हेलिन बोलेक आणि इब्राहिम गोक्चेक यांच्या आठवणी
जगभरातील फॅसिस्ट आणि हुकूमशहांविरोधातील संघर्षांमध्ये आम्हाला प्रेरणा देत राहतील!
(तुर्कस्तानातील हुकूमशाही विरोधात लढणारे क्रांतिकारी कलाकार इब्राहिम गोक्चेक यांच्या 8 मे या शहादत दिनी साथी सत्यम यांनी 2020 मध्ये लिहिलेल्या लेखाचा अनुवाद)
अलविदा इब्राहिम गोक्चेक! क्रांतिकारी लाल सलाम!

सत्यम (अनुवाद – निश्चय)


हेलिन बोलेक नंतर आजच्याच दिवशी (8 मे 2020 रोजी) त्यांचे साथी संगीतकार इब्राहिम गोक्चेक सुद्धा आपल्याला सोडून गेले.  मुक्तपणे गिटार वाजवता यावी, यासाठी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी 323* दिवसांच्या उपोषणानंतर इब्राहिम सुद्धा आपल्या साथी हेलिन यांच्या मार्गावर गेले, ज्या 288 दिवसांच्या उपोषणानंतर 3 एप्रिल 2020 रोजी आपल्याला सोडून गेल्या होत्या. (*तुर्कस्तानात ही परंपरा आहे की उपोषणादरम्यान काहीच ठोस पदार्थ खात नाहीत, परंतु पातळ पदार्थ घेऊ शकतात.)

हे दोघेही तुर्कस्तानातील क्रांतिकारी संगीत बॅंड ‘ग्रुप योरम’चे सदस्य होते. तुर्कस्तानातील एर्दोगानच्या पाशवी सत्तेने या बॅंडवर याकरिता बंदी घातली होती कारण की हा बॅंड एर्दोगानच्या जुलमी आणि पुराणपंथी सत्तेचा विरोध करत होता, आणि समाजवाद व कामगार वर्गाचे गीत गात होता. 2016 मध्ये बॅंडच्या सर्व सदस्यांच्या अटकेच्या फर्मानानंतर पोलिसांनी त्यांच्या सांस्कृतिक केंद्रांवर छापे मारले आणि त्यांच्या वाद्य यंत्रांनाही नष्ट केले. तुर्कस्तानात पहिल्यांदाच कलाकारांच्या डोक्यावर इनाम जाहीर केले गेले आणि त्यांना ‘फरार दहशतवाद्यांच्या’ यादीत टाकले गेले.

एर्दोगानच्या फॅसिस्ट सत्तेकरिता ते दहशतवादी आणि देशद्रोही होते कारण ते त्या खाण कामगारांचे गीत गात होते जे जमिनीखाली सात मजले खोलवर अत्यंत खराब स्थितींमध्ये काम करताना मरत होते; कारण ते त्या क्रांतिकारकांचे गीत गात होते ज्यांना एर्दोगानच्या फॅसिस्ट सत्तेने छळ करून मारून टाकले होते;  कारण ते त्या शेतकऱ्यांचे गीत गात होते ज्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या गेल्या होत्या, ते तुर्कस्तानातील उत्पीडीत कुर्दीश लोकांचे गीत गात होते, ते त्या गरिबांबद्दलचे गीत गात होते ज्यांच्या झोपड्या बुलडोझर्सनी तोडल्या गेल्या होत्या, आणि ते त्या बुद्धीजीवींचे गीत गात होते ज्यांना गप्प करण्यासाठी मृत्यूदंड दिला जात होता. ते विरोधाचे गीत गात असत आणि रेसेप तैयप एर्दोगानच्या कॄर शासनासाठी हे दहशतीपेक्षा कमी नव्हते.

जन आंदोलनांच्या पाशवी दमनानंतर 2016 मध्ये एर्दोगानद्वारे आणीबाणीची घोषणा होताच कार्यकर्ते, पत्रकार, आणि लेखक-कलाकार-संगीतकारांवरचे दमनचक्र तीव्र झाले होते. तुर्कस्तानात अत्यंत लोकप्रिय असलेल्या इब्राहिम आणि त्यांच्या बॅंडच्या सदस्यांना अचानक  एक दिवस समजले की त्यांना दहशतवादी घोषित केले गेले आहे आणि त्यांच्या डोक्यावर इनाम घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या घरांवर आणि सांस्कृतिक केंद्रांवर 2 वर्षात 9 वेळा छापे मारले गेले. शेवटी त्यांना अटक करण्यात आली. अटकेच्या काही दिवस अगोदरच गेल्या वर्षी इब्राहिम आणि हेलिन बोलेकने राजकीय कैद्यांच्या अधिकारांच्या मागणीवर उपोषण सुरू केले होते आणि नंतर त्यालाच आमरण उपोषणात परिवर्तित केले होते. त्यांच्या मागण्या होत्या की त्यांच्या बॅंडवरची बंदी हटवली जावी, तुर्कस्तानात कुठेही त्यांना आपले संगीत प्रस्तुत करण्याचे स्वातंत्र्य मिळावे, त्यांच्या सर्व अटक झालेल्या साथींना मुक्त केले जावे आणि त्यांच्यावरील खटले मागे घेतले जावेत.

