वृत्तपत्र आणि कामगार

अन्तोनियो ग्राम्शी
अनुवाद – अमित शिंदे

gramsciसध्याचा काळ हा सदस्यता मोहिमांचा काळ आहे. भांडवली वर्तमानपत्रांचे संपादक आणि प्रशासक रस्त्याने जाणाऱ्यांचे, म्हणजेच वाचकांचे, लक्ष आपल्या मालाकडे वेधून घेण्यासाठी आपली डिस्प्ले विण्डो सजवतात, आपल्या दुकानांच्या साइनबोर्ड्सची रंगरंगोटी करून वाचकांना माल खरेदी करण्याचे आवाहन करतात. त्यांचा माल म्हणजे चार किंवा सहा पानी वर्तमानपत्रे. वृत्तपतांचे मालक आणि व्यापारी यांच्यासाठी उपयुक्त अशा वर्तमान राजकीय तथ्यांची ओळख करून देणे आणि ही तथ्ये समजून घेण्याच्या पद्धती वाचकांच्या डोक्यात भरवणे यासाठीच दररोज सकाळी वा संध्याकाळी ही वृत्तपत्रे निघतात.
वर्तमानपत्राची सदस्यता घेण्यासारख्या वरकरणी अत्यंत सध्या वाटणाऱ्या गोष्टीचे महत्व आणि त्यामागील गांभीर्य यावर आपणाशी आणि विशेष करून कामगारांसोबत आम्ही चर्चा करू इच्छितो. ही एक फसवी आणि धोकादायक निवड आहे, जी काटेकोर पारखून सारासार विचार करून जाणतेपणी केली पाहिजे.
कामगारांनी भांडवली वर्तमानपत्रासोबत कुठल्याही प्रकारची संलग्नता दृढपणे नाकारली पाहिजे. भांडवली वर्तमानपत्रे (मग त्याचा रंग कोणताही असो) त्यांचे स्वतःचे विचार व हित आणि त्यांच्या विरोधात काम करणारे विचार व हितसंबंध यांच्यामधील संघर्षातील एक उपकरण असते. ह्यात छापल्या जाणाऱ्या गोष्टी एकाच विचाराने प्रभावित झालेल्या असतात, व तो म्हणजे वर्चस्वशाली वर्गाची सेवा करणे, जो वेळप्रसंगी कामगार वर्गाच्या विरोधात रुपांतरित होतो. वास्तविक, भांडवली वर्तमानपत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये हा पूर्वग्रह दिसून येतो.
परंतु मजेदार गोष्ट – खरे तर ती अत्यंत हिणकस आहे – अशी की भांडवली वर्गाच्या बाजूने केल्या जाणाऱ्या ह्या क्रूर कामासाठी भांडवलदार वर्गाकडून पैसा उभा करण्याऐवजी भांडवली वर्तमानपत्रे त्याच कष्टकरी जनतेकडून पैसा उभा करतात ज्यांचा ते नेहमी विरोध करीत असतात. कामगार वर्ग त्याचा मोबदला वेळोवेळी आणि उदारपणे चुकवत राहतो.
लाखो कामगार भांडवली वर्तमानपत्रांना नियमितपणे आपले पैसे देतात, आणि त्याद्वारे त्यांची ताकद वाढवण्यास हातभार लावतात. का? ट्राम वा रस्त्यावर एखादे भांडवली वर्तमानपत्र विकत घेणाऱ्या पहिल्या कामगाराला तुम्ही हा प्रश्न जर विचारला, तर तुम्हाला उत्तर मिळेल : ‘कारण मला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की माझ्या आजूबाजूला काय काय चालले आहे’. ही गोष्ट मात्र त्यांच्या लक्षात येत नाही की बातम्या आणि त्या बनवण्यासाठी वापरलेली सामग्री