केवळ आसाराम नाही तर संपूर्ण धर्माची लुटारू वृत्ती ओळखा

लखविन्दर अनुवाद : डॉ. सुरेश बेरी

25 एप्रिल 2018 रोजी आसाराम बापूला बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा झाली. केस चालू असताना त्याच्या निर्दोषत्वाच्या समर्थनात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन आणि प्रचार केला होता. पण आसाराम विरुद्धची केस आणि पुरावे इतके मजबूत होते की प्रचंड राजकीय दबाव असूनही त्याला शिक्षा ठोठावावी लागली. गेल्या काही वर्षांमध्ये अशाप्रकारच्या बलात्कारी, गुन्हेगार, फसवेबाज बाबा-मातांचा पूरच आला आहे. अनेक  उदाहरणे तर डोळ्यासमोरच आहेत. राधे-मा विरोधात पोलिस तक्रारी होऊनही कारवाई करण्यात टाळाटाळ करण्यात आली. सचिन दत्ता उर्फ सचिदानंद गिरी उर्फ बिल्डर बाबाला 2015 मध्ये घरांचय संदर्भात बॅंक लोनचा घोटाळा केल्याची केस दाखल झाली. गुरमित सिंह उर्फ बाबा राम-रहिमला 25 ऑगस्ट 2017 रोजी बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा झाली तेव्हा तर त्याच्या भक्तांनी दंगलच घडवली. विवेकानंद झा उर्फ स्वामी ओझा विरोधात चोरी पासून ताडा पर्यंत खटले दाखल आहेत. श्रीमुर्ती द्विवेदी उर्फ इच्छाधारी भिमानंद बाबाला 2010 साली सेक्स रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला. नोव्हेंबर 2014 मध्ये हरियाणातील बाबा रामपालला खुन्याच्या खटल्यामध्ये कोर्टात हजर होत नाही म्हणून अटक करण्यासाठी पोलिस गेले तेव्हा त्याच्या किल्ल्यावजा आश्रमातून त्याच्या भक्तांनी मशिन-गन्स घेऊन युद्धच पुकारले. अलिकडे जून-2018 महिन्यात दाती महाराजावर बलात्काराचा आरोप होऊनही त्याला अटक झालेली नाही. अशा बाबा-मातांची यादी कितीही मोठी होऊ शकेल. खालील लेख आसाराम बापूला अटक झाल्यानंतर 2013 साली लिहिला गेला होता, आणि धर्माच्या नावाने लुटारू वृत्तीकडे, आसाराम बापू सारख्यांच्या राजकीय-आर्थिक संबंधांकडे तो लक्ष्य वेधतो आणि आजही अत्यंत प्रासंगिक आहे. त्यामुळे या लेखाचा मराठी अनुवाद प्रकाशित करत आहोत.- संपादकीय टिपण

आपण एक संत आहोत; असा दावा करून आपल्या भक्तांनी आपल्यावर जी श्रद्धा प्रकट केली आहे, तिचा गैरफायदा आसारामकडून उठवला गेला. आपल्या भक्तिणींवर बलात्कार करून त्यांना धमकावून गप्प करण्यात आले. यामधून भक्तांकडून अमाप संपत्ती (10,000 कोटी) गोळा करण्यात आली. अशी व्यक्ती संत असू शकत नाही, असेही या निमित्ताने म्हटले जात आहे. परंतु असे करताना एकंदरीत धर्म आणि संत यांच्या चारित्र्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात एका बाजूला धर्म व साधुसंत, आणि दुसऱ्या बाजूला शोषणकारी भांडवलदारी अर्थव्यवस्था व राजकारण हे पूर्णपणे एकमेकात मिसळून गेलेले आहेत. ह्या लुटारू गटबंधनाला आपण नीटपणे ओळखले पाहिजे.

