कामगार वर्गाचा राजकीय पक्ष कसा असावा?
सनी (अनुवाद: अभिजित)
प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधित्व त्या वर्गाचा राजकीय पक्ष किंवा अनेक पक्ष करतात. भारतात अनेक पक्ष आहेत जे वेगवेगळ्या वर्गांचे समर्थन करतात किंवा शासक वर्गाच्या एखाद्या हिश्श्याच्या हितांचे प्रतिनिधित्व करतात. भाजप आणि कॉंग्रेस हे मूळात आणि मुख्यत्वे मोठ्या भांडवलदार वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. हे दोन्ही पक्ष भारतातील मोठ्या वित्तीय-औद्योगिक भांडवलाच्या हितांना उचलून धरतात.
यासोबतच, तृणमूल कॉंग्रेस, राजद, जदयू, अण्णाद्रमुक, द्रमुक, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे सारखे विविध पक्ष हे मध्यम आणि प्रादेशिक भांडवलदार वर्गाचे आणि/किंवा धनिक शेतकरी-कुलकांचे प्रतिनिधी आहेत जे देशभरामध्ये हडपल्या जात असलेल्या अतिरिक्त मूल्यामधील आपल्या वाट्याला वाढवण्यासाठी मोठ्या भांडवलदार वर्गासोबत रस्साखेची करत राहतात. परंतु या तुलनेने छोट्या भांडवली पक्षांना आणि प्रादेशिक पक्षांना जेव्हाही संधी मिळते तेव्हा ते मोठ्या भांडवलदार वर्गाची सेवा करण्याची संधी सोडत नाहीत. दुरुस्तीवादी पक्ष, म्हणजे नावाने ‘कम्युनिस्ट’ पण वास्तवात भांडवलदार वर्गाची सेवा करणाऱ्या पक्षांना जसे की भाकप, माकप, भाकप(माले), एसयुसीआय हे सर्वसाधारणपणे छोट्या आणि मध्य्म भांडवलदार वर्ग, कृषक भांडवलदार वर्ग आणि छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांच्या कानात ‘हळू चला-हळू चला’ चा मंत्र फुंकत राहतात जेणेकरून संपूर्ण भांडवली व्यवस्था सुरक्षित राहील. हे सर्व पक्ष भांडवलदार वर्गाच्या विविध हिश्श्यांचे प्रतिनिधित्व करतात.
भांडवलदार वर्गाचे स्वरूप आणि चरित्रच असे असते की त्याला अनेक राजकीय पक्षांची गरज असते. त्याचे कारण हे आहे की भांडवलदार वर्गाचे विविध गट आपसात स्पर्धा करतात आणि ही स्पर्धाच खरेतर त्यांना एका वर्गाचय रूपात घडवते. त्यामुळेच मार्क्सने म्हटले होते की भांडवलदार वर्गाचे शत्रुत्वरूपी भातृत्व बाजारात स्पर्धेच्या रूपाने निर्माण होते. शत्रुत्वरूपी यामुळे कारण की भांडवलदार एकमेकांशी गळाकापू स्पर्धा करत असतात आणि भातृत्व यामुळे कारण की मिळून कामागार वर्गाचे शोषण करतात आणि लुटीच्या मालामध्ये आपल्या भांडवलानुसार हिस्सेदारी करतात. भांडवलदार वर्गाचे अनेक पक्ष असण्याचे दुसरे कार्ण हे आहे की भांडवलदार वर्गाचे शासन हे भांडवलदार वर्गासाठी आणि त्याच्या चाकर वर्गांसाठी (उदाहरणार्थ शहरी आणि ग्रामीण उच्च-मध्यम वर्ग) ‘लोकशाही’ असते, परंतु व्यापक कामकरी जनतेसाठी भांडवली हुकूमशाही, म्हणूनच त्यांना अनेक मुखवट्यांची आवश्यकता असते, ज्यांना दर पाच, दहा, पंधरा वर्षांनी बदलण्याची गरज पडते. जेव्हा एखाद्या मुखवट्याबद्दल जनतेचा असंतोष वाढू लागतो आणि संयम ढळू लागतो तेव्हा दुसऱ्या एखाद्या मुखवट्याला समोर केले जाते.
