राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देशाचा स्वातंत्र्यलढा

नारायण खराडे 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देशाचा स्वातंत्र्यलढासध्या समस्त भारतीयांना राष्ट्रप्रेमाचा अर्थ समजावून सांगण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या मित्र संघटनांनी आपल्या शिरावर घेतलेली आहे. त्यामुळे भारत माता, हिंदू राष्ट्र, सनातन धर्म, प्राचीन संस्कृती यांसारख्या संघाच्या आवडीच्या संकल्पनांचे निखारे वणव्याचे रूप घेऊ लागले आहेत. या गदारोळात संघाच्या या संकल्पनांना विरोध करणाऱ्या, तसेच संघावर कोणत्याही स्वरूपाची टीका करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संघ देशद्रोही ठरवीत आहे. अर्थात देशभक्ती आणि देशद्रोहाचे सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार संघाला कोणीही दिलेला नाही, हे खरेच, तरीही संघाच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही ९० वर्षांचा इतिहास, देशभरात ५१३३५ शाखा आणि सुमारे ६० लाख स्वयंसेवक (सक्रिय सदस्य) असलेली संघटना आहे. इतकेच नाही तर गेल्या ५ वर्षांत संघाच्या दैनिक शाखांची संख्या २९ टक्के, साप्ताहिक शाखांची संख्या ६१ टक्के आणि मासिक शाखांची संख्या ४० टक्क्यांनी वाढलेली आहे. शिवाय, देशाचे सध्याचे पंतप्रधान हेदेखील संघाचे प्रामाणिक स्वयंसेवक आहेत, आणि त्याचा त्यांना अभिमानही आहे. म्हणूनच देशभक्तीबद्दल संघाच्या मताकडे दुर्लक्ष करण्याचे धाडस करता येणार नाही . उलट संघाची देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांचा सांगोपांग शोध घेणे आज समाजाच्या दृष्टीने कधी नव्हे एवढे गरजेचे बनले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली नागपूर येथे झाली. तेव्हापासून १५ आगस्ट १९४७ पर्यंत, म्हणजेच पुढची २२ वर्षे भारतावर इंग्रजांचे राज्य होते. या काळात भारतीय राष्ट्रीय काग्रेससारख्या मोठ्या संघटनांपासून देशाच्या विविध भागांमध्ये सक्रिय असलेल्या अनेकानेक लहान संघटना इंग्रजांच्या गुलामीतून देशाला स्वतंत्र करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करीत होत्या. अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमके काय करीत होता? हे समजून घेणे संघाची राष्ट्रभक्ती समजून घेण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरेल. थोडक्यात सांगायचे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक संघटना म्हणून इंग्रजांच्या विरोधात काहीही केले नाही. उलट, उरात देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी घेऊन स्वातंत्र्यलढ्यात उडी घेऊ पाहणाऱ्यांना तसे करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न आणि देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांच्या त्यागाचा अपमान मात्र अथकपणे आणि सुनियोजित पद्धतीने संघाने केला. आज संघाने राष्ट्रभक्तीच्या कितीही बाता मारल्या तरी त्यांचा हा काळाकुट्ट इतिहास त्यांच्याच पुस्तकांमधून व्यवस्थित नोंद झालेला आहे. अर्थात, आपल्या लबाड भूमिकेबद्दल संघाने कधीच लाज बाळगलेली नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे. अगदी देश स्वतंत्र झाल्यानंतरदेखील स्वातंत्र्यलढ्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याच्या संघाच्या भूमिकेचे समर्थन संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांनी पुढील शब्दांत केले आहे, “१९४२ सालीसुद्धा अनेकांच्या अंतःकरणात आंदोलनाचे विचार होते. त्यावेळीसुद्धा संघाचा नियमित कार्यक्रम चालू राहिला. प्रत्यक्षपणे काहीही न करण्याचा संकल्प सघाने केलेला होता. तरीही संघाच्या स्वयंसेवकांच्या मनात खळबळ माजली होती. संघ ही फक्त अकर्मण्य लोकांची संघटना आहे, त्यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही, असे बाहेरचेच लोक नाहीत, तर संघाचे स्वयंसेवकसुद्धा बोलू लागले. ते नाराज झाले.”[1] पण संघाने आपली भूमिका सोडली नाही. संघाला परपमूज्य असणाऱ्या गोळवलकर गुरुजींचे हे शब्द म्हणजे संघाच्या राष्ट्रभक्तीचाच पुरावा आहे.