सर्वसामान्य लोकांमध्ये आज प्रचंड प्रमाणात सामाजिक आर्थिक असुरक्षा आहे. या व्यवस्थेबाबत तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन नसल्यामुळे देव, भूतबाधा, जादूटोणा, पूजापाठ यावर लोकांचा विश्वास आहे. विविध धर्मांमध्ये याबाबत विविध रीती-रिवाज आहेत. शोषक वर्ग नेहमी जनतेच्या धार्मिक विश्वासांचा गैरफायदा उठवून त्यांचे आर्थिक-सामाजिक-राजकीय शोषण करीत आलेले आहेत. धर्म ही वास्तवात पारलौकिक गौष्ट नसून नेहमी लौकिक म्हणजे या जगाशी संबंधित अशीच आहे. शोषक वर्ग हा नेहमी आपल्या सशस्त्र ताकदीच्या जोरावर राज्य करतो. सध्याच्या भांडवलदारी व्यवस्थेपूर्वी गुलामगिरीच्या काळात गुलाम आणि त्यांचे मालक, सरंजामशाहीच्या काळात राजे-राजवाडे हे धार्मिक विचारांचा आधार घेऊन राज्य करीत होते. राजा हा विष्णूचा अंश आहे, अशा प्रकारचे विचार वर्णव्यवस्थेत पसरवले जात. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांची गुलामगिरी पत्करायला सहजपणे तयार होत असे. हेच या शोषणकारी व्यवस्थेचे दैवतीकरण होते. परंतु आज भांडवलदारी व्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती नाहीये. या व्यवस्थेचे दैवतीकरण झालेले नाहीये. मात्र आजही धर्म हा भांडवलदारी वर्गाच्या हातात राज्य करण्याचे महत्त्वाचे हत्यार आहे.

साधू, संत, पाद्री, मौलवी यांचा वापर नेहमीच शोषक वर्ग करीत आलेला आहे. यांच्या बदल्यात भांडवलदारी लुटीचा एक हिस्सा या धार्मिक गटाला मिळत आहे. जसजशी सामाजिक-आर्थिक-राजकीय परिस्थिती बदलते तसा धर्मातही बदल होत जातो. आज भांडवलदारी व्यवस्था कायम झाल्यासारखी दिसतेय आणि त्यामुळे धर्माचे रूपांतरही बाजारी व्यवस्थेत झालेले आहे. स्वतःला “देवदूत” किंवा “परमेश्वराचे रूप” मानणारे हे बाबा, संत हे स्वतःच भांडवलदार झालेले आहेत. ते खरे म्हणजे दलाल, भांडवलदार प्रथम आहेत आणि साधूसंत नंतर आहेत.

नफा हे प्रत्येक भांडवलदाराचे एकमेव उद्दिष्ट असते. मग ते कोणत्याही प्रकारे, कितीही अमानवीय पद्धत वापरावी लागली तरी, भांडवलदार जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात. हे भांडवलदार आपले उत्पादन विकण्यासाठी जनतेतले अज्ञान, त्यांच्यातल्या विविध अंधश्रद्धा यांचा फायदा उठवून जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करतात. धर्माला राजकारणाशी जोडून हे काम ते अधिक चांगल्या प्रकारे करतात. धर्म आणि भांडवल यांचे हे एकत्रीकरण त्यांच्या अमाप नफ्याचा स्त्रोत आहे. म्हणूनच आपल्या देशामध्ये संत आणि भांडवलदार मोठ्या संख्येने एकमेकांच्या बरोबर आहेत.

निवडणूक लढविणारे सर्व भांडवलदारी पक्ष या साधुसंतांचे भक्त असतात. या संतांच्या भक्तांचे रूपांतर हे पक्ष आपल्या मतपेढीमध्ये करू इच्छित असतात. संत आपले भांडवल आणि सामाजिक आधार यांच्या मदतीने चांगल्यापैकी राजकीय स्थान स्वतःसाठी मिळवतात. संतांचा धर्माच्या नावावर उभा असलेला कारोबार आणि भांडवलदारी राजकारण हे अशा रीतीने एकमेकांना पूरक आहे. हे संत आपले गुन्हे, गैरव्यवहार लपविण्यासाठी याच राजकारण्यांचा आधार घेतात.

