तुमच्या समाजाचा ऱ्हास

राहुल सांकृत्यायन  (अनुवाद – प्रविण सोनवणे)

लेखकाचा परिचय

राहुल सांकृत्यायन खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री  गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे  हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.

जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ  शकते की,  ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा,  साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती.  इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र,  मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?,  बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.

राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर  करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”

राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं गतिरोध. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त  भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख  करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.

समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरुध्द तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.

—————————————-

मनुष्य सामाजिक प्राणी आहे. मानव आणि प्राण्यांमध्ये अंतर एवढेच की मानव आपल्या हित आणि अहितासाठी अधिकत: आपल्या समाजावर अवलंबून असतो. खरेतर प्राणीजगताचे मोठ-मोठे शक्तीशाली शत्रू असताना तसेच वेळोवेळी येणाऱ्या हिमयुगासारख्या महाभयंकर नैसर्गिक संकटांपासून बचावात त्याच्या मेंदूने जे सहाय्य दिले आहे, त्यामध्ये मानवाचे समाजाच्या स्वरूपातील संघटन अतिशय सहाय्यक ठरले आहे. समाजाने सर्वात अगोदर दुबळ्या माणसांच्या शक्तींना शेकडो माणसांच्या ऐक्याद्वारे खूप वाढविले. तेव्हाच त्याने, आपल्या नैसर्गिक आणि इतर शत्रूंपासून रक्षण मिळवत असताना, आपल्यातूनच अशा शत्रूंना जन्म दिला की ज्यांनी त्या नैसर्गिक आणि पाशविक पशूंपेक्षाही जास्त, मनुष्य-जीवनाला नरकासमान बनवण्याचे काम केले आहे.

समाजाचे पहिले कर्तव्य आहे समूहातील व्यक्तींच्या बाबतीत न्याय करणे. न्यायाचा अर्थ हा असला पाहिजे की प्रत्येक व्यक्ती आपल्या कष्टाच्या फळाचा उपभोग घेऊ शकेल. परंतु आम्ही याच्या उलट पाहत आहोत.

धन ते आहे जे माणसाच्या जीवनासाठी अत्यंत गरजेचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या त्याच वस्तू आहेत ज्यांना धन म्हटले पाहिजे. वास्तविक धनाचे उत्पादक तेच आहेत जे या वस्तूंना निर्मितात. शेतकरी खरा धनाचा निर्माणकर्ता आहे. तो मृदेला गहू, तांदूळ, कापसाच्या रूपात परिवर्तित करतो. दोन तास रात्र शिल्लक असतानाच तो शेतावर पोहोचतो, ज्येष्ठाची रणरणती दुपार असो अथवा माघ-पौषाची हाडं गोठवणारी थंडी, तो नांगर जुंपतो, ढेकळं फोडतो, त्याचे अंग घामाने निथळून निघते, त्याच्या एका-एका हाताला सात सात घट्टे पडतात, फावडे चालविता-चालविता त्याला दम लागतो, परंतु तेव्हासुद्धा तो तशाच प्रकारे मशागत करत राहतो. कारण त्याला माहित आहे की धरणी आईच्या इथे लाच चालत नाही. ती स्तुती प्रार्थनेच्या द्वारे आपले हृदय खोलू शकत नाही. ही मूल्यरहीत माती सोन्याचे गहू, रूप्याचे तांदूळ आणि द्राक्षांच्या मोत्यांच्या रूपामध्ये तेव्हाच परिवर्तित होते जेव्हा ती पाहते की शेतकऱ्याने तिच्यासाठी आपल्या रक्ताचे किती घडे खर्चले, किती वेळा त्याचं अंग मोडून निघाले आणि कुदळ हातातून अनायासे गळून पडली.

