पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प सहावे)
आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.
कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.
पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.
पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या या अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात करत आहोत. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू.
या साखळीतील पहिल्या काही पुष्पांमध्ये आपण पॅरिस कम्युनच्या पार्श्वभूमीमध्ये जाणून घेतले की कामगारांनी कशाप्रकारे भांडवलाच्या सत्तेविरोधात लढण्याची सुरूवात केली आणि कशाप्रकारे चार्टीस्ट आंदोलन आणि 1848 च्या क्रांत्यांमधून जात कामगार वर्गाची चेतना आणि संघटीतपणा वाढत गेला. आपण कामगारांच्या मुक्तीच्या वैज्ञानिक विचारधारेचा विकास आणि कामगारांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल (इंटरनॅशनलबद्दल) जाणले. गेल्या अंकात आपण पाहिले की कम्युनची स्थापना कशाप्रकारे झाली आणि तिच्या रक्षणाकरिता कामगार वर्गीय जनता कशाप्रकारे शौर्याने लढली. यावेळी आपण पाहूयात की कम्युनने खऱ्या लोकशाहीच्या नियमांना इतिहासात पहिल्यांदा व्यवहारात कसे लागू केले आणि हे दाखवले की “जनतेची सत्ता” खरोखर काय असते.
— संपादक मंडळ
पॅरिस कम्युन : सर्वहारा अधिनायकत्त्वाचा पहिला प्रयोग
- ‘
कम्युन’ कामगार वर्गाच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाच्या आणि सर्वाधिक प्रेरक घटनांपैकी एक आहे. एका जबरदस्त क्रांतिकारी उठावाद्वारे पॅरिस मधील कामगार जनतेने भांडवलशाही राज्य हटवून त्याजागी जनतेच्या सरकारच्या आपल्या संस्था स्थापन केल्या आणि 72 दिवसांपर्यंत राजकीय सत्ता आपल्या हातात ठेवली. पॅरिसच्या कामगारांनी खूप कठिण परिस्थितीत शोषण आणि अत्याचाराचा नायनाट केला आणि नव्या पायावर समाजाचे नवनिर्माण करण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्या 72 दिवसातील घटनांमुळे मिळालेले धडे आजही कामगार वर्गासाठी महत्वपूर्ण आहेत. कम्युनची निवडणूक सार्वत्रिक पुरूष मताधिकाराच्या सिध्दांतानुसार झाली होती. वर्साय येथील प्रतिक्रांतिकारी सरकारने जनतेला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी आव्हान केले होते आणि बुर्झ्वा व अभिजात इलाक्यांमधून पडलेल्या मताची संख्या खूप कमी होती. ही गोष्ट चांगलीच होती कारण याचा अर्थ होता की कम्युन मुख्यत्वे कामगारांमधूनच निवडून आले होते. कम्युनच्या सदस्यांमध्ये राष्ट्रीय गार्डच्या केंद्रीय समितीमधून वार्ले, दूवाल, जूर्द, एद, आणि वाइयां सारखे सर्वात प्रमुख लोक पण होते. राष्ट्रीय गार्डच्या केंद्रीय समितीप्रमाणेच कम्युन पण स्वत:ला पॅरिस शहराची नगरपालिका नाही तर लोकशाहीचे केंद्रिय क्रांतिकारी सरकार मानत होते.