आसाराम हा भांडवलदारी संतांपैकी एक आहे. त्याची एकूण संपत्ती 10,000 कोटी रु. आहे. “संत आसाराम बापू ट्रस्ट” या नावाच्या संस्थेचे एकंदर 425 आश्रम आहेत. यातील काही परदेशात सुद्धा आहेत. औषधे, रुग्णालये, शाळा, पुस्तके, मासिके यातून नफा तर येतोच. शिवाय भक्तांनी दिलेल्या देणग्या वेगळ्याच. श्री. श्री. रविशंकर, गुरमीत राम रहीम, बाबा रामदेव यांच्या सारख्या भांडवलदारी संतांची संख्या भारतात बरीच आहे. सन 2011 मध्ये बाबा रामदेव हे 1100 कोटी रु. चे मालक होते. देशाच्या उत्तराखंड या राज्यात 250 चौ. मीटरपेक्षा जास्त जमीन राज्याच्या बाहेरची व्यक्ती खरेदी करू शकत नाही. त्या ठिकाणी रामदेव 2000 एकरचे मालक आहेत, आमच्या या स्वदेशी बाबाने अमेरिकेतील ह्यूस्टन येथे 100 एकर जमीन व स्कॉटलंड मध्येही बरीचशी जमीन खरेदी केली आहे. भांडवलदारी धर्म हा किती नफेखोर धंदा आहे, हे आपण बघताय.

आसाराम यांची बरीचशी मालमत्ता सरकारने अनुदानाच्या रूपाने दिलेल्या जमिनीवर उभी आहे. या जमिनीबरोबरच सरकारी-बिगरसरकारी जमिनींवर अतिक्रमण करूनही त्या ताब्यात त्यांनी घेतल्या आहेत. गुजरात सरकारच्या म्हणण्यानुसार आसारामच्या आश्रमांनी 67,099 एकर जमिनीवर कब्जा केलेला होता. अशाच प्रकारचे आरोप त्याच्यावर मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्येसुद्धा झाले आहेत. 2010 साली जेव्हा आसारामच्या मठामध्ये चार मुलांचा रहस्यमय मृत्यू झाला होता, तेव्हा आपल्या अशाच राजकीय संबंधांमधून आसाराम तुरुंगांत जाता जाता वाचला होता. याबाबत गुजरात सरकारने अत्यंत नाईलाजाने या प्रकरणाची जी चौकशी त्यावेळेला केली होती, ती आजतागायत लोकांसमोर आलेली नाही. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता असेल, नाहीतर धर्मनिरपेक्ष काँग्रेसची, आसाराम हा अघोषित राजगुरु होता. खास करून भाजपच्या नेतृत्वाखालची राज्य सरकारे आसाराम सारख्या बाबांना अगदी उघडपणे साथ देत होती, आणि त्याची मदतही घेत होती. हा सरळसरळ देवाणघेवाणीचा प्रकार होता. उमा भारती जेव्हा मध्यप्रदेशची मुख्यमंत्री होत्या, तेव्हा आसारामचे विधानसभेत प्रवचन ठेवण्यात आले होते. भाजपचे आडवाणी आणि काँग्रेसचे दिग्विजयसिंह सारख्या मोठ्या नेत्यांचे आसारामचे फार जुने संबंध होते. मात्र आता एका अल्पवयीन मुलीवरच्या बलात्काराचे प्रकरण घडले तेव्हा मात्र हे सर्व भक्तगण बाजूला झाले आहेत. अर्थात आसारामला वाचवण्याचे आतून भरपूर प्रयत्न झालेच. यावेळेला आसारामच्या विरोधात पुरावा एवढा भक्कम होता की, भांडवलदार वर्गातील अंतर्गत झगडे, या प्रकरणांचा टीआरपी वाढविण्यासाठी मिडीयामध्ये झालेली जबरदस्त स्पर्धा, समाजाच्या लोकशाहीवादी -परिवर्तनवादी विभागाकडून आसारामच्या विरोधात उठलेला आवाज इत्यादी कारणांमुळे आसारामला तुरुंगात जावे लागले. देशातील भांडवलदारी न्यायव्यवस्थेला अखेर याही गोष्टींचा विचार करावा लागला. यामुळे दुसऱ्या बुवांना जरा सावधगिरीने वागण्याचा धडा मिळेल. यापेक्षा अधिक काही फरक पडणार नाही.