गहू आपोआप एका जागी दहा-वीस मण ठेवलेला मिळत नाही. तो पंधरा-पंधरा वीस-वीस दाण्यांच्या रूपात आणि तो सुद्धा वेगवेगळ्या ओंब्यांमध्ये संपूर्ण शेतामध्ये विखुरलेला असतो. शेतकरी त्याला गोळा करतो, ओंब्यांपासून वेगळं करतो. दहा-दहा, वीस-वीस मणाच्या ढिगांना एका ठिकाणी पाहिल्यावर एकदा त्याचे मन पुलकित होऊन उठते. महिन्यांच्या भुकेने अर्धमेली त्याची मुलं अधाशी डोळ्य़ांनी त्या राशींना पाहतात. ते समजतात की दु:खाची अंधारी रात्र सरणार आहे आणि सुखाची सकाळ समोर येत आहे. त्यांना काय माहित की त्यांची ही राशी, जिला त्यांच्या माता-पित्याने एवढ्या कष्टाने निर्माण केले, त्यांच्या खाण्यासाठी नाहीये. हे खाण्याचे अधिकारी सर्वात अगोदर ते स्त्री-पुरुष आहेत ज्यांच्या हातांना एक सुद्धा घट्टा नाहीय़े, ज्यांचे हात गुलाबासारखे लाल आणि लोण्यासारखे मऊ आहेत. ज्यांची ज्येष्ठाची दुपार खसच्या ताट्यांमध्ये, विजेचे पंखे किंवा शिमला आणि नैनिताल मध्ये जाते. हिवाळा त्यांच्यासाठी थंडीचा त्रास घेऊन येत नाही, तर मऊ चादरी आणि महागड्या ओव्हरकोटांनी संपूर्ण शरिराला झाकलेल्या या लोकांसाठी आनंदाचे सर्व मार्ग उघडतो. आळशी आणि रिकामटेकडी ही मोठी माणसं —जमीनदार, सावकार, मील-मालक, मोठ-मोठ्या पगारावाले नोकर, पंडित आणि दुसऱ्या सर्व प्रकारचे परजीवी —शेतकऱ्यांच्या कष्टाच्या या कमाईच्या जेवणावर सर्वांच्या अगोदर हक्क बजावतात.

कामगार भोंगा वाजताच डोळे चोळत-चोळत कारखान्यांकडे धावतात. अलिकडील काही दिवसांअगोदर पर्यंत तर कामाच्या तासांवर कोणतेच निर्बंध नव्हते आणि आतासुद्धा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांवरच हे नियम लागू आहेत. तिथे तीन आणे, चार आणे रोजावर तो खपतो आहे. याच तीन-चार आण्यांमध्ये त्याला बायको, तीन-चार मुलं आणि म्हाताऱ्या आई वडिलांची सुद्धा काळजी वाहायची आहे. एक दिवस सुद्धा निश्चिंत होत पोट-भर खाणे त्याच्यासाठी हराम आहे आणि याही पलीकडे जर तो आजारी पडला तर त्याला नोकरीला मुकावे लागते. जर म्हातारा किंवा अपंग झाला तर  त्याला आणि त्याच्या मुलाबाळांना आकाशाखाली भीक देणारे सुद्धा कोणीच नाही. हेच नाही, कालपर्यंत कारखाना चोवीस तास चालत होता, आज मालकाकडे बातमी येते की वस्तूंचे भाव पडले, आता त्यांना मुद्दलाच्या भावातसुद्धा कोणीच विकत घेणारा नाहीये; तेव्हा कारखान्याला टाळे लावले जाते. कामगार, त्याची मुलं-बाळं, दाण्या-दाण्यासाठी हुंदके देऊन रडू लागतात. जेव्हा त्याला काम मिळत होते आणि रोजंदारी मिळत होती तेव्हासुद्धा त्याचे जीवन नरकापेक्षा वेगळे नव्हते आणि बेकारी तर जिवंतपणीच मरण आहे. अशा हाल अपेष्टांना सहन करत कामगार तयार करतो भारीतील भारी कपडे, साखर, मिठाई आणि हजारो तऱ्हेची सुख-चैनीची साधनं. तो आपल्या हातांनी उभारतो मोठ मोठे महाल, बंगले, बगीचे, भारी रस्ते. परंतु त्याला स्वत:ला काय मिळते? त्याचं झोपडं कदाचित पावसात शाबूत रहात असावं. त्याच्या शरीराला झाकण्यासाठी चिंधड्या सुद्धा  मिळत नाहीत.  त्याने स्वत:च बनविलेल्या कितीतरी वस्तू त्याला स्वप्नवत वाटतात आणि कामगारांच्या हाडा-घामाने आणि चिंतेने तयार झालेल्या बनलेल्या या वस्तूंचा उपभोग कोण घेतो? त्याच्या रक्ताच्या चिखलातून उभ्या राहिलेल्या गगनचुंबी वास्तूमध्ये कोण वास्तव्य करतो? तेच मोठ-मोठे परजीवी—जमीनदार, सावकार, कारखान्यांचे मालक, मोठमोठ्या पगारांवाले नोकर, पुरोहित.

शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी आपले तारुण्य धुळीस मिळवितात, झोपेचा त्याग करतात, आपल्या स्वतःच्या आरोग्याचा सत्यानाश करतात, पण तो त्यांना भुके-नागडे ठेवून समाधानी होत नाही, तर पदोपदी त्यांना अपमानित करणे आपलं कर्तव्य समजतो. शेतकरी आणि कामगार गरीब का आहेत? कारण त्यांनी आपली कमाई कुटुंब आणि मुला-बाळांना उपाशी ठेवून त्या परजीवींना हसत हसत दिली आहे. त्यांच्याच रक्ताने मोठी झालेली ही पोटं गरिबांनाच नावं ठेवतात.  त्यांच्या भाषेमध्ये गरिबांसाठी वेगळे शब्द आहेत. ‘तुम्ही’ची तर बातच काय ‘तू’ सुद्धा त्यांच्यासाठी वापरलेले जाऊ शकत नाही. “अबे”, “ए” असेच त्यांना संबोधित केले जाते. घाणेरड्यातील घाणेरड्या शिव्यांना त्यांच्यासाठी वापरणे श्रीमंतीचा अभिमान, शान आहे. त्यांच्यामुळेच गरिबीची शिकार असलेला कामगार आणि शेतकरी त्यांच्यासमोर खाटेवर बसू शकत नाही; खडाव, चपला घालू शकत नाही, छत्री घेऊ शकत नाही. खेड्यातील शेतकऱ्यांची अब्रू आणि मालमत्त्ता जमीनदारांच्या हातात आहे. तो त्याला जसे पाहिजे तसे नाक रगडायला लावतो.

ही तर झाली वास्तविक खऱ्याखुऱ्या धनाच्या उत्पादकांची अवस्था आणि परजीवी कामगार शेतकऱ्यांची कमाई त्यांच्यासाठी अर्पित आहे. ते हा विचार करण्याची पर्वा करत नाहीत, तमा बाळगत नाहीत की त्यांचा लाखोंचा कर आणि नफा कशाप्रकारे मिळविला गेलाय. काय हा विचार करण्याचे ते कष्ट घेतात का, की या एक-एक रुपयाला जमा करण्यासाठी शेतकऱ्याने किती वेळा आपल्या मुलांना उपाशी ठेवले? किती आयांनी स्वतःला नागडे ठेवले? किती रोग्यांनी आजार आणि औषधे न मिळाल्याने स्वतःचे प्राण गमावले? जर त्यांना असा विचार असता तर कधीच दोन हजाराच्या फोर्ड कारच्या जागी तीस हजाराची रोल्स रॉईस खरेदी करणे पसंत केले नसते. महिन्याकाठी हजार-हजार रुपये मोटारीच्या तेलात फुंकले नसते. हाकिमांच्या मेजवान्या आणि विलासितेच्या जलशांमध्ये लाखोंचा चुराडा केला नसता.

