बुलंदशहर मधील हिंसा, कोणाचे षडयंत्र?
संपूर्ण समाज माथेफिरू बनवलेल्या गर्दीच्या स्वाधीन होईल, त्या अगोदर, आतातरी तरी भानावर या!
नवमीत, अनुवाद: प्रवीण सोनवणे
अपेक्षेप्रमाणेच सर्वसाधारण निवडणुकांच्या अगोदर देशामध्ये वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नांना आता वेग आला आहे. काही काळापासूनच अयोध्येत राम मंदीर बनवण्याच्या मुद्यावरुन परत एकदा वातावरण तापवले जात होते. लव्ह-जिहाद आणि गोहत्ये सारखे मुद्दे तर तेव्हापासूनच तापवले जात आहेत जेव्हापासून केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आले आहे. मध्ये-मध्ये राज्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हा तर हे सर्वच मुद्दे आणखीच आग भडकावत राहिले. गोरक्षेच्या नावाखाली जमावाद्वारे हत्येच्या घटना सुद्धा सातत्याने घडत आहेत. ताजं उदाहरण हे उत्तर प्रदेश मधील बुलंदशहर येथील आहे. तेथे योजनाबद्ध पद्धतीने गोहत्येच्या नावावर गर्दीला भडकवण्यात आले आणि मग हिंसा, जाळपोळ आणि उच्छाद माजविला गेला. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी ड्युटीवर असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याची जमावाद्वारे हत्या केली गेली. सोबतच नेहमी प्रमाणेच सोशल मिडीयावर सुद्धा नाना प्रकारच्या अफवा पसरवून परिस्थितीला आणखी चिघळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जात राहिला. हिंसेमध्ये सुमित नावाचा एक तरूणही मारला गेला. नंतर फोटो आणि व्हिडीयोतून हे उघड झाले की तो सुद्धा दंगल घडविणाऱ्यांमध्ये सामील होता. प्रत्येक निवडणुकी अगोदर अशा प्रकारच्या घटना घडणे ही सामान्य बाब झाली आहे. परंतु नेहमी प्रमाणेच इथेही काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्यांच्याविषयी बोलणे गरजेचे आहे.
3 डिसेंबर रोजी बुलंदशहरच्या महाव गावाच्या एका शेतात गायीच्या मांसाचे तुकडे मिळाले. हे तुकडे जाणूनबुजून उसाच्या शेतात असे लटकवण्यात आले होते की ते लांबूनच नजरेस पडावेत. नंतर हे सुद्धा उघड झाले की जनावराला कमीत कमी 48 तास अगोदर मारून तिथे आणले गेले होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की याच्या ठीक 3 दिवसानंतर म्हणजे 6 डिसेंबर रोजी बाबरी मशिद विध्वंसाचा स्मृतीदिवस येणार होता आणि राम मंदिराचा मुद्दा अगोदर पासूनच तापलेला होता. याच दिवशी घटनास्थळापासून 50 किलोमीटर लांब मुस्लिमांचा धार्मिक समागम, इज्तेमा, सुरू होता ज्यात लाखो मुसलमान सहभागी झाले होते. अफवा अशी सुद्धा पसरवण्यात आली होती की गोहत्येच्या घटनेला इज्तिमामध्ये सहभागी असलेल्या लोकांनी घडवले आहे. सुदर्शन न्यूज नावाच्या संघी न्यूज चॅनेलचा मालक सुरेश चव्हाणकेने तर अधिकृतपणे याची खोटी बातमी सुद्धा प्रसारित केली होती ज्याचे उत्तरप्रदेश पोलिसांनी ट्वीट करून खंडन केले. इथे आणखी एक गोष्ट पाहण्यासारखी आहे की महाव गाव हे बुलंदशहर-गढमुक्तेश्वर राज्य महामार्गावर पडते आणि इज्तिमाच्या समापनानंतर या मार्गावरून लाखो मुस्लिमांना जायचे होते. ‘दैनिक जागरण’ च्या बातमीनुसार महाव गावामध्ये गोवंशाचे अवशेष मिळाल्यानंतर संघ परिवाराच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चिरगांवठी गावाच्या जवळ बुलंदशहर-गढमुक्तेश्वर राज्य महामार्गावर मांसाच्या तुकड्यांना ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये ठेवून रास्तारोको केला होता. ज्या वेळेला रास्ता रोको केला होता त्याच्या ठीक एक तास अगोदर म्हणजे 11 वाजता इज्तिमाचं समापन झाले होते आणि याच मार्गावरून इज्तिमामध्ये सहभागी मुस्लिमांना आपल्या वाहनांवरून परतायचे होते. दंगलीसाठी यापेक्षा चांगलं ठिकाण आणि वेळ काय असू शकली असती? पोलिसांनी वेळ पाहून मुसलमानांना घटनास्थळाच्या दुसऱ्या मार्गाने पाठवून दिले होते, परंतु घटना स्थळावर दंगल उसळली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वातील जमाव आणि पोलिसांमध्ये झडप झाली ज्यामध्ये एक व्यक्ती सुमित आणि एक पोलिस अधिकारी सुबोध कुमार सिंह हे गोळी लागल्याने मृत्यूमुखी पडले. सुबोध कुमारला गोळी मारण्याच्या अगोदर अतिशय वाईट पद्धतीने मारले आणि फरफटवले सुद्धा होते.
