शहीदे आजम भगत सिंह यांची उद्धरणे

क्रांतीचा आमचा आशय काय आहे, हे स्‍पष्‍ट आहे. या शतकात क्रांतीचा फक्‍त एकच अर्थ असू शकतो तो म्‍हणजे – जनतेसाठी जनतेने राजकीय सत्‍ता ताब्‍यात घेणे. वास्‍तवात हीच ‘क्रांती’ आहे. बाकी सारे विद्रोह हे फक्‍त मालकांच्‍या पाठिंब्‍याने चालणाऱ्या परिवर्तनाद्वारे भांडवलशाहीतील सडकेपणाच पुढे रेटत असतात. लोकांविषयी किंवा त्‍यांच्‍या प्रश्‍नांविषयी कितीही सहानुभूती दाखवली तरी जनतेपासून वस्‍तुस्थिती लपत नाही, लोक कपट ओळखतातच. भारतामध्‍ये श्रमिकांच्‍या सत्‍तेपेक्षा काहीही कमी स्‍वीकारणे आम्‍हांला मान्‍य नाही. भारतातील साम्राज्‍यवादी – आणि ज्‍यांची नाळ शोषण हा मूलाधार असलेल्‍या आर्थिक व्‍यवस्‍थेशी जुळलेली आहे, असे त्‍यांचे हस्‍तक – यांना हुसकून देऊन भारतीय श्रमिकांना पुढे यावे लागेल. आम्‍ही गोऱ्या दुष्‍प्रवृत्‍तीच्‍या जागी काळी दुष्‍प्रवृत्‍ती आणून यातना भोगू इच्छित नाही. एक स्‍वार्थी समूह म्‍हणून या दुष्‍प्रवृत्‍ती एकमेकांची जागा घ्‍यायला तयार आहेत.

इतिहासाने पुन:पुन्‍हा सिद्ध केलेल्‍या एका सत्‍याकडे आम्‍ही जनतेचे लक्ष वेधू इच्छितो. गुलामी आणि असहाय्यतेत विव्हळणाऱ्या जनतेला चिरडून टाकणे सोपे आहे, परंतु विचार अमर असतात आणि जगातील कोणतीही शक्ती त्यांना चिरडून टाकू शकत नाही. जगातील महान साम्राज्‍ये धुळीला मिळाली, पण ज्या विचारांनी प्रेरित होऊन जनसामान्यांनी ही साम्राज्ये धुळीस मिळवली ते विचार आजही जिवंत आहेत. बूरबों (फ्रेंच राज्‍यघराणे) नष्ट झाले, परंतु क्रांतिकारक निधड्या छातीने पुढे जात आहेत.

लोकांना आपापसात लढण्यापासून रोखण्यासाठी वर्गचेतनेची आवश्यकता आहे. गरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांना समजावून सांगितले पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत, म्हणूनच तुम्ही त्यांच्या डावपेचांपासून सावध राहिले पाहिजे, व त्यांच्या नादी लागून काहीबाही करता कामा नये. जगातील सर्व गोरगरिबांचे, मग ते कोणत्याही जातीचे, वर्णाचे, धर्माचे वा राष्ट्राचे असोत, अधिकार सारखे आहेत. धर्म, वर्ण, वंश आणि राष्ट्रियतेचे भेदभाव संपवून तुम्ही एकजूट व्हावे आणि सरकारची शक्ती आपल्या हाती घेण्यासाठी प्रयत्न करावेत, यातच तुमचे भले आहे.

कामगार बिगुल, एप्रिल २०१७