प्रत्येक भांडवली पक्ष धर्म, प्रांत, भाषा किंवा जातीच्या नावावर जनतेला विभागून बुर्झ्वा (भांडवलदार) वर्गाची सेवा करतो. अकाली दलापासून, ते राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि चौटालाच्या ‘इनेलो’ पक्षापर्यंत मुख्यत्वे स्थानिक भांडवलदार वर्ग आणि धनिक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष आहेत. आम्ही वर सांगितल्याप्रमाणे नकली दुरुस्तीवादी पक्ष भांडवलदार वर्गाचेच प्रतिनिधित्व करतात. ते मुख्यत्वे छोटा भांडवलदार वर्ग, मोठा आणि मध्यम शेतकरी, मध्यम आणि छोटे व्यापारी आणि संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या उच्च श्रेणीच्या नियमित कर्मचाऱ्यांच्या वर्गाचा एक हिस्सा (जो उच्चभ्रू कामगार वर्गामध्ये परिवर्तित झाला आहे) यांची सेवा करतात. हे पक्ष आज कॉंग्रेस आणि भाजपप्रमाणे चाराणे सदस्यतेचे पक्ष बनले आहेत.
कामगार वर्गाचा आपला स्वत:चा पक्ष असतो, परंतु तो भांडवलदार वर्गाच्या पक्षाप्रमाणे नसतो. तो कामगार वर्गाची विचारधारा म्हणजे मार्क्सवादी विज्ञान आणि तत्वज्ञानावर आधारित असतो. मार्क्सवादाच त्याकरिता होकायंत्राचे काम करतो आणि त्याला दिशा दाखवतो. मार्क्सवादच्या वैज्ञानिक विचारधारेच्या आणि तत्वांच्या उजेडात आणि क्रांतिकारी जनदिशेला लागू करूनच कामगार वर्गाचा क्रांतिकारी पक्ष आपली राजकीय दिशा आणि कार्यक्रम ठरवतो.
क्रांतिकारी जनदिशेचा अर्थ आहे व्यापक कामकरी जनतेमध्ये विखुरलेल्या अविकसित, अकेंद्रित, असंघटित योग्य विचारांना एकत्र करणे, त्यांच्या पायाभूत तत्वांना पकडणे आणि त्यांचे सामान्यीकरण करून एक योग्य राजकीय कार्यदिशा काढणे आणि नंतर या कार्यदिशेला जनतेमध्ये लागू करूनच तिच्या योग्य असल्याची पडताळणी करणे, आणि याच प्रक्रियेमध्ये तिच्यातील कमतरता दूर करून विकसित करत जाणे.
राजकीय कार्यदिशेचा अर्थ काय आहे? राजकीय कार्यदिशेचा अर्थ आहे कोणत्याही सामाजिक स्थितीमध्ये कामगार वर्गाच्या हितांना समोर ठेवून व्यवहाराची एक सर्वसाधारण दिशा. दुसऱ्या शब्दांमध्ये, कोणत्याही राजकीय-सामाजिक स्थितीमध्ये वर्ग संघर्ष आणि राज्यसत्तेच्या प्रश्नावर कामगारवर्गाची सर्वसाधारण पोहोच (approach), दृष्टीकोन आणि कामांची सर्वसाधारण दिशा. योग्य राजकीय कार्यदिशा ठरवण्यासाठी कामगार वर्गाचा पक्ष मार्क्सवादी विज्ञान आणि तत्वांच्या प्रकाशात (जे स्वत: सामाजिक व्यवहाराच्या अनुभवांचेच सामान्यीकरण आणि समाहार आहेत) क्रांतिकारी जनदिशेला लागू करून योग्य विचारांना जाणून घेतो आणि त्यांचे सामान्यीकरण करतो. फक्त मार्क्सवादी विज्ञान, तत्व आणि राजकीय कार्यदिशा आणि कार्यक्रमाच्या आधारावरच एखादा पक्ष कामगार वर्गाच्या अग्रदलाची भुमिका निभावू शकतो आणि आपल्या काळातील राजकीय कार्यभारांना पूर्ण करू शकतो. फक्त अशाच एका पक्षाच्या नेतृत्वामध्ये कामगार वर्ग एक राजकीय वर्ग बनू शकतो, म्हणजे एक असा वर्ग ज्याचे लक्ष्य राजकीय सत्ता मिळवणे आहे आणि आपली राज्यसत्ता स्थापित करणे आहे.
