बिर्सा मुंडा आणि लहूजी साळवे – उपेक्षित स्वातंत्र्य सैनिक

नागेश धुर्वे 

सुमारे दोन शतकांच्या गुलामीनंतर १९४७ साली भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. या स्वांतंत्र्यासाठी हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी रक्त सांडले, आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यापैकी अनेकांच्या त्यागमय जीवनावर आज विस्मृतीची धूळ बसली आहे, किंवा अनेकांना शासकवर्गाने फोटोफ्रेममध्ये अथवा जातीजमातीच्या चौकटीत बंदिस्त करून टाकले आहे. त्यांच्या संघर्षाचे अंतरंग दडवण्याचा प्रयत्न होतो आहे. अशाच दोन थोर विभूती म्हणजे बिर्सा मुंडा आणि लहुजी साळवे.

क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ ला पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला. १८१७ साली खडकी येथे पेशव्यांच्या इंग्रजांविरुद्ध झालेल्या युद्धात २३ वर्षांचे लहुजी आपल्या वडिलांबरोबर पेशव्यांच्या बाजूने लढले. या युद्धात लहुजींच्या डोळ्यांसमोर त्यांचे वडिल शहीद झाले. पेशवे युद्ध हरले. या पराभवातूनच त्यांच्या ह्दयात स्वातंत्र्याची ठिणगी पडली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक घडवायचे असे त्यांनी ठरवले. आपल्या अंगी असलेले युद्धकौशल्य तरुणांना देण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण केंद्र सरू केले. या केंद्रात सर्वच जातीजमातीतील युवक तालीम घेण्यासाठी येत असत. बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, उमाजी नाईक, चाफेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे यांसारख्या अनेकांनी लहुजींकडून शस्त्रविद्येचे धडे घेतले.

२० जुलै १८७९ रोजी वासुदेव बळवंत फडके ब्रिटिशांच्या तावडीत सापडले. रात्री विश्राम घेत असतानाच ब्रिटिशांनी त्यांना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. लहुजींच्या मनावर हा मोठा आघात होता. वर्षभरानंतरच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगपुरा परिसरातील एका झोपडीवजा घरात देशभक्तांच्या आणि समाजसुधारकांच्या या थोर शिक्षकाची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्रात लहुजी क्रांतिकारकांना शस्त्रांची दीक्षा देत असतानाच देशाच्या दुसऱ्या टोकाला आणखी एका क्रांतिकारकाचा जन्म झाला ज्याचे जीवन म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेकार्थांनी वेगळा आणि देदिप्यमान अध्याय ठरले आहे. त्या क्रांतिकारकाचे नाव बिर्सा मुंडा. आज बिर्सा मुंडा हे नाव अन्याय, जुलूमाविरोधात लढणाऱ्यांसाठी एक प्रेरणाचा अक्षय स्रोत बनून राहिले आहे. बिर्साचा जन्म झारखंड येथील मुंडा जमातीत १८७५ साली झाला. त्यांच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. परंतु ख्रिश्चन मिशनरीसुद्धा आदिवासी समाजाला भ्रमाच्या जाळ्यात अडकवून ठेवण्याचेच काम करतात, याची जाणीव पुढे बिर्सा मुंडा यांना झाली. व्यापक समाजाने आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहापासून तोडलेले होते. त्यामुळे हा समाज ज्ञानाच्या प्रकाशापासूनही वंचित राहिला होता. आस्थेच्या नावाखाली अंधविश्वासात गुरफटलेला होता. भारतीय जमीनदार – जागीरदारांच्या आणि ब्रिटीश सत्तेच्या शोषणाच्या आगीत तो होरपळत होता. अशा वेळी बिर्सा यांनी आदिवासी समाजाला जागृत आणि संघटित केले. त्यांनी या आदिवासी समाजाला शिक्षणाचा आणि सहकाराचा रस्ता दाखवला. बिर्सा यांच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी समाजाने बेगारी प्रथेविरुद्ध आंदोलन पुकारले. बिर्सा यांच्या नेतृत्त्वात सुरू झालेल्या या चळवळीमुळे झाड-पाला-अंगाराची दुकाने चालवणाऱ्यांचा धंदा बंद पडला, जमीनदारांच्या घरातील-शेतातील कामे ठप्प झाली. त्याचबरोबर बिर्सा यांनी लोकांना राजकीयदृष्ट्या प्रशिक्षित केले. त्यांनी गावोगावी जाऊन  अनुअः दिशोम अनुअः राज (आपला देश आपले राज्य) ची घोषणा दिली आणि संघर्ष तीव्र केला. यावेळी ब्रिटिशांनी त्याना अटक करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांच्या मदतीने ते निसटले. मात्र काही दिवासांतच बिर्सा यांना अटक करण्यात ब्रिटिशांना यश आले. दोन वर्षांनंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रचारकार्य न करण्याच्या अटीवर मुक्त करण्यात आले. मात्र बिरसा शांत थोडेच बसणार होते? त्यांनी संघर्ष अधिकच तीव्र केला. १८९७ ते १९०० या काळात बिर्सा यांच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी जनतेने ब्रिटिशांच्या विरोधात जबरदस्त झुंज दिली. बिर्सा आणि त्यांच्या ४०० साथीदारांनी खुंटी ठाण्यावर हल्ला केला. १८९८ मध्ये तेगा नदीच्या किनारी बिर्सा आणि त्यांच्या साथीदारांची ब्रिटिशांच्या विरोधात लढाई जुंपली व या लढाईत बिर्साच्या सैन्याने ब्रिटिशांना धूळ चारली. त्यानंतर आदिवासी नेत्यांच्या अटकेचे सत्र सुरू झाले. अनेक नेत्यांना ब्रिटिशांनी पकडून तुरुंगात डांबले. जानेवारी १९०० मध्ये डोमवाडी पहाडीवर आणखी एक चकमक झाली. त्यात अनेक स्त्रिया आणि मुलांची ब्रिटिशांनी कत्तल केली. त्यावेळी बिर्सा जवळच एका जनसभेला संबोधित करीत होते. काही दिवसांनी ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिर्सा यांना चक्रधरपूर येथे अटक करण्यात आली, व ९ जून १९०० रोजी आदिवासी समाजाच्या जल-जंगल-जमीनच्या अधिकारांची घोषणा करणाऱ्या व बलाढ्य ब्रिटिश सत्तेविरुद्ध विद्रोह पुकारणाऱ्या या क्रांतिकारकाचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी त्यांना विष देऊन मारले, असे म्हटले जाते.