देशाचा स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध लावताना एक खबरदारी घ्यावी लागेल. संघटना आणि वैयक्तिक स्वयंसेवक यांचा वेगवेगळा विचार करणे भाग आहे. कोणत्याही संघटनेची आपल्या सदस्यांवर पूर्ण पकड असू शकत नाही. संघटनेत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मतभेद, विरोधी भूमिका निर्माण होतात. आज्ञापालनासाठी प्रसिद्ध असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघसुद्धा याला अपवाद नाही. अशा वेळी कोणती भूमिका निवडायची याचा निर्णय प्रत्येक संघटना आपल्या तत्त्वप्रणालीनुसार व हेतूंनुसार घेत असते. लोकशाही मूल्ये अथवा बुद्धिवाद मानणारी संघटना मतदान, चर्चा, तर्क यांद्वारे भूमिका निश्चित करेल. मात्र असल्या फडतूस गोष्टींना संघात थारा नाही. संघ एक ध्वज, एक नेता, एक विचारधारा या तत्त्वाबरहुकून आपली भूमिका ठरवतो. मतभेद बाळगणाऱ्यांना, स्वतः विचार करण्याची खोड असणाऱ्यांना दूर व्हावे लागते.  संघ वास्तविक एका लहानशा समाजगटाच्या हिताचे प्रतिनिधित्व करतो. मात्र त्यासाठी व्यापक जनतेचे पाठबळ मिळवण्यासाठी खरे हेतू दडवून संघाच्या उद्देश्यांबद्दल एक भ्रामक चित्र निर्माण करणे ही संघाची गरज आहे. त्यासाठी संघाने घडवलेले अतिशय प्रभावी अस्त्र म्हणजे संघाची भावनांना हात घालणारी अलंकारिक उदात्त भाषा. भोळ्या भाबड्या लोकांना संघाशी जोडण्याचे काम या मायावी अस्त्राने वर्षानुवर्षे चोख केले आहे.  त्यामुळे सामान्य स्वयंसेवक आणि संघाचे नेतृत्त्व यांमध्ये वेळोवेळी विरोध निर्माण होत असतो. स्वातंत्र्यलढ्यासंबंधी संघाच्या भूमिकेवरूनही अशा प्रकारचे विरोध निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच संघाचे स्वयंसेवक व्यक्तिगत पातळीवर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याची उदाहरणे पाहताना त्यावेळी संघटना म्हणून संघाची भूमिका काय होती हे पडताळून पाहणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय राष्ट्रीय कांग्रेसमधून केली. १९२० साली असहकार आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांना एका वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. साम्राज्यवादी सत्तेला विरोध करणे हा केवळ अधिकारच नव्हे तर कर्तव्य असल्यामुळे राजद्रोहाच्या खटल्यात सत्याग्रह्यांनी स्वतःची बाजू न मांडण्याचा प्रघात त्यावेळी होता. परंतु डॉ. हेडगेवारांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. “स्वतःचा बचाव न करता ढेकणासारखे चिरडून जाणे मला योग्य वाटत नाही. आपली बाजू मांडून आपण प्रतिपक्षाचा खोडसाळपणा जगाला अवश्य उघड करून दाखविला पाहिजे. तीही देशसेवाच आहे,” असा युक्तिवाद त्यांनी आपल्या समर्थनार्थ मांडलेला आहे.