कामगार वर्गाच्या क्रांतिकारी पक्षाची संरचना ट्रेड युनियन सारखी नसते, तर फौलादी शिस्तीची आणि कॅडर आधारित असते. पक्षाचे सदस्यतेवर लेनिनचा ‘कमी पण चांगला’चा नियम लागू होतो, ज्यानुसार प्रत्येक संपकरी कामगाराला पक्षाचे सदस्यत्व दिले जात नाही. कामगार वर्गाच्या पुढारलेल्या(उन्नत) हिश्श्याला जो राजकीय प्रश्नाला, म्हणजे राज्यसत्तेच्या प्रश्नाला विचारण्याची क्षमता बाळगतो वा विकसित करतो आणि फक्त आर्थिक मागण्यांभोवती घुटमळत न राहता संपूर्ण व्यवस्था आणि सत्तेचा प्रश्न उअचलू लागतो, आणि जो एका वैज्ञानिक दृष्टीकोनाला स्विकारतो, फक्त तोच पक्षाचे सदस्यत्व मिळवू शकतो. याशिवाय, कामगारांचा व्यापक जनसमुदाय पक्षाच्या भांडवलशाही-विरोधी समाजवादी कार्यक्रमाला स्विकारून पक्षासोबत विविध स्तरावर जोडला जाऊ शकतो. अशा कामगारांना आपण ‘समाजवादी कामगार’ म्हणू शकतो. लेनिननी त्यांच्या काळात अशा कामगारांना ‘सामाजिक-लोकशाहीवादी कामगार’ म्हटले होते कारण तेव्हा हा शब्द समाजवादी या शब्दाचा समानार्थी म्हणून रूढ होता.
कामगार वर्गाच्या पहिल्या पक्षाचा प्रयोग युरोपातील एकोणीसाव्या शतकाच्या दुसऱ्या हिश्श्यामध्ये झाला. श्रम आणि भांडवलाच्या ऐतिहासिक महासंघर्षामध्ये कामगार क्रांत्यांचे तीन मैलाचे दगड आहेत पॅरिस कम्युन, रशियन क्रांती आणि महान सर्वहारा सांस्कृतिक क्रांती. या ऐतिहासिक प्रवासात पक्षाची संकल्पना आणि पक्षाच्या संरचनेच्या समजदारीत महत्त्वपूर्ण बदल घडून आले. पक्षाच्या संरचनेवर सर्वप्रथम व्यवस्थितपणे लेनिनने लिहिले आणि सांगितले की कशाप्रकारे कामगार पक्ष भांडवली राज्यसत्तेला भिडण्याची आणि शेवटी तिला उध्वस्त करून समाजवादी समाजाचा पाया रचण्याची क्षमता ठेवतो. लेनिनच्या याच समजदारीवर बोल्शेविक पक्ष 1902 पासून ते 1913 पर्यंत ठोस रूप ग्रहण करत गेला. ज्या तत्त्वांवर हा पक्ष बनला आणि मजबूत झाला, त्यांनाच पुढे जाऊन पक्ष संघटनेची बोल्शेविक तत्त्वे म्हटले गेले. आपण काही मुद्द्यांमध्ये कामगारवर्गाच्या पक्षाच्या मुख्य चारित्र्यिक गुणवैशिष्ठ्यांबद्दल चर्चा करूयात. जसे की पक्षाची विचारधारा काय आहे? पक्षाचे लक्ष्य काय आहे? पक्षाचा कामगार वर्गाशी संबंध कसा आहे? पक्षाचा प्रचार कसा होईल? पक्षाचे स्वरूप आणि त्याची संरचना काय आहे?
आज विघटनाच्या आणि निराशेच्या काळात अनेक अराजकतावादी संघाधिपत्यवादी संघटना आणि अक्षविहीन बुद्धिजीवी सोवियत रशिया आणि समाजवादी चीनमध्ये समाजवादाच्या पतनाकरिता पक्षाच्या संकल्पनेलाच जबाबदार ठरवतात. तर दुसरीकडे सर्व दुरुस्तीवादी पक्ष आपल्या मूळ चरित्रात बुर्झ्वा पक्ष असतात पण स्वत:ला कामगार वर्गासमोर कामगार वर्गाच्या पक्षाच्या रूपात प्रस्तुत करतात आणि कामगार वर्गाला भरकटवतात. ही दोन्ही टोकं पक्षाच्या लेनिनवादी संकल्पनेला बदनाम करतात. त्यामुळेच लेनिनवादी पक्षाच्या संकल्पनेच्या पायाभूत पैलूंना समजणे गरजेचे आहे.