- कम्युनने सर्वोच्च विधीमंडळाच्या रुपात काम करत कायदे बनवण्यास सुरवात केली होती. सोबतच ती कायदा लागू करण्यावरही
लक्ष ठेवून होती, म्हणजेच कम्युन सर्वोच्च कार्यपालिका सुद्धा होती. विधीमंडळ आणि कार्यपालिका यांच्या शक्तीचे एकाच गटामध्ये संयोजन हे कम्युनच्या सर्वात महत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यांपैकी एक होते. केंद्रीय समितीने सुरू केलेल्या जुन्या बुर्झ्वा राज्ययंत्रणेचा नाश करण्याच्या कामाला कम्युनने पूर्ण केले. कायमस्वरुपी सैन्य आणि पोलीस यांना या वेळेपर्यंत आधिकारिकरित्या भंग केले गेले होते. तोडफोडीच्या कामाशी संलग्न असलेल्या जुन्या नोकरशाही यंत्रणेच्या जागेवर जनतेच्या पंक्तीतून आलेल्या नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले होते. कम्युनने आदेश काढून नोकरशाहीमधील खूप मोठे वेतन घेणाऱ्या सदस्यांना काढून टाकले आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वरची मर्यादा आखून दिली, ज्यांचे लक्ष्य साधारण सरकारी कर्मचाऱ्याचे वेतन कुशल कामगाराच्या वेतनाच्या स्तरावर घेवून येणे असे होते. कम्युनने असाही आदेश दिला की सरकारी कर्मचारी जनतेद्वारे निवडून आले पाहिजेत, त्यांना जनतेसमोर उत्तरदायी व्हावे लागेल आणि कोणत्याही वेळी जनतेच्या मागणीनुसार त्यांना परत बोलावले जावू शकेल.
-
राष्ट्रीय गार्डच्या केंद्रीय समितीने आणि कम्युनने टाकलेल्या या सर्व पावलांनी एक नव्या प्रकारच्या सरकारचा पाया घातला, ज्याचा इतिहासात कोणताही दाखला नव्हता. परंतु खुद्द पॅरिसच्या कामगारांना आणि त्यांच्या नेत्यांना—कम्युनच्या सदस्यांना—सुद्धा अंदाज नव्हता की ते कोणत्या गोष्टीचे निर्माण करत आहेत. लोक आणि कम्युनमधील त्यांचे प्रतिनिधी जीवनाच्या अनुभवानुसार काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सृजनात्मक शक्तीलाच साकार करत होते. जनतेच्या या रचनात्मक शक्तीच्या दिशेचे आणि तिच्या वास्तविक महत्त्वाचे सर्वात पहिल्यांदा वर्णन कार्ल मार्क्सने केलेले होते. त्याने सागितले होते की 1871 ची पॅरिस कम्युन वस्तुत: त्या कामगारवर्गीय अधिनायकत्त्वाचे उदाहरण होते ज्याच्या आगमनाची त्याने आपल्या 1848-1850मधील आपल्या लेखांमध्ये घोषणा केलेली होती.
- नक्कीच, पॅरिस कम्युनमध्ये कामगारवर्गाच्या अधिनायकत्वाला पूर्ण रूपात विकसित होणे शक्य नव्हते. कम्युन हा अशा प्रकारच्या
अधिनायकत्त्वाच्या स्थापनेचा पहिला प्रयत्न होता. त्याचे नेते प्रयोग करत होते आणि त्यांनी काही गंभीर चुकाही केल्या. तरीपण कम्युनने हे दाखवले की कामगार वर्ग भांडवलशाही राज्ययंत्रणा नष्ट करण्यात, तिच्या स्थानावर राज्ययंत्रणेच्या उच्चतर स्वरूपाची स्थापना करण्यात, आणि अशा प्रकारच्या लोकशाहीच्या उच्चतर स्वरूपाचा—बहुतांशांच्या हिताच्या, जनतेच्या हिताच्या—कामगार लोकशाहीचा रस्ता प्रशस्त करण्यात समर्थ आहे आणि असे केलेही पाहिजे.