हा सर्व अन्याय असून सुद्धा कुणाला काही फरक पडत नाही. समाजाचे पंच म्हणतात की, श्रीमंत-गरीब पूर्वीपासून सातत्याने चालत आले आहेत, जर सर्वांना समान केलं तर कोणालाच काम करणं आवडणार नाही; दुनियेला चालवण्यासाठी श्रीमंत-गरीब राहणं आवश्यक आहे. समाजाच्या बेड्या तुरुंगाच्या बेड्यांपेक्षाही मजबूत आहेत. त्यांना सामान्य डोळ्यांनी पाहता येऊ शकत नाही. परंतु जिथे समाज कायद्याच्या विरुद्ध—जरी तो कायदा अगदी अन्यायावर आधारित का असेल ना—काही गोष्ट, घटना घडली की समाज हात धुवून मागे पडतो. विहिरीत पाणी आहे, काठावर पोहरा दोरी ठेवलेली आहे, एकीकडे मंदिराच्या अंगणात भक्तिभावाने डोलत-डोलत लोक रामायण वाचताहेत- ‘जाति-पाँति पूछे नहिं कोई। हरि के भजै सो हरि के होई।” गीता वाचली जात आहे – “विद्या विनय-सम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि। शुनि चैव श्वपाके च पण्डिता समदर्शिनः।।’ (विद्या आणि शील संपन्न, ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ सर्वांमध्ये पंडित माणसे समदर्शी असतात.) महात्मा आणि पंडित लोक भावूक होऊन अर्थ सांगत आहेत—”जे काही आहे ती सर्व ईश्वराची देणगी आहे, सियाराम मय सद जग जानी! करहु प्रणाम जोरी जूग पाणी! चराचर विश्व सर्व ईश्वराचे रुप आहे, जे आहे त्यामध्ये काही भेद नाही.” असे वाटते की चहू दिशेने समदर्शिता, विश्व-बंधुत्व आणि प्रेमाचा महासमुद्र उसळ्या मारतोय. त्याचवेळेला ज्येष्ठाच्या दुपारी तहानेने व्याकुळ झालेला चांभार येतो, त्याचे पाऊल विहिरीच्या दिशेने पडते, भक्तांपैकी कोणीतरी त्याची जात ओळखतो, महात्मा आणि भक्तीरसात डबडबलेल्या सर्व श्रोत्यांचा पारा चढतो, डोळे लाल होतात आणि सर्वजण जणू काही कच्चा खाऊन टाकण्यासाठी त्या निरपराध व्यक्तीकडे धाव घेतात. त्याचा अपराध काय? विहिरीतून पाणी पिणे गुन्हा आहे काय? समदर्शिता आणि विश्वबंधुत्वाच्या वायुमंडळात विहिरीतून पाणी काढून पिणे महापाप आहे? आणि ही मंडळी काहीच मिनिटे अगोदर जो राग आळवीत होती त्यानुसार काय असे करणे योग्य होते? त्या व्यक्तींपैकी एका-एकाला वेगवेगळं विचारा—”तुमच्या वचनात आणि कर्मात, बोलण्यात आणि वागण्यात एवढं अंतर का?” हिंडून-फिरून तुम्ही याच मतावर पोहचाल की समाज त्यांच्याकडून तसेच करवून घेऊ इच्छितो.