पोलिसांनी या प्रकरणात बजरंग दलाचा कार्यकर्ता योगेश राज आणि हिंदु संघटनांच्या इतर कार्यकर्त्यांसहीत 27 लोकांचे नाव घेतले आहे. नंतर 5 डिसेंबर रोजी बजरंग दलाचे संयोजक व इन्स्पेक्टर सुबोध कुमारच्या हत्येमधील मुख्य आरोपी योगेश राजचा एक व्हिडिओ समोर आला. व्हिडिओ मध्ये योगेश राज स्वत:ला निर्दोष सांगत आहे आणि म्हणत आहे की घटनेच्या वेळी तो स्याना येथील ठाण्यामध्ये एफ. आय. आर. नोंदवायला गेला होता. जागरण वृत्तपत्रानुसार स्याना ठाण्याच्या मुंशींनी सांगितले की योगेश राजने 12:43 ला एफ.आय.आर. नोंदवली होती ज्याची सीपीआई घेऊन तो 12:50 ला ठाण्यातून निघून गेला. जमाव आणि पोलिसांची झडप जवळपास 1 वाजता सुरू झाली आणि 1:35 वाजता इन्स्पेक्टर सुबोध कुमारांना गोळी मारली गेली. ही घटना जिथे घडली ते ठिकाण पोलिस ठाण्यापासून 11 किलोमीटर लांब आहे. 12:50 ते 1:35 च्या दरम्यान 45 मिनिटांच्या कालावधीमध्ये 11 किलोमीटर जाणे अवघड नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की योगेश ठाण्यातून निघून सरळ घटनास्थळी पोहोचला आणि लोकांना भडकवायला लागला.
हा रिपोर्ट लिहिला जाई पर्यंत पोलिस योगेशला अटक करू शकले नव्हते (नंतर 2 जानेवारीला अटक झालेली आहे— अनुवादक). नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार पोलिसांना त्यांच्या मोबाईलचे लोकेशन दिल्ली आणि तिच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मिळाले आहेत. वर्तमानपत्राच्या न्यूज पोर्टलने लिहिले आहे की एका मोठ्या पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की योगेश राज 6 डिसेंबर पर्यंत दिल्लीतील एका हिंदू संघटनेच्या नेत्याच्या घरामध्ये आश्रय घेऊन होता. प्रश्न हा आहे की जर पोलिसांना त्याचे लोकेशन माहित होते तर अटक का केली जात नव्हती? पोलिसांवर “वरून” दबाव होता काय?
दुसरीकडे सुमित आणि सुबोध कुमारच्या शवांचे पोस्टमार्टेम झाले तर आणखी आश्चर्यचकीत करणारे तथ्य समोर आले. त्यांच्या पोस्टमार्टेम नुसार दोघांनाही .32 बोअरच्या पिस्तुलाने गोळी मारली गेली होती. प्रश्न असा निर्माण होतो की दोघांनाही एकाच हत्याराने एकाच व्यक्तीने तर गोळी मारली नाही ना?
घटनेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दिसतेय की शेतामध्ये उभ्या असलेल्या एका पोलिसाला पाहून संतप्त जमाव दगडफेक करत … मारा-माराचा आवाज देत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की इन्स्पेक्टर सुबोध हेच दादरीमधील अखलाख हत्याकांडाचे तपास अधिकारी होते. अखलाखला सुद्धा गोहत्येच्या अफवेने पेटलेल्या जमावाद्वारे मारले गेले होते. आताच सुबोध कुमारचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते म्हणताहेत की अखलाख हत्याकांडाच्या तपासाला प्रभावित करण्यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. उघड आहे की ते बुलंदशहर मधील घटनेच्या अगोदरपासूनच कट्टरपंथी हिंदू संघटनांच्या निशाण्यावर होते.