अन्याय्य  ब्रिटिश राज्यसत्तेविरुद्ध बळाचा वापर करणाऱ्या तसेच जनतेला त्यासाठी प्रशिक्षित करणाऱ्या अनेक नायकांची स्वतंत्र भारताच्या सरकारांनीसुद्धा एक तर उपेक्षा केली किंवा त्यांचे विचार दडपून त्यांच्या फक्त मूल्यविहीन, देवतुल्य प्रतिमा उभारून त्यांचे आदर्श निःसत्त्व करण्याचे प्रयत्न केले. बिर्सा मुंडा, लहूजी साळवे, भगतसिंह यांसारखी अनेक उदाहरणे देता येतील. आणखी एक कारण आहे. उत्पीडित पार्श्वभूमीतून (आदिवासी व दलित) आल्यामुळेसुद्धा बिर्सा मुंडा आणि लहूजी यांच्यावर अन्याय झाला आहे. परंतु अशीच पार्श्वभूमी असणाऱ्या अनेकांचा स्वतंत्र भारताच्या सरकारांनी वेळोवेळी गौरव करून त्यांचे विचारसुद्धा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. कारण त्यांच्या राजकारणाचा आशय शोषक राजकीय सत्ता बळाने नष्ट करण्यापर्यंत जाणारा नव्हता. अन्यायाच्या विरोधात बळाचा वापर करण्याच्या व बळाचा वापर सशस्त्र संघर्षापर्यंत घेऊन जाणाच्या विचाराचे शासक वर्गाला नेहमीच भय वाटत असते. स्वतंत्र भारताचा शासकवर्गसुद्धा त्याला अपवाद नाही. अन्यायाच्या विरोधात जनतेला संघटित करून बळाने या व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणे हीच बिर्सा आणि लहूजीसारख्या क्रांतिकारकांना आपली खरी श्रद्धांजली ठरू शकते.

 

कामगार बिगुल, डिसेंबर २०१६