नपुंसक न्यायव्यवस्थेकडे न्यायाची दाद मागता-मागता खैरलांजीचे भैयालाल भोतमांगे यांचा संघर्ष मावळला
बबन ठोके
आजपासुन ११वर्षांपूर्वी खैरलांजी येथील दलित कुटुंबियाचा अमानुष, बर्बर हत्याकांडाने पूर्ण देशातील न्यायप्रिय व्यक्तींच्या हृदयाला िपळवटून टाकले. त्या हत्याकाण्डातील जीवित राहिलेले एकमात्र पीडित व्यक्ती भैयालाल भोतमांगे यांचा २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय न्यायव्यवस्थेचा नपुंसकपणा व खरा चेहरा खैरलांजी घटनेतील पीडित भैयालाल भोतमांगे यांच्या मृत्युने दाखवुन दिला आहे. उच्चवर्णीयांच्या तिरस्कृत नजरांपासुन स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करत, आयुष्याचा पुर्वाध कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत शांतपणे जगणारे, पण उत्तरार्धात याच नजरांचा स्फोट झाल्यावर भीषण शोकांतिकेला सामोरे जावे लागलेले, भैयालाल भोतमांगे यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रत्येक व्यक्ती आशेवर जगत असतो. भैयालाल सुद्धा आपल्या कुटुंबियांवर झालेला पाशवी अत्याचार डोळ्याने पाहुन सुद्धा न्यायाच्या आशेने न्यायव्यवस्थेचा दरवाजा ठोठावत राहिले. पण शेवटी हृदयविकाराच्या एका झटक्याने त्यांची ही आशाही हिरावली गेली.
ग्रामीण भागातील गावगाड्याचे सामाजिक विषमतेचे प्रचंड चटके सहन करून सुद्धा ताठ मानेने जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भोतमांगे कुटुंबासाठी २९ सप्टेंबर २००६ हा दिवस काळाकुट्ट ठरला. शेजारच्या गावातील प्रेमानंद गज्वी नावाच्या व्यक्तीबरोबर, काही कारणामुळे गावातील लोकांशी वाद झाला. सत्याची बाजु म्हणून भोतमांगे यांची पत्नी सुरेखाने साक्ष दिल्याने गावातील उच्चजातीय आणि उच्चवर्गीय वर्चस्व असलेल्या लोकांना पाहावले नाही. याचा राग आणि वर्षानुवर्षे उपेक्षीत असलेल्या एका दलित व्यक्तीने स्वाभिमानाने जगणे, मुलांना शिकविणे, मुलगी असुन सुद्धा प्रियंकाला १२वी शिकवुन पोलिस भरतीसाठी प्रोत्साहन देणे हे गावगुंडांना सहन होण्यासारखे नव्हते. आणि मानवी मनाला व मानवतेला काळीमा फासणारे कृत्य झाले. पत्नी सुरेखा व मुलगी प्रियंका यांच्यावर आळीपाळीने सामुहीक बलात्कार करण्यात आले, गुप्तांगावर विवस्त्र अवस्थेत वार करून त्यांचे तुकडे करण्यात आले. दोन्ही मुलांना बेदम मारहान करून त्यांचे हातपाय तोडले व नंतर बैलगाडीमध्ये टाकुन गावातुन मिरवणुक काढत, गावकुसाबाहेर पाठबंधाऱ्यात फेकुन देण्यात आले. त्याचवेळेस असह्य होऊन भैयालाल पोलीसांचे पाय धरत विनवण्याकरत “तुम्ही एकदा तरी गावात चला” असे सांगत होते. पण पोलीसांनी जरा सुद्धा ऐकले नाही. समुद्रा एवढे दु:ख हृदयात दाबुन व डोक्यावर सारे आभाळ कोसळले असतानां जगण्याची इच्छाच राहिली नाही, असे भैयालाल यांच्या डोळ्यातील रक्ताश्रु सांगत होते. पण तरी सुद्धा झालेला अत्याचार पाहता, खचुन न जाता केवळ कुटुंबियाना न्याय मिळावा यासाठी स्वत: प्रत्येक दिवस जीव जाळत न्यायासाठी संघर्ष सुरू झाला. तो त्यांच्या निधनापर्यंत याच अकरा वर्षाच्या काळात भंडारा येथे एका वस्तीगृहात शिपाई म्हणुन काम करून व निवृत्तीनंतर विशेष बाब म्हणजे मिळालेली मुदतवाढ व त्यातुन मिळणाऱ्या मोजक्या पैशाच्या आधारावर स्वत:ची उपजीविका भागवत न्याय मिळावा म्हणुन कधी नागपुरला तर कधी दिल्लीला चकरा मारत राहिले.
पण संवेदनाशुन्य झालेल्या जुलमी न्यायव्यवस्थेपर्यंत भैयालाल भोतमांगे यांचा आवाज व वेदना आयुष्याच्या शेवट पर्यंत पोहचलीच नाही. या हत्याकांडामध्ये गावातील बहुतेक लोकांचा सहभाग असताना सुद्धा फक्त ११ लोकांवर खटला चालवण्यात आला. भंडारा न्यायालयाने यातील ३ आरोपींना मुक्त केले आणि दोघांना जन्मठेपेची व सहा जणांना फाशीची शिक्षा सुनावली. नंतर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा झालेल्यांची सुद्धा शिक्षा जन्मठेपेत बदलली. सीबीआईने भोतमांगे यांना आश्वासन दिले की कमी होत चाललेल्या शिक्षे विरोधात आम्ही सर्वोच न्यायलयात अपील करू, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे भोतमांगे यांना स्वत: सर्वोच न्यायलयात अपील करावी लागली. तिथे त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांच्या अपीलाची शेवटची सुनावणी ऑगस्ट २०१५ मध्ये झाली. मृत्युच्या दोन दिवसा अगोदर दोन वर्षांपासुन स्थगिती असलेल्या सुनावणीला सुरूवात कधी होणार? हा त्यांचा शेवटचा प्रश्न त्यांच्या हृदयाचे ठोके थांबताच संपला. भोतमांगे यांना व्यवस्थेशी दोन हात करताना पावला-पावलावर पराभवच बघावा लागला. त्यांचे न्यायाचे स्वप्न अधूरे राहिले. बथानी टोला, लक्ष्मणपुर बाथे सारखे दलित हत्याकांडां प्रमाणेच खैरलांजी हत्याकांडातील पीडितांना सुद्धा न्याय मिळाला नाही. या घटनेने पुन्हा एकदा गरीब, दलित व समाजातील इतर वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यात न्याय व्यवस्थेची अकार्यक्षमता आणि दुबळेपणा उजागर झाला आहे.
कामगार बिगुल, एप्रिल २०१७
बबनराव, या लेखाच्या सुधारून पुनर्मुद्रणाबाबत बोलायचे आहे. माझा नंबर९८६७११८५१७.