जागरण वृत्तपत्राने लिहिले आहे की गुप्तहेर खात्याच्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे की सहा तरुण घटनास्थळापासून तब्बल 500 मीटर लांब बसलेले होते. या सर्व तरुणांचे चेहरे झाकेलेले होते जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नये. त्यामुळे रिपोर्ट मध्ये या युवकांची नावे लिहिलेली नाहीत. अंदाज आहे की हे सहा युवक संपूर्ण घटनाक्रमाचे सुत्रधार असू शकतात. त्यांचा शोध सुरू आहे. हे तरूण कोण होते आणि कोणत्या उद्दिष्टाने तेथे बसले होते हा गंभीर प्रश्न आहे.
घटना ज्या ठिकाणी घडली ती जागा चिरगांवठी गावाच्या पोलिस ठाण्याजवळ आहे. नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार गावातील प्राथमिक आणि ज्युनियर माध्यमिक शाळेमध्ये तीन डिसेंबरला 150 हून अधिक विद्यार्थ्यांना वेळेच्या आधीच सकाळी सव्वा अकरा वाजताच मध्यान्ह भोजन दिले गेले होते. शाळेत मध्यान्ह भोजन वाटप करणाऱ्या राजपाल सिंह यांनी सांगितले की त्यांना भोजन लवकर वाटायचे आणि मुलांना घरी पाठवायचे आदेश मिळाले होते. याशिवाय शिक्षकांना सुद्धा लवकर घरी निघून जाण्यास सांगण्यात आले होते. आदेशाचे कारण सांगण्यात आले की त्या दिवशी परिस्थिती खराब होऊ शकते.
बीबीसी हिंदीने लिहिले आहे की “गावाच्या अगदी शेजारी जर रात्री डझनभर पशूंची हत्या झाली असेलही, तरी दोन मोठ्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नाही. पहिला हा की डझनभर पशूंना मारण्यासाठी किती लोक पोहोचले होते आणि कुठून आले होते? नंतर ते गायब कसे झाले? दुसरा हा की डझनभर जनावरांना मारते वेळी जो गोंगाट माजतो, त्याला रात्रीच्या शांततेमध्ये कोणीही गाववाल्याने का नाही ऐकले? या सर्व गोष्टी आहेत ज्या गहन प्रश्न उभे करतात.
एवढी मोठी घटना घडल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येची कसून चौकशी करण्याऐवजी पोलिसांना गोहत्येचा तपास लावण्याचे आदेश दिले. जर गोहत्या झाली तर त्याची जबाबदारी पोलिस आणि प्रशासनाची राहील. मुख्यमंत्र्यांनी गोहत्येची जबाबदारी तर निश्चित केली परंतु गायीच्या नावाने झालेल्या माणसांच्या हत्येची जबाबदारी कुणाची राहील? योगीने लवकरात लवकर गो हत्याऱ्यांना पकडण्याचे आदेश दिले आणि माणसांच्या हत्येला अतिशय निर्लज्जपणे ‘दुर्घटना’ घोषित केले.
