लव्ह जिहादचे षडयंत्र हाणून पाडले!
शाहबाद डेअरी मध्ये साक्षीच्या हत्येला लव्ह जिहादचं स्वरूप देऊ पाहणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रचाराला क्रांतिकारी कामगार वर्गाने हाणून पाडले!
✍ अश्विनी
28 मे रोजी दिल्लीमध्ये शाहबाद डेअरी येथे 16 वर्षीय साक्षी एका बर्थडे पार्टीला जात असताना तिचा पूर्वीचा मित्र साहिलने रस्ता अडवून तिची हत्या केली. त्याने तब्बल 34 चाकूचे वार केले, एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानंतर दगड घेऊन तिचे डोके, कंबर ठेचून काढले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली, ज्यातून आपण पाहू शकतो की ही हत्या किती निर्दयीपणे केली गेली. त्याचवेळी आजूबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या जनतेने मात्र या घटनेत कोणताही हस्तक्षेप केला नाही हे सुद्धा दिसते.
शाहबाद डेअरी मध्ये घडलेली ही काही पहिली घटना नाही. महिलाविरोधी, मुलींविरोधी अत्याचार इथे सततच घडत असतात. चौकाचौकात मुलींची छेड काढणे, त्यांचा रस्ता अडवणे ह्या दररोज घडणाऱ्या घटना आहेत, कारण साहिल सारख्या लंपटांना राजकीय आश्रय देणारे भांडवली पक्षही येथे आहेत. वस्तीत वाढणारी नशाखोरी, गुंडगिरी ह्याच पक्षांच्या नेत्यांमार्फत, दलाल-चेल्या-चपाट्यांमार्फत वाढवली जाते आणि अशा पाळलेल्या गुंड-चमचे-दलालांच्या जोरावरच निवडणुकांच्या वेळी यांना मतं मिळवणे शक्य होते. शाहबाद डेअरी सारख्या वस्त्यांमध्ये विविध कारणांवरून सतत ताणतणाव असतात, त्यातून एकमेकांचे सर्रास खून केले जातात. काही बातम्यांनुसार काही काळापूर्वी ह्याच भागात दोन वेगवेगळ्या वेळी नाल्यात तरुणांचे मृतदेह वाहून जाताना आढळले. एकदा तर रस्त्याच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह पडलेला दिसला. परंतु त्या वेळी सुद्धा प्रशासनाची ना कुठलीही त्वरित हालचाल दिसली, ना गुन्हेगारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. यातूनच दिसून येते की शाहबाद डेअरी सारख्या ठिकाणी पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना एकाप्रकारे खुले रानच मिळालेले आहे.
28 मे ला ही घटना घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संघ भाजपच्या विविध संघटना म्हणजे आरएसएस, बजरंग दल मिळून घटनेला धार्मिक वळण देण्यासाठी खोटा प्रचार घेऊन वस्तीत आले. साहिल मुस्लिम धर्मातून येत होता आणि साक्षी हिंदू, म्हणून हे लव जिहादचे प्रकरण होतं, ह्याप्रकारचं धार्मिक विष पेरत उजव्या संघटना सक्रिय झाल्या. त्यावेळेस भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाच्या (आर.डब्ल्यु.पी.आय.) नेतृत्वात स्थानिक जनतेनेच या प्रकरणात साहिलला शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु अशा घटना अगोदरही होत आल्यात, आणि इथे धर्माचा काही संबंध नाही ही भुमिका घेत धर्मांध प्रचारकांना हाकलून लावले. यानंतर भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाकडून गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे ही मागणी घेऊन संपूर्ण शाहबाद डेअरी भागातून रॅली काढण्यात आली. अगोदरचे लव्ह जिहादचं षडयंत्र अपयशी ठरल्यामुळे नंतर मुस्लिमांविरोधात विष पेरणारी सभा हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजित केली. ह्या सभेलाही शह देण्यासाठी भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाने ( आर.डब्ल्यु.पी.आय.) त्याच दिवशी जवळच आपली कामगारांची सभा ठेवली आणि वरील संघी प्रयत्नांनाही उलथवून लावले. पक्षातर्फे सतत कामगार एकतेचा प्रचार प्रसार करत प्रचार मोहिमा काढण्यात आल्या. आर.डब्ल्यु.पी.आय. कार्यकर्त्यांसोबत कामगारांनी शपथ घेतली की अशा धार्मिक प्रचाराना बळी पडणार नाही आणि वर्गीय एकता राखून अशा घटनांना विरोध केला जाईल. स्त्रियांना स्वतःच्या सुरक्षेबाबत आत्मविश्वास वाढावा, अशा गंभीर अत्याचारांना विरोध करता यावा म्हणून आर.डब्ल्यु.पी.आय. तर्फे ‘दुर्गा भाभी स्क्वाड’ ची स्थापना केली गेली आहे, ज्यामध्ये नियमित रूपाने वस्तीतील इच्छुक मुलामुलींसाठी कवायत, कराटेचे प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे.
