Tag Archives: लखविन्दर

केवळ आसाराम नाही तर संपूर्ण धर्माची लुटारू वृत्ती ओळखा

सर्वसामान्य लोकांमध्ये आज प्रचंड प्रमाणात सामाजिक आर्थिक असुरक्षा आहे. या व्यवस्थेबाबत तात्विक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन नसल्यामुळे देव, भूतबाधा, जादूटोणा, पूजापाठ यावर लोकांचा विश्वास आहे. विविध धर्मांमध्ये याबाबत विविध रीती-रिवाज आहेत. शोषक वर्ग नेहमी जनतेच्या धार्मिक विश्वासांचा गैरफायदा उठवून त्यांचे आर्थिक-सामाजिक-राजकीय शोषण करीत आलेले आहेत. धर्म ही वास्तवात पारलौकिक गौष्ट नसून नेहमी लौकिक म्हणजे या जगाशी संबंधित अशीच आहे. शोषक वर्ग हा नेहमी आपल्या सशस्त्र ताकदीच्या जोरावर राज्य करतो. सध्याच्या भांडवलदारी व्यवस्थेपूर्वी गुलामगिरीच्या काळात गुलाम आणि त्यांचे मालक, सरंजामशाहीच्या काळात राजे-राजवाडे हे धार्मिक विचारांचा आधार घेऊन राज्य करीत होते. राजा हा विष्णूचा अंश आहे, अशा प्रकारचे विचार वर्णव्यवस्थेत पसरवले जात. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांची गुलामगिरी पत्करायला सहजपणे तयार होत असे. हेच या शोषणकारी व्यवस्थेचे दैवतीकरण होते. परंतु आज भांडवलदारी व्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती नाहीये. या व्यवस्थेचे दैवतीकरण झालेले नाहीये. मात्र आजही धर्म हा भांडवलदारी वर्गाच्या हातात राज्य करण्याचे महत्त्वाचे हत्यार आहे.