[2] व देशकार्य करीत असताना तुरुंगातच काय, परंतु जरूर पडल्यास काळ्या पाण्यावर व फासावर जाण्यासही आपण सिद्ध असले पाहिजे, अशी सिंहगर्जनासुद्धा पुढे केलेली आहे. परंतु कारावास भोगून परतल्यानंतर मात्र काळ्या पाण्यावर किंवा फासावर जावे लागणार नाही, याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतल्याचे दिसते. देशात राहणाऱ्या सर्व जातीधर्माच्या लोकांचा हा देश आहे, ही भूमिका मान्य नसल्यामुळे ते कांग्रेसपासून दूर झाले. डॉ. हेडगेवारांचे चरित्रकार ना. ह. पालकर यांनी म्हटल्याप्रमाणे “हिंदुस्थानात राहणाऱ्या सर्व लोकांचे हे राष्ट्र आहे, या कल्पनेवरील त्यांचा विश्वास संपूर्णतः उडाला होता व हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व आहे, असा निःसंदिग्ध निर्वाळा त्यांचे मन देऊ लागले होते.”[3] म्हणूनच त्यांनी १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या संघटनेद्वारे त्यांनी तरुणांना साम्राज्यवाद विरोधाकडून मुसलमान विरोध आणि कट्टर हिंदुत्त्ववादाकडे वळवण्यासाठी पुढचे आयुष्य वेचले. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची तळमळ बाळगणाऱया तरुणांना हेडगेवारांचे काय सांगणे असायचे ते त्यांच्या चरित्रातील वर्णनावरून उत्तम प्रकारे कळू शकते. या चरित्राचे लेखक ना. ह. पालकर हे स्वतः संघाचे प्रचारक व हेडगेवारांचे सोबती होते, तसेच या चरित्राला संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यामुळे संघाच्या एखाद्या विरोधकाने जाणूनबुजून खोटे लिहिले असण्याची शक्यताही गृहीत धरता येणार नाही. पालकर लिहितात, “एखादा तरुण सत्याग्रहात सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे दिसून येताच डाक्टर त्याला प्रश्न करीत, सत्याग्रहानंतर तुरुंगातत जावे लागेल, तयारी आहे का? हो, तरुणाचे ठाम उत्तर असे. किती दिवसांची सिद्धता करून निघाला आहेस? त्याच्याकडून सहा महिने, अशासारखे उत्तर येई. त्यावर डाक्टर म्हणत, सहा महिन्यांच्या जागी दोन वर्षे शिक्षा झाली तर? या त्यांच्या प्रश्नाला चटकन उत्तर मिळे की, भोगीन. इतकी सिद्धता दाखवली की डाक्टर त्याला सांगत असत, की आपणाला शिक्षा झाली आहे असे समजून हा काळ संघकार्याला कां देत नाहीस?” म्हणजेच, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणे हा संघकार्याचा भाग नव्हता. हेडगेवारांच्या अशा उपदेशाला अर्थातच पूर्ण यश मिळत नसे. काही जण आपला विचार बदलत असत, परंतु बरेच जण सत्याग्रहात सहभागी होत. त्यांच्याबद्दल डाक्टरांची भूमिका काय होती. याचेही उत्तर पालकर यांनी दिलेले आहे. “आपण काहीतरी केले असे मिरवण्यास मिळेल अशी जाण्यामागे डोकावणारी लालसा तरुणांत अधिक असलेली पाहून त्यांना (डा. हेडगेवार यांना) दुःख होई.”