एन.सी.आर.बी. 2022 अहवालानुसार दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर आहे. तिथे दर दिवसाला 2 लहान मुलींवर बलात्कार होतात. पूर्ण देशाची आकडेवारी पाहिल्यास लक्षात येते की देशभरात दर दिवसाला 87 बलात्कार होतात. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत 15.8 टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. 2020 मध्ये ही संख्या 3,71,503 होती तर 2021 मध्ये वाढून 4,28,278 झाली. बलात्कार करून हत्या करणे अशा अत्याचाराचे क्रूर स्वरूप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामागे एक मुख्य कारण आहे भांडवली बाजारी व्यवस्थेने सतत चालवलेले स्त्री देहाचे बाजारीकरण.
1991 पासून भारतात ‘खाऊजा’ धोरण अवलंबले गेले. यातून एक नवधनाढ्य वर्ग उदयाला आला. असा परजीवी वर्ग जो बसल्या बसल्या अगणित पैसा लुटत आहे आणि आर्थिक व राजकीयरित्या मजबूत झाला आहे. अर्थातच कायदे, न्यायव्यवस्था, सरकारं खिशात ठेवून विविध स्त्री विरोधी, कामगार विरोधी अपराध करताना यांना कुणाची चाड नसते. ह्या वर्गाने फेकलेल्या तुकड्यांवर पोसला जाणारा एक दुसरा लंपट वर्ग आहे जो कामगार वर्गातून असला तरी तो कामगार वर्गापासून पूर्णतः कटलेला असतो आणि पैशासाठी अपराध करायला सुद्धा तो तयारच असतो. मानवतेच्या सर्व शर्ती ह्या वर्गाने गमावलेल्या असल्याने कितीही घृणीत कृत्ये करताना ह्यांना कसलीही लाज नसते. अशामध्ये स्त्रीकडे बघण्याचा उपभोगवादी दृष्टीकोन पसरवणारी व्यवस्था रोजच काम करत आहे. नफेखोर भांडवली व्यवस्थेत प्रत्येक वस्तूची निर्मिती नफ्यासाठी होते. स्त्रीदेह, मानवी नाती ह्यांचेसुद्धा बाजारीकरण ह्या व्यवस्थेत केले जाते. स्त्रीला माणूस म्हणून न बघता वस्तू म्हणून बघणे, स्त्रीदेहाला उपभोगाची वस्तू म्हणूनच पाहणे याचा प्रचार रोजच जाहिराती, दर्जाहीन सिनेमे या माध्यमातून बाजाराची व्यवस्था करत असते, आणि यातून निर्माण झालेल्या मानसिकतेतूनच एखाद्या वापरलेल्या वस्तूप्रमाणे स्त्रिची विल्हेवाट लावण्यासारखे अमानवीय कृत्य क्षुल्लक वाटू लागते.