कामगार वर्गाचा पक्ष हा कामगार वर्गाचे अग्रदल असतो
कामगार वर्गाचा पक्ष हा कामगार वर्गाचे अग्रदल असतो. हा कामगार वर्गाला नेतृत्व देतो. तो वर्ग संघर्षाला उत्पादितही करतो आणि दुसरीकडे त्याला संचालित करण्याचे उपकरणही असतो. अग्रदल असण्याचा अर्थ आहे कामगार वर्गाच्या पुढारलेल्या हिश्श्यांद्वारे कामगार वर्गाला नेतृत्व देणे. पक्षाचे वर्गचरित्र सर्वहारा असते. खुद्द लेनिनच्या शब्दांमध्ये, पक्ष कामगार वर्गाच्या पुढारलेल्या तत्त्वांना आत्मसात करतो आणि कामगार वर्गाचे अग्रदल असतो.
प्रत्येक वर्गाचे मुख्यत: तीन हिस्से असतात: पुढारलेला हिस्सा, मध्यवर्ती हिस्सा आणि पिछाडलेला हिस्सा. कामगार वर्ग सुद्धा प्रस्थापित भांडवलि समाजात भांडवलदार वर्गाने थोपवलेल्या आपसातील स्पर्धेमुळे भांडवली आणि निम्न-भांडवली विचारधारांना बळी पडतो; प्रादेशिक, भाषिक, जातीय, लिंगभेदात्मक कारणांमुळे एका वर्ग-समाजात आपसातील अंतर्विरोध असतात; व्यवसायगत आणि क्षेत्रगत फरकांमुळे, कुशल आणि अकुशल श्रमातील फरकामुळे, मानसिक आणि शारीरिक श्रमातील फरकामुळे आणि याचप्रकारच्या इतर आंतरवैयक्तिक असमानतांमुळे कामगार वर्ग सुद्धा अनेक पातळ्यांवर विभागलेला असतो. विविध कारकांच्या मिश्र प्रभावामुळे प्रत्येकच जागी कामगार वर्गाचे काही पुढारलेले घटक असतात जे पुढारलेली राजकीय चेतना बाळगतात, फक्त वेतन-भत्त्यांच्या लढाईत जे संतुष्ट नसतात, ते फक्त एका मालकाला नाही तर संपूर्ण मालकवर्गाला आणि त्या वर्गाच्या भांडवली सत्तेला शत्रू म्हणून पाहतात. त्यानंतरचा हिस्सा मध्यवर्ती तत्वांचा असतो जो याप्रकार्च्या राजकीय चेतनेला तुलनेने वेगाने कमावण्याची क्षमता आणि समृद्ध-शक्यता बाळगतो. शेवटी पिछाललेला हिस्सा असतो ज्यामध्ये राजकीय चेतनेचा अभाव असतो, आणि त्याला राजकीय वर्गचेतना मिळवण्यात तुलनेने अधिक वेळ लागतो. कामगार वर्गाचा पक्ष वास्तवात कामगार वर्गाच्या अग्रणी तत्वांना आत्मसात करतो आणि हा अग्रदल-पक्ष कामगार वर्गाच्या तुलनेने पिछाडलेल्या तत्वांना नेतृत्व देतो, त्यांच्या राजकीय चेतनेला उन्नत करतो, त्यांचे राजकीय आणि विचारधारात्मक शिक्षण करतो आणि त्यांच्या दैनंदिन संघर्षांमध्ये त्यांना नेतृत्व देतो, आणि याच प्रक्रियेमध्ये त्यांना भांडवलशाही-विरोधी बनवतो आणि सोबतच त्यांना समाजवादाच्या गरजेवर सहमत करतो, त्यांना समाजवादी कार्यक्रमाचा पाठिराखा बनवतो. याशिवाय, कामगार वर्गाचा पक्ष संपूर्ण कामकरी जनसमुदायांच्या विविध वर्गांसोबत मिळून कामगार वर्गाचा मोर्चा बनवतो आणि त्या मोर्चाचे नेतृत्व करन्यात कामगार वर्गाला सक्षम बनवतो.
