कोरोनाच्या काळात अफवा आणि अंधश्रद्धांचा सुळसुळाट!
मूर्खपणाची स्पर्धा बंद करा! विज्ञानाची कास धरा!
पवन
भारतीय समाजातील अंधश्रद्धा पुन्हा एकदा कोरोनाच्या निमित्ताने बोकाळून आल्या आहेत. सर्वधर्मीय बाबा-बुवांनी लाज आणेल अशाप्रकारे कोरोनाला संपवणाऱ्या औषधी आणि उपाययोजना शोधल्या आहेत आणि व्हॉट्सअप वरचे योद्धे या अंधश्रद्धांना जीवापाड मेहनत करून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. माझा धर्म मोठा की तुझा या साठमारीमध्ये, आणि धार्मिक-जातीय़ वर्चस्वाच्या विचारांनी ग्रासलेल्या समाजामध्ये कोरोना सारख्या साथीला प्रतिबंध करणे अजून अवघड काम बनवले आहे.
उत्तर प्रदेश मध्ये लखीमपूर मध्ये एका पंडिताने सांगितले की विहिरीमध्ये पाणी भरल्यानंतर कोरोना निघून जाईल. लखनऊ मध्ये एक कोरोना बाबा नावाचा बाबा आहे जो तावीज बांधल्यानंतर कोरोना लागण तुम्हाला होणार नाही असा भ्रम पसरवत आहे. कुठून तरी व्हाट्सअप वरून मेसेज आला आणि भाटापारा या गावांमध्ये नंदी ला पाणी पाजण्याचा प्रकार सुरू झाला, तर काही ठिकाणी गोमूत्र पिल्याने आणि शेणाचा लेप लावल्याने त्याचा आजार तुम्हाला होणार नाही असे सांगणारे संदेश व्हॉट्सअप वर फिरत आहेत. याचाच एक परिणाम म्हणजे बंगालमध्ये जोर बागवान या ठिकाणी एका भाजप कार्यकर्त्याने शिपायाला जबरदस्ती गोमूत्र पाजले, ज्यामुळे तो आजारी पडला आणि या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आहे. बुंदेलखंड मध्ये घरातील दारात भांडे ठेवून भांड्याला शेण लावल्याने तुमच्या घरांचे रक्षण देवी करेल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोरोनाची लागण होणार नाही असा प्रचार झाला. तर राजस्थानमध्ये दोहोरी जिल्ह्यांमध्ये लोक एकत्र येऊन कोणत्यातरी बाबाची पूजा करत आहेत.
ज्या देशामध्ये रामदास आठवले सारखे मंत्री ‘गो कोरोना’ चा नारा देतात तिथे इतरांकडून काय अपेक्षा करावी? मोदींनी स्वत:च्या सरकारचे नाकर्तेपण लपवायला जनतेला टाळ्य़ा-थाळ्य़ा वाजवायला आणि दिवे लावायला सांगितले, तर देशातील महान भक्त मंडळींनी थाळ्या वाजवून कोरोना मरतो आणि दिवे लावून सुद्धा मरतो असा प्रचार चालू केला. इथेच थांबले नाहीत तर शेकडो लोकांनी लॉकडाऊन धाब्यावर बसवून एकत्र येत मोठमोठ्या रॅली काढल्या आणि ‘गो कोरोना’च्या घोषणा दिल्या, ज्याचे शेकडो व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहेत. कोरोनाच्या निमित्ताने लोकांच्या धर्मश्रद्धाळू स्थितीचा आणि खोट्या राष्ट्रवादाच्या लहरीचा फायदा घेत, आयुर्वेदाच्या शास्त्राला फाट्यावर मारत, बाबा रामदेव या उद्योगपतीने तर कोरोनावर शंभर टक्के उपाय शोधल्याचा पूर्णपणे खोटा दावा करत औषधही बाजारात आणले!
