मानखुर्द–गोवंडीत औषधांची वाढती नशाखोरी!
नफ्याकरिता कामगार–कष्टकरी–युवकांच्या जीवाशी खेळ!
बबन
मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये नफ्याच्या लालसेने अवैध नशेच्या धंदेबाजांद्वारे नशाखोरीच्या घातक सवयी लावून युवकांचे, कामगार-कष्टकऱ्यांचे जीवन बर्बाद करणे चालू आहे. सरकारी यंत्रणेच्या ‘आशिर्वादा’ने चालणाऱ्या नशेखोरीच्या बाजारात सर्व कायदे व संकेत धाब्यावर बसवून अवैध पदार्थांचा धंदा मुक्तपणे चालू आहे!
‘नशा’ म्हटल्यावर डोळ्यासमोर चटकन बिडी, गुटखा, पान मसाला, तंबाखू , मावा, हुक्का, सिगारेट, दारू, चरस, गांजा, अफिम, हिरोईन, एमडी, ड्रग्ज अशा प्रकारच्या शरीराला कमी-अधिक प्रमाणात घातक असलेल्या, प्रचलित मादक पदार्थांचे चित्र उभे राहते. काही काळापूर्वीपासून काही अशा पदार्थांच्या नशेचे प्रमाण वाढलेले दिसून येत होते जे पदार्थ पारंपारिक नशेच्या प्रकारात मोडत नव्हते. यात व्हाइटनर, थिनर, रंग, आयोडेक्स, सोल्युशन, पेट्रोल यांचा समावेश होता; परंतु अलीकडच्या काही वर्षात याही पुढे जाऊन अजून एक प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तो म्हणजे “औषधांपासून करण्यात येणारी नशा”! या प्रकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जातांना दिसत आहे. यात प्रामुख्याने केटामाइन, कोडीन, अल्फ्राझोलम, मेफेड्रीन, इफेड्रीन या सारख्या औषधांचे सेवन करण्यात येत आहे. त्यामुळे ड्रग्ज माफियांनी अलीकडेच काही वर्षापासून आपला मोर्चा औषधांच्या साठेबाजी साठी स्मगलिंग करायला सुरुवात झाली आहे. प्रतिबंधित औषधांचा वापर करून नशाखोरीचे प्रमाण वाढत आहे. ही औषधे मेडिकल वर किंवा तिथे शक्य नसेल तर चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या टोळ्याकडून विक्रेत्यांपर्यंत पोहचवली जातात. यात किंमती तीन ते चार पटीने जास्त असल्यामुळे या कामात प्रचंड पैसा कमावला जातो.
मानखुर्द गोवंडीमध्ये औषधांची नशा!
या नशांचे प्रमाण झोपडपट्टी असलेल्या भागात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मुंबई शहरात अनेक झोपडपट्टी भागात या नशेचा सुळसुळाट सुटला आहे. या पैकीच एक म्हणजे मानखुर्द -गोवंडी, शिवाजीनगर झोपडपट्टी आहे. 8 लाखाच्या जवळजवळ लोकसंख्या असलेल्या या भागातील 77% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. या इलाक्यातील काही ठराविक ठिकाणी तर कोणत्याही वेळी नशा सर्रास होताना दिसून येते. नशेच्या आहारी जाणारी मुले ही 14 ते 30 या वयोगटातील सर्वात जास्त असल्याचे आढळून आले आहेत. लहान शाळकरी मुलांमध्ये देखील या नशांचे प्रमाण वाढले आहे. मानखुर्द- गोवंडीच्या इलाक्यात तोंडाला रुमाल बांधून किंवा रुमालाची घडी करून त्याचा वास घेणारे येता जाता पहायला मिळतील! रुमालात सुलोचन, फेव्हीकॉल, व्हाइटनर, कॉस्मेटिक टाकून त्याचा वास घेऊन नशा केली जाते. आयोडेक्स खाणे इतर नशेच्या तुलनेत अत्यंत घातक आहे. यातच आता वाढत आहे “औषधांची नशा”.
खोकल्यासाठी वापरण्यात येणारे “कोरेक्स सिरप” औषध व “नायट्रो -10” या झोपेच्या गोळ्यां ज्यांना “बटन” असे म्हटले जाते, यांचा वाढता वापर गेल्या काही काळात दिसून येते आहे. “कोरेक्स सिरप” ला “चीप दारू” म्हणून ओळखले जाते. त्याचा वापर प्रमाणापेक्षा जास्त आणि नियमित केल्यास त्यातील कोडिनची नशा व्हायला सुरुवात होते. काही वेळेस हे कोल्ड्रिंक मध्ये टाकून पिले जाते तर अनेकदा आहे तसेच सुद्धा पिले जाते. बटन या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गोळ्यांची नशा करणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड ‘लोकप्रियता’ आहे. त्यामुळे यांचा वापर नशा म्हणून करण्याचे प्रमाण वाढत आहे. खरतर ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देणे अपेक्षित नसतांना देखील मेडिकल दुकानांमधून सुद्धा यांचा पुरवठा केला जातो. मानखुर्द-गोवंडीमधील आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात “झोलाछाप” डॉक्टरांच्याच खांद्यावर आहे. अशात यातील काही डॉक्टरांकडून क्लिनिक वर मोठ्या प्रमाणात अशा औषधांचा साठा करून चोरट्या मार्गाने वाढीव किंमतीत बेकायदेशीरपणे विकून प्रचंड नफा कमावला जातो.