कामगारांचे महान नेते मार्स्क यांनी म्हटले होते की कम्युनिस्ट कामगार वर्गाच्या तात्कालिक नाही तर दूरगामी आणि फक्त एक प्रदेश किंवा एका राष्ट्राच्या कामगारांचे नाही तर संपूर्ण देशातील आणि संपूर्ण दुनियेतील कामगारांच्या हितांचे प्रतिनिधित्व करतात. परंतु कम्युनिस्ट पक्ष एकटा क्रांती करत नाही आणि ना कामगार वर्ग एकटा क्रांती करतो. कम्युनिस्ट पक्ष कामगार वर्गाच्या सर्वात पुढारलेल्या तत्वांची फळी असतो, आणि त्यांद्वारेच तो संपूर्ण कामगार वर्ग आणि सामान्य कामकारी जनतेचे नेतृत्व करतो. त्याची शक्ती सामान्य कामकरी जनताच असते. सामान्य कामकरी जनतेचे नेतृत्व कामगार वर्ग करतो. हे लक्षात ठेवले पाहिजे की कामगार वर्ग एकटा इतिहास रचत नाही, तर जनता इतिहास रचते. सामान्य जनतेमध्ये (जिच्यामध्ये आजच्या काळात कामगार वर्ग, गरीब आणि मध्यम शेतकरी, शहरी आणि ग्रामीण निम्न मध्यमवर्ग सामील आहेत) भांडवलदारवर्ग आपल्या विचारधारेचा आणि राजकारणाचा दबदबा स्थापित करून, तिला कामगारवर्गापासून विभक्त करण्यासाठी सतत प्रयत्नरत असतो आणि जनसमुदायांना तो कामगारवर्गाच्या त्या शक्तीपासून वंचित करतो जिचा वापर करून ते भांडवली राज्यसत्तेला उखडून टाकू शकतील. हे तो याकरिता करतो की त्याचे अधिनायकत्व (तानाशाही) म्हणजेच भांडवली राज्यसत्ता टिकवली जावी. कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामध्ये कामगार वर्ग सामान्य जनतेमध्ये आपली विचारधारा आणि राजकारण स्थापित करून त्यांना भांडवलशाहीच्या वास्तवाशी परिचित करवण्यासाठी आणि त्यांना भांडवलशाही विरोधात संघटित करण्यासाठी संघर्ष करतो. जनतेमध्ये ज्या वर्गाची विचारधारा आणि राजकारण शेवटी प्रभुत्व स्थापित करते, तोच वर्ग या संघर्षामध्ये विजयी होतो. कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्गामध्ये राजकीय संघर्षाचा खरा मुद्दा हाच असतो.
जनता स्वत:हून सुद्धा भांडवलशाही विरोधात बेरोजगारी, गरिबी, इत्यादीमुळे त्रस्त होऊन मधूनमधून विद्रोह करू शकते, परंतु जर त्यांमध्ये कामगारवर्गाची विचारधारा, रणनिती, आणि नेतृत्वाचे प्रभुत्व नसेल , तर ती भांडवली व्यवस्थेला बदलू शकत नाही. तिला आपले राजकारण आणि विचारधारेच्या वर्चस्वाला जनसमुदायांमध्ये स्थापित करून जनसमुदायांच्या शक्तीला भांडवली व्यवस्थेविरोधात वळवावे लागते. त्यामुळेच कामगार वर्ग आपल्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वामध्ये जनसमुदायांमध्ये क्रांतिकारी जनदिशा लागू करतो, जनतेमधील अविकसित, विखुरलेल्या आणि अपुऱ्या योग्य विचारांना तो एकत्र करतो, त्यांना मार्क्सवादी विज्ञान आणि तत्वांच्या उजेडात विकसित करतो, त्यांना केंद्रित करतो आणि त्यांना पूर्ण बनवतो, आणि याच पक्रियेमध्ये तो आपल्या सर्वहारा राजकीय कार्यदिशेला विकसित करतो आणि नंतर या राजकीय कार्यदिशेद्वारे (लाईनद्वारे) तो जनसमुदायांना नेतृत्व देतो. ही एक निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे.
