समाजवादाची मुळाक्षरे (भाग – १)
लिओ ह्यूबरमॅन
अनुवाद – पुष्कर सराड
समाजवाद म्हणजे कामगारांचे राज्य. कामगारांचे राज्य असे आपण म्हणतो, त्याचा नेमका अर्थ काय? एेण उत्पादन, संपूर्ण शासन प्रशासनावर कामगारांचा ताबा असलेली व्यवस्था म्हणजेच कामगारांचे राज्य. आज आपण एका भांडवली समाजात जगतो आहोत. म्हणजेच अशा समाजात जेथे उत्पादनावर, एकूण शासन प्रशासनावर मूठभर धनिकांचा, भांडवलदारांचा ताबा आहे. ही अशी व्यवस्था आहे जिच्यामध्ये कामगार हर तऱ्हेचे कष्ट उपसतात आणि सगळा फायदा मालक लाटतात. काहीच न करता मालक चैनीत राहतात आणि कामगार दिवसभर घाम गाळूनसुद्धा दरिद्रीच राहतो. अशी व्यवस्था संपायला नको का? अशी लुटारू व्यवस्था नक्कीच नष्ट झाली पाहिजे. हे ऐकायला फार गोड वाटते, पण खरोखरच अशी व्यवस्था नष्ट केली जाऊ शकते? हो नक्कीच नष्ट केली जाऊ शकते. तिला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे क्रांती. मात्र बघता बघता क्रांती करून टाकली, असे काही कधी होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला क्रांतीच्या शास्त्राची गरज आहे. हे शास्त्र आत्मसात केल्याशिवाय आपण समाज बदलू शकत नाही. आजपासून सुमारे १०० वर्षांपूर्वी रशियामधील कामगारांनी १९१७ साली हे शास्त्र आत्मसात करून आपल्या देशात समाजवादाची स्थापना केली होती. चिनमधील कामगारांनीसुद्धा १९४९ साली क्रांती करून राज्य आपल्या हाती घेतले होते. हे दोन्ही मागासलेले देश होते परंतु त्यांनी समाजवादाच्या काळामध्ये वेगाने प्रगती केली. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी मालकांनी चालवलेली लूट थांबवली आणि सामूहिकतेवर आधारित एका नव्या समाजाची निर्मिती केली. दोन्ही देशांमध्ये २५-३० वर्षे समाजवाद राहिला, परंतु तो जास्त काळ टिकू शकला नाही. आज मालकवर्ग आपल्याला सांगत असतो की समाजवाद अपयशी ठरला आहे आणि तो फार दिवस टिकून राहू शकत नाही. परंतु हे खरे नाही, समाजवाद अपयशी ठरला नाही तर त्याने आपल्या काळात लोकांच्या जीवनात विलक्षण परिवर्तन घडवून आणले. समाजवाद जास्त काळ रशिया आणि चिनमध्ये का टिकून राहू शकला नाही, हेसुद्धा आपण क्रांतिचे शास्त्र समजून घेतल्यानंतर जाणून घेऊ शकतो.
तसे पाहता हे शास्त्र समजून घेण्यासाठी मोठमोठी पुस्तके उपलब्ध आहेत. ती आपण नक्कीच वाचली पाहिजेत, परंतु सुरुवात आपण समाजवादाची मुळाक्षरे या लहानशा पुस्तिकेपासून करू या. अमेरिकेतील एक समाजवादी लिओ ह्यूबरमॅन यांनी लिहिलेली ही पुस्तिका भांडवलशाहीचे वेगवेगळे पैलू आणि समाजवाद म्हणजे काय हे अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये समजावते. ही पुस्तिका १९६७ मध्ये प्रकाशित झाली होती आणि प्रामुख्याने अमेरिकेतील कामगारांना डोळ्यांसमोर ठेवून ती लिहिण्यात आली होती. बहुतके आकडेवारीसुद्धा अमेरिकेतील आहे. परंतु ही पुस्तिका जेवढी अमेरिकेतील कामगारांसाठी प्रासंगिक आहे तेवढीच भारतातील कामगारांसाठीसुद्धा.
नियमित अभ्यास करण्यासाठी एक मालिका सुरू करणे गरजेचे आहे. म्हणूनच क्रांतिचे शास्त्र या शिर्षकासह आम्ही ही मालिका सुरू करीत आहोत. आपले जीवन बदलण्यासाठी आवश्यक असे लिखाण आम्ही नियमितपणे येथे प्रसिद्ध करू.
