नफ्याच्या हव्यासामुळे बिघडलेले हवामान:
कामगार-कष्टकऱ्यांचा घेतेय बळी!
✍ललिता
गेल्या काही वर्षांपासून हवामानाच्या बदलत्या लहरी सर्वांच्या लक्षात येत आहेत! अवकाळी पाऊस, प्रचंड पाऊस, पूर-महापूर, दुष्काळ, वादळे, चक्रीवात, कुठे नद्यांच्या पाण्यात घट, कुठे बारमाही नद्या आटणे, कुठे जास्त थंडी, कुठे जास्त उन्हाळा हे सगळे आता हवामान खात्याने सांगायची गरज राहिलेली नाही, कारण ते तुम्हा आम्हा सर्वांच्या लक्षात येत आहे. याबद्दल एकतर भांडवली मीडिया गप्प आहे किंवा भ्रम पसरवत आहे. या सर्व बदलांचा सर्वात मोठा फटका बसत आहे तो कामगार कष्टकरी वर्गाला, आणि या बदलांचे खरे कारण आहे नफ्याची-बाजाराची व्यवस्था: भांडवलशाही. या बदलांची भीषणता, त्याचे होणारे परिणाम आणि याला भांडवलशाही कशी जबाबदार आहे ते समजणे आवश्यक आहे.
भारतात व जगात हवामान बदलाचे परिणाम, आणि पुढील अंदाज
केवळ या वर्षीच, संपूर्ण भारतभर अत्यंत तीव्र हवामानाच्या अनेक घटना घडल्या. यांमध्ये उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेच्या सुरुवातीपासून ते ईशान्येकडील राज्यांमध्ये अलिकडच्या वर्षांतील सर्वात भीषण पूर सामील आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा भागात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे; यामागे हा प्रदेश अधिक दुष्काळग्रस्त होणे सुद्धा एक कारण आहे. या वर्षी पावसाने 45 लाख शेतकर्यांची पिके नष्ट केली आहेत. जून 2022 मध्ये मराठवाड्यात 108 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्यामागे शेतीची बिघडती स्थिती, आणि त्यामागे हवामान बदल हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे.
आपल्या मान्सून अहवालामध्ये भारतीय हवामान खात्याने 30 सप्टेंबर रोजी जाहीर केले की देशात सर्वसाधारण पाऊस झाला आहे, आणि सहा टक्के जास्त पाऊस पडला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की काही दिवस जास्त पाऊस असूनही, एकूणच देशातील 27% भागात कमी पाऊस झाला आहे. अहवालाने असेही भाकीत केले आहे की मान्सूननंतरही पाऊस सुरूच राहील आणि हे खरे ठरले कारण भारताच्या हवामान खात्याने जाहीर केले आहे की ऑक्टोबरमध्ये भारतात सामान्यपेक्षा 47 टक्के जास्त पाऊस पडला आहे आणि “नोव्हेंबरमध्ये सामान्यपेक्षा 23% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे”.
हवामान बदलाचा भारताला आधीच मोठा फटका बसला आहे. देशभरातील विक्रमी प्रदूषण पातळीसह, हवामान बदलामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. अधिक अनिश्चित पावसाळा तांदूळ, कडधान्ये आणि गहू यासारखे मुख्य अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या लागवड आणि कापणी चक्रावर परिणाम करत आहे. या वर्षी अवकाळी पावसामुळे धान्याची भीषण तूट होऊ शकते, ज्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात आणि कष्टकरी जनतेच्या दुःखात भर पडू शकते, असा अंदाज आहे. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटच्या अहवालात असे नमूद केले आहे की 2022 च्या पहिल्या 9 महिन्यांत जवळजवळ दररोज एक नैसर्गिक संकट आले आहे. या संकटांमध्ये हिमाचल प्रदेशात मृत्यूची संख्या सर्वात जास्त होती, तर आसाममध्ये सर्वाधिक प्राण्यांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि कर्नाटकात हवामान बदलामुळे देशातील प्रभावित पीक क्षेत्राचा सर्वात जास्त वाटा आहे. अनियमित पावसामुळे पक्षी आणि इतर स्थलांतरित प्राण्यांच्या स्थलांतरण पद्धतीतही व्यत्यय येतो, असे दिसून आले आहे.
नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार भारत देश एकाच वेळी “दुष्काळाचे ठिकाण” तर आहेच, पण सोबतच 2050 पर्यंतपावसात 15-30% वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे आहे. याचा अर्थ आहे की देशात एकंदरीत पाऊस वाढणार आहे, पण देशातील अनेक ठिकाणी दुष्काळही वाढणार आहे. वर्षानुवर्षे देशात तापमानात वाढ, पूर, दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ, चक्रीवादळ आणि हवामानातील इतर बदल होत आहेत. `डाउन टू अर्थ’ नावाच्या नियतकालिकाने देशाचे तापमान 1.5 अंशांनी वाढल्यास पर्जन्यवृष्टीतील बदलांचे प्रमाण काढले आहे आणि अंदाज वर्तवला आहे की पावसाची वाढ असमानपणे वितरीत होण्याची शक्यता आहे. म्हणजे देशात सगळीकडे सारख्या प्रमाणात नाही, तर असमान पाऊस वाढेल. यामध्ये, वायव्य भारतात सर्वाधिक पर्जन्यवाढ अपेक्षित आहे.
हवामान बदलाची शिक्षा भोगताहेत कामगार–कष्टकरी
भांडवलशाही निर्मित हवामान बदलामुळे स्थलांतरण पद्धती, प्राण्यांमध्ये अराजकता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे साथीच्या रोगांची वारंवारता वाढू शकते. वेगवेगळ्या प्रजातींमध्ये आणि नंतर मानवांमध्ये विषाणूंचे संक्रमण अधिक आरोग्य सेवेचे संकट निर्माण करू शकते. वाढत्या पावसाने घरे उद्ध्वस्त केली आहेत; ज्यांनी प्रत्येक रुपया वाचवून कष्टाने घरे बांधली, त्या कष्टकरी जनतेची घरे वाहून गेली आहेत. या वर्षी बंगळुरूमध्ये दिसून आले की शहरातील पूरग्रस्त भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबांनी बोटींची व्यवस्था करून स्वतःची सुटका केली; परंतु श्रमिक वर्गातील कुटुंबांमध्ये हाहाकार माजला कारण अनेक लोक अन्न, पाणी किंवा वीज नसताना त्यांच्या पूरग्रस्त घरात अडकले. कष्टकरी जनतेसमोर परिसरात पूर आल्यास “घरून काम करणे” किंवा कामातून विश्रांती घेण्याचा पर्याय नाही. पावसाळ्यात वीज खंडित झाल्यास वापरण्यासाठी कामगारांच्या घरात इन्व्हर्टर बसवलेले नाहीत! प्रचंड पाऊस असतानाही इतरांच्या घरांमध्ये घरकामगार म्हणून काम करण्यास जाण्यासाठी, झोमॅटी-स्विगी सारखे “गीग” काम करण्यासाठी, कारखाने-वर्कशॉप्स मध्ये जाण्यासाठी कामगारच पूरग्रस्त भागातून फिरत राहतात, कचऱ्यातून चालत राहतात, जीव धोक्यात घालतात आणि सर्दी, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया यांसारख्या अनेक संसर्ग आणि आजारांना बळी पडतात. शहरे ठप्प झालेली असताना सुद्धा कामगारांना मात्र त्यांच्या “डिल्हीवरी”च्या शोषणकारी कामावर जाण्यासाठी लांब पल्ल्याचे प्रवास करावे लागत आहेत!