सर्व जगामध्ये शारीरिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न चालू असताना, तिकडे सर्व धर्माच्या लोकांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे की आमच्या धर्माची शक्ती कोरोनाला थांबवू शकते. दिल्लीमध्ये मरकज मध्ये जमलेल्या तबलीघी मुस्लिम धर्मप्रचारकांच्या बावळटपणामुळे रोग अजून पसरला. त्यांचे नेते मौलाना साद हे धार्मिक मूर्खपणाचे अपवाद नाहीत तर नियम आहेत असे म्हणावे लागेल. इतर धर्मांनी बहुतेक आपल्या धर्माचे ‘देव’ कसे जास्त शक्तीशाली आहेत हे सांगण्यात आणि बावळटपणाच्या स्पर्धेमध्ये अजिबात कसर सोडलेली नाही. एप्रिल महिन्यात रामनवमी साजरी करण्यासाठी पश्चिम बंगाल मध्ये शेकडो लोक एकत्र जमले. कर्नाटकात कोळगोड्डंहळ्ळी या गावात हजारो लोक धार्मिक जत्रेसाठी जमले. याला गावाच्या पंचायतीने परवानगी सुद्धा दिली! 11 मे रोजी मध्यप्रदेशामध्ये मुनी प्रणाम सागर या जैन साधूंच्या स्वागतासाठी सागर जिल्ह्यामध्ये शेकडो लोक एकत्र आले. भारतातच हे होत आहे असे नाही. लंडनमध्ये स्टॅंफर्ड हिल येथे हासिदिक ज्यू समुदायाचे अनेक लोक 14 मे रोजी एकत्र जमले आणि आपला सण साजरा केला. जगभरामध्ये इतरही अनेक उदाहरणे आहेत, पण अशा अंधश्रद्धांच्या बाबतीत भारत विरळाच म्हणावा लागेल!
वैज्ञानिक तथ्य
नोव्हेल कोरोना व्हायरस हा एक नवीन व्हायरस असून यावर कोणतेही औषध किंवा लस अजून विकसित झालेली नाही. अनेक जण याला विज्ञानाचे ‘अपयश’ म्हणून संबोधताना दिसतात आणि म्हणूनच ‘दैवी’ उपचारांचा मार्ग सांगताना दिसतात. खरेतर विज्ञान कधीही शंभर टक्के सत्य किंवा सर्व उत्तरे माहित असल्याचा दावा करत नाही. विविध देशांमध्ये शास्त्रज्ञ, डॉक्टर्स मिळून औषध आणि लस शोधत आहेत, परंतु अशाप्रकारच्या वैज्ञानिक शोधाला किती वेळ लागेल किंवा नक्की यश मिळेलच याची खात्री कधीच नसते. गोवर, देवी, पोलिओ सारख्या अनेक आजारांवर विज्ञानाने लस शोधली आणि कोट्यवधी लोकांचे जीव वाचले. परंतु एड्स सारख्या रोगावर संशोधन चालूच आहे. विज्ञान म्हणजे जादू नाही, तर मानवी प्रयत्न आणि वैज्ञानिक पद्धत यांचा परिणाम आहे. आजपर्यंत सर्व रोगांवर फक्त विज्ञानानेच औषध शोधले आहे आणि त्यामुळे विज्ञानाचा जास्तीत जास्त प्रसार-प्रचार-वापर-शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे. औषध मिळणे वा ना मिळणे यातून विज्ञानाचे यश वा अपयश सिद्ध होत नाही. परंतु उपाय मिळण्याचा वैज्ञानिक पद्धत हाच एकमेव मार्ग आहे.
कोरोनावर औषध नसले, तरी इतर अनेक आजारांप्रमाणे आपापल्या शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीप्रमाणे अनेक लोक बरे होत आहेत. तरीही सध्या कोरोना पासून वाचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे त्याचा संसर्ग होऊ न देणे. त्यासाठी पहिले म्हणजे स्वतःची स्वच्छता ठेवणे, सॅनिटायझर किंवा साबणाने हात सतत स्वच्छ करणे, मास्क लावणे, घरामध्ये किंवा बाहेरील संपर्कात येणाऱ्या व्यक्ती पासून शरीरापासून किमान एक मीटरचे अंतर ठेवणे, या गोष्टी महत्वाच्या ठरतात दुसरे म्हणजे कोणतीही लक्षणे आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधणे व त्याच्यावर योग्य तो उपचार घेणे आणि कोणत्याही धार्मिक दुष्ट प्रचाराला आणि अंधविश्वासाला बळी न पडणे. भारतासारख्या प्रचंड गरिबी असलेल्या देशात हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सरकार रिकामी घरं ताब्यात घेणे, मोठमोठी हॉटेल्स आणि पंचतारांकित हॉस्पिटल ताब्यात घेणे आणि जनतेला उपलब्ध करून देणे, वैद्यकीय सेवेचे राष्ट्रीयीकरण, यासारखी क्रांतिकारी पावले उचलेल. तेव्हा जनपक्षधर वैज्ञानिक दृष्टीकोण फक्त औषधासाठीच नाही, तर सामाजिक-आर्थिक बाबींमध्येही आवश्यक आहे. अंधश्रद्धा, धार्मिक अपप्रचार याला बळी न पडता, डॉक्टर आणि वैज्ञानिक समुदायाकडून दिल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन हाच एकमेव मार्ग अवलंबिण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आपण केला पाहिजे, आणि वैज्ञानिक मार्गानेच रोगाला तोंड देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करवण्यासाठी भांडवली राज्यसत्तेसोबत सुद्धा संघर्ष केला पाहिजे.
कामगार बिगुल, जुलै 2020