या पदार्थाची मार्केट मध्ये सहज उपलब्धता हे नशाखोरीचे एक मुख्य कारण आहेच. जी औषधे डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय उपलब्ध होणे शक्य नाही, ती ड्रग्ज विक्रेत्यांकडून बेकायदेशीर मार्गाने सर्रासपणे विकली जात आहेत. परिणामी, मानखुर्द-गोवंडी मधील रफिक नगर, बाबा नगर, गौतम नगर, झाकीर हुसैन नगर, साठेनगर, खाडी, मंडाळा, लल्लुभाई कंपाउंड या इलाक्यात नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमध्ये आत्महत्येचे आणि गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढताना दिसत आहे. मानखुर्द-गोवंडी या भागात प्रत्येक महिन्याला कमीत कमी दोन ते तीन खून होण्याच्या नोंदी आढळून येत आहेत. सामान्य नागरिकांना या भागात रात्री फिरतांना जीव मुठीत धरून फिरवा लागत आहे. किरकोळ वादातून तोंडावर ब्लेड मारणे, डोक्यात दगड टाकून मारणे, हाताच्या नस कापून मारणे, अंगावर वार करणे अशा घटना रोज पोलीस ठाण्यात नोंद केल्या जात आहेत.
युवकांच्या जीवाशी खेळत आहे नफ्याची लालसा!
गरीब आणि श्रीमंतांच्या नशेमध्ये फरक हा असतोच की गरीब वस्त्यांमध्ये स्वस्तातील नशा केली जाते जी आरोग्यासाठी इतर नशेच्या तुलनेत खूपच जास्त धोकादायक असते. वर चर्चा करण्यात आलेले नशेचे पदार्थ तर इतर नशांच्या तुलनेत बरेच घातक आहेत.
अल्कोहोलयुक्त द्रव्यपदार्थ आणि रसायने रक्ताभिसरण प्रक्रियेला सरळ इजा पोहचवत असतात. अशा वेळेस किशोरवयीन मुलांमध्ये याचे गंभीर परिणाम पाहायला मिळतात. कोमात जाण्यासारखी परिस्थितीही उत्पन्न होऊ शकते. श्वासावाटे करण्यात येणाऱ्या नशेमुळे श्वसनक्रियेवर दुष्परिणाम होऊन छातीचे आणि श्वसनाचे आजार होण्याच्या शक्यता जास्त वाढतात. शरीरातील अवयव खराब होऊन कर्करोगासारखे आजार होऊ शकतात.
सुलोचन, फेव्हीकॉल, व्हाइटनर, कॉस्मेटिक या सारखे रसायनयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात वापरल्यामुळे मेंदूवर परिणाम होतांना दिसून येतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या सुस्त पडू लागल्या की विचार करण्याची शक्ती मंद होत जाते. त्याचा परिणाम नशा करणाऱ्या व्यक्तीवर आहे तो पर्यंत नशा करणारा व्यक्ती अनेकदा विचित्र पद्धतीने वागतांना दिसतो. कधी-कधी असे व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्याच अंगावर ब्लेडने वार करून हातावर, छातीवर किंवा चेहऱ्यावर असलेल्या चमडीला सुद्धा कापतात! हा सगळा प्रकार फार वेदनादायक असतांना देखील त्या व्यक्तीला नशेमुळे याचा त्रास जाणवत नाही किंवा त्या त्रासाला जाणवून घेणाऱ्या त्याच्या संवेदना सुस्त पडलेल्या असतात. थोडा त्रास होत असतांना त्या त्रासाला “आत्मपीडन” म्हणून सहन केले जाते. नशा उतरल्या नंतर त्याचा भयंकर त्रास होतो त्यामुळे त्यावर सर्वात ‘प्रभावी उपाय’ म्हणून पुन्हा नशा करणे हाच एक मार्ग शिल्लक राहतो.
“कोरेक्स”चे नियमित आणि जास्त प्रमाणात सेवन केल्याने बुद्धीभ्रम, स्मरणशक्तीचा ऱ्हास, यकृत, छाती आणि पोटाच्या संबंधित समस्या जाणवायला लागतात.