शहरांचे मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण होत आहे, आणि शहरांमध्ये तलाव साचत आहेत कारण पावसाचे पाणी जायला कोठेही जागा नाही. ते मातीत शोषले जात नाही आणि सांडपाण्याच्या व्यवस्था एवढ्या मोठ्या पावसाचे पाणी हाताळण्यासाठी सुसज्ज नाहीत कारण देशभरातील बहुतेक शहरे अनियोजित आणि अव्यवस्थित रीतीने वाढली आहेत आणि वाढत्या कचर्याने गुदमरत आहेत. या वाढत्या, अनिर्बंध शहरीकरणामागे कारण काय आहे? तर जास्त नफ्याच्या हव्यासापोटी बिल्डर लॉबी, उद्योजकांकडून केला गेलेला “अनिर्बंध” विकास ज्यामध्ये निसर्गाचा, जनतेच्या होऊ शकणाऱ्या हालापेष्टांचा विचारही केला जात नाही आणि मजल्यांवर मजले चढवले जातात, प्रत्येक उपलब्ध जागेत कोंबून घरे बांधली जातात, उपलब्ध सार्वजनिक सुविधांवर अतिताण आणला जातो कारण काही जागी किमती जास्त मिळू शकतात!
संकटे येतात तेव्हा सरकारकडून देण्यात येणारी मदत नेहमीच खूप उशिरा आणि अपुरीच मिळते. तात्कालिक मदतकार्य सुद्धा उशिराच पोहोचते आणि ज्या कुटुंबांचे सामान हरवले आहे आणि हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे अशा कुटुंबांना मदतीचा हात मिळत नाही.
पर्यावरण संकटाला भांडवलशाही जबाबदार कशी?
वारंवार येणारे पूर, वाढता पाऊस, अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटा या सर्वांचे मूळ आज आपला समाज ज्याप्रकारे आर्थिकदृष्ट्या चालत आहे, म्हणजेच भांडवली पद्धतीने चालत आहे, त्यात आहे. भांडवली व्यवस्थेमध्ये उत्पादन फक्त नफ्यासाठी केले जाते. नफ्याची हव्यास एकीकडे अति-उत्पादन करवते पण ते सुद्धा लोकांची गरज भागवण्यासाठी नाही, तर विकून नफा कमावण्यासाठीच. त्यामुळेच शेतमाल, कापड, इलेक्ट्रॉनिक, गाड्यांसारख्या अनेक वस्तूंचे अति-उत्पादन होते आणि न विकलेल्या मालाचा नाश सुद्धा केला जातो, पण कामगार-कष्टकरी जनतेपर्यंत मात्र वस्तू पोहोचवल्या जात नाहीत. याच उत्पादनाच्या प्रकियेमध्ये इंधन जाळले जाते आणि कार्बन डायऑक्साईड सारख्या वायंचे उत्सर्जन वाढते, ज्यामुळे तापमान वाढ झाली आहे, आणि अजून होत आहे. भांडवली उत्पादनाच्या प्रकियेतच माणसांचे जसे शोषण केले जाते तसेच निसर्गाच्या क्षमतांचा, पुनर्निमितीक्षमतेचा विचार न करता निसर्गालाही ओरबाडले जाते. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड, शेतजमिनीचा वापर, मातीचे आवरण नष्ट करणे, औद्योगिक प्रदूषण यामुळे हवामानात अभूतपूर्व बदल झाला आहे. जनतेची गरज भागवण्यासाठी नाही, तर नफ्यासाठी उत्पादन होत असल्यामुळेचे हे होते! पृथ्वीवरील आपत्ती, साथीचे रोग आणि संकटांच्या लाटांनंतर लाटा पृथ्वीचा नाश करत आहे याची पर्वा न करता भांडवलदार वर्गासाठी नफाच सर्वोच्च आहे. “माणूस हे विषाणू आहेत”, “सर्व दोष माणसाचा” आहे अशा घोषणा देऊन पर्यावरणीय संकटांचा दोष “सर्व” माणसांवर टाकण्याचा निर्लज्ज उद्योग भांडवलदार वर्गाचे आणि त्यांची सेवा करणार्या सरकारांचा प्रयत्न आहे. दोष “माणसांचा” नाही, तर भांडवली व्यवस्थेचा आहे! दोष “माणसाच्या हपापलेपणाचा” नाही तर नफ्याला हपापलेल्या भांडवलदार वर्गाचा आहे!