याचप्रकारे कम्युनिस्ट पक्ष कामगार वर्गाचे अग्रदल बनण्यासोबतच संपूर्ण कामकरी जनतेचे क्रांतिकारी केंद्र किंवा कोअर बनत जातो आणि फक्त तेव्हाच तो भांडवली व्यवस्था आणि तिच्या राज्यसत्ते विरोधात समाजवादी क्रांती करू शकतो.
कम्युनिस्ट खाजगी संपत्ती नामशेष करू पाहतात. ते भांडवलाचे रूप घेतलेल्या उत्पादन साधनांचे सामाजीकरण करून या उद्दिष्टाला साध्य करतात. या ऐतिहासिक लक्ष्याला निदर्शनास आणून देण्याचे काम कार्ल मार्क्स आणि त्यांचे साथीदार फ्रेडरिक एंगल्स यांनी केले. त्यांनी वैज्ञानिक समाजवादाच्या सिद्धांताची रचना केली आणि हे सांगितले की इतिहासच्या विकासक्रमात समाजवादी व्यवस्थेची स्थापना कोणाच्या सदिच्छेचा मुद्दा नसून इतिहासाचा पुढचा टप्पा आहे. त्यांनीच सांगितले की भांडवलदार वर्ग सर्वहारा वर्गाला लुटतो ज्याचा आधार वरकड मूल्य आहे. त्यांनी वरकड मूल्याची संकल्पना स्पष्ट करत भांडवली शोषणाच्या घृणीत आणि क्षुद्र रहस्याला भेदले आणि सांगितले की कामगार आपल्या कार्यदिवसाचा फक्त एक छोटा काळच स्वत:साठी काम करतो आणि आपल्या मजुरीच्या समान मूल्य निर्माण करतो, आणि बाकी हिश्श्यामध्ये तो भांडवलदारासाठी अतिरिक्त मूल्य किंवा वरकड मूल्य निर्माण करतो. मजुरी म्हणजे बाकी काही नाही तर मजूराच्या काम करण्याच्या शक्तीचे म्हणजे श्रमशक्तीच्या मूल्याचेच एक बदललेले रूप असते. म्हणजे मजुराला काम करण्याच्या बदल्यात फक्त जगण्यापुरता खुराक मिळतो आणि बाकी वेळ तो भांडवलदारासाठी मोफत नफा निर्माण करतो आणि हाच भांडवलदार वर्गाच्या नफ्याचा स्त्रोत असतो. मार्क्स आणि एंगल्सने संपूर्ण मानव समाजाच्या गतीच्या विज्ञानाच्या रुपामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद आणि सर्वहारा वर्गाच्या तत्वज्ञानाच्या रुपामध्ये द्वंद्वात्मक भौतिकवादाला स्थापित केले, जो सामाजिक व्यवहाराच्या सर्व अनुभवांचा आणि सोबतच निसर्ग विज्ञानातील शोधांच्या समाहाराच्या आधारावर काढलेला एक विश्व-दृष्टीकोन आहे, म्हणजेच जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन. द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या मते इहलोक, म्हणजेच आजूबाजूचे सगळे भौतिक यथार्थच अस्तित्वात आहे, तेच वास्तव आहे, आणि सतत आपल्या आतील अंतर्गत अंतर्विरोधांमुळे बदलत राहते. मार्क्स आणि एंगल्सच्या या एकंदरीत पायाभूत शिकवणीलाच मार्क्सवाद म्हणतात.
मार्क्सवाद कर्मांचे मार्गदर्शक विज्ञान आहे जे सामाजिक व्यवहार आणि त्याच्या अनुभवांच्या सततचे सामान्यीकरण आणि नंतर त्याच्या परिणामांच्या आधारावर उन्नत सामाजिक व्यवहाराच्या सतत प्रक्रियेमध्ये अधिकाधिक ऊंची गाठत जाते.
लेनिनने एकीकडे कामगार वर्गाच्या अग्रदल असलेल्या पक्षाची संकल्पना प्रस्तुत केली, आणि दुसरीकडे साम्राज्यवादाच्या काळात मार्क्सवादी विज्ञानाला पुढे नेले. यासोबतच माओंनी क्रांतिकारी जनदिशेची संकल्पना आणि समाजवादी संक्रमणाच्या काळाच्या समजदारीला महान सर्वहारा सांस्कृतिक क्रांतीच्या तत्वांच्या रूपात प्रस्तुत केले.
कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी तत्वज्ञान आणि विज्ञानाच्या प्रकाशात कामगार वर्गाला त्याच्या ऐतिहासिक लक्ष्याचा परिचय करवतो, त्याला जागृत, एकजूट आणि संघटित करतो. लेनिनने म्हटले आहे की कम्युनिस्ट पक्ष क्रांतिकारी मार्क्सवादाची कार्यशील शाळा असते. कामगार वर्गाचे अग्रदल या नात्याने पक्षाचे काम या ऐतिहासिक उद्दिष्टाच्या प्राप्तीच्या संघर्षात कामगारवर्ग आणि समस्त कामकरी जनतेला नेतृत्व देणे असते. भांडवल आणि श्रमाच्या ऐतिहासिक महासमरात श्रमाच्या शिबिराच्या सेनापतीची जबाबदारी कामगार वर्गाचा पक्ष पार पाडतो. त्याचे पहिले उद्दिष्ट भांडवली राज्यसत्तेला उखडून फेकून तिच्या जागी कामगारवर्गाची हुकूमशाही स्थापित करणे आहे, म्हणजेच एक समाजवादी राज्य स्थापित करणे. समाजवादी व्यवस्था आणि राज्यसत्तेच्या स्थापनेनंतर कामगार वर्गाच्या अग्रदलाचे काम आहे कामगार वर्गाच्या राज्यकारभारामध्ये चालू असलेल्या वर्ग संघर्षामध्ये कामगारवर्ग आणि जनसमुदायांना नेतृत्व देत बुर्झ्वा वर्गाचा प्रतिकार मोडून काढणे, भांडवली विचारधारेचे वर्चस्व तोडणे, आणि याच प्रक्रियेमध्ये मानसिक श्रम व शारीरिक श्रम, शहर व गाव आणि उद्योग व शेतीमधील फरक संपवत माल उत्पादनाच्या व्यवस्थेलाच नष्ट करणे आणि साम्यवादाकडे(कम्युनिझम), म्हणजे एका वर्गविहीन समाजाकडे वाटचाल करणे. दुरुस्तीवादी पक्ष सर्वात अगोदर मार्क्सवादाच्या मूळावरच हल्ला करतात. बर्नस्टीन, कौट्स्की,ट्रॉट्स्की, ख्रुश्चेव पासून ते डेंग झियाओ पिंग यांनी मार्क्सवादी विज्ञानावर हल्ले केले. दुरुस्तीवादी पक्ष फक्त कम्युनिस्ट पक्ष असल्याचे आवरण ओढून बसलेले असतात, परंतु त्यांचा गाभा मात्र भांडवली पक्षाचा झालेला असतो.
कामगार वर्गाला नेतृत्व देण्याचा अर्थ आहे त्यांना विचारधारात्मक, राजकीय आणि आर्थिक संघर्षांमध्ये नेतृत्व देणे. हे अत्यंत महत्वाचे आहे कारण कामगार वर्गाचा पक्ष कामगार वर्गाला स्वत:स्फूर्ततावादाच्या तावडीत सोडत नाही. कामगार वर्ग फक्त आर्थिक मुद्यांवर संघर्ष करत स्वत:हून क्रांतिकारी चेतना विकसित करत नाही. कामगारांमध्ये क्रांतिकारी राजकारण घेऊन जाण्याचे काम पक्षाचे असते. राज्यसत्तेचा प्रश्न आणि समाजवादाच्या संकल्पनेची समज कामगार वर्ग फक्त आर्थिक मुद्यांवर लढून मिळवू शकत नाही. कामगार वर्गाचे ऐतिहासिक लक्ष्य आणि त्याच्या नेतृत्वकारी भुमिकेबद्दल पक्षच त्याला अवगत करवतो—पक्ष, जो स्वत:च कामगार वर्गाच्या अग्रणी तत्वांना सामावून घेणारी संघटना आहे. कामगार वर्गाची स्वत:स्फूर्त चेतना ट्रेड युनियनवादी राजकारणाऱ्या मर्यादेपर्यंतच घेऊन जाते. आज संपूर्ण भारतात केंद्रिय ट्रेड युनियन्स अर्थवादाच्या चौकटीतच कामगार वर्गाला अडकवून ठेवतात. देशाच्या मोठ्या औद्योगिक शहरांमध्ये दुरुस्तीवादी पक्षांच्या ट्रेड युनियन्स कामगारांना