घातक केमिकल्सयुक्त पदार्थाचे सेवन अतिरेकीपणाने केल्यास मेंदूच्या पेशी नष्ट होऊन मानसिक संतुलन कायमचे किंवा दीर्घकाळासाठी बिघडू शकते. त्यामुळेच आज कामगार वस्त्यांमध्ये अशी अनेक मुले भेटतात जी या अवस्थेत वर्षानुवर्ष जगत आहेत. गरिबीमुळे नशामुक्ती केंद्रात जाऊन काही महिने राहणे आणि त्यासाठी खर्च करणे परवडणारे नसते; आणि मानसशास्त्रज्ञांकडे जाऊन काही महिने नियमित उपचार घेण्याचा उपचार तर अजूनच महागडा आणि सरकारी स्तरावर यासाठी उपचाराची काही विशेष व्यवस्था दिसूनही येत नाही! तेव्हा नशेच्या घेऱ्यात अडकलेल्या गरिबांसाठी त्यातून बाहेर पडणे हे पैसेवाल्यांपेक्षा अत्यंत कठीण काम असते.
नशेखोरीशी कसे लढावे?
“अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई तीव्र केली! अमुक जागेवर छापा टाकून अमुक-अमुक प्रमाणात माल जप्त केला! किंवा अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले!” अशा बातम्या आपण वर्तमानपत्रातून कायमच वाचत असतो पण नशेखोरीला आळा बसलाय का? नाही! याचे पहिले कारण तर हे आहे की अशाप्रकारच्या कारवाया या अत्यंत तुरळक केल्या जातात. जेव्हा एखाद्या भागामध्ये सर्रास अवैध अमली पदार्थांची विक्री चालते, तेव्हा ती पोलिस खात्याच्या माहिती शिवाय चालते यावर तर शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही. नशा करून इतरत्र पडलेली मुले, वाढते गुन्हे, लंपटगिरी हे डोळ्यांना दिसणारे वास्तव आहे. आजकाल तर कोणाच्या घरात काय अन्न शिजवले जात आहे याबद्दल सुद्धा पोलिस खाते गुन्हे दाखल करताना दिसते, आणि सर्रास विकले जाणारे नशेचे पदार्थ त्यांना दिसत नाहीत? वास्तवामध्ये ड्रग्स विकणारे, नशेच्या औषधांचा अवैध धंदा करणारे या सर्वांवर राजकीय वरदहस्त असतो हे सर्वसामान्य लोक जाणतातच; किंबहुना धंदेबाज भांडवली राजकीय पक्षांचे चमचे, गल्लीबोळातील दलाल कार्यकर्तेच या काळ्या धंद्यांच्या मागे आहेत हे सुद्धा खुले गुपित आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या कडून या नशेखोरीच्या गंभीर परिणामाची अजिबात दखल घेणे दूरच या धंद्याला आश्रय देणेही यांच्या साठी सुद्धा गरजेचे झाले आहे. निवडणुकीच्या काळात नशेचे सामान इतर वेळेच्या तुलनेत जास्त विकले जाते कारण निवडणुकीच्या वेळेला स्थानिक लोकप्रतिनिधीं नशेखोरांना “वोट बँक” प्रमाणे वापरत असतात.
दुसरीकडे हे समजणे आवश्यक आहे की गरिबांसाठी नशाबाजीची गरज ही जीवनाच्या अत्यंत अमानवीय स्थितींमधून पैदा होते. जेव्हा कामाच्या जागची स्थिती अमानवी असते, जेव्हा रक्त-पाणी आटवूनही घर चालवले जाऊ शकत नाही, जेव्हा फुरसत काय असते ही कल्पनाच जीवनातून गायब झालेली असते, जेव्हा किमान मानवीयतेची वागणूकही दुर्लभ झालेली असते, दुर्गंधी, प्रदूषण हे जीवनाच्या परिस्थितीचे अविभाज्य भाग बनवले गेलेले असतात, जेव्हा माणसाला स्वत:मधला आणि जनावरामधला फरक समजणे अवघड जाईल अशी जीवनाची स्थिती करून ठेवलेली असते, तेव्हा गरीब वर्गाचा एक मोठा हिस्सा नशेच्या मागे जातो. नशेखोरीमागील सामाजिक-आर्थिक संरचनात्मक कारणे विसरली किंवा नजरेआड केली तर नशेच्या समस्येशी लढणे शक्य नाही.
नफ्याकरिता चालणारी बाजारू व्यवस्था एकीकडे दिवसरात्र काम करवून घेऊन कामगारांना उसाच्या चरकातून पिळवटून काढते; तर दुसरीकडे या दैन्यावस्थेचा विसर पडावा म्हणून नशेच्या पदार्थांचा अवैध धंदा करवून कामगार-कष्टकरी-युवक वर्गाच्या मोठ्या हिश्श्याचे मानवी सारतत्त्वही हिरावून घेते. तेव्हा नशेखोरी विरूद्ध लढताना फक्त वैध-अवैध धंद्यांविरोधात लढणे पुरेसे नाही, तर नशाखोरीला जन्म देणाऱ्या अमानवीय भांडवली, नफेखोर व्यवस्थेशी लढणे, कामाचे तास कमी करण्याकरिता, मजुरी वाढवण्याकरिता, एका सन्माननीय़ जीवनाच्या गरजांच्या पूर्ततेसाठीच्या आंदोलनांद्वारे समाजाच्या संरचनेत क्रांतिकारी परिवर्तनासाठी लढणे आवश्यक आहे.