याच दरम्यान पोलिसांनी हिंसेच्या खटल्यामध्ये एकूण 27 जणांचे नाव घेतले आहे. ज्यापैकी 4 जणांना अटक झाली आहे. गुन्हा दाखल असलेल्यांपैकी मुख्य आरोपी योगेश राज हा बजरंग दलाचा जिल्हा संयोजक आहे. बजरंग दलाचा दंगली भडकावण्याचा इतिहास जुना आहे. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्राहम स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांना जिवंत जाळण्यामध्ये सुद्धा याच संघटनेचा कार्यकर्ता दारासिंहला शिक्षा झाली होती. गुजरात दंगल असो वा मुझप्फर नगर दंगल, प्रत्येक ठिकाणी आर.एस.एस.च्या या संघटनेचे नाव पुढे येत राहिले आहे. दोन वर्षांपूर्वी बातमी आली होती की हे संघटन उत्तर प्रदेशच्या विविध शहरांमध्ये ‘आत्मरक्षा शिबिर’ नावाने दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. या केंद्रांमध्ये म्हणायला तर आत्मरक्षा शिकवण्याची गोष्ट केली जाते पण प्रत्यक्षात इथे अल्पसंख्यांकांविरोधात राग पसरवला जातो आणि त्याला तापवत त्यांच्या हत्यांसाठी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
उघड आहे की हे सर्व अचानक नाही झालेले. याची तयारी खूप काळापासून सुरू होती. पण खोटारडेपणाचा तर आर.एस.एस. आणि त्याच्या सहकारी संघटनांनी कारखानाच उघडला आहे. हिटलरचा प्रचार मंत्री गोबेल्स याने म्हटले होते की जर एखादं खोटं शंभर वेळा मांडलं तर ते सत्य बनते. आर.एस.एस. सहीत जगातील सर्व फॅसिस्ट संघटना याच मुलमंत्रावर चालतात आणि आर.एस.एस.ला तर यामध्ये विशेष हातखंडा प्राप्त आहे. आर.एस.एस.ची स्थापना 1925 मध्ये झाली होती. त्या वेळी, जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्याची लढाई लढत होता, आर.एस.एस.ने इंग्रजांशी सहयोगाची निती अवलंबली होती. इंग्रज देशामध्ये हिंदू-मुसलमानांना आपापसात लढवत राज्य करत होते, त्यांची सेवा करताना आर.एस.एस.ने हे तंत्र चांगल्या पद्धतीने शिकून घेतले. गोरक्षा समित्या सुद्धा या संघटनेने त्याच वेळी बनवायला सुरू केल्या होत्या आणि तेव्हापासूनच मुसलमान यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. गोबेल्सच्या पावलांवर चालत शंभर नाही तर कोट्यवधी वेळा ही गोष्ट सांगितली आहे की मुसलमानांपासून देशाला धोका आहे, ते विदेशी आहेत. त्यांना देशातून हाकलून दिले पाहिजे, मारून टाकले पाहिजे. तसेच हे मुसलमान जाणूनबुजून गोमांस खातात कारण हिंदूंना चिडवता यावे. परंतु जे विदेशी म्हणजे इंग्रज प्रत्यक्षात गोमांस खात होते, देशाला गुलाम बनवून बसले होते त्यांचे पाय मात्र आर.एस.एस. चाटत होते. आता काही वर्षांपासून म्हणजे बाबरी मशिद पाडल्या पासून त्यांनी आपल्या शक्तिमध्ये सातत्याने वाढ केली आहे आणि याच दरम्यान त्यांच्या खोट्या प्रचारामध्ये सातत्याने वाढ होत आली आहे. आता सर्वच ठिकाणी सातत्याने दंगली आणि धार्मिक हिंसा घडण्याच्या बातम्या येत राहिल्या आहेत. गुजरात दंगलींच्या अगोदर सुद्धा हे लोक अशा घाणेरड्या घटना घडवत राहिले आहेत परंतु त्यानंतर तर जणू अशा घटनांचा पूरच आला आहे. कधी दंगली, कधी विरोधकांची दिवसा-ढवळ्या सुनियोजित हत्या, तर कधी गायीच्या नावाने, तर कधी लव्ह जिहादच्या नावाने, तर कधी मंदिर-मशिदीच्या नावाने मॉब लिंचिंग!