वेतन-भत्त्याच्या लढाईत अडकवून ठेवतात. बॅंक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी आणि सर्व नियमित कामगारांच्या युनियन्स कामगारांमध्ये एका युनियन नोकरशाहीला निर्माण करतात ज्या ह्या व्यवस्थेतच आपला स्वर्ग शोधत बसतात. असंघटित कामगारांमध्ये सुद्धा ज्या युनियन्सचा प्रभाव आहे त्यांपैकी अधिकांश फक्त फॅक्टरी मालकांची आणि सरकारी श्रम विभागाची दलाली करतात. अशामध्ये कामगारांमध्ये आपण राजकीय प्रचार घेऊन जाण्याची गरज आहे. कामगारांना आर्थिक संघर्षांमध्ये पक्ष नेतृत्व देतो परंतु याद्वारे एकता बनवून कामगारांमध्ये राजकीय प्रचाराचा आधार तयार करतो आणि या आर्थिक संघर्षांना राजकीयरित्या लढतो. म्हणजेच आपल्या आर्थिक मागण्यांकरिता लढतानाच तो कामगार वर्गाला या आर्थिक समस्यांच्या मूळ कारणाशी अवगत करवतो आणि त्यांना त्याम्च्या दीर्घकालिक उद्दिष्टाबद्दलही शिक्षित करतो. समाजवादी चेतनेचा प्रवेश ‘बाहेरून’ होतो याचा अर्थ आहे की स्वत:हून आर्थिक संघर्षांमधून समाजवादी चेतना निर्माण होऊ शकत नाही आणि सुरूवातीच्या काळात या चेतनेला कामगार आंदोलनामध्ये घेऊन जाणारा समूह अनेकदा क्रांतिकारी बुद्धिजीवींचा असतो. याचा अर्थ हा नाही की कामगार स्वत: क्रांतिकारी बुद्धिजीवींची भुमिका निभावू शकत नाहीत. परंतु लेनिनच्या शब्दांमध्ये जेव्हा ते या भुमिकेला निभावतात, तेव्हा ते एक सामान्य कामगाराच्या नाही तर एका समाजवादी बुद्धिजीचीच्या भुमिकेत असतात. सर्वहारा विचारधारेला कामगार वर्गापर्यंत आणि सामान्य कामकरी जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम सर्वहारा वर्गाचा पक्ष करतो.
आज कामगार वर्गासमोर ऐतिहासिकरित्या दोन नवे कार्यभार सुद्धा आहेत. आपण ज्या काळात जगत आहोत, तिथे कामगार वर्गीय क्रांत्यांचे पहिले ऐतिहासिक कालचक्र पूर्ण झाले आहे. आपण कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्गामधील वर्गसंघर्षाच्या दुसऱ्या आणि निर्णायक वर्गसंघर्षाच्या महासमराच्या सुरूवातीच्या पहिल्या टप्प्यात आहोत. अशावेळी आपल्याला कामगार वर्गाला त्याच्या भूतकाळातील संघर्षांशी परिचित करवण्याच्या सर्वहारा पुनर्जागरणाच्या कार्यभारालाही हाती घ्यावे लागेल. हे काम क्रांतिकारी कामगार पक्षच करू शकतो. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला बदललेल्या परिस्थितींमध्ये क्रांतीच्या विज्ञानाला लागू करावे लागेल कारण आजची भांडवलशाही हुबेहूब लेनिन वा माओच्या काळातील भांडवलशाही नाही, तर तिच्यातही अनेक परिवर्तने झाली आहेत, ज्यांना मार्क्सवादी विज्ञानाच्या प्रकाशात समजून घ्यावे लागेल. हा सर्वहारा प्रबोधनाचा कार्यभार बनतो. सर्वहारा पुनर्जागरण आणि सर्वहारा प्रबोधनाच्या कार्यभाराला, सध्याच्या काळात, फक्त कामगार वर्गाचा क्रांतिकारी पक्षच पूर्ण करू शकतो.
(अपूर्ण, पुढील अंकात सुरू राहील)