फासीवाद म्हणजे काय आणि त्याविरुद्ध लढायचे कसे?
चौथा भाग
लेखक : अभिनव
मराठी अनुवाद : अमित शिंदे
गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या खोल आर्थिक मंदीमुळे एकीकडे लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागत असताना बहुतेक देशांमध्ये एक तर फासीवादी पक्ष सत्तेत आले आहेत किंवा बळकट तरी झाले आहेत. (जसे आपल्या देशात फासीवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व करणारा भाजप) असे पक्ष सत्तेत येताच कामगारांच्या अधिकारांवर जोरदार हल्ला चढवतात आणि कॉर्पोरेट घराण्यांचा नफा वेगाने वाढविणारी धोरणे बनवतात. जर्मनीत हिटलर आणि इटलीमध्ये मुसोलिनी यांना आपण इतिहासातील फासीवादाचे जनक म्हणून ओळखतो. त्यांनी लाखो-कोट्यावधी निर्दोष माणसांची कत्तल केली आणि आजसुद्धा तमाम फासीवादी त्यांना आपले गुरू मानतात. अशा परिस्थितीत, आर्थिक अरिष्ट किंवा मंदी म्हणजे नेमके काय असते, ती फासीवादाला कसा जन्म देते, फासीवाद कसा ओळखावा आणि त्याच्याशी लढण्याचा खरा मार्ग कोणता, यांसारख्या गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
एखादा फासीवादी पक्ष सत्तेत असतो तेव्हाच फासीवादाचा धोका असतो, आणि फासीवादी पक्ष सत्तेतून बाहेर पडताच फासीवादाचा धोका टळतो, असे मानणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारचा पराभव झाला होता, तेव्हा अनेकांचा असा गैरसमज झाला होता की फासीवादाचा धोका आता टळलेला आहे. त्यांचा समज किती बालीश होता हे स्पष्ट झालेच आहे, व आता फासीवादाचा धोका सर्वांत भयंकर रूपात आपल्या डोक्यावर घिरट्या घालीत आहे. फासीवाद म्हणजे काय? हे समजून घेतल्याशिवाय आपण काही झाले तरी त्यांच्या विरोधात लढण्याचा प्रभावी मार्ग शोधून काढू शकत नाही. त्याच्या सर्वच सामाजिक-आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक पैलूंची योग्य जाणीव विकसित करूनच आपण त्याला पराभूत करण्याचा एक व्यावहारिक कार्यक्रम आखू शकतो. २००९ मध्ये जे लोक म्हणत होते की फासीवादाचा धोका आता टळला आहे तेच लोक २०१४ मध्ये मोदी सत्तेवर येताच रडू-विव्हळू लागले आणि फासीवाद फासीवाद म्हणून ओरडू लागले आहेत. त्यांच्या मते भाजप सत्तेत असला, तर फासीवादाचा धोका असतो आणि जर भाजप सरकार बनवू शकला नाही तर फासीवादाचा धोका टळतो! फासीवादाची एवढी बालीश समज असल्यामुळेच हे लोक फासीवादाला पराभूत करण्याचा जो कार्यक्रम तयार करतात तोसुद्धा विसंगतींनी भरलेला असाच असतो. महागठबंधन किंवा व्यापक डाव्या आघाडीच्या बळावर फासीवाद संपवण्याची योजना बनवणाऱ्या डॉन क्विहोतेंची सध्या कमी नाही. ते फक्त निवडणूकीच्या माध्यमातून फासीवादाला पराभूत करण्याचे शेखचिल्लीचे स्वप्न पाहत आहेत. परंतु हे खरेच शक्य आहे का? निवडणूकीच्या माध्यमातून फासीवाद संपवला जाऊ शकतो का?
या प्रश्नावर गंभीरपणे विचार करणे व फासीवाद विरोधी लढ्याला योग्य दिशा देणे आज गरजेचे आहे. अशा वेळी, हा दीर्घ लेख फासीवादाची एक सुस्पष्ट समज निर्माण करण्यास वाचकांना साहाय्यक ठरेल, असे आम्हांला वाटते. हा लेख फासीवाद निर्माण होण्याच्या आर्थिक-राजकीय कारणांवर विस्ताराने चर्चा करतो, जर्मनी आणि इटलीमधील फासीवादाच्या इतिहासाचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढतो, भारतातील सर्वांत मोठी फासीवादी शक्ती असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एकंदर जन्मकुंडली मांडतो आणि शेवटी फासीवादाशी लढण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यावहारिक कार्यक्रम सादर करतो. फासीवादाच्या निरनिराळ्या सैद्धांतिक पक्षांवरही हा लेख प्रकाश पाडतो व इतिहासात केल्या गेलेल्या सैद्धांतिक चुकांची समीक्षासुद्धा करतो.
हा निबंध सर्वप्रथम २००९ साली कामगारांसाठी प्रसिद्ध होणाऱ्या मजदूर बिगुल या मासिक वृत्तपत्रात सहा भागांमध्ये प्रसिद्ध झाला होता. हा निबंध मुळात हिंदीत लिहिला गेला होता व या लेखाने मांडलेल्या प्रस्थापनांना गेल्या पाच वर्षांतील घटनाक्रमाने योग्य सिद्ध केले आहे.
संपादक
आतापर्यंत आपण फासीवादाच्या उदयाची सर्वसाधारण पृष्ठभूमी आणि आर्थिक, सामाजिक परिस्थिती अभ्यासली. त्याच बरोबर, जर्मनी आणि इटली मधील फासीवादाच्या क्लासिकल प्रयोगाविषयी जाणून घेतले. आता आपण भारतातील फासीवादाच्या उदयामागाचा इतिहास, पृष्ठभूमी, त्याच्या विशेषता आणि त्याची वर्तमान परिस्थिती ह्या विषयी बोलूयात.