मिठाचा सत्याग्रह सुरू होताच संघानेदेखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दडपण येणे स्वाभाविक होते. अशा वेळी पत्रक काढून डॉ. हेडगेवार यांनी संघाची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट केली, “चालू चळवळीत संघाने संघशः भाग घेण्याचे तूर्त ठरविले नाही. व्यक्तिशः ज्या कोणास भाग घेणे असेल त्याने आपल्या संघचालकांच्या अनुमतीने भाग घेण्यास हरकत नाही. संघाच्या कार्यास पोषक होईल अशा रीतीनेंच त्याने कार्य करावे.” संघाच्या लबाड भूमिकेचे हे उत्तम उदाहरण आहे. स्वातंत्र्यलढ्यात उघड विरोध करणे हे राजकीयदृष्ट्या आत्मघातकी ठरले असते. संघाने ते टाळले. मात्र स्वयंसेवकांना स्वातंत्र्यलढ्यापासून दूर ठेवण्याचे कारस्थान मोठ्या हुशारीने व पूर्ण ताकदीनिशी केले.

राष्ट्रगौरवाच्या बाता मारायच्या आणि स्वातंत्र्यलढ्यापासून फटकून राहायचे या धोरणातून संघ पुरता उघडा पडत होता. स्वयंसेवक व्यक्तिशः सहभागी होत असले तरी संघटना म्हणून संघाची भूमिका स्वातंत्र्यलढ्याच्या विरोधी आहे, हे पावलोपावली दिसून येत होते. यामुळे संघावर टीका होत होती. अशा वेळी संघाने दाखविलेला कोडगेपणा किती उच्च दर्जाचा होता हे भागानगर सत्याग्रहाचे उदाहरण आणि संघाच्या भूमिकेचे डाक्टर हेडगेवार यांनी दिलेले स्पष्टीकरण यावरून दिसून येते. संघावर वर्तमानपत्रातून टीका करणाऱ्यांमध्ये श्री. गो. गो. अधिकारी हे एक होते. अशा टीकेला उत्तर न देण्याची चलाखीची भूमिका एरव्ही संघ घेत असे. परंतु यावेळी परिस्थिती नाजूक असल्यामुळे हेडगेवारांना उत्तर देणे भाग पडले. या उत्तरात डाक्टर म्हणतात, “नित्य कार्ये आणि नैमित्तिक कार्ये यांतला विवेक जर श्री. गो. गो. अधिकारी यांनी ओळखला असता तर संघाविरुद्ध विषारी फूत्कार त्यांनी सोडलेच नसते. भागानगर सत्याग्रह आटोपल्यानंतरही राष्ट्रविमोचनाचे कार्य शिल्लक राहतेच, हे श्री. अधिकारी विसरलेले दिसतात. ज्या वेळी राष्ट्र विमोचनाकरता अखेरचा एकच घाव घालावयाचा असतो त्या अंतिम समरक्षणाच्या आगमनाची पूर्वतयारी हे राष्ट्रविमोचनाचे नित्य कार्य होय, व भागानगर आंदोलनासारखी आंदोलने ही राष्ट्रविमोचनाची नैमित्तिक कार्ये होत. नित्य कार्यात व्यत्यय उत्पन्न होईल अशा रीतीने आपले वैशिष्ट्य व शक्तिसर्वस्व नित्य संस्थेला नैमित्तिक कार्याला वाहता येत नाही.” इंग्रज सत्तेच्या विरोधात आंदोलन करणे हे संघाच्या दृष्टीने एक तुच्छ असे नैमित्तिक कार्य होते. अशा नैमित्तिक कार्यात आपली शक्ती खर्च करायला संघ तयार नव्हता. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यास संघाचा असलेला स्पष्ट नकार किती ठाम होता याचा आणखी एक पुरावा क्रांतदर्शी डॉ. केशव बळीराम हेडगेवार या पुस्तकातही पाहावयास मिळतो. या पुस्तिकेचे लेखक डॉ. हेडगेवारांच्या कार्याची थोरवी गाताना म्हणतात, “ज्या काळात स्वातंत्र्यप्रीत्यर्थ चाललेल्या विविध चळवळींव्यतिरिक्त इतरही लहान मोठी सामाजिक कामे घेऊन विविध संस्था कार्य करीत होत्या, त्या काळात डाक्टरांनी असे कोणते ना कोणते विवक्षित काम डोळ्यांसमोर न ठेवता, परिस्थितीनिरपेक्ष देशव्यापी संघटना उभारण्याचे मूलगामी कार्य हाती घेतले. डाक्टर म्हणत असत, “संघाने केवळ हिंदू संघटन हेच लक्ष्य स्वतःसमोर ठेवले आहे.” संघ केवळ संघटन करील, या व्यतिरिक्त काहीही करणार नाही.” संघ खरोखरच फक्त संघटन करीत होता का? या संघटनाचा उद्देश्य काय होता? स्वातंत्र्य चळवळ, इतर सामाजिक कामे यांना ज्या नित्य कार्याच्या प्रेमापोटी संघाने वर्ज्य मानले मानले ते नित्य कार्य नेमके काय होते, व त्याचा हेतू काय होता? संघ खरोखरच कोणतेही नैमित्तिक कार्य करीत नव्हता का? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी डॉ. हेडगेवार या चरित्रातील नागपूरचा दंगा हे प्रकरण वाचण्यासारखे आहे. हिंदू धर्मनिष्ठ संघ स्वयंसेवकांनी या दंग्यात मुसलमानांचे मुडदे कसे पाडले, मशीद कशी जाळली त्या पराक्रमाचे रसाळ वर्णन लेखकाने मोठ्या अभिमानाने केले आहे. संघाच्या नित्य कार्याचे स्वरूप आणि संघटनाचा हेतू तेथे चांगलाच स्पष्ट झालेला आहे.

