अजून लढणे बाकी आहे

✍मुक्ता

पहाट झाली, सूर्य उगवला

उजेड तरीही अपुराच आहे

अंधाऱ्या खोलीत या माझ्या

दारिद्र्याचे अमाप राज्य आहे…

बापाला अस्थमा मग पदरी ग्रॅज्युएशन

नोकरी तरीही दुरापास्त आहे

अस्थमाच्या औषध पाण्याचा खर्च

डिग्री विकून थोडीच भागणार आहे…

नोकरीच्या वाटेकडे डोळे लावून

जिंदगी खर्ची पडली आहे

हिच्या दोन घरांच्या धुणी-भांड्यांवर

आमच्या संसाराचा पंगूगाडा चालला आहे …

मुलगा म्हणतो मोबाईल पाहिजे

ऑनलाईन वर्गात बसायचं आहे

बायकोला वाटतं शिक्षण पुरे

माझ्या गरिबीत एक वाटा तिचा सुद्धा आहे…

मुलगा आता जातो कामाला

म्हणे ठेकेदार माझा दिलदार आहे

2 पैसे जास्त गेले तरी

‘भैय्याला’ नाही मलाच कामाला नेत आहे…

मालकाचं आवडतं शस्त्र

आता मुलावरही उगारलं आहे

‘कामगारांमध्ये फूट पाडा

बाकी सगळं मग आपलचं आहे!’

मालकाने लढाई सोडली नाही

मी का गप्प आहे …

मुलाला आता सांगावे लागेल

माझी – त्याची, खरी ओळख काय आहे…

पूर्वी कामाला जायचो कारखान्यात

वेतन सुई एवढं, मालकाला नफा आकाशाएवढा

आम्ही कामगारांनी संप केला

आता कारखाना बंद आहे…

चार भिंतींच्या ह्या ठोकळ्यात

आयुष्य आमचे बंदिस्त आहे

लढून सुद्धा काही मिळाले नाही

म्हणजेच,

अजून लढणे बाकी आहे!

राजरोस चालते श्रमाची लूट

कामगार फक्त खटतो आहे…

आपला स्वर्ग मेल्यावर मात्र

मालक माडीवर माडी चढवत आहे…

सूर्व्यांच्या त्या ओळींची

मनात सतत आठवण आहे

तू सुद्धा हृदयात कोरून घे

‘ कामगार आहे मी तळपती तलवार आहे ‘

जिंदगीत नसले काही जरी

एक गोष्ट कायम आहे

ह्या दारिद्र्यातुन मुक्तीचा मार्ग

कामगारांच्या सत्तेतच आहे …

सगळे म्हणता सर्वकाही हरलो आपण

आपल्याकडे हरण्यासाठी काय आहे?

कामगाराकडे हरण्यासाठी काय असतं?

जिंकण्यासाठीच्या गोष्टींची अमर्याद यादी आहे …

नवी लढाई नव्या जोमाने

आता परिस्थिती बदलली आहे

कामगार आहे विखुरलेला

नव्या योजनांची गरज आहे …

बायको दुजोरा देत म्हणाली, चला लढूया नव्याने

लढणं आपला अधिकार आहे

हॉस्पिटल, शाळा, घर, नोकरी

मिळवायची आहे, हक्काची आहे …

आज नसला घरात उजेड

पण उद्याचा सूर्य आपलाच आहे

इतिहासातून शिकू, भविष्य घडवू

आजही मालकाच्या डोळ्यांत

कामगार एकजुटीची भीती आहे …

नवा उन्मेष, डफलीवर नवी थाप

नव्या क्रांतीचं गीत आपल्या ओठांवर आहे

थकलेल्या, हरलेल्या, निजलेल्या सर्वांना सांगूया

अजून लढणे बाकी आहे…

अजून लढणे बाकी आहे …