जर्मनी किंवा इटली प्रमाणे फासीवादी भारतात कधीही सत्तेत आलेले नाहीत. परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी ६ वर्षे सत्तेमध्ये राहून गेली आहे परंतु त्यांचे सत्तेत येणे मुसोलिनी किंवा हिटलरच्या सत्तेत येण्या पेक्षा वेगळे होते. ह्या व्यतिरिक्त, भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली नव्हती. ते एक आघाडी सरकार होते आणि त्याच्या स्वतःच्या अश्या अंतर्गत कुरबुरी आणि ताणतणाव होते ज्यामुळे भाजप त्यांच्या स्वतःचा कार्यक्रम उघडपणे लागू करू शकत नव्हता. परंतु भाजपने आघाडी सरकार असतानाच इतके काही केले की त्यावरूनच स्पष्ट व्हावे की त्यांचे सरकार पूर्ण बहुमताने आले असते तर त्यांनी काय केले असते. जर्मनी किंवा इटली प्रमाणे फासीवादी भारतात कधीही सत्तेवर आलेले नसले तरी तळागाळात रुजलेल्या शक्तीच्या रुपात दीर्घ काळापासून त्याचे अस्तित्व राहिले आहे. सर्वप्रथम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काही मुलभूत माहिती देणे उपयुक्त ठरेल. त्यानंतर आपण भारतामधील फासीवादाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्प्रेरकांची माहिती घेऊ.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – भारतीय फासीवाद्यांची खरी जन्मकुंडली
भारतातील फासीवादाचा इतिहास जवळपास जर्मनी आणि इटली इतकाच जुना आहे. जर्मनी आणि इटलीमध्ये फासीवादी पक्षांची स्थापना १९१॰ च्या दशकाच्या शेवटी किंवा १९२० च्या दशकाच्या सुरुवातीस झाली. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये नागपूर मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते केशव बळीराम हेडगेवार. हेडगेवार ज्या व्यक्तीच्या प्रभावाखाली फासीवादी विचारांच्या संपर्कात आले होते त्याचे नाव मुंजे. मुंजे १९३१ मध्ये इटलीमध्ये गेला होता आणि त्याने तिथे मुसोलिनीची भेटही घेतली होती. १९२४ ते १९३५ च्या दरम्यान संघाशी जवळीक असलेले वृत्तपत्र दैनिक ‘केसरी’ मुसोलिनी आणि त्याच्या फासीवादी सत्तेचे गुणगान करणारे लेख सतत छापले. मुंजेने हेडगेवार यांना मुसोलिनीद्वारा तरुणांच्या डोक्यात विष कालवून त्यांना फासीवादी संघटनेत भरती करण्याबद्दलच्या क्लुप्त्या सांगितल्या. हेडगेवार यांनी त्या क्लुप्त्यांचा तत्काळ उपयोग करण्यास सुरुवात केली आणि संघ आजही त्याच क्लुप्त्यांचा उपयोग करतो. १९३॰ च्या दशकाच्या शेवटी भारतीय फासीवाद्यांनी मुंबईस्थित इटालिअन काउन्सलेटशी संपर्क साधला होता. पुढेसुद्धा तिथल्या इटालिअन फासीवाद्यांनी हिंदू फासीवाद्यांशी संपर्क कायम ठेवला.
जवळपास त्याच वेळी एक अन्य हिंदू कट्टरपंथी विनायक दामोदर सावरकर यांनी, ज्यांचे मोठे बंधू संघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते, जर्मनीमधील नात्झींशी संपर्क साधला. सावरकरांनी जर्मनीमध्ये हिटलर कडून केल्या गेलेल्या ज्यूंच्या कत्तलीचे समर्थन सुद्धा केले आणि भारतातील मुस्लिम “समस्ये”वर हेच समाधान सुचवले. जर्मनीमधील ‘ज्यूंच्या प्रश्ना’चे “अंतिम समाधान” सावरकरांसाठी एक मॉडेल होते. सावरकरांच्या दृष्टीकोनातून नात्झी राष्ट्रवादी होते तर ज्यू राष्ट्रद्रोही आणि धर्मांध. लेनिनने खूप आधीच सांगितले होते की वांशिक अंधराष्ट्रवादी सनकीपणा नेहमी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बुरखा घालून अवतरतो. भारतामध्येसुद्धा हिंदू धर्मांध राष्ट्रवाद हा सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बुरखा ओढूनच समोर येत होता.