इतर साधूंच्या राजकीय लागेबांध्याची उदारणेही बघावी लागतील. श्री. श्री. रविशंकरच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मुख्यालयासाठी कर्नाटक सरकारने 99 वर्षाच्या कराराने जमीन दिली आहे. ओडिसा सरकारनेही या संस्थेला 200 एकर जमीन अनुदान या स्वरूपात दिली आहे. या जमिनीवर मागच्या वर्षी प्राचीन मूल्ययुक्त आधुनिक शिक्षणाचे एक विद्यापीठ सुरू करण्यात आले. मध्यप्रदेशामध्ये महर्षी महेश योगी या साधूला एका विश्वविद्यालयासाठी जमीन देण्यात आली. बाबा रामदेवलाही विविध सरकारंनी स्वस्तात जमीन दिली आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

नवउदारीकरण, खाजगीकरणाच्या या जमान्यात सरकार जनतेची मालमत्ता आणि विविध स्त्रोत देशी-विदेशी भांडवलदारांच्या ताब्यात देत आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारीच्या नावावर जनतेचे पैसे आणि मालमत्ता या भांडवलदारांच्या तिजोरीत भरले जात आहेत. या सरकारी धोरणाचा हे साधू भांडवलदार भरपूर फायदा उठवीत आहेत.

हे साधू अतिशय सनातनी, परिवर्तनविरोधी, जनताविरोधी आणि फॅसिस्ट (भांडवलदारी हुकूमशाहीवादी) शक्तींचा एक भाग आहेत. आसारामने आपला पहिला आश्रम 1970 मध्ये गुजरातच्या अहमदाबादमध्ये सुरू केला. परंतु त्याला 1980 नंतरच प्रसिद्धी मिळाली. याच काळात भारतात उदारमतवादी आर्थिक धोरणे सुरू झाली होती. उदारमतवाद याचा अर्थ भांडवलदार वर्गावरची सर्व कायदेशीर व आर्थिक बंधने हळूहळू काढून टाकून मुक्त अर्थव्यवस्थेला उत्तेजन देणे. याच काळात कडव्या हिंदुत्ववादाच्या जोरदार प्रचाराला भाजपाच्या लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली होती. आसारामचा उदय हा सुद्धा कडव्या हिंदुत्ववादाच्या उदयाचा एक भाग आहे. आसाराम हा आत्मसुधाराच्या प्रवचनांच्या नावाखाली कडवा हिंदुत्ववाद आणि रूढीप्रिय संस्कृती यांचा प्रचार करीत असे. स्त्री स्वातंत्र्याला त्याचा प्रखर विरोध आहे. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या विरोधात हिन्दु जनमानसात विष कालवायचे आणि लोकांना हिंसक कारवाईला तयार करायचे हा अशा संस्थांचा एक विशेष भाग होता. आसारामवर बलात्काराचा आरोप ठेवल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या अशोक सिंघल यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मत्याच्यावर बलात्काराचा आरोप लावणे हा हिंदू संस्कृतीवर हल्ला आहे.फ असे उद्गार काढले होते. केवढा हा बलात्कारी साधूची बाजू घेण्याचा भयंकर हिंदुत्ववादी प्रयत्न!

हे अतिशय रुढीवादी साधू कष्टकरी जनतेचे कट्टर शत्रू आहेत. कष्टकरी जनतेने भांडवलदारी व्यवस्थेच्या विरोधात क्रांतीकारी एकजूट करावी, अशी त्यांची कधीच इच्छा नसते.

धर्माच्या नावाने हे साधू लोकांना आत्मसुधाराची प्रवचने देतात; परंतु ही प्रवचने ते स्वतःला लागू करत नाहीत. इतर भांडवलदारांप्रमाणे हे भांडवलदारी संतही नफ्याच्या मागे असतात आणि भक्तांची लूट करून बांडगुळासारखे ऐशोरामात राहतात. जनतेच्या दु:खाला कष्टकऱ्यांची भांडवलदार वर्गाकडून होणारी लूट जबाबदार आहे, हे ते आपल्या प्रवचनातून कधीही सांगत नाहीत. परंतु त्यांच्या दुःखाला मागच्या जन्मात त्यांनी केलेले पाप जबाबदार आहे, असे खोटेच सांगतात. सत्य काय आहे, ते सांगून ते समस्त भांडवलदारी वर्गाच्या विरुद्ध जाऊ इच्छित नाहीत. जनतेला अंधश्रद्ध करून ही व्यवस्था टिकविण्याचाच प्रयत्न ते करतात. धर्म हा नेहमीच शोषकांची सेवा करीत आला आहे. आज तो भांडवलदार वर्गाची सेवा करीत आहे. 

 

कामगार बिगुल, जुलै 2018