मुक्काम पोस्ट: मानखुर्द-गोवंडी
कामगारांच्या जीवनाची विदीर्ण स्थिती, कामगार वस्त्यांमधून, कामगारांच्या तोंडून
बिगुल प्रतिनिधी
कोरोना काळातील लॉकडाऊन संपून एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. तरी देखील महानगरातील कामगार वस्त्यातील भयावह चित्र अजून देखील बदललेले नाही. सरकारी दावे आणि घोषणाबाजी म्हणजे कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखेच आहे. कामगार वस्त्यांमध्ये जाऊन कामगारांचा जगण्यासाठी सुरु असलेला संघर्ष पाहिला तर याची प्रचिती येते. मानखुर्द-गोवंडी या भागातील कामगार वस्त्यामधून खालील परिस्थिती आपल्या समोर …
“कोरोना आला आणि हातातले काम गेले तेव्हापासून आयुष्याची फरफट सुरु आहे.”
28 वर्षीय भगवान कांबळे मागील अडीच वर्षापासून बेरोजगार आहेत. भगवान मागील दोन अडीच वर्षाबद्दल बोलतांना सांगतात की, “नवीन लग्न झाल्यावर वर्ष दोन वर्षातच हि परिस्थिती आली आणि आयुष्याच सगळ गणितच बिघडले. बेरोजगारीच्या या काळात अधून मधून मिळणारी विविध कामे करून कसे तरी घर चालवले. कोरोनामुळे हातातले काम गेले आणि दीर्घकाळ घरातच बसून राहावे लागले होते. जवळ काहीच पैसे नसल्यामुळे कोरोना काळात कोरोना झालेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन रोजंदारीवर सॅनिटायझेशन करायचे काम केले. त्यानंतर झोमॅटो मध्ये तीन महिने काम केले. तिथे दहा ते बारा तास काम करावे लागत असे, या कामात फूड ऑर्डर देण्यासाठी स्वतःची गाडी वापरावी लागते, पेट्रोलसाठी वेगळे पैसे मिळत नाहीत. पेट्रोलच्या वाढत्या दामामुळे ‘कमाई कमी आणि खर्च जास्त’ अशी अवस्था झाली होती. ज्या ठिकाणी एका ऑर्डरसाठी फक्त 27 रुपये, आठवड्याचे पैसे पंधराशे-आठराशे ते दोन हजार म्हणजे महिन्याला जास्तीत जास्त सहा ते सात हजार असतील तिथे महिन्याचा पेट्रोलचा दोन ते तीन हजार रुपये खर्च कसा परवडणार आहे? त्यात देखील कामाचा ताण खूप जास्त असल्यामुळे मला ते काम सोडावे लागले. त्यामुळे पुन्हा बेरोजगार म्हणून कामासाठी भटकावे लागले.”
भगवान पुढे सांगतात की, “झोमॅटो नंतर काही महिने बेरोजगार म्हणून कामासाठी वणवण भटकल्यानंतर पुन्हा नाईलाजाने डॉमिनोज मध्ये काम करायचे ठरवले पण तिथली परिस्थिती काही वेगळी नव्हती ‘इथे पण पळसाला तीनच पान होती!’ बारा ते चवदा तास काम करून देखील गाडीचे पेट्रोल, घराचे भाडे, घरात लागणारे राशन, लाईट बिल, आणि कधी काही दुखलंच तर दवाखान्याचा खर्च देखील निघत नव्हता. इथे एका ऑर्डरसाठी 27 रुपये मिळायचे आणि महिन्याची एकूण कमाई 7 ते 8