आर.एस.एस. ने सुद्धा जर्मनीमध्ये नात्झींनी ज्यूंचे जे शिरकाण केले त्याचे उघड समर्थनच केले होते. हेडगेवार यांनी त्याच्या मृत्युपूर्वी गोळवलकर यांना स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. गोळवलकर यांनी ‘व्ही, ऑर अवर नेशनहूड डिफाइण्ड’ ह्या पुस्तकामध्ये आणि नंतर प्रकाशित झालेली ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्येही जर्मनीमध्ये नात्झींकडून केल्या गेलेल्या ज्यूंच्या शिरकाणाचे समर्थन केले आहे. गोळवलकर आर.एस.एस.च्या स्वयंसेवकांसाठी सर्वाधिक पूजनीय सरसंघचालक होते. संघाचे लोक त्यांना आदराने ‘गुरुजी’ म्हणत असत. गोळवलकर यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयामधून मेडिकलचे शिक्षण घेतले होते आणि तेथेच काही काळ शिकवण्याचे कामही केले. इथेच त्यांना ‘गुरूजी’ हे नाव मिळाले. हेडगेवारांच्या म्हणण्यानुसार गोळवलकरांनी संघाची दीक्षा घेतली आणि काही काळ संघाचे काम केले. त्यांच्या धार्मिक ओढीतून ते काही काळ आर.एस.एस. मधून बाहेर गेले आणि कोण्या एका गुरूच्या मार्गदर्शनामध्ये संन्यास घेतला. त्यानंतर १९३९ च्या आसपास गोळवलकर पुन्हा आर.एस.एस. मध्ये परत आले. ह्या वेळपर्यंत हेडगेवार मृत्युशय्येवर होते आणि त्यांनी गोळवलकरांना स्वतःचा उत्तराधिकारी घोषित केले. १९४० पासून १९७३ पर्यंत गोळवलकर आर.एस.एस.चे सुप्रीमो राहिले.
गोळवलकरांच्या नेतृत्वाखालीच आज आपणास ज्ञात असलेल्या आर.एस.एस.च्या सर्व संघटना अस्तित्वात आल्या. आर.एस.एस.ने ह्याच दरम्यान त्यांच्या शाळांचे जाळे देशभरात पसरवले. संघाच्या शाखासुद्धा मोठ्या प्रमाणावर ह्याच दरम्यान संपूर्ण देशात पसरल्या. विश्व हिंदू परिषद सारख्या आर.एस.एस.च्या अग्रणी संघटना ह्याच काळात स्थापन झाल्या. गोळवलकरांनीच आर.एस.एस.च्या फासीवादी विचारधारेला व्यवस्थित आकार दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आर.एस.एस.ची पोहोच महाराष्ट्रातील ब्राम्हण जातीच्या बाहेर गेली. गोळवलकरांच्या नेतृत्वाखालीच आर.एस.एस. एक अखिल भारतीय संघटना म्हणून उभी राहिली. ह्याच कारणांमुळे गोळवलकर आजही संघाच्या लोकांमध्ये सर्वाधिक आदरणीय मानले जातात आणि काही वर्षांपूर्वी संघवाल्यांनी त्यांची जन्मशताब्दी देशभरात साजरी केली होती.
आर.एस.एस. ने ब्रिटीशांच्या विरोधात स्वातंत्र्य आंदोलनात कुठलाही सहभाग घेतला नाही. संघ नेहमी ब्रिटीश साम्राज्यवाद्यांसोबत संगनमताचे राजकारण करण्यासाठी तयार होता. त्यांचे लक्ष्य नेहमीच मुस्लिम, कम्युनिस्ट आणि ख्रिश्चन होते. परंतु ब्रिटीश साम्राज्याला त्यांनी कधीही लक्ष्य केले नाही. ‘भारत छोडो आंदोलना’ दरम्यानच्या देशव्यापी उलाथापालथी मध्येही संघ निष्क्रिय राहिला. उलट संघाने ठीकठिकाणी ह्या आंदोलनावर बहिष्कार टाकला आणि ब्रिटीशांची साथ केली. श्यामाप्रसाद मुखर्जीचे बंगालमध्ये ब्रिटीशांच्या बाजूने उघडपणे बोलणे ह्याचे सर्वात मोठे उदाहरण होते. जर चुकून संघाचा माणूस ब्रिटीश सरकार कडून पकडला गेला किंवा तुरुंगात गेला तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी माफीनामे लिहून ब्रिटीश साम्राज्याप्रती स्वतःच्या निष्ठा व्यक्त केल्या आणि नेहमी निष्ठा कायम ठेवण्याचे वचननामे लिहून दिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीने सुद्धा स्वतः असा माफीनामा लिहून दिलेला आहे. अशा संघवाल्यांची यादी खूप मोठी आहे जे माफीनामे लिहून लिहून ब्रिटीश तुरुंगांमधून बाहेर आले आणि ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यसैनिकांच्या विरुद्ध ब्रिटीशांच्या बाजूने हेरगिरी करण्याचे नीच कृत्य केले. ब्रिटीश वसाहतवादी राज्याने सुद्धा ह्या इमानदारीचा योग्य मोबदला त्यांना दिला आणि हिंदू धर्मांध फासीवाद्यांना कधीही लक्ष्य केले नाही. आज संघाने स्वतःस कीतीही राष्ट्रवादी म्हणून घेतले तरी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी न झाल्याचा आणि ब्रिटिशांना सहकार्य करण्याचा कलंक संघ कधीच मिटवू शकणार नाही. इतिहासाचे पुनर्लेखन करण्याच्या संघाच्या प्रयत्नांमागचे खरे कारण हेच आहे. ते स्वतःच्याच इतिहासाला घाबरतात. त्यांना माहिती आहे की त्यांचा इतिहास हा विश्वासघात आणि पळपुटेपणाचा काळा इतिहास आहे. हिंसेवर त्यांचे प्रचंड प्रेम आहे पण तेही फक्त झुन्डीमध्ये पुरुषत्वाचे प्रदर्शन केले जाणाऱ्या हिंसेवर! ते कधीही कुठल्याही जन-आंदोलनात सहभागी झाले नाहीत आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे दमन झेलण्याची क्षमता नाही. नेहमी सत्तेबरोबर नाळ जोडून व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करणाऱ्या लोकांवर हिंस्र हल्ले करणे हेच ह्यांचे वैशिष्ट्य राहिले आहे. मग ते मुसलमान असोत, ख्रिश्चन असोत किंवा राजकीय विरोधक असोत. नीडर, शौर्यपूर्ण संघार्षांशी यांचे दूर दूर पर्यंत नाते नाही.