“अच्छे दिनाचा” वायदा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने मागील साडे चार वर्षांमध्ये “अच्छे दिन” आणण्याचं काम फक्त भांडवलदारांसाठी केले आहे. निवडणुकीतील आपल्या वायद्यांची थट्टा उडवत मोदी कधी बेरोजगारांना भजी तळण्याचा सल्ला देतात तर कधी नोटबंदी सारखी संकटं निर्माण करत आहेत. आता निवडणुका जवळ आहेत तर सांप्रदायिक तणाव सातत्याने वाढवला जात आहे आणि याचे कारण सुद्धा स्पष्ट आहे. संपूर्ण जगासह भारत सुद्धा आर्थिक अरिष्टाच्या घेऱ्यात आहे. भांडवली व्यवस्थेला यातून बाहेर येण्याचा कोणताच मार्ग सापडत नाहीये. वास्तवात होते असे की भांडवलशाहीमध्ये सर्व संपत्ती मूठभर लोकांच्या ताब्यात येते आणि बहुसंख्यांक कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि कनिष्ठ मध्यमवर्ग सातत्याने दळला जात असतो. जेव्हा भांडवली संकट येते तेव्हा परिस्थिती अजूनच खालावत जाते. मोठ्या प्रमाणावर कामगार कपात केली जाते, बेरोजगारी वाढते, छोटे उद्योग बंद होऊ लागतात. भुकबळी, बेरोजगारीने त्रस्त असलेल्या जनतेमध्ये असंतोष वाढत जातो आणि याच वेळी एखादी योग्य क्रांतिकारी शक्ती नेतृत्व देण्यासाठी असेल तर क्रांती होण्याची शक्यता सुद्धा वाढू लागते. अशात भांडवलदार वर्गाकडे एकच पर्याय उरतो. तो असतो फॅसिझमला शरण जाण्याचा. फॅसिझम ही एक प्रतिक्रियावादी सामाजिक चळवळ असते जी आपला आधार समाजाच्या सर्वच स्तरांवर मजबूत बनवते. अधिकांशत: मध्यम वर्गावर आणि शक्य तेवढ्या कामगार वर्गावर सुद्धा. ही जनतेचं लक्ष्य मुख्य प्रश्नांवरून हटवण्यासाठी एका काल्पनिक शत्रूला निर्माण करते. जर्मनीमध्ये हिटलरच्या पक्षाने यहूदींना शत्रू म्हटले होते. भारतामध्ये आर्.एस.एस. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यांकांना शत्रू म्हणते. फॅसिझम खोटा प्रचार करतो की कथित शत्रूच समस्यांचे मूळ कारण आहेत आणि खऱ्या समस्या सुद्धा भुकबळी, निरक्षरता, महागाई, आणि बेरोजगारी नाहीत तर लव्ह जिहाद, गोहत्या, आणि मंदिर-मशिद आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तो ‘फायनल सोल्युशन’ देतो की या कथित शत्रूंना मारून टाकले पाहिजे. याच खोट्या गोष्टींचा कोट्यवधी वेळा प्रचार करून त्याला सत्य बनवण्याचा प्रयत्न केला जातो. फॅसिझम जुन्या काळाच्या महानतेचा गौरव करतो, आपल्या धर्म आणि कुळाला सर्वश्रेष्ठ म्हणतो. देश-धर्म धोक्यात असल्याचे सांगतो, युद्ध आणि सेनेचं गुणगान करतो, उथळ प्रकारच्या देशभक्तीचा प्रचार करतो. यामुळे लोकांना वाटते की अहा, हाच तर स्वर्ग आहे ! जेव्हाकी वास्तवात हा घृणीत नरक असतो. लोकांच लक्ष विचलित करून आणि आपापसात भांडायला लावून फॅसिझम आपल्या भांडवली मालकांना दोन्ही हातांनी जनतेचे श्रम आणि देशाच्या संसाधनांच्या लुटीची खुली सूट देतो.
मोदी सरकार आणि संघ परिवार खरेतर हेच करत आहेत. परंतु आपल्याला फॅसिस्टांच्या या घाणेरड्या षडयंत्राला बळी न पडता त्यांचं बिंग फोडलं पाहिजे. शहिद-ए-आजम भगतसिंहानं म्हटलं होतं की “लोकांना आपापसात भांडण्यापासून रोखण्यासाठी वर्गीय जाणीवेची गरज आहे. गरीब, कष्टकरी, व शेतकऱ्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्या हातचलाखीपासून जपून राहिले पाहिजे आणि त्यांना बळी पडून काही केले नाही पाहिजे. जगातील सर्व गरिबांचे, भलेही ते कोणत्याही जाती, धर्म, रंग वा राष्ट्राचे असोत – अधिकार एकच आहेत. तुमचे हित यातच आहे की तुम्ही धर्म, रंग, वंश आणि राष्ट्रीयता व देशांचे भेदभाव संपवून एकजूट व्हा आणि शासनाची सत्ता आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न करा. या प्रयत्नांमुळे तुमचं काहीच नुकसान होणार नाही. याने एखाद्या दिवशी तुमच्या बेड्या तुटतील आणि तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.”
हीच गोष्ट लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक जात व धर्माशी संबंधित देशातील कष्टकरी जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता, त्यांचे इरादे निकामी केले पाहिजेत आणि त्यांना सडेतोड उत्तर देत आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे.
कामगार बिगुल, जानेवारी 2019