‘निकारागुआ’चे महाकवी अर्नेस्टो कार्देनाल यांची कविता – सेलफोन

अनुवाद : नारायण खराडे

Cardenalतुम्ही तुमच्या सेलफोनवर बोलता,
बोलता, बोलत राहता
आणि हसता तुमच्या सेलफोनवर,
तो कसा बनला आहे याची काहीच माहिती नसताना,
आणि तो काम कसा करतो याची त्याहूनही कमी माहिती असताना
पण त्याने फरक काय पडतो,
अडचण ही आहे की तुम्हांला माहीत नाही,
जसे माहीत नव्हते मलाही
की कित्येक माणसे कांगोमध्ये मरतात
हजारो हजार
त्या सेलफोनपायी.
कांगोमध्ये मरतात,
त्याच्या डोंगरांमध्ये आहे कोल्टन
(सोने आणि हिरे तर आहेतच)
जे वापरले जाते सेलफोन कंडेन्सर्ससाठी
या खनिजावर ताबा मिळवण्यासाठी
बहुराष्ट्रीय कार्पोरेशन्स
लादतात हे अंतहीन युद्ध
पाच वर्षांत पन्नास लाख मृत्यूमुखी
आणि हे बाहेर माहित झालेले त्यांना नको आहे
प्रचंड संपत्तीचा देश
दारिद्र्याने गांजलेल्या लोकांचा
जगातील ८० टक्के कोल्टन साठे आहेत कांगोमध्ये
कोल्टन तेथे पडून आहे
तीन हजार दशलक्ष वर्षांपासून
नोकिया, मोटोरोला, काँपॅक, सोनी
खरेदी करतात कोल्टन
पेंटागॉनदेखील, आणि दि न्यू यॉर्क टाईम्स कार्पोरेशनसुद्धा
आणि हे बाहेर माहित झालेले नको आहे त्यांना
तसेच हे युद्ध थांबलेले त्यांना नको आहे
जेणेकरून कोल्टनवर डल्ला मारणे सुरू राहील
सात ते दहा वर्षांची मुले काढतात कोल्टन
कारण त्यांची इवली शरीरे लहानशा ढोलींमध्ये शिरू शकतात
रोज २५ सेंटसाठी
आणि असंख्य मुले मरतात
कोल्टन पावडरमुळे
किंवा त्या पत्थराखाली चिरडून
जो कोसळतो त्यांच्यावरcongo-mining

दि न्यू यॉर्क टाईम्ससुद्धा
ज्याला हे बाहेर कुणालाही कळलेले नको आहे
आणि अशा प्रकारे ते राहते अज्ञात
ही सामूहिक गुन्हेगारी
बहुराष्ट्रीय कंपन्यांची…
बायबल मांडते
सत्य आणि न्याय
आणि प्रेम आणि सत्य
सत्याचे महत्त्व जे देईल आपल्याला मुक्ती
सत्य कोल्टनचेसुद्धा
कोल्टन तुमच्या सेलफोनमध्ये
ज्यावर तुम्ही बोलता आणि बोलत राहता
आणि हसता तुमच्या सेलफोनमध्ये.