कविता – विदूषक
कविता कृष्णपल्लवी
अनुवाद – सोमनाथ केंजळे
विदूषक सिंहासनावर बसून
दाखवतो तऱ्हेतऱ्हेच्या करामती
दरबारी हसतात, टाळ्या पिटतात
आणि भ्यायलेले सभ्य नागरिक साथ देतात
त्यांना माहीतीय, विदुषक एक खुनी आहे
आणि दरबारात रक्ताच्या डागावरच
अंथरल्यात लाल पायघड्या
विदूषकाचा आवडता छंद आहे
युगपुरूष बनून रस्त्यावर भटकण्याचे सोंग रचने
भव्य दिव्य स्टेजवरून ‘अच्छे दिना’ च्या घोषणा करने
जे ऐकताच सम्मोहीत झालेली गर्दी
करू लागते जोरदार घोषणाबाजी
सदगृहस्थ भली माण्सं घाबरतात
शहाणे आपल्या बचावाच्या युक्त्या-प्रयुक्त्या जमवू लागतात
आणि विवेकवान माण्सं मात्र येऊ घातलेल्या बरबादीवर
विचार करू लागतात, चिंतातूर..
युगांपूर्वी जे हल्लेखोर बनून आले होते
तेच आता येऊ पाहताहेत पाहूणे बनून
विदूषक सामान्यांतून आपल्या महान बनण्याच्या
अगणित आठवणी सांगू लागतो
तो चंद्राला जादूई दोरी टाकून
ओढून जमिनीवर आणल्याचा दावा करतो
विदूषक शब्दांचा खेळ मांडतो
आणि अलंकार-वैचित्र्यांची मालिकाच लावतो
असो शब्द वा पोशाख वा लूट अन् दमनाची विधान
वा सामूहिक नरसंहार रचन्यासाठी विकसित केलंलं
संकेत विज्ञान
विदूषक सगळं कसं सुनियोजित आणि सुधारीत रितीनं करतो
आणि रचतो क्रुरतेच नव सौंदर्यशास्त्र
सर्कशीचा मालकच होऊ पाहतो विदूषक
जनमत त्याच्याच बाजूने असल्याचा
गणितीय तर्क त्याच्याच दिमतीला असतो
तरीही उद्वीग्न, अस्वस्थ आहे तो
दूर्गनगरासारख्या विशाल बंद सर्कशीच्या तंबू बाहेर
अजून निशब्द शांतता आहे, तळपणारे ऊन आहे
आणि इथंतिथं उठणारे धुळीची वावटळ सुद्धा आहेत
विदूषकाला समजत नाही ही रहस्यमयी शांतता
विदूषकाला सहन होत नाही चिमुरडयांच हसणं सुद्धा,
जे नसतं हतबल आणि भयग्रस्त
या तमाम आश्वस्तते नंतरही
भुतकाळातली प्रेतं सतावत राहतात विदूषकाला
तो भेदरलेलाच असतो सदैव
कामगार बिगुल, एप्रिल २०१७