संघाचे शस्त्रप्रेम सर्वज्ञात आहे. शस्त्रांस्त्रांचे उत्पादन, साठा आणि प्रशिक्षण यांना संघाने स्थापनेपासूनच महत्त्व दिलेले दिसते. वेगवेगळ्या शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण संघात स्वयंसेवकांना दिले जायचे. ही शस्त्रास्त्रे इंग्रजांच्या विरोधात कधी वापरण्यात आली का? नागपूरच्या दंग्यात स्वयंसेवकांनी दुरूनच जळत्या बाणांचा वर्षाव करून मशीद जाळली. धनुर्विद्येत एवढे प्रावीण्य स्वयंसेवकांनी मिळवलेले होते, परंतु इंग्रजांच्या कचेऱ्या किंवा पोलीस स्टेशनाच्या दिशेने एकही जळता बण कधी या रामसेवकांच्या धनुष्यातून सुटला नाही. उलट या शस्त्रसाठ्यापैकी मोठा साठा डाक्टर हेडगेवारांनी नष्ट कां केला त्याची कहाणीसुद्धा संघाच्या इंग्रजधार्जिणेपणावर आणि भ्याडपणावर चांगलाच प्रकाश टाकणारी आहे. संघाचे पहिले सरकार्यवाह बाळाजी हुद्दार यांना १९३१ च्या जानेवारीत बालाघाटाच्या राजकीय सशस्त्र दरोड्यात पकडण्यात आले. ( हे बाळाजी हुद्दार पुढे स्पेनच्या गृहयुद्धात लढले आणि तेथून परतल्यानंतर कम्युनिस्ट पार्टी आफ इंडियाचे सदस्य बनले) हा दरोडा अर्थातच संघाने घडवून आणलेला नव्हता. ही बातमी म्हणजे डॉ. हेडगेवार यांच्यासाठी मोठा आघात होता. ना. ह. पालकर यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “सरसंघचालकाच्या खालोखाल संघटनेत ज्यांचे स्थान आहे त्यांच्यावर असा आरोप येणे म्हणजे पर्यायाने इंग्रजांच्या डोळ्यांत सलू लागलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनेवरील ते गंडांतरच होते. म्हणूनच त्यानंतर डॉ. हेडगेवार यांनी दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे १९३१ साली नष्ट करून टाकली.” संघ इंग्रजांच्या डोळ्यात सलू लागला होता, असे येथे ना. ह. पालकर म्हणतात. यात कितीसे तथ्य आहे? काही स्वयंसेवकांनी व्यक्तिगत पातळीवर सत्याग्रहांत सहभागी झाल्यामुळे व एकूण देशात स्वातंत्र्य चळवळ ऐन भरात असल्यामुळे इंग्रजांचे संघाकडे लक्ष होते हे खरे. अशा वेळी इंग्रजविरोध हे आपले ध्येय नाही, हे स्वयंसेवकांच्या मनावर बिंबवण्याचा तसेच इंग्रजांना तसा भरवसा देण्याचा डॉ. हेडगेवारांनी संघाचे प्रमुख म्हणून सतत आणि जोरदार प्रयत्न केला. म्हणूनच संघावर बंदी घालण्याची गरज ब्रिटीशांना कधी भासली नाही. मुसलमानांना देशाचे शत्रू ठरवून त्यांच्याविरोधात शस्त्रे अवश्य वापरावीत, परंतु स्वयंसेवकांनी इंग्रजांच्या विरोधात शस्त्रांस्त्रांचा वापर करून नसती आफत ओढवून घेऊ नये, याबद्दल संघाचे सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार किती दक्ष होते, हे हुद्दारांच्या उदाहरणावरून दिसून येते. ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’, या म्हणीनुसार प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या इंग्रजविरोधी कारवायांमध्ये न गुंतलेल्या संघटनांवरसुद्धा ज्यावेळी इंग्रज सरकार बंदी घालत होते, त्या काळातही संघावर बंदी येणार नाही, असा सार्थ विश्वास डॉ. हेडगेवारांना वाटत होता तो उगाच नाही. इंग्रजांनी संघाचे स्वरूप पूर्णपणे ओळखले होते. म्हणूनच संघाच्या स्वामीनिष्ठेवर इंग्रजांचा पूर्ण विश्वास होता. संघाबद्दल ब्रिटीश कागदपत्रांमध्ये पुढची नोंद सापडते, भविष्यात संघ भारतासाठी तीच भूमिका बजावू इच्छितो, जी जर्मनीमध्ये नाझींची आणि इटलीमध्ये फासिस्टांची आहे.