- केवळ 72 दिवसाच्या आपल्या छोट्या कारकिर्दीत कम्युनने हे दाखवून दिले की वास्तवात ते एक लोकशाही शासन होते, ज्यासाठी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न कष्टकरी जनसामान्यांचे कल्याण होते. राष्ट्रीय गार्डच्या केंद्रीय समितीने सत्तेत आल्याबरोबर काही नवे आणि महत्त्वपूर्ण कायदे बनवले होते. क्रांतिच्या यशाच्या पहिल्या दिवशी, 19 मार्चला त्यांनी त्या सर्व राजकीय कैद्याची शिक्षा माफ केल्याची घोषणा केली, ज्यांना शोषक वर्गाच्या सरकारने अटक केली होती वा शिक्षा दिली होती. गहाण ठेवलेल्या वस्तुंची विक्री करण्यावर बंदी घातली गेली आणि 15 फ्रॅंक पेक्षा कमी किंमत असणाऱ्या गहाण वस्तू त्यांच्या मालकाला परत देण्याचे आदेश ताबडतोब प्रसारित केले गेले. याचप्रकारे भाडे न देवू शकणाऱ्या भाडेकरूंना घरातून काढण्यावर बंदी घालण्यात आली. या सर्व कायद्यांचा हेतु कामगार आणि गरीब यांच्या हितांचे रक्षा करणे हा होता. राष्ट्रीय गार्डच्या सैनिकांना नियमित वेतन देण्याकरिता आणि गरिबांना अनुदानस्वरूपात वाटण्यासाठी 10 लाख फ्रॅंक देण्याचा आदेश प्रसारित करण्यामागेही हाच हेतू होता. कम्युनने 16 एप्रिल रोजी एक आदेश काढून असे सर्व उद्योग कामगार आणि उत्पादकाच्या संघाना हस्तातंरित केले, ज्यांना त्यांचे मालक सोडून पळून गेले होते. हा आदेश खरोखर समाजवादी स्वरूपाचा होता आणि कम्युन आणखी काही दिवस चालली असती तर नक्कीच तिचे समाजवादी चरित्र आणखी अधिक स्पष्टपणे समोर आले असते. अशाप्रकारे कम्युनने पॅरिस मधून पळून गेलेल्या बुर्झ्वा मालकांचे सर्व प्लॅट जप्त केले आणि त्यांना शहराचे रक्षण करणाऱ्यांना, आणि सर्वात आधी त्या लोकांना ज्याचे घर लढाईच्या काळात क्षतिग्रस्त झाले होते, वाटण्याची व्यवस्था केली. चर्चला राज्यकारभारापासून वेगळे केले गेले. जनसामान्यांमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली गेली—लुव्र, त्यूइल्येरी, आणि अमूल्य कलावस्तूंनी सज्ज इतर संग्रहालयांना आणि महालांना सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले गेले; आणि कलेच्या सर्व शाखांना व सर्वांसाठी शालेय शिक्षणाला सर्वप्रकारे प्रोत्साहन दिले गेले. पाहिजे.
-
या सर्व उपायांनी कम्युनने हे चांगल्या प्रकारे दाखवून दिले की कामगार वर्गाचे सरकार जनतेच्या कल्याणासाठी किती जबरदस्त काम करू शकते. परंतु कम्युनने साध्य केलेल्या गोष्टींना अमर बनवणाऱ्या पावलांसोबत अनेक चुका पण झाल्या, ज्या प्रतिक्रांतिकारी भांडवलदारां विरूद्ध संघर्षामध्ये घातक सिद्ध झाल्या. यामध्ये सर्वात मोठी चूक तीच होती जी 18 मार्चच्या गौरवशाली विजयानंतर लगेच केली गेली. ती म्हणजे कम्युनार्डांनी त्या सैनिकांना विनाअडथळा परत जाऊ दिले जे थियेरप्रति इमानदार होते. यापेक्षा मोठी चूक ही होती की पॅरिसचे लोक आपल्या विजयाला त्याच्या तर्कसंगत परिणामांपर्यंत घेऊन गेले नाहीत; म्हणजे पुढाकार घेऊन व्हर्सायला जाणे, थियेरच्या निराश सेनेवर संहारक घाव घालणे आणि देशभर क्रांतिचा विजय पक्का करण्यासाठी लढणे. हे सर्व सोडून राष्ट्रीय गार्डची केंद्रीय समिती निष्क्रीय बनून हे पहात राहिली की फासा कोणाच्या बाजूने पडतो. या घातक दिरंगाईमुळे व्हर्साय येथील सरकारला आपल्या सुरवातीच्या पराजयातून सावरणे, क्रांतिला पॅरिस पर्यंत मर्यादित ठेवणे आणि शहरावर पर्यायी हल्ला करण्यासाठी तयारी करणे शक्य झाले.