यात भर म्हणून 2014 पासून संघ भाजपचे मोदी सरकार सत्तेत आल्यापासून स्त्रिविरोधी अपराधांना जणू पुर आला आहे. भाजपा हा एक असा पक्ष आहे ज्यात केंद्रात बसलेल्या मंत्र्यांपैकी, आमदार/खासदारांपैकी 40 टक्क्यांपेक्षा जास्त मंत्र्यांवर बलात्कार, हत्यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलीकडचीच काही उदाहरणे हे स्पष्ट करतील. 2002 गोध्रा हत्याकांडामधील सामूहिक बलात्कार पीडिता बिल्कीस बानोच्या गुन्हेगारांची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्याआधीच गुन्ह्यातून मुक्तता केली आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचा हार-तुरे देऊन सत्कार केला गेला. स्वामी चिन्मयानंद आणि हाथरस घटनेतील बलात्कारांच्या समर्थनार्थ यात्रा काढण्यात आल्या. 40 पेक्षा जास्त पहिलवानांवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या ब्रिजभूषण सिंहसारख्या खासदाराला अजूनही अटक झालेली नाही! मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढली गेल्याचे अमानवियतेची हद्द गाठणारे कृत्य देखील ह्याच सत्ताधाऱ्यांच्या काळात घडले! उदाहरणांची कमी नाहीच. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ नारा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे महिलाविरोधी चरित्र ओळखायला वरील उदाहरणे पुरेशी आहेत. अशामध्ये शाहबाद डेअरी मधील साक्षीच्या हत्येला दिला गेलेला धार्मिक रंग देखील हेच स्पष्ट करतो की वाढते महिला अत्याचार रोखणे नाही, तर ह्या घटना वाढून जनतेत धार्मिक अस्मिता कशा भडकावता येतील आणि त्याआधारे जनतेला विभागून राज्य कसे करता येईल हे भाजपचे उद्दिष्ट आहे. सत्तेचेच समर्थन असताना स्त्रिविरोधी अत्याचार वाढणार नाहीत तर काय?
हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की ‘लव्ह जिहाद’ हे एक थोतांड आहे, सतत सांगून खरे भासवले गेलेले एक धादांत असत्य आहे. मुस्लिम समुदायाकडून नियोजनबद्ध पद्धतीने हिंदू मुलींना फसवून लग्नाच्या जाळ्यात ओढण्याचे षडयंत्र केले जात आहे, ही बाब सर्वथा खोटी आहे. केरळ, कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये पोलिस तपास, एन.आय.ए. चे तपास यांमध्ये स्पष्टपणे समोर आले आहे की असे कोणतेही षडयंत्र अस्तित्वात नाही. गृहमंत्रालयाने सुद्धा लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही असे कबुल केले आहे. परंतु एक असत्य अनेक वेळेस सांगून त्याला सत्य बनवण्याच्या हिटलर काळातील गोयबेल्स नितीचा वापर करून लव्ह जिहादचा खोटा प्रचार हिंदुत्ववादी करत आलेत, जेणेकरून कामगार कष्टकरी जनता जाती धर्माच्या नावावर एकमेकांचा द्वेष करेल आणि जगण्यासाठीचे खरे प्रश्न, जे पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले आहे, त्यापासून जनतेला दूर ठेवता येईल.
शहाबाद डेअरीच्या प्रकरणातून हे समजून घ्यावे लागेल की जाती-धर्म बाजूला ठेवून बनलेल्या व्यापक कामगार-कष्टकरी जनतेच्या एकजुटीशिवाय खोटा प्रचार हाणून पाडणे शक्य नव्हते. योग्य क्रांतिकारी कामगार वर्गीय विचारांचा प्रचार करूनच, कामगार कष्टकरी जनतेची व्यापक एकजूट करूनच, फॅशिझमला हरवले जाऊ शकते आणि हिंदुत्ववाद्यांचा प्रचार हाणून पाडला जाऊ शकतो, हे समजून आपल्याला त्या दिशेने मार्गक्रमण करावे लागेल