भांडवलशाहीचे समाजवादी विश्लेषण
१. वर्ग-संघर्ष
माणसे गरीब असोत वा श्रीमंत, दुर्बळ असोत वा बलिष्ठ, गोरी, काळी, सावळी वा गव्हाळ असोत, ती प्रत्येक ठिकाणी अशा वस्तूंचे उत्पादन आणि वितरण करतात ज्या जीवनासाठी अत्यावश्यक किंवा आवश्यक असतात. अमेरिकेमध्ये उत्पादन आणि वितरणाच्या या व्यवस्थेला भांडवलशाही म्हणतात. जगातील बहुतेक देशांमध्ये अशाच पद्धतीची व्यवस्था अस्तित्त्वात आहे. अन्न, वस्त्र, निवारा, ऑटो, रेडिओ, वर्तमानपत्रे, औषधे, शाळा इत्यादींच्या उत्पादन आणि वितरणासाठी मूलतः दोन गोष्टी आवश्यक आहेत.
१. जमीन, खनिज, कच्चा माल, मशीन, कारखाना ज्यांना अर्थशास्त्रज्ञ उत्पादनाची साधने असे म्हणतात.
२. कष्टकरी कामगार जे आपले श्रम आणि कौशल्य उत्पादनांच्या साधनांसोबत कामी आणतात आणि आवश्यक वस्तूंचे उत्पादन करतात.
इतर भांडवलशाही देशांप्रमाणेच संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्येसुद्धा उत्पादनांची साधने ही सार्वजनिक संपत्ती नाही आहे. जमीन, कच्चा माल, मशीन यांवर व्यक्तींची मालकी असते. हे एक महत्त्वपूर्ण सत्य आहे. कारण तुमची उत्पादनांच्या साधनांवर मालकी आहे अथवा नाही, यावरून तुमचे समाजातील स्थान ठरत असते. जर तुम्ही उत्पादनांच्या साधनांवर मालकी असलेल्या लहान वर्गाशी – भांडवलदार वर्गाशी – संबंधित असाल, तर तुम्ही काम न करतासुद्धा जगू शकता. जर तुम्ही उत्पादनांच्या साधनांवर मालकी नसलेल्या फार मोठ्या वर्गाशी, म्हणजेच कष्टकरी वर्गाशी – श्रमिक वर्गाशी- संबंधित असाल, तर तुम्ही काम न करता जिवंत राहू शकत नाही.
एक वर्ग शासन करून जिवंत राहतो आणि दुसरा वर्ग कष्ट करून. भांडवलदार वर्गाची मिळकत इतरांना आपल्यासाठी कामाला लावून पैदा होते, तर कष्टकरी वर्गाची कमाई त्याने केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्याला मिळणाऱ्या पगाराच्या स्वरूपात होत असते.
आपल्याला जिवंत राहण्यासाठी ज्या आवश्यक वस्तूंची गरज असते त्यांच्या उत्पादनासाठी श्रम आवश्यक असतात. कष्ट करणाऱ्या श्रमिक वर्गाला भरपूर मोबदला मिळत असेल, असे तुम्हांला वाटू शकते. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. भांडवलदारी समाजामध्ये जे सर्वांत जास्त श्रम करतात त्यांचे उत्पन्न सर्वांत जास्त असतेच असे नाही. या उलट, ज्यांच्याकडे सर्वांत जास्त मालकी असते, ते सर्वांत जास्त कमाई करतात.
नफा भांडवलदारी समाजामध्ये चक्र फिरतं ठेवण्याचे काम करतो. जो कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी कमीत कमी किंमत देतो, आणि जी वस्तू विकायची आहे तिची जास्तीत जास्त किंमत वसूल करतो, तोच हुशार व्यापारी असतो. खर्च कमी करणे हे जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या मार्गातील पहिले पाऊल आहे.
श्रमिकांना मिळणारा पगार हासुद्धा उत्पादनातील एक खर्च आहे. श्रमिकांना शक्य तेवढा कमी मोबदला देण्यात मालकाला म्हणजेच भांडवलदाराला रस असतो. त्याच प्रकारे, श्रमिकांकडून जास्तित जास्त काम करून घेण्यासही तो उत्सुक असतो.