सरकारे काही करत का नाहीत?
जगभरातील सरकारे वर्षानुवर्षे आंतरराष्ट्रीय परिषदा आणि शिखर परिषदांमध्ये पृथ्वीच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात, “मदर नेचर”चे म्हणजे पृथ्वीमातेचे संरक्षण करण्यासाठी भावनिक आवाहने करतात, परंतु या सर्व दिखाव्याच्या सभांमधून काहीही साध्य होत नाही. खरेतर हा ओरडा होत असताना पडद्यामागे तापमान वाढीमुळे होणाऱ्या विनाशातही धंद्याची संधी हे भांडवलदार शोधत असतात. आम्हाला पृथ्वीची काळजी आहे असे भांडवलशाहीवर विश्वास असणाऱ्यांना भासवायला यांना फार आवडते. सत्य तर हे आहे की जगातील सत्ताधाऱ्यांना, सरकारे चालवणाऱ्या भांडवलदार वर्गाला जागतिक तापमान वाढीची फार पूर्वीपासूनच कल्पना होती! त्यांच्या प्रदूषक कारखान्यांमधून उत्सर्जित होणारे विषारी वायू, सागरी आणि मानवी जीवनावर परिणाम करणारी घातक रसायने या सर्वांची त्यांना नेहमीच जाणीव होती. त्यांची उत्पादने क्रूरता मुक्त आहेत आणि नैतिकदृष्ट्या योग्य आहेत असे आश्वासन देऊन ते आपल्याला फसवतात; पण सत्य हे आहे की श्रमशक्ती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रचंड शोषणच भांडवली उत्पादन घडवते. या व्यवस्थेचे रक्षण करणे हेच प्रस्थापित राज्यसत्तांचे काम आहे, आणि म्हणूनच दिखावा सोडून ते काहीच करत नाहीत!
कसे वाचेल पर्यावरण? कोण वाचवेल?
या देशातील कष्टकरी जनतेसाठी पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणीय विनाशाचे हे चक्र संपवण्यासाठी एकत्र येणे आणि भांडवलशाही सुधारण्यासारख्या निरर्थक विचारांचा त्याग करणे, कारण श्रीमंत लोक पृथ्वीवर घडवून आणलेल्या कहरामुळे तुलनेने अप्रभावितच राहतात! जर आपण भांडवलशाही संपवली आणि मानवी हितासाठी किंवा पर्यावरणाच्या संवर्धनात रस नसलेल्या लोभी परजीवी भांडवलदार वर्गाच्या इच्छेप्रमाणे जग न चालवता, मानवी गरजांसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करणारे नवीन जग तयार केले, समाजवादाचे जग तयार केले, तर एक चांगले भविष्य आपली वाट पाहत आहे! भांडवलदारांनी पृथ्वीला आग लावली आहे, आता सत्ता हातात घेणे, ही आग विझवणे आणि जिथे पृथ्वी आणि तिचे सर्व रहिवासी सहजीवनात राहतात अशा चांगल्या भविष्यासाठी बीज पेरणे ही कामगार वर्गाची जबाबदारी आहे. पुढील पिढ्यांसाठी समाजाचा आणि पृथ्वीचा कायापालट करण्यासाठी आजच्या शोषक समाजात अस्तित्वात असलेले वर्गीय संबंध नष्ट करणे आणि शोषणविरहित समाज निर्माण करणे, हाच पर्यावरण वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे! याकरिता लढ्यांना नेतृत्व देत, आपल्या पुढील पिढ्यांसाठी पृथ्वीला वाचवण्याची गंभीर जबाबदारी कामगार वर्गाच्याच खांद्यावर आहे!
कामगार बिगुल, नोव्हेंबर 2022