अशा कलात्मक पद्धतीने मांडली जाते की वाचकांचे विचार एका निश्चित दिशेने नेता येणे शक्य व्हावे आणि त्यांच्या अंतर्मनाला प्रभावित करता यावे. तरीही त्याला हे मात्र माहित आहे की हे वर्तमानपत्र संधिसाधू आहे, दुसरे वर्तमानपत्र श्रीमंतांसाठी आहे, तिसरे, चौथे, पाचवे वर्तमानपत्र राजकीय पक्षांशी संबंधित आहे, ज्यांचे हितसंबंध त्याच्या हितसंबंधांच्या बिलकुल विरुद्ध आहेत.
भांडवली वर्तमानपत्रे अत्यंत साध्या-साध्या गोष्टी कशा प्रकारे भांडवली वर्गाच्या बाजूने व कामगार वर्गाच्या व त्याच्या राजकारणाच्या विरोधात छापतात, ते कामगार दर दिवशी बघत असतात. काय, संप झाला? जिथवर भांडवली वर्तमान पत्रांचा प्रश्न आहे, कामगार नेहमीच चूक असतात. काय, कुठे तरी निदर्शने झाली? निदर्शक नेहमीच चूक असतात. फक्त ह्यासाठी की ते कामगार आहेत आणि त्यांचे डोके नेहमीच गरम असते, ते हिंसक होतात, उपद्रव निर्माण करणारे असतात. सरकारने नवीन कायदा पारित केला आहे? तो नेहमीच चांगला, उपयोगी व न्याय्य असतो, जरी प्रत्यक्षात तसे नसेल तरी. आणि एखादी निवडणूक, राजकीय वा प्रशासकीय संघर्ष आहे? तेव्हा सगळ्यात चांगला कार्यक्रम आणि उमेदवार भांडवली पक्षाचेच असतात.
ज्या तथ्यांबाबत भांडवली वर्तमानपत्रे एकतर मुग गिळून गप्प असतात किंवा कामगारांची दिशाभूल करतात, त्यांना भ्रमित करण्यासाठी, त्यांना अज्ञानी ठेवण्यासाठी ज्यांची खिल्ली उडवतात व ज्यांना खोटे सिद्ध करतात, अशा तथ्यांबाबत आपण येथे बोलतसुद्धा नाही आहोत. असे असूनही भांडवली वर्तमानपत्रांना कामगारांकडून मिळणारी आपराधिक मौन स्वीकृती खरोखर अतुलनीय आहे. आपल्याला याच्या विरुद्ध उभे राहावे लागेल आणि कामगारांना ह्याविषयी वास्तवाचे भान करून द्यावे लागेल. आपल्याला पुन्हा पुन्हा हे सांगावे लागेल की भांडवली वर्तमानपत्र विक्रेत्याच्या हातात गोंधळलेल्या अवस्थेत पैसे टेकवणे हे भांडवली वर्तमानपत्राच्या हातात तोफेचे गोळे देण्यासारखे आहे, ज्यांचा उपयोग ते योग्य वेळी कामगार वर्गाच्या विरोधातच करतील.
जर कामगार वर्गाला ह्या मूलभूत सत्यांची जाणीव करून दिली असती तर ते त्याच एकजुटीने आणि शिस्तीने भांडवली वृत्तपत्रांवर बहिष्कार टाकायला शिकले असते, अगदी त्याच प्रमाणे, जसे भांडवलदार समाजवादी वृत्तपत्रे असलेल्या कामगारांच्या वर्तमानपत्रांचा बहिष्कार करतात. आपली विरोधक असलेल्या भांडवली वृत्तपत्रांना सहयोग देऊ नका. सर्व भांडवली वर्तमानपत्रांच्या सदस्यता अभियानांच्या ह्या काळात आपला नारा हाच असला पाहिजे. बहिष्कार करा, बहिष्कार करा, बहिष्कार करा!

कामगार बिगुल, सप्‍टेंबर २०१५