सुरुवातीपासूनच संघाची संपूर्ण बांधणी फासीवादी पद्धतीची राहिली आहे. प्रदीर्घ काळासाठी संघाची दारे केवळ पुरुषांसाठी उघडी होती. संघाची महिला शाखा खूप नंतर अस्तित्वात आली. संघाची अंतर्गत बांधणी हिटलर आणि मुसोलिनीच्या पक्षांच्या बांधणीशी पूर्णपणे मेळ खाते. संघाचा प्रत्येक सदस्य ही शपथ घेतो की तो सरसंघचालकांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन कुठलाही प्रश्न न विचारता करेल. सरसंघचालक सर्वात वर असतो, त्याच्या खाली एक सरकार्यवाह असतो ज्याची नियुक्ती सरसंघचालकच करतो. एक केंद्रीय कार्यकारी मंडळ असते ज्याची निवड स्वतः सरसंघचालक करतो. आपला उत्तराधिकारी सुद्धा सरसंघचालक स्वतःच निवडतो. म्हणजेच हे एका प्रकारचे ‘कमांड स्ट्रक्चर’ आहे ज्यामध्ये लोकशाहीला जागा नाही. नात्झी आणि फासीवादी पक्षाची संपूर्ण बांधणी ह्याच प्रकारची होती. नात्झी पक्षामध्ये ‘फ्यूहरर’च्या नावाने आणि फासीवादी पक्षामध्ये ‘ड्यूस’च्या नावाने शपथ घेतली जात असे.
हे सांगायची गरज नाही की संघाची दारे फक्त हिंदूंसाठी खुली राहिली आहेत. संघ उघडपणे हे मान्य करतो की तो हिंदूंच्या हितांची सेवा करण्यासाठी आहे. संघाने कधीही खालच्या जाती किंवा खालच्या वर्गांमधील हिंदूंसाठी काम केले नाही. संघाचा जनाधारसुद्धा कीरकोळ भांडवलदार वर्ग, नव-श्रीमंत आणि लंपट सर्वहारा वर्गामध्ये राहिला आहे. संघाच्या सामाजिक आधाराची चर्चा आपण नंतर करूयात. आर.एस.एस. ने भारतामध्ये फासीवादाची मूल्यवान आवृत्ती तयार केली आहे. त्यांचे हिटलर आणि मुसोलिनीच्या फासीवादाशी बरेच साम्य आहे आणि त्यापासून संघाने बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या. गोळवलकर लिहितात – “आज दुसरे राष्ट्र, जे सगळ्या जगाच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे ते आहे जर्मनी. हा देश राष्ट्रवादाचे ज्वलंत उदाहरण आहे. आधुनिक जर्मनी कार्यमग्न आहे आणि ज्या कार्यात तिने स्वतःला झोकून दिले आहे, तो कार्यभाग तिने बऱ्याच अंशी साध्य केला आहे… पितृभूमिप्रती जर्मन लोकांचा गर्वबोध, जिच्या प्रति त्या वंशाचा परंपरागत जिव्हाळा आहे, खऱ्या राष्ट्रीयत्वाचे अनिवार्य तत्व आहे. आज ते राष्ट्रीयत्व जागृत झाले आहे, तसेच त्याने नव्याने विश्वयुद्ध सुरु करण्याची जोखीम घेत आपल्या “पूर्वजांच्या पावन भूमीत” एकत्रित, विवादरहित जर्मन साम्राज्याची स्थापण्याचा निर्धार केला आहे….” (गोळवलकर व्ही, ऑर अवर नेशनहूड डिफाइण्ड’ पृ. क्र. ३४-३५)
गोळवलकरांनी ह्याच पुस्तकात ज्यूंच्या शिरकाणाचे पुरेपूर समर्थन केले आहे आणि भारताने ह्यातून काही शिकावे हे सांगताना लिहिले आहे – “… (गोळवलकर, व्ही, ऑर अवर नेशनहूड डिफाइण्ड’ पृ. क्र. ३५). हिटलरचे आपल्या वंशाची आणि संस्कृतीची शुद्धता जपण्यासाठी जर्मनीने देशामधून अशुद्ध वंशाचा – ज्यूंचा संहार करून सगळ्या जगाला चकीत केले आहे. त्यांच्या वंशावरील (त्यांचा) गर्वबोध इथे सर्वोच्च रुपात व्यक्त झाला आहे. जर्मनीच्या उदाहरणावरून हेही स्पष्ट आहे की सर्व सदिच्छा असूनही ज्या वंशामध्ये आणि संस्कृतीमध्ये मुलभूत फरक असतो, त्या कधीही एकरूप होऊ शकत नाहीत. भारतामध्ये आपल्यासाठी हा एक चांगला धडा आहे.” हे विचार गोळवलकर भारतावर कसे लागू करतात ते बघा “….वंश आणि संस्कृतीच्या गौरवाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार मनात येऊ नये, अर्थातच हिंदू राष्ट्रीय बनावे लागेल आणि हिंदू वंशामध्ये समाहित होऊन आपले स्वतंत्र अस्तित्व संपवावे लागेल. ह्या देशामध्ये, पूर्णपणे हिंदू राष्ट्राच्या सेवेमध्ये, कुठलाही स्वार्थ न ठेवता, कुठल्याही प्रकारचे विशेषाधिकार न मागता, कुठल्याही विशेष व्यवहाराची तर अपेक्षा सुद्धा नको, प्रसंगी नागरिक अधिकारांच्या शिवाय राहावे लागेल. त्यांच्या समोर ह्या शिवाय इतर कुठलाही मार्ग सोडता कामा नये. आपण एक प्राचीन राष्ट्र आहोत. आपल्या देशात राहणाऱ्या विदेशी वंशाबरोबर आपल्याला त्याच मार्गाने निपटावे लागेल ज्याप्रमाणे प्राचीन राष्ट्र विदेशी वंशांचा बंदोबस्त करत असत.” (गोळवलकर, व्ही, ऑर अवर नेशनहूड डिफाइण्ड’ पृ. क्र. ४७-४८). हे अगदी स्पष्ट आहे. हिटलरचे ज्युंबद्दलचे जे विचार होते तेच विचार संघाचे मुस्लिम आणि ख्रिश्चनांबद्दलचे आहेत.