- 18 मार्च नतंर लगेचच इतर काही शहरांमध्ये—लियो, मार्सेई, सॉं-एत्येन, तुलूज, पपीन्यॉं, क्रेजो, इत्यादीमध्ये—सुद्धा कम्युनची
स्थापना झाली. हे या गोष्टीचे द्योतक होते की, पॅरिस मध्ये जो जनविद्रोह सुरू झाला होता तो पसरत सर्व देशाला सुद्धा आपल्या कवेत घेवू शकत होता. परंतु कम्युनचे नेते या आक्रमक कारवायांचे नितांत महत्त्व समजू शकले नाहीत. यामुळे भांडवलदार वर्गाला देशाच्या विविध भागांमधील क्रांत्यांची वेगवेगळी केंद्रे चिरडणे शक्य झाले. एप्रिलच्या सुरवातीपर्यंत प्रांतांमधील या सर्व विद्रोहांना चिरडून टाकले गेले होते आणि बुर्झ्वा प्रतिक्रांतिकारी शक्तींना आपले सर्व प्रयत्न पॅरिसच्या विरोधात एकत्र करणे शक्य झाले होते. या वेळेपर्यंत पॅरिस शहर देशाच्या इतर भागांपासून तुटले गेले होते. या परिस्थितीत राजधानीतील कामगार खेड्यातील कामगारांसोबत आवश्यक अशी युती स्थापित करू शकले नाहीत. कम्युनच्या नेत्यांना ही गोष्ट माहित होती आणि क्रांतिकारी सरकारने शेतकऱ्यांना संबोधित करत खूप सारी आवाहने पण प्रसरित केली होती. परंतु कम्युनार्ड शेतकरी समुदायासोबत आघाडी बनवण्याच्या आणि त्या समर्थनाचा वापर करून घेण्याच्या स्थितीत अजिबात नव्हते
- कम्युनच्या पुढाकारामध्ये समाजाची जी सामाजिक व राजकीय घडण हळू-हळू वर येत होती, ती खात्रीने समाजवादी होती. परंतु अशा समाजाचे कोणतेही अगोदरचे उदाहरण उपलब्ध नव्हते; त्यांच्याकडे कुठलाही स्पष्ट आणि तयार कार्यक्रम नव्हता; ते चहूबाजूने रक्तपिपासू शत्रूंनी घेरलेले होते; आणि घेरेबंदी व युद्धाने मोठी समाजिक व आर्थिक अव्यवस्था निर्माण केली होती. अशा परिस्थितीत कामगारांना आपल्या हितानुरूप समाजाला संघटित करण्यासाठी ठोस गरजांनुसार तातडीने नव-नवे निर्णय घ्यावे लागत होते. त्यांनी अनेक चूका केल्या; परंतु तरीही कामगारांद्वारे उचलल्या गेलेल्या सर्व महत्त्वपूर्ण पावलांची दिशा मजुरवर्गाच्या संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक मुक्तीचे संकेत दाखवत होती. कम्युनची शोकांतिका ही होती की तिला कुठलाही वेळ मिळाला नाही. समाजवादाच्या दिशेने पुढे जाण्याच्या कोणत्याही शक्यतेला थियेरच्या सैन्याच्या परतण्याने आणि त्यानंतरच्या भयंकर रक्तपाताने संपवून टाकले.
…पुढील अंकात चालू