संघाला देशरक्षणाबद्दल असलेली अॅलर्जी अगदी संघाच्या पहिल्या प्रार्थनेतही प्रतिबिंबित झाली आहे. संघाच्या पहिल्या प्रार्थनेत एक मराठी आणि एक हिंदी श्लोक होता. पैकी हिंदी श्लोक आर्यसमाजात रूढ असणाऱ्या प्रार्थनेत काही बदल करून स्वीकारलेला होता. आर्यसमाजाच्या प्रार्थनेचा मूळ पाठ असाः

हे प्रभो, आनंददाता ग्यान हमको दीजिये

शीघ्र सारे दुर्गुणोंको दूर हमसे कीजिये

लीजिये हमको शरणमें हम सदाचारी बने

ब्रह्मचारी देशरक्षक वीर व्रतधारी बने

यात बदल करून संघाने स्वीकारलेली प्रार्थना पुढीलप्रमाणेः

हे गुरो, श्रीरामदूता शील हमको दीजिये

शीघ्र सारे सद्गुणोंसे पूर्ण हिंदू कीजिये

लीजिये हमको शरणमें रामपंथी हम बने

ब्रम्हचारी धर्मरक्षक वीरव्रतधारी बने?

यात केलेले बदल पाहाण्यासारखे आहेत. पूर्ण हिंदू करण्याची रामापाशी केलेली याचना, रामपंथी बनण्याची इच्छा हे तर आहेच, परंतु देशरक्षक होण्याबद्दलची संघाची अनिच्छा इतकी टोकाची होती व धर्मासमोर देशाला इतके दुय्यम स्थान होते की मूळ प्रार्थनेच्या शेवटच्या ओळीत असलेला देशरक्षक हा शब्द काढून धर्मरक्षक हा शब्द घालायला संघाचे नेतृत्त्व विसरले नाही.