संघाचे राष्ट्र कोण आहेत हिंदू, पण सगळे हिंदू नव्हे! उच्चवर्णीय पुरुष हिंदू! स्त्रियांना हिटलर आणि मुसोलिनी प्रमाणेच पुरुषांची गुलाम आणि मुलांना जन्म देणारी मशीन ह्या पेक्षा अधिक दर्जा नाही. हिंदूंमध्ये सुद्धा ते हिंदू ज्यांच्याकडे समाजातील संसाधनांची मालकी आहे. कामगार वर्गाचे काम आहे महान हिंदू राष्ट्राच्या प्रगती आणि उन्नतीसाठी प्रश्न न विचारता घाम गाळणे – १२ तास आणि कधी कधी १४-१५ तास सुद्धा! ह्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणे किंवा श्रम अधिकारांची भाषा करणे राष्ट्रद्रोही मानले जाईल. प्रत्येकाने आपापले ‘कर्म’ करावे, प्रश्न विचारू नये. कर्म तुमच्या जन्मावरून ठरते. तुम्ही जिथे, ज्या घरात जन्मलात त्याप्रमाणे कर्म तुम्हाला करावे लागेल. किंवा राष्ट्र, धर्म किंवा जातीचे नेते तुम्हाला जे कर्म करावयास सांगतील ते कर्म तुम्हाला करावे लागेल. ह्याचा प्रतिकार, विरोध आणि ह्यावर प्रश्न उभे करणे राष्ट्रद्रोही आहे. श्रद्धाभाव ठेवून कर्म करा. कामगारांचा धर्म हाच आहे की त्यांनी ‘राष्ट्र निर्माणात’ हाड-मांस गाळावे. सांगायची गरज नाही की संघ आणि भाजप ह्यांच्यासाठी राष्ट्र ह्या संकल्पनेचा अर्थ फक्त आणि फक्त भांडवलदार, दुकानदार आणि कीरकोळ व्यापाऱ्यांचा वर्ग इतका मर्यादित आहे. जेव्हा हे नफेखोर प्रगती करतात तेव्हा देशाची प्रगती होते. हिटलर आणि मुसोलिनीने त्यांच्या देशातील कामगारांच्या बाबतीत हीच भूमिका घेतली होती. ह्या देशांमध्ये फासीवादी सत्ता आल्यानंतर ट्रेड युनियन्सवर बंदी घालण्यात आली. जर्मनी आणि इटलीमध्ये ट्रेड युनियन चळवळीवर हिंसक हल्ले फासीवाद्यांनी सत्तेबाहेर असताना सुद्धा केले होते. मुंबईमधील ट्रेड युनियनच्या नेतृत्वावर, कामगारांवर आणि त्यांच्या संपांवर अशे हल्ले शिवसेनेने (जीचे फासीवादी प्रेम जगजाहीर आहे) सुद्धा केले होते. देशभरामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या गुंडांनी ठिकठिकाणी, वेळोवेळी भांडवलदारांच्या बाजूने कामगार, त्यांचे नेते आणि संप तोडण्याचे काम केले आहे. जेव्हा ते अशा प्रकारच्या हिंसक कारवाया करत नसतात तेव्हा ते कामगार वर्गाची वर्गीय एकता तोडण्याचा भरपूर प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, कामगारांच्या मध्ये अश्या संघटना उभ्या केल्या जातात ज्या कामगारांच्या दुरावस्थेला भांडवलदारांना जबाबदार धरत नाहीत. भांडवलदारांकडून भिक मागून आणि कामगारांमधून पैसे गोळा करून ‘फंड पूल’ बनवले जातात ज्यातून कामगारांना बेरोजगारी आणि भूक ह्यापासून वाचवण्यासाठी थोडा बहुत पैसा देतात.
