सर्व कामगारांनी संघटित झाले पाहिजे

माझं नाव मोहम्मद मेहताब आहे आणि मी मुंबईतील मण्डालातील एका स्टील कारखान्यामध्ये काम करणारा कामगार आहे. ज्या कारखान्या मध्ये मी काम करतो तिथे 25 ते 30 लोक काम करतात, ज्यापैकी 10 ते 12 महिला आहेत. इथे जवळच आणखी दोन कारखाने आहेत. या तीन कारखान्यांमध्ये मिळून जवळपास 350 कामगार काम करतात त्यात जवळपास 200 महिला कामगार आहेत. या कारखान्यांमध्ये स्टी‍ल पोलिशिंगचे अत्यंत धोकादायक काम चालते. स्टील लाइन मधली बहुतांश कामे तशीही अत्यंत धोकादायक असतात आणि कारखान्यांमध्ये दररोजच अपघात घडत असतात. अश्या अपघातानंतर कारखाना मालक कामगारांना किरकोळ उपचार उपलब्ध करतो, परंतु अशा अपघातांमध्ये त्यांना कधीही नुकसान भरपाई दिली जात नाही. अपघातानंतर कारखाना मालक कामगारांना कामावरून काढून सुद्धा टाकतात.
workers unityइथे कामाचे तास नक्की नाहित आणि दररोज 12-13 तासांपेक्षा जास्त काम करायला लागते. ज्या दिवशी लोडिंग-अनलोडिंगचे काम असते त्या दिवशी तर 16-16 तास काम करावे लागते. आठवड्या मध्ये 2-3 दिवस लोडिंग-अनलोडिंगचे काम करावे लागते. सध्याची महागाई बघता मुंबई सारख्या शहरामध्ये आम्हाला अत्यंत कमी मोबदला दिला जातो. एकही दिवस सुट्टी न घेता घाम गाळून सुद्धा महीन्या शेवटी 8-9 हजार पेक्षा जास्त कमाई होत नाही. त्यामुळे आम्ही इच्छाअसून सुद्धा आमच्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये पाठवू शकत नाहीत. इथे कुठल्याच कारखान्याचे रजिस्ट्रेशन झालेले नाही आणि श्रम कायद्यांविषयी कुठल्याही कामगाराला काहीच माहिती नाही. बहुतांश कामगारांना कारखान्यांमध्येच रहावे लागते कारण मुंबईमध्ये रहायला घर मिळणे अत्यंत अवघड आहे. अश्या कामगारांचे तर जास्ताच शोषण होते. आम्हाला शुक्रवारी सुट्टी मिळते पण त्यांना तर दररोज काम करावे लागते.
यापूर्वी मी अलाहाबाद मध्ये रहायचो आणि खताच्या कारखान्या मध्ये काम करायचो. मी अजूनही बऱ्याच शहरांमध्ये काम केले आहे परंतु सर्वच ठिकाणी कामगारांची परिस्थिती सारखीच आहे. माझ्या मते आपण सर्व कामगारांनी संघटित झाले पाहिजे आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष केला पाहिजे. आपण आपली मजबूत अशी यूनियन स्थापन करायला हवी, तेव्हांच आपण मालकांशी लढू शकू. आगोदरच अस्तित्वात असलेल्या मोठ्या मोठ्या यूनियन्स कामगारांच्या, हितांसाठी काहीही काम करत नाहीत. आपल्याला अशा यूनियन्स पासून दूर राहिले पाहिजे आणि आपली स्वत:ची क्रांतिकारी यूनियन बनवली पाहिजे.

 

कामगार बिगुल, ऑगस्‍ट २०१५