मदर जोन्स : कामगारांची लाडकी आजी आणि भांडवलदार वर्गासाठीची “सर्वात धोकादायक स्त्री”
स्वातंत्र्य आणि समतेसाठीच्या कामगार वर्गाच्या दीर्घ काळच्या लढाईने शेकडो अशा महिलांना जन्म दिला आहे ज्यांनी केवळ नफेखोरांच्या मनात दहशत निर्माण केली नाही, तर त्या नव समाजाच्या निर्मितीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या नवीन पिढीच्या प्रेरणास्तंभ बनल्या आहेत. अशा स्त्रियांपैकी एक होत्या अमेरिकेमधील मैरी जोन्स! कामगार त्यांना प्रेमाने मदर जोन्स म्हणत असत तर भांडवलदार त्यांना “अमेरिकेतील सर्वात धोकादायक स्त्री”!
१ मे,१८३० रोजी आयर्लंड मध्ये जन्मलेल्या मैरी हैरिस १८३८ मध्ये आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेमध्ये आल्या. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीस कपडे शिवण्याचे आणि त्यानंतर शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. १८६१ मध्ये त्यांनी पोलाद कारखान्यात काम करणारे कामगार आणि ट्रेड युनियन कार्यकर्ता जार्ज जोंसबरोबर विवाह केला. परंतु लग्नानंतर ६ वर्षांच्या आतच काविळीच्या साथीमध्ये त्यांच्या पतीचा आणि चार मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मैरी जोंस शिकागोला राहण्यासाठी आल्या आणि कपडे शिवण्याचे काम करू लागल्या. परंतु काही काळानंतरच १८७१ मध्ये शिकागो मध्ये लागलेल्या आगीमध्ये त्यांचे घर जळून राख झाले. त्यानंतर त्यांनी एका चर्चच्या तळघरात शरण घेतली. असेच एका दिवशी रस्त्यांवर भटकत असताना त्या ‘नाइट्स ऑफ लेबर’ नामक कामगार संघटनेच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्या बैठकांना जाऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी कामगार आंदोलनामध्ये स्वतःचे सर्वस्व झोकून दिले आणि आयुष्यभर त्यांनी कामगार चळवळ पुढे नेण्यासाठी योगदान दिले. कामगारांना संघटीत करण्यासाठी त्या देशभर फिरून आपल्या उत्साही भाषणांनी कामगारांना प्रोत्साहित करू लागल्या. यूनियन संगठनकर्त्याच्या रूपातील आपल्या कित्येक दशकांच्या दीर्घ आयुष्यात मैरी हैरिस जोंस यांनी कोळसा उद्योग, कापड उद्योगामधील बाल कामगारांना, रेल्वे वाघिणी बनवण्याच्या कारखान्यांमधील व खनिज उत्खनन उद्योगातील कामगारांना संघटीत केले. मदर जोंसने तिच्या आयुष्याचा दीर्घ कालावधी खाण कामगारांना संघटीत करण्यात व्यतीत केला. वेस्ट वर्जीनिया व पेनसिल्वेनिया प्रांतामधील कामगारांना युनियन बनवण्याचा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची ४० वर्षे खर्ची घातली. एका इतिहासकाराच्या शब्दांमध्ये, “खाण कामगारांच्या संघर्षांमध्ये त्या दरी-खोरे पार करून पत्रके वाटण्याचे काम पार पडत असत. वेळप्रसंगी निर्भीडपणे बंदुकांच्या समोर उभ्या ठाकत आणि नेहमीच शिपायांना “हिम्मत असेल तर एका म्हाताऱ्या स्त्रीला गोळी मारा” असे खोचक आव्हान देत असत.