त्यांना गेल्या नोव्हेंबर मध्ये तुरुंगातून सोडले गेले पण आपल्या मागण्यांना घेऊन त्यांचा विरोध चालूच राहिला. ग्रुप योरम बॅंडचे दोन सदस्य अजूनही जेल मध्येच आहेत. त्यापैकी एक गोक्चेक यांची पत्नी आहे.

तुर्कस्तानातील शेकडो लेखक-कलाकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत फॅसिस्ट सत्ता अडून बसली की त्यांनी अगोदर उपोषण समाप्त करावे, त्यानंतरच त्यांच्याशी चर्चा होऊ शकेल. पण हे दोन्ही क्रांतिकारी कलाकारही आपल्या इराद्यांचे पक्के होते. अठ्ठावीस वर्षांची सुंदर आणि लोकप्रिय गायिका हेलेन 288 दिवसांच्या उपोषणानंतर 3 एप्रिल 2020 रोजी नाही राहिली. ती आज इस्तंबुलच्या एका स्मशानभूमीत पहुडलेली आहे.

मृत्यूच्या काही दिवस अगोदर 41 वर्षीय इब्राहिमने लिहिलेल्या पत्रात म्हटले होते, “मी खिडकी बाहेर बघतो आणि मला इस्तंबुलच्या गरिबांच्या वस्त्या दिसतात. मी याप्रकारे कमजोर आहे की बाहेर जाऊ शकत नाही, माझे वजन आता फक्त 40 किलो आहे. पण मी कल्पना करतो की मी माझ्या गिटार सोबत मंचावर आहे आणि मी बघतो आहे की हजारो तुर्क लोक आकाशात मुठी लहरावत ‘बेला चालो’* गात आहेत. (*दुसऱ्या महायुद्धात फॅसिस्टांशी लढणाऱ्या इटालियन छापेमारांचे गीत)

सतत म्हटले जाते की कम्युनिस्ट एका स्वप्नदुनियेत (युटोपियात) जगत आहेत आणि समाजवाद एक अयशस्वी सिद्धांत आणि कधीही खरे न होणारे स्वप्न आहे. मग काय कारण आहे की सर्व जगामध्ये गरिब आणि कामगारांच्या अधिकारांकरिता आवाज उठवणाऱ्यांना रोज सतावले जाते? काय कारण आहे की सर्व सत्ता त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी जुलमाची पराकाष्ठा करायला तयार होतात? भारत असो वा तुर्कस्तान, सगळे फॅसिस्ट त्यांना याप्रकारे का घाबरतात?

उत्तर स्पष्ट आहे. सगळे हुकूमशहा जाणतात की क्रांतिकारी आपल्या जीवावर उदार होऊन त्यांचा ढोंगीपणा लोकांसमोर नागडा करतील. ते जाणतात की कम्युनिस्ट इतिहासाला कूस बदलायला भाग पाडू शकतात. ते जाणतात की जिद्दी लोक तोपर्यंत लडत राहतील जोपर्यंत जगामध्ये लढण्याची गरज बाकी असेल, ते तोपर्यंत झुंझत राहतील जोपर्यंत ते आपल्या आजूबाजूच्या भौतिक परिस्थितींना बदलवून सोडत नाहीत. ते समजतात की हेच ते लोक आहेत जे लोकांच्या हृद्यात क्रांतीचे रोपटे लावतील आणि तेव्हा भूक, अपमान आणि मृत्यूवर टिकलेल्या त्यांच्या सत्तेची कालघटिका भरणे सुरू होईल. यामुळेच आपल्या भितीला लपवण्यासाठी ते सतत ओरडत राहतात की कम्युनिझ्म संपला आहे आणि दिवसरात्र ते आपल्याला गप्प करायच्या, संपवायच्या आणि तुरूंगात टाकायच्या षडयंत्रांच्या तयाऱ्या करत असतात.

पण त्यांना माहित नाही की हेलिन आणि इब्राहिम सारखे लोक कधी मरत नाहीत. आपल्या प्रिय भगतसिंह आणि पाश प्रमाणे ते कोट्यवधी लोकांच्या हृद्यात जीवंत राहतात, त्यांच्या हृदयाला आशा आणि हिंमतीने प्रकाशमान करत राहतात, आणि सत्ताधीशांच्या छातीत चाकूसारखे धसून राहतात.

भारताच्या जनतेच्या वतीने आम्ही हेलिन आणि इब्राहिमला क्रांतिकारी सलाम अर्पण करतो. कॉम्रेड, तुमच्या रक्ताने एक दिवस क्रांतीची फुलं बहरतील आणि नाजिम हिकमत व रूमीची धरती तुमच्या संघर्षांच्या आठवणीत लिहिलेल्या कविता आणि गीतांनी निनादून जाईल.

कामगार बिगुल, एप्र‍िल 2021