बऱ्याच वेळा हे पैसे व्याजाने दिले जातात. ह्या व्यतिरिक्त धार्मिक प्रसंगी कामगारांमध्ये पूजेचे आयोजन वगैरे करणे, किर्तन आयोजित करणे – हे अशा संघटनांचे मुख्य काम असते. त्याच बरोबर कामगारांच्या डोक्यात हि गोष्ट भरवली जाते की त्यांच्या दयनीय परिस्थितीस अल्पसंख्यांक जबाबदार आहेत कारण ते त्यांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेत आहेत. फासीवादी संघटनांच्या नेत्यांच्या तोंडून नेहमी असली वाक्ये ऐकायला मिळतात – “१७ करोड मुसलमान म्हणजे १७ करोड हिंदू बेरोजगार”. ह्यावरून आपोआपच फ्रांसमधील फासीवादी नेता मेरी लॉ पेन च्या वक्तव्याची आठवण येते ज्यात त्याने म्हटले होते – “दहा लाख प्रवासी घुसखोर म्हणजे १० लाख फ्रान्सीसी बेरोजगार”. कामगारांमध्ये सुधारवादी कार्य करत ह्या संघी संघटना कामगारांची वर्गीय चेतना बोथट करतात. ते त्यांना हिंदू कामगार म्हणून संघटीत करण्याचे प्रयत्न करतात, आणि त्यातून हे कामगारांची वर्गीय एकता तोडतात. त्याच बरोबर ‘कमेटी’ उघडण्यासारखे (व्याजावर पैसे देणारी संघी संघटना जी संघी, कामगारांच्याच पैश्यातून उभी करतात, जी वर वर बघता कामगारांच्या सहकारी संस्थेसारखी भासते) उद्योग करून थोड्या वेळासाठी का होईना पण भांडवली वर्गाबरोबरचे अंतर्विरोध तीव्र होऊ देत नाहीत. संघाची अशीच एक संघटना आहे ‘सेवा भारती’. त्याच बरोबर संघी ट्रेड युनियन भारतीय मजदूर संघ मुसोलिनीच्या धर्तीवरच औद्योगिक विवादांच्या सोडवणुकीसाठी ‘कॉर्पोरेट’ समाधान सुचवते. त्यात फासीवाद्यांच्या नेतृत्वाखाली एक संघीय कमेटी बनवली जाते ज्यात कामगार आणि भांडवलदारांचे प्रतिनिधी असतात. फासीवादी पक्ष विवादांचा निवडा करतो आणि नेहमी तो निवडा करताना भांडवलदारांच्या बाजूने झुकलेला निर्णय घेतात. किंवा हिटलर प्रमाणे कामगारांवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी वेग वेगळ्या दहशतवादी संघटना स्थापन करण्याच मार्ग आर.एस.एस. नेहमी खुला ठेवते. बजरंग दल ही अशीच आतंकवादी संघटना आहे जी संघाने राजकीय विरोध असंवैधानिक मार्गाने, हिंसेच्या माध्यमातून मोडून काढण्यासाठी स्थापन केली आहे. ही संघटना कम्युनिस्ट, उदारमतवादी, साहित्यिक ह्यांच्या बरोबरच कामगार आणि ट्रेड युनियन्सचा प्रतिरोध गुंड टोळ्यांच्या हिंसक हल्ल्यांच्या माध्यमातून संपवण्यावर विश्वास ठेवते. म्हणजेच भारतातील फासीवाद्यांनी जर्मनी आणि इटली मधील फासीवाद्यांच्या मार्गांचा सुवर्णमध्य साधला आहे.
थोडक्यात सांगायचे तर फासीवाद नेहमीच राष्ट्रवादाच्या नावाखाली भांडवलदारांची सेवा करतो. राष्ट्राचा त्यांचा अर्थ भांडवलदार वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग इतकाच आहे, बाकीच्या वर्गांची स्थिती ह्या वर्गांच्या अधीनस्थ असते आणि त्यांना महान राष्ट्राची सेवा करावयाची असते हेच त्यांचे कर्तव्य आणि उत्तरदायित्व असते. प्रतिरोध करणाऱ्यांना श्दैहिक आणि दैविक त्रासातून पूर्ण मुक्ती’ दिली जाते. समाजात प्रभुत्व निर्माण करण्यासाठी फासीवाद नेहमीच रस्त्यांवर जमावाकडून केल्या जाणाऱ्या हिंसेचा आधार घेतो. जर्मनी आणि इटलीमध्ये हेच झाले होते आणि भारतामध्येही संघाने हीच रणनीती अवलंबली. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ह्या सारख्या संघाच्या अग्रणी संघटना हीच रणनीती उपयोगात आणतात. भोपाल मधील प्राध्यापक सभरवाल यांची हत्या याचेच एक उदाहरण आहे.
भारतीय फासीवादाची कार्यपद्धती आणि त्याच्या उद्याचा इतिहास
फासीवादाने भारतामध्ये जी कार्यपद्धती उपयोगात आणली त्याचे जर्मनी आणि इटलीमधील फासीवाद्यांच्या कार्यपद्धतीबरोबर खूप साम्य आहे. जर्मनी आणि इटली प्रमाणेच आपल्याकडे सुद्धा फासीवाद्यांनी ज्या मार्गांचा उपयोग केला ते होते – रस्त्यांवर केली जाणारी जमावाची हिंसा पोलिस, नौकरशाही, सैन्य दल आणि माध्यमांचे फासीवादीकरण कायदे धाब्यावर बसवून आपल्या हिंसक कारवाया करत राहणे आणि त्यावर उदारमतवाद्यांचे मौन, सुरुवातीस अल्पसंख्यांकास हल्ल्यांचे लक्ष्य बनवणे आणि नंतर हल्ल्यांचा परीघ अधिक व्यापक बनवून सर्व राजकीय विरोधकांना हल्ल्यांचे लक्ष्य बनवणे, शाखा, शिशु-मंदिर, सांस्कृतिक केंद्र आणि धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये मिथकांना सामान्यज्ञान (कॉमन सेन्स) म्हणून स्थापित करणे (जसे, आज उदारमतवादी हिंदूंमध्ये सुद्धा ही धारणा दृढ आहे के मुस्लिम एका पेक्षा जास्त विवाह करतात, जास्त मुलांना जन्म देतात, धूर्त असतात, हिंदू राष्ट्र संपवू इच्छितात, खूप अस्वच्छ असतात, इत्यादी-इत्यादी. ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो). खोटा प्रचार ही जगभरातील फासीवाद्यांची एक कॉमन रणनीती आहे. फासीवादी हल्ल्यांचे लक्ष्य संस्था-संघटना नसतात तर व्यक्ती असतात आणि भारतात सुद्धा विरोधकांना आतंकित करण्यासाठी हीच रणनीती फासीवाद्यांकडून वापरली गेली आहे. अफवांचा कौशल्याने वापर करणे हेही भारतीय फासीवाद्यांचे वैशिष्ट्य आहे. जर्मनी आणि इटली प्रमाणेच एकाच वेळी अनेक गोष्टी बोलण्याचा मार्ग भारतीय फासीवाद्यांनी पुरेपूर उपयोगात आणला आहे. त्यांचा एक मुखवटा सौम्य,तर एक उग्र असतो,एक मध्यममार्गी असतो आणि जेव्हा ज्या मुखोट्याची गरज पडते तो मुखोटा समोर केला जातो. भारतामध्ये सुद्धा संघाचे स्थायी असे संविधान राहिलेले नाही. जेव्हा जे गरजेचे असेल तशी चाल-चेहरा-चरित्र स्वीकारण्यास ते तयार असतात. कारण सगळे फासीवादी संधिसाधू असतात आणि तात्कालिक राजकीय हितांसाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात.