एका वरच्या उच्च जातीतील आई-वडीलांची एक छोटीशी मुलगी आहे. समाजाने दबाव टाकला आहे की तिचा विवाह आठ दहा वर्षाच्या वयापर्यंत व्हावा. अकराव्या वर्षी ती मुलगी विधवा होते. मग तोच समाज म्हणतो की आता तिचा विवाह होऊ शकत नाही. आता तिला आजन्म ब्रह्मचारी राहावे लागेल आणि आपल्या इंद्रियावर संयम ठेवावा लागेल. कसले ब्रह्मचर्य आणि इंद्रिय संयम? ज्याचे पालन करण्यात विश्वामित्र आणि पराशर, शृंग आणि व्यासासारखे मोठ-मोठे ऋषी बिलकुल असमर्थ ठरले? आज सुद्धा त्याच विधवा मुलींचा पन्नास वर्षाचा म्हातारा बाप हा एका स्त्रीच्या निधनानंतर दुसरीशी विवाह करायला तयार आहे. त्याच्या पंचवीस वर्षाच्या भावाच्या पत्नीला मरून महिन्यापेक्षा जास्त दिवस नाहीत परंतु दुसऱ्या लग्नाची बोलणी पक्की होत आहेत. तर मग काय समाजाची अक्कल मेली आहे? काय त्याच्या डोळ्यावर पडदा पडलाय? काय त्यांना माहित नाही की या अबोल बालिकेकडून आयुष्यभर ब्रह्मचर्य आणि संयमाची आशा ठेवणे फक्त दुराशा आहे? काय त्याने आपल्या आजूबाजूला प्रतिवर्षी एक-दोन गर्भ पाडताना पाहिले नाहीत? इतक्या वर सुद्धा तो समजू शकत नाही की जर त्या मुलीला उघड-उघड समागमाचे स्वातंत्र्य दिले नाही तर ती लपून छपून तसेच करेल? उघड-उघड करत असतांना कदाचित तिने नाती आणि जातीचा ही विचार केला असता, परंतु लपून करताना ती सर्वात जवळच्या नातेवाईका सोबत सुद्धा नातं जोडू शकते. एखाद्या जातीचा पुरुष जो तिला सोयीस्कर आहे, तो तिच्या प्रेमाच्या लायक ठरू शकतो. या गुप्त प्रणयाचा परिणाम तिला माहित आहे, तिच्यासाठी तो मृत्यू दंडापेक्षा पेक्षा कमी नाही. जर गर्भ पाडण्यात येऊ शकला नाही तर तिला सर्वात मोठी शिक्षा ही मिळेल की तिचे आई-वडील, भाऊबंद, रक्ताचे अत्यंत जवळचे नातेवाइक तिला एखाद्या अनोळखी शहरात एखाद्या जागेत सोडतील, तिथे तिला आयुष्यभर वेश्या व्यवसाय अथवा त्याच प्रकारे काम करावे लागेल. समाजाच्या दबावात तिचे भाऊबंद तिला विषही देऊ शकतात, शस्त्राने मारू शकतात. जर गुप्त संबंधांना लपविता आले तर निश्चितच एक-दोन गर्भ पाडले जाऊ शकतील. जो समाज या सर्व गोष्टींना आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि त्याच्या परिणामांना सुद्धा बऱ्यापैकी समजतो, तो कसे काय इतके अशक्य नियम अभागी व्यक्ती समोर सादर करू शकतो? काय यातून त्यांची संवेदनहीनता स्पष्ट होत नाही का? प्रत्येक पिढीच्या कोट्यवधी माणसांच्या आयुष्याला या प्रकारे कलुषित, पीडित आणि कष्टदायक करून तो आपल्या नरपिशाचतेची ओळख देत नाही का? अशा समाजाप्रती आमच्या हृदयात काय सन्मान असू शकतो? काय सहानुभूती असू शकते? बाहेरून धर्माचे ढोंग, सदाचरणाचा अभिनय, ज्ञान-विज्ञानाचे नाटक केले जाते आणि आतून अतिशय जघन्य आणि किळसवाणे काम. धिक्कार असो अशा समाजाचा! सर्वनाश हो अशा समाजाचा!!