उत्पादन सांधनांच्या मालकांच्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या माणसांच्या, म्हणजेच श्रमिकांच्या, आकांक्षा पूर्णपणे भिन्न असतात. भांडवलदारांसाठी संपत्तीचे स्थान पहिले तर माणूसकीचे स्थान दुय्यम असते. श्रमिक हा माणसाला म्हणजेच स्वतःला पहिल्या स्थानी ठेवतो तर संपत्तीला दुसऱ्या स्थानी. त्यामुळे भांडवलदारी समाजात या दोन वर्गांमध्ये नेहमी संघर्ष सुरू असतो. वर्ग समाजामध्ये दोन्ही पक्ष ज्या कारवाया करतात त्या त्यांच्यासाठी आवश्यक असतात. भांडवलदार हा भांडवलदार म्हणून टिकून राहण्यासाठी नफा मिळवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करतो. श्रमिक जिवंत राहण्यासाठी योग्य मजुरी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करतो. दोन्ही पक्ष परस्परांचे मोल देऊनच यशस्वी होऊ शकतात.
श्रम आणि भांडवल यांमधील सहिष्णुतेच्या सर्व बाता म्हणजे निव्वळ फसवणूक आहे. भांडवलदारी समाजात कसलीही सहिष्णुता असू शकत नाही, कारण जी गोष्ट एका वर्गाच्या फायद्याची आहे ती दुसऱ्या वर्गासाठी नुकसानीची आहे.
गळ्याशी चाकूचा जो संबंध असतो, तोच संबंध भांडवलदारी समाजात उत्पादनाच्या सांधनांचे मालक (भांडवलदार) आणि श्रमिक यांच्यामध्ये असणे बंधनकारकच आहे.
२.अतिरिक्त मूल्य
भांडवलदारी समाजामध्ये व्यक्ती वस्तूंचे उत्पादन आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करीत नाही तर वस्तू इतरांना विकण्यासाठी त्यांचे उत्पादन करते. पूर्वी लोक स्वतःच्या वापरासाठी वस्तूंचे उत्पादन करायचे, आता बाजारात विकण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते.
भांडवली व्यवस्थेला मालाच्या उत्पादनाची आणि वितरणाची चिंता असते.
श्रमिक उत्पादन साधनांचे मालक नसतात. ते फक्त एका मार्गाने आपली उपजीविका प्राप्त करू शकतात – मजुरीसाठी स्वतःला अशा व्यक्तीकडे गहाण ठेवून जी त्यांना विकत घेऊ शकते. ते एकच माल बाजारात आणून विकतात, तो म्हणजे त्यांची काम करण्याची क्षमता म्हणजेच श्रमशक्ती. हीच गोष्ट ग्राहक त्यांच्याकडून विकत घेतो. यासाठीच तो त्याला मजुरी देतो. श्रमिक आपल्या मालकाकडून मिळणाऱ्या मजुरीसाठी आपला माल, म्हणजेच आपली श्रमशक्ती विकतो.
तो किती मजुरी मिळवणार? आणि या मजुरीचा दर कोणती गोष्ट ठरवते?
श्रमिक जी वस्तु विकतो (म्हणजेच त्याची श्रमशक्ती) तोसुद्धा एक माल आहे, या सत्यामध्ये वरील प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. कोणत्याही अन्य मालाप्रमाणे, श्रमशक्तीचे मूल्यसुद्धा तिच्या उत्पादनात खर्ची पडलेल्या सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रमकालाच्या प्रमाणावरून निर्धारित होते. श्रमिकाच्या श्रमशक्तीचे मूल्य त्याला जिवंत राहण्यापुरते आवश्यक अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या बरोबर असते. (त्याचप्रमाणे, ते त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीसुद्धा पुरेसे असावे लागते, कारण श्रमाचा नियमित पुरवठा होणे आवश्यक आहे.)
दुसऱ्या शब्दांता सांगायचे झाल्यास, जर कोणा फॅक्टरी, गिरणी किंवा खाणमालकाला ८० तास श्रमकाळ हवा असेल तर जो कुणी हे करू शकतो किंवा करतो त्याला एवढी मजुरी देणे आवश्यक आहे की तो स्वतः जिवंत राहू शकेल तसेच त्याच्या म्हातारपणी अथवा मृत्यूनंतर त्याची जागा घेण्याकरिता त्याच्या मुलाला लहानाचा मोठा करू शकेल.