ही संघी फासीवाद्यांची सर्वसाधारण कार्यपद्धती राहिली आहे. ह्या सगळ्या पद्धती अधिकांश संघ स्वयंसेवकांनी त्यांच्या जर्मन आणि इटालिअन पूर्वजांकडून आत्मसात केल्या आहेत. ह्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून भारतीय फासीवाद्यांनी समाजामध्ये स्वतःची मूळे रुजवली.
स्वातंत्र्यपूर्व काळात १८९० व १९०० च्या दशकात हिंदू आणि मुस्लिम पुनरुत्थानवाद्यांच्या कारवायांमुळे हिंदू-मुस्लिम तणाव तयार झाले होते. परंतु त्या काळात राष्ट्रवादी नेत्यांकडून केल्या गेलेल्या प्रयत्नांमुळे हे तणाव तीव्र झाले नाहीत. १९१० च्या दशकामध्ये सुद्धा असे तणाव तयार झाले पण १९१६चा ‘लखनौ करार’, ‘खिलाफत चळवळ’ आणि ‘असहयोग आंदोलना’च्या एकत्र येण्यामुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये सौहार्दपूर्ण स्थिती होती. ते ब्रिटीश वसाहतवाद्यांना सामाईक शत्रू म्हणून बघत होते. ह्या दरम्यान सुद्धा ‘हिंदू महासभा’ नामक एक सांप्रदायिक संघटना अस्तित्वात होती. परंतु राष्ट्रवादी आंदोलनाने तयार केलेली सांप्रदायिक एकता असहयोग आंदोलनापूर्वी पर्यंत पूर्णपणे भंगली नव्हती. परंतु त्यात चरे जाण्यास सुरुवात झाली होती. असहयोग आंदोलन अचानक रद्द झाल्यानंतर ही एकता भंगण्यास सुरुवात झाली. हाच तो कालखंड आहे ज्या वेळी देशाच्या विविध भागांमध्ये हिंदू पुनरुत्थानवाद्यांचा प्रभाव वाढण्यास सुरुवात झाली होती. सावरकर बंधूंचा हाच काळ आहे. जवळपास हाच तो कालखंड आहे त्यावेळी बंकीम चंद्र यांची ‘आनंदमठ’ प्रकाशित झाली आणि राष्ट्रवादाच्या स्वरूपाबद्दल सबंध देशभरात चर्चा सुरु झाली. त्यात एक प्रवाह कॉंग्रेस मधील राष्ट्रवाद्यांचा होता जो भांडवलदारांच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण जनतेला साम्राज्यवाद विरोधी लढ्यात सोबत घेण्याच्या मताचा होता. हा एक तडजोडवादी प्रवाह होता. हा प्रवाह सेक्युलर तर होता पण त्याचा सेक्युलरीजम स्वतः हिंदू पुनरुत्थानवादाकडे झुकलेला होता. जे काँग्रेसी नेतृत्व पुनरुत्थानवादी नव्हते त्यांचा सेक्युलरीजम पुंसत्वहीन होता आणि सांप्रदायिक कट्टरतेविरुद्ध कधीच लढू शकत नव्हता. दुसरा प्रवाह, कम्युनिस्टांनी स्वीकारलेल्या साम्राज्यवाद विरोधाचा होता. त्यांनी निरंतर जनतेला एकजूट करून संघर्ष केला परंतु बहुतांश रणनीती विषयक आणि कुटनितिक मुद्द्यांवरती स्पष्टता नसल्या कारणाने सबंध स्वातंत्र्य आंदोलनात त्यांच्या कडून विविध चुका झाल्या, ज्यामुळे ते कधीही आंदोलनाचे नेतृत्व स्वतःच्या हाती घेऊ शकले नाहीत. तिसरा प्रवाह होता, हिंदू सांप्रदायिकतावाद्यांचा – ज्यांनी त्यांच्या फासीवादी विचारधारेला हिंदू राष्ट्रवादाच्या बुरख्यात सादर केले. ते कीती राष्ट्रवादी होते हे तर आपण बघितलेच आहे. ह्यांचे खरे ध्येय फासीवादच होते ज्याला राष्ट्रवादाच्या बुरख्या आड लपवण्यात आले होते.