स्वातंत्र्यलढ्यात भरीव योगदान देणाऱ्या सर्वच देशभक्तांशी संघ आज आपला संबंध जोडत आहे. खोटा इतिहास पसरवला जात आहे. मात्र देशासाठी लढता लढता आयुष्य उद्ध्वस्त करून घेणाऱ्या देशभक्तांबद्दल संघाने आपल्या लिखाणातून, व्याख्यानांतून व्यक्त केलेली मते मात्र संघाच्या स्वातंत्र्य चळवळीतील संघाच्या भूमिकेशी अगदी सुसंगत अशीच आहेत. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरूजी म्हणतात, “इंग्रजांबद्दल असलेल्या रागामुळे अनेकांनी अद्भुत पराक्रम गाजवला. आपणसुद्धा तसे करावे असा विचार आपल्या मनातही एखादेवेळी येऊ शकतो. परंतु त्यामुळे संपूर्ण राष्ट्राचे हित साध्य होणार आहे का, याचा विचार केला पाहिजे. बलिदान केल्यामुळे उभ्या समाजात राष्ट्राच्या हितासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तेजस्वी भावना निर्माण होत नाही. ह्दयतील हा अंगार सर्वसाधारण लोकांना असह्य वाटतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे.” देशभक्तांचा मार्ग सर्वसाधारण लोकांना असह्य वाटतो, एवढाच संघाचा आक्षेप नाही, तर या देशभक्तांबद्दल संघाला वाटणारा आकस इतका टोकाचा आहे की त्या देशभक्तांचा अधिकाधिक अपमान करणे, हे संघाला आपले कर्तव्य वाटते, असे त्यांच्या विचारांवरून तरी दिसते. ‘डा. हेडगेवार क्रांतदर्शी युगपुरुष’ या पुस्तिकेचे लेखक वि. ना. नेने देशभक्तांबद्दलची डॉ. हेडगेवारांची भूमिका स्पष्ट करताना म्हणतात, “ब्रिटीशविरोधी भावना हीच त्या चळवळींमागची प्रमुख प्रेरणा असे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासंबंधी, स्वराज्यासंबंधी विधायक दृष्टी वा धारणा असल्याचे कोठेही आढळत नसे? सत्याग्रह करणाऱ्या बहुतेकांना लहानमोठ्या शिक्षा होत. अशा प्रकारे सत्याग्रह करून, तुरुंगवास भोगून आलेल्या लोकांना आपण देशभक्तीचे काही विशेष कार्य केले आहे, असे वाटे. ओघानेच, आपण इतर जनांपेक्षा श्रेष्ठ आहोत, पुढारी आहोत, इतरांनी आपला जयजयकार करावा, अनुयायी म्हणून आपला पडता बोल झेलावा अशी भावना त्यांच्यात बळावू लागली. देशभक्तांचा असा एक निराळा वर्गच तयार होऊ लागला.” भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांचा आदर्श तर तरुणांनी घेऊच नये, असा संघाचा आग्रह आहे. स्वयंसेवकांना याविषयी सावध करताना गोळवलकर म्हणतात, “आपली भारतीय संस्कृती सोडून इतर सगळ्या संस्कृतींनी अशा प्रकारच्या बलिदानांची पूजा केली आहे व त्यांना आदर्श मानले आहे, व अशा बलिदान करणाऱ्यांना राष्ट्रनायक म्हणून स्वीकारले आहे. परंतु आपण आपल्या भारतीय परंपरेत अशा प्रकारच्या बलिदनाला सर्वोच्च आदर्श मानलेले नाही.” या देशभक्तांना आदर्श मानू नये, एवढेच सांगून गोळवलकर थांबत नाहीत तर यापुढे जाऊन ते म्हणतात, “जे जीवन अपयशी ठरले आहे त्यात नक्कीच एखादी फार मोठी उणीव असली पाहिजे. जो स्वतः पराजित झाला आहे तो इतरांना कसा काय प्रकाश देऊ शकतो, आणि त्यांना यशाच्या दिशेने कसे काय घेऊन जाऊ शकतो? हवेच्या प्रत्येक झुळूकेसरशी कंपित होणारी ज्योत आपला मार्ग कसा प्रकाशित करू शकेल?” बलिदान करणारे देशभक्त हे संघाच्या दृष्टीने अपयशी नायक आहेत, आणि ब्रिटीशांची माफी मागून पुन्हा कोणत्याही प्रकारची इंग्रजविरोधी कारवाई न करण्याचे वचन देऊन स्वतःची कैदेतून सुटका करून घेणारे सावरकर हे स्वातंत्र्यवीर आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या थोर देशभक्तांचा असा अपमान साम्राज्यवादी ब्रिटीशांनीसुद्धा कधी केलेला नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा ठेकेदार बनला आहे. जनतेला अंधारात ठेवण्यासाठी, खऱ्या मुद्द्यांपासून जनतेला विन्मुख करण्यासाठी राष्ट्रवादाचा अफूच्या गोळीसारखा वापर केला जात आहे. धनदांडग्यांची आणि भांडवलदारांची चाकरी करण्याचे कार्य चोख बजावण्याच्या योजनेत संघाने राष्ट्रभक्ती हा एक बाजारू माल बनवला आहे. पतंजलीची उत्पादने खरेदी करेल, तोच खरा राष्ट्रभक्त या रामदेव बाबांच्या घोषणेत या बाजारू राष्ट्रप्रेमाचा सर्वांत घृणास्पद आविष्कार आपण नुकताच पाहिला. निरनिराळ्या भांडवली प्रसारमाध्यमांतून चालणाऱ्या मोहक-अलंकारिक प्रचाराच्या आत दडलेले विषारी सत्य ओळखण्यासाठी, जनतेला दारिद्र्यात ढकलणारे, जनतेत फूट पाडणारे संघाचे राजकारण हाणून पाडण्यासाठी संघाचा इतिहास लोकांसमोर येणे गरजेचे आहे. आज संघाने राष्ट्रप्रेमाच्या कितीही बाता मारल्या तरी त्यांचा खरा काळाकुट्ट भूतकाळ इतिहासाने संघाच्याच साहित्यातून जपून ठेवला आहे. हाफ पॅंट सोडून फूल पॅंट वापरली म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला नंगेपणा झाकता येणार नाही.

[1]           श्रीगुरुजी समग्र दर्शन खंड ३

[2]           डॉ. हेडगेवार : क्रांतदर्शी युगपुरुष – वि. वा. नेने

[3]           डॉ. हेडगेवार – ना. ह. पालकर

 

 

कामगार बिगुल, डिसेंबर २०१६