आपल्या श्रमशक्तीच्या मोबदल्यात कामगार जिवंत राहण्यापुरती मजुरी मिळवतो. काही देशांमध्ये तर ती इतकी कमी असते की तो एखादा टेप रेकॉर्डर किंवा फ्रिजसुद्धा विकत घेऊ शकत नाही, किंवा एखाद दिवशी सिनेमाचे तिकीट विकत घेणेसुद्धा त्याला परवडत नाही.
जे आर्थिक नियम कष्टकऱ्यांची मजुरी जेमतेम त्यांच्या उदरनिर्वाहापुरती मर्यादित करून ठेवतात, त्यांचा अर्थ असा समजायचा का की कष्टकऱ्यांच्या राजकीय संघटना आणि ट्रेड युनियम निरुपयोगी आहेत? नाही, असे नक्कीच नाही. आपल्या युनियनच्या माध्यमातून श्रमिक आपली मजुरी उदरनिर्वाहाच्या स्तराहून अधिक वाढवून घेऊ शकतात. काही देशांमध्ये हे शक्य झाले आहे. त्यात अमेरिका देशाचाही समावेश होतो. आणि हा असा एकमेव उपाय आहे ज्याद्वारे श्रमिक त्या आर्थिक नियमाला नेहमी कार्यशील ठेवू शकतात, हे लक्षात ठेवले पाहिजे.
नफा कुठून येतो?
मालाच्या वितरणाच्या प्रक्रियेत नफा निर्माण होत नाही, तर वास्तविक आपल्याला उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्येच नफा निर्माण होतो, व तो भांडवलदार वर्गाकडे जातो.
श्रमिक कच्च्या मालाला तयार मालामध्ये बदलून त्याचे रूपांतर एका नवीन संपदेमध्ये करतात. त्यातून एक नवीन मूल्य तयार होते. श्रमिकाला मजुरीच्या रूपात दिली गेलेली रक्कम आणि कच्च्या मालात जोडले गेलेले अधिकचे मूल्य, या दोन्हींमधील फरक मालक आपल्याकडे ठेवतो. यातूनच त्याचा नफा येतो.
श्रमिक ज्यावेळी स्वतःला एखाद्या मालकाकडे गहाण ठेवतो त्यावेळी जी वस्तू तो निर्माण करतो ती वस्तू तो विकत नाही, तर तो आपली उत्पादनाची क्षमता (मालकाला) विकतो. मालक श्रमिकाला आठ तासांत त्याने तयार केलेल्या मालासाठी मजुरी देत नाही तर त्याच्या आठ तासांच्या श्रमासाठी पैसे देतो.
श्रमिक संपूर्ण दिवसासाठी (म्हणजे आठ तासांसाठी) आपली श्रमशक्ती विकतो.
समजा, श्रमिकाला मिळणाऱ्या मजुरीच्या मूल्याएवढे उत्पादन करण्यासाठी लागणारा वेळ ४ तास आहे. तरी, ४ तासांनंतर तो काम बंद करून घरी जात नाही. अजिबात नाही. कारण त्याला ८ तास काम करण्यासाठी विकत घेतले गेले आहे. त्यामुळे तो राहिलेले चार तास काम सुरूच ठेवतो. हे चार तास तो स्वतःसाठी नाही तर मालकासाठी काम करतो. त्याच्या श्रमाच्या एका भागासाठी त्याला मोबदला दिला जातो. दुसऱ्या भागासाठी दिला जात नाही. आणि मालकाचा नफा याच मोबदला न दिल्या गेलेल्या श्रमामधून येत असतो.
श्रमिकाला दिला गेलेला मोबदला आणि त्याच्या द्वारे उत्पादित मूल्य यामध्ये फरक असणे आवश्यक आहे. नाहीतर मालक त्याला विकत घेणार नाही. श्रमिकाला दिला जाणार मोबदला आणि त्याच्या द्वारे उत्पादित मालाचे मूल्य यांमधील जो फरक आहे, त्याला अतिरिक्त मूल्य असे म्हणतात.
अतिरिक्त मूल्यच तो नफा आहे जो मालकाकडे जातो. तो श्रमशक्तीला एका विशिष्ट किंमतीला विकत घेतो आणि श्रमाने केलेले उत्पादन त्याहून जास्त किंमतीला विकतो. याच फरकाला, म्हणजे अतिरिक्त मूल्याला तो आपल्यापाशी ठेवतो.
…..उर्वरीत पुढील अंकात
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१५