गाझापट्टीतील एका चिमुकल्याची कविता
कविता कृष्णपल्लवी (मराठी अनुवाद – भरत यादव)
बाबा!
मी पळू शकत नाहीये
रक्ताळलेल्या मातीने बरबटलेले माझे बूट
फारच जड झालेयत
माझे डोळे आंधळे होताहेत
आकाशातून बरसणार्या आगीच्या चमचमाटाने
बाबा,
माझे हे हात आता दगड दूरपर्यंत फेकू शकत नाहीत
आणि माझे पंखसुद्धा अद्याप खूप लहान आहेत
बाबा!
गल्लीत विखुरलेल्या ढिगार्यांमध्ये लपंडाव खेळणारे माझे तीन भाऊ कुठे निघून गेले आहेत?
आणि ते तीन छोटे छोटे ताबूत उचलून मित्रमंडळी आणि शेजार्यांसोबत तुम्ही कुठे गेला होतात?
मी घाबरलो होतो बाबा,
तुम्ही पकडले गेले असाल
आणि कुठे तरी अज्ञात काळोख्या ठिकाणी कोंडून ठेवले गेला असाल म्हणून,
जसा अहमद,माजिद आणि सफी
यांच्या वडिलांवर प्रसंग आलेला
मी भ्यालो होतो बाबा,
कारण मला तुमच्याशिवाय जगावं लागेल की काय
असं वाटलं,
जसा मी जगतो आहे माझ्या अम्मीविना
तिच्या पदराच्या दुग्धयुक्त छायेच्या आणि
अंगाईच्या आठवणींसोबत
मला नाही ठाऊक बाबा,
की ते लोक का बरं जाळतायत जैतूनच्या बागा
नाही ठाऊक मला आपल्या वस्तीतला ढिगारा का हटवला नाही गेला अजून आणि नवी घरं का उभारली नाहीत अजूनही!
बाबा!
या भल्या मोठ्या दुनियेमध्ये
खूप सारी मुलं असतील आमच्याचसारखी
आणि त्यांचेही पालक असतील
जे त्यांच्यावर नितांत प्रेम करत असतील
बाबा,
कधी ते आमचाही विचार करत असतील का हो?
बाबा!
मी समुद्रकिनारी चाललो आहे
फुटबाॅल खेळायला.
जर मला बराच उशीर झाला
तर मला न्यायला जरूर या,
तुम्ही मला तुमच्या बाहूपाशात
उचलून आणा आणि एका विशाल ताबूतात निजवा
म्हणजे मी त्यात मोठा होत जाईन
तुम्ही मला शांतीपर्वातले एक छानसे गाणे ऐकवा,
जैतूनच्या एका फांदीचे झाड होत असल्याचे बघा,
आणि धरणीच्या मांडीवर
मी मोठा होण्याची प्रतीक्षा करा.