मदर जोंसने कामगार वस्त्यांमधील स्त्रियांना संघटित करून त्यांना कामगार वर्गाच्या हिताच्या लढाईमध्ये सक्रिय केले आणि त्यांना कामगार चळवळीचा महत्वाचा भाग बनवले. त्यांचे एक सर्वात प्रभावी हत्यार होते – “भांडी-थाळी ब्रिगेड”! १९०० मध्ये पेनसिल्वेनिया मधील कोळसा कामगार जेव्हा संपावर गेले होते तेव्हा मदर जोंसने स्त्रियांना संघटित करून संप तोडू पाहणाऱ्यांना संपकरी कामगारांच्या जागी कारखान्यात काम करण्यास जाण्यापासून रोखले होते. ह्या सगळ्या स्त्रिया कोळसा खाणींच्या गेट वर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या हातातील भांडे, थाळ्या जोरजोरात वाजवून आणि झाडू उंचावून गद्दार कामगारांना तिथून पळवून लावले. मदर जोंसने तिच्या एका पत्रामध्ये लिहिले आहे, “त्या दिवसापासून सर्व कामगार स्त्रिया कोळसा खाणींच्या गेटवर नजर ठेऊ लागल्या, जेणे करून कंपनी संप तोडण्यासाठी बाहेरून कामगार आणू शकणार नाही. प्रत्येक दिवशी कामगार महिला एका हातात झाडू, पातेली घेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये शालमध्ये गुंडाळलेली त्यांची चिमुकली बाळे घेऊन खाणींवर जाऊ लागल्या. त्यांनी कोणालाही खाणींच्या आत घुसू दिले नाही. सूत मिल्स आणि कोळसा खाणींमध्ये बाल कामगारांकडून ज्या परिस्थितीमध्ये काम करवून घेतले जात असे, ते पाहून मदर जोंस रागाने लाल होत असे. बाल कामगारांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी दक्षिणेकडून कपड्यांच्या कारखान्यांमध्ये काम सुद्धा केले. केनसिंगठन मध्ये १९०३ मध्ये कपडा मिल कामगारांच्या संपाला समर्थन मिळवून देण्यासाठी तिथे गेलेल्या मदर जोंस त्यांच्या त्या अनुभवाबद्दल लिहितात, “दररोज छोटी-छोटी मूले युनियनच्या कार्यालयात येत असत. कोणाचा हात चिरडला गेला असायचा, कोणाचा अंगठा गायब झालेला असायचा तर कोणाची अख्खी बोटे तुटलेली असायची. ही मुले त्यांच्या वयापेक्षाही लहान भासत, अगदी अशक्त आणि रोगट. त्यांपैकी कित्येक मुलांचे वय दहा वर्षेसुद्धा नसेल, जरी स्थानिक कायद्यानुसार १२ वर्षाखालील मुलांना कामगार म्हणून ठेवण्यास मनाई होती.” मदर जोन्स लहानग्यांचे शोषण थांबवण्यासाठी कायदा बनवण्यासाठीच्या मागणीसाठी मुलांचा एक मोठा मोर्चा घेऊन राष्ट्रपति थिओडोर रूजवेल्ट यांना भेटावयास गेल्या, जे त्यावेळी न्यूयार्क मधील बंगल्यावर सुट्ट्या घालवत होते. राष्ट्रपतींनी त्यांना भेटण्यास नकार दिला. पण जनतेच्या दबावाखाली पेनसिल्वेनियाच्या विधानसभेला बाल कामगार कायद्यात सुधारणा करावी लागली. मदर जोंस शंभर वर्षे जगल्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या अमेरिकेतील कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठीच्या संघर्षात कुठल्या न कुठल्या प्रकारे सहभागी होत राहिल्या.
दीर्घ संघर्षाच्या ह्या काळात अमेरिकेच्या कामगारांनी बरेच अधिकार प्राप्त केले आणि नरकप्राय, गुलामगिरीच्या जगण्यातून स्वतःची मुक्ती करून घेतली. अमेरिकी भांडवलदारांनी जगभरातील कष्टकरी जनतेचे शोषण करून आपल्या देशातील कामगारांना बऱ्याचश्या सुविधा सुद्धा दिल्या. ह्याच सुविधाप्राप्त कामगारांमधून बाहेर पडलेल्या खात्या-पित्या कुलीन कामगारांनी अल्बर्ट पार्सन्स व मदर जोंस यांसारख्यांची महान परंपरा असलेल्या अमेरिकन कामगार चळवळीला कलंकित केले आहे. परंतु भारतासहित तिसऱ्या जगातील करोडो कामगार तश्याच पद्धतीचे नारकीय जीवन जगात आहेत ज्या विरुद्ध शंभर वर्षांपूर्वी मदर जोंस यांनी संघर्ष केला होता. त्या सर्वांसाठी मदर जोंस यांचे जीवन प्रेरणेचा न अटणारा स्रोत आहे.
कामगार बिगुल, ऑगस्ट २०१५