ज्या समाजाने प्रतिभांना, कौशल्यांना जिवंतपणीच गाडून टाकणे कर्तव्य समजले आहे आणि गाढवांसमोर द्राक्ष पसरविण्यात ज्याला आनंद वाटतो अशा समाजाच्या अस्तित्वाला आपण क्षणभर सुद्धा स्विकारले नाही पाहिजे. एक गरीब आई-वडील आहेत. त्यांचा स्वतःच्याच खाण्यापिण्याचा आणि कपड्यांचा ठिकाणा नाही. त्यांच्या घरी एक असाधारण प्रतिभावंत जन्म घेतो. बालपणापासून त्याला एका श्रीमंताच्या मुलाला खेळवावे लागते, शेळ्या-मेंढ्या चरवून पोट भरण्यास बाध्य व्हावे लागते. आई वडिलांना माहितच नाही की मुलांना लिहायला वाचायला शिकवणे हे सुद्धा त्यांचे कर्तव्य आहे. जरी त्यांना माहीत असले तरी त्यांच्याकडे ना फी भरण्याचे पैसे, ना पुस्तक घेण्यासाठी रक्कम. मुलगा मोठा होतो, म्हातारा होतो, मरून जातो, आणि आपल्या प्रतिभेला, कौशल्याला सोबत घेऊन जातो, जिच्याद्वारे तो देशाला एक चाणक्य, एक कालिदास, आर्यभट्ट, एक रवींद्र, एक रमण देऊ शकला असता. मी खेड्यातील एका अभिनेत्याला पाहिले आहे. जर तो एखाद्या अशा देशांमध्ये जन्माला आला असता जिथे पुढे जाण्याचे सर्व मार्ग खुले आहेत, तर तिथे प्रथम श्रेणीचा जगप्रसिद्ध अभिनेता असता. परंतु आज साठ वर्षाच्या अवस्थेत या अशिक्षित व्यक्तीची ती महान प्रतिभा ग्रामीण जीवनातील काही स्त्री-पुरुष जीवनांच्या जिवंत चित्रणाद्वारे आपल्याला ओळखणाऱ्या काही जणांचेच फक्त मनोरंजन करू शकते. मी असे स्वाभाविक कवी पाहिले आहेत ज्यांना अक्षराचे काहीच ज्ञान नाही. ते ज्या भाषेत बोलतात तिच्यामध्ये कोणतेही लिखित साहित्य नाही, कोणतीही गुरुपरंपरा नाही, छंद आणि अलंकाराची माहिती होण्याचे कोणतेही साधन नाही, तरीसुद्धा आपल्या भाषेत ते अतिशय भावपूर्ण, रसपूर्ण कविता करु शकतात. शिकलेली माणसं त्यांच्या कवितेला गावठी किंवा अडाणी म्हणून अनादर करतात आणि या कारणाने ते स्वतः सुद्धा तिला तसेच समजतात. कवित्वासाठी बाहेरून त्यांना न कोणती प्रेरणा मिळते ना प्रोत्साहन; केवळ अंत:करणातून व्याकूळ होत ते कधी-कधी काहीतरी गातात. मी खेड्यातील एका मुलाला ओळखतो, त्याची आई विधवा आहे. नावापुरती  थोडी शेती आहे जी आई आणि मुलाच्या जीविकेचे साधन आहे. गावातील शाळेत शिकायला गेला. असाधारण बुद्धिमत्ता आणि गणितात विशेष नैपुण्य. त्याला प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती मिळाली व त्याच आधारे त्याने माध्यमिक पर्यंतचे शिक्षण घेतले. तिथेही त्याने शिष्यवृत्ती मिळवली, जी पुरेशी नव्हती. तरीसुद्धा तो कसे तरी आपले शिक्षण सुरू ठेवू शकला. मॅट्रिकमध्ये सदर विभागातून उत्तीर्ण होणाऱ्या मुलांमध्ये त्याचा क्रमांक दुसरा किंवा तिसरा होता. परंतु एक किंवा दोन विद्यार्थी जे त्याच्यापेक्षा जास्त गुण आणि क्रमांकाने पास झाले होते ती श्रीमंताची लाडावलेली  पोरं होती. त्यांच्यासाठी दोन-दोन तीन-तीन शिक्षक घरी ठेवले होते. त्यांना इतर तरूणांसारखी खाण्याची-पिण्याची चिंता नव्हती. यावेळेस पुन्हा त्याला शिष्यवृत्ती मिळाली. तो महाविद्यालयात शिकू लागला. फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे त्याचे विषय होते. शिष्यवृत्ती पुरेशी नव्हती. इकडे त्याची तब्येतही बिघडली. याउपरही एका खेड्याच्या ठिकाणाहून येऊन खूप गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध एका महाविद्यालयामध्ये त्याने नाव दाखल केले होते. तेथे शिष्यवृत्ती कमी होती. योगायोगाने एकाच शिष्यवृत्तीसाठी तीन विद्यार्थ्यांचे मार्क सारखेच आले. शिष्यवृत्ती कोणाला मिळाली पाहिजे याचा निर्णय करतेवेळी विश्वविद्यालयाने असे दोन विषय पाहिले ज्यामध्ये एक दुसराच विद्यार्थी —जो पैसे वाल्याचा मुलगा होता व ज्याला त्या विषयात एक-दोन गुण जास्त होते—निवडला. याची कोणीही त्याची पर्वा केली नाही की त्या तरुणाच्या—जो अतिशय दारिद्र्यात जन्म घेऊन, कितीतरी अडचणींना पार करत, इथपर्यंत पोहोचला होता—प्रतिभेचे भविष्य काय होईल. मला त्या तरुणाला वर्षभरानंतर भेटण्याचा योग आला. मी पाहिले त्याचा चेहरा थायसिसच्या रोग्यासारखा झाला आहे. शरीर अतिशय अशक्त. मी कारण विचारले. तो तरुण बहाणा बनवून निघून गेला. तो निघून गेल्यानंतर दुसऱ्या मित्राने सांगितले की “त्याला या वर्षी शिष्यवृत्ती मिळाली नाही. खूप विनवण्यांनंतर फी माफ झाली. खाण्यापिण्यासाठी त्याने शिकवणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु विद्यार्थी मिळाले नाहीत. एक-दोन मित्र आपल्या सोबत राहण्याचा आग्रह करत होते, परंतु त्याला तो आपल्या स्वाभिमानाविरुद्ध समजत होता.” दुसऱ्या दिवशी ही माहिती सांगत मी जेव्हा त्या तरुणाला विचारले तर त्याने उत्तरादाखल म्हटले, “होय, ठीक आहे. मी शिकवणीसाठी खूप प्रयत्न केले. कॉलेजचे तास संपवून मी तासन-तास याच साठी भटकत राहिलो. परंतु पुढे काही होताना दिसत नसल्यामुळे मी आता सोडून दिले आहे.” ज्यावेळी या प्रतिभावंत तरुणाच्या या उपेक्षेला पाहण्याची संधी मिळाली आणि हे सुद्धा ऐकले की तो फक्त एक वेळेस थोडीशी खिचडी खाऊन गुजराण करत आला आहे, तेव्हा खरं सांगू, माझ्या डोळ्यात रक्त उतरले. मला वाटत होते की अशा समाजाला जगू देणे पाप आहे. या पाखंडी, धूर्त, बेईमान, कृर आणि नृशंस समाजाला पेट्रोल टाकून जाळून टाकले पाहिजे.