१९२५ मध्ये आर.एस.एस. ची स्थापना होई पर्यंत कॉंग्रेसी राष्ट्रवादी सांप्रदायिक सौहार्द कायम राखण्याची इच्छा आणि धैर्य दोन्ही गमावू लागले होते. ब्रिटीश साम्राज्यावाद्यांनी हिंदू आणि मुस्लिम कट्टरपंथ्यांना आपापसात लढवण्याचे प्रयत्न सुरुवातीपासूनच केले होते. बरेच इतिहासकार तर असेही मानतात की भारतामधील हिंदू मुस्लिम कट्टरता ब्रिटीशांनीच निर्माण केली. ब्रिटीश येण्यापूर्वी कुठल्याही धार्मिक दंगलीचे पुरावे मिळत नाहीत. हि धार्मिक कट्टरता ब्रिटीश आणि पुनरुत्थानवाद्यांच्या सामुहिक प्रयत्नातून निर्माण झाली होती. बंगालचे विभाजन करण्यामागचा ब्रिटीशांचा हेतू हाच होता. कुठे ते हिंदू फासीवाद्यांचे समर्थन करायचे तर कुठे मुस्लिम कट्टरपंथीयांचे समर्थन करायचे. ब्रिटिशांनी जनगणनेचा उपयोगही धार्मिक तेढ वाढवण्यासाठी पुरेपूर केला. कम्युनिस्टांनी ह्या प्रयत्नांचा विरोध केला परंतु फासीवाद्यांविरुद्ध लढण्याची कुठलीही सुसंगत रणनीती नसल्यामुळे त्यांचा विरोध यशस्वी होऊ शकला नाही.
धर्मांधतेचा प्रभावी विरोध आणि नायनाट करू न शकल्याचा परिणाम म्हणून १९२५ मध्ये संघाच्या स्थापनेनंतरच्या १५ वर्षातच संघाची सदस्य संख्या १ लाखाच्या वरती पोहोचली होती. ह्या वेळपर्यंत संघ हिंदू पुनरुत्थानवादी आणि कट्टरपंथी भूमिकेत होता आणि त्या भूमिकेचा प्रचार करत होता. प्रामुख्याने मुस्लिम त्यांच्या निशाण्यावर होते. वसाहतवादी सत्तेचा विरोध करणे संघाने कधीच आपले कर्तव्य मानले नाही आणि नेहमीच ब्रिटीशांशी इमानदार राहिला. परंतु हिंदू राष्ट्रवादाची भूमिका घेण्यास त्याने सुरुवात केली होती. त्यांच्या प्रचारामध्ये प्राचीन भारतातील ‘हिंदू गौरवाचे’ गुणगान असे. त्यावेळी फासीवादी विचार लागू करण्यासाठी संघ प्रशिक्षित होऊ पाहत होता. १९३०च्या दशकाच्या अखेरीस गोळवलकरांच्या नेतृत्वाखाली संघाने आधुनिक फासीवाद आणि कार्यपद्धती भारतीय संदर्भात लागू करण्यास सुरुवात केली होती. संघ शाखांचे विशाल जाळे देशभरात पसरवण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्य आंदोलनातील लाजिरवाणे योगदान संघाने स्वातंत्र्यानंतर खोटा प्रचार करून झाकण्यास सुरुवात केली होती. हे काम संघ आजही करत आहे कारण संघाच्या नेतृत्वाच्या ऐतिहासिक विश्वासघाताचे कागदोपत्री पुरावे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत – उदाहरणार्थ; माफीनामे, हेरगिरी आणि निष्ठेची वचनपत्रे इत्यादी – जे संघी फासीवाद्यांनी ब्रिटिशांशी केले होते.
स्वातंत्र्यानंतर सत्ता कॉंग्रेसच्या हातात आली.नेहरू पंतप्रधान झाले. गोळवलकर ह्यामुळे खूप निराश झाले आणि त्यांनी ह्याला मुस्लिमांकडून झालेला पराभव मानले. त्यानंतर संघाने आपल्या बहुतांश संघटनांची स्थापना करण्यास सुरुवात केली ज्यात विश्व हिंदू परिषद प्रमुख होती. त्यानंतर बजरंग दल, वनवासी कल्याण परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दुर्गा वाहिनी ह्या सारख्या संघटनांची स्थापना केली. ह्या संघटनांच्या माध्यमातून संघाने देशाच्या प्रत्येक भागात आणि प्रत्येक सामाजिक स्तरामध्ये पाय रोवण्यास सुरुवात केली. १९८० पर्यंत संघ देशातील सर्वात मोठी संघटना बनला होता. भाजप सत्तेमध्ये येवो किंवा न येवो, भांडवली व्यवस्थेच्या अस्तित्वामुळे संघी फासीवाद धोक्याच्या रुपात कायम राहील. अर्थशास्त्रज्ञ मायकल कालेलीने सत्तेच्या बाहेरील फासीवादाला साखळीने बांधलेल्या कुत्र्याची उपमा दिली होती. ही उपमा भारतात तंतोतंत लागू होते. जर हा कुत्रा साखळीमध्ये न बांधता खुला सोडला तर काय होते ते जर्मनी आणि इटली मध्ये दिसून आले. परंतु साखळीमध्ये बांधले गेल्यामुळे होणाऱ्या चिडचिडीमधून हा कुत्रा बरेच कृष्णकृत्य करू शकतो हे भारताच्या इतिहासावरून दिसून येते.
भारतातील संघी फासीवादाच्या अभूतपूर्व विस्ताराचे कारण काय होते भारतामध्ये फासीवादासाठी अनुकूल परिस्थिती होती का ? कोण-कोणते वर्ग फासीवादाचा आधार बनले ? हे समजून घेणे फासीवादाविरुद्ध लढण्यासाठीची रणनीती बनवण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे. त्यावर आपण पुढील अंकात चर्चा करू.
कामगार बिगुल, एप्रिल २०१७