एकीकडे प्रतिभेची अशी अवहेलना आणि दुसरीकडे श्रीमंतांच्या गाढव मुलावर अर्धा डझन खाजगी शिक्षक लावून-लावून, त्यांना मारून मुटकून पुढे ढकलणे. मी एका अशा व्यक्तीला ओळखतो ज्याच्या डोक्यात सोळा आणे शेण भरलेले होते; परंतु तो एका करोडपतीच्या घरी जन्मला होता. त्याच्यासाठी मॅट्रिक पास करणे सुद्धा दुरापास्त होते परंतु तो आज एम. ए. च नाही तर डॉक्टर आहे. त्याच्या नावाने डझनभर पुस्तकं छापलेली आहेत. दूरवरचं जग त्याला मोठा विद्वान समजते. एकदा “त्याचे” एक पुस्तक वाचून एक सज्जन म्हणाले, “मी याचे अमुक पुस्तक वाचले होते. त्याचे इंग्रजी अतिशय चांगले होते आणि या पुस्तकाची भाषा तर अतिशय रद्दी आहे.” त्यांना काय माहित होते की त्या पुस्तकाचा लेखक दुसरा होता आणि या पुस्तकाचा दुसरा.

प्रतिभेच्या गळ्यावर याप्रकारे सुरी चालताना पाहून जो समाज खिन्न होत नाही, त्या समाजाचा “ऱ्हास होवो” हे सोडून आणखी काय म्हणता येऊ शकते.

 

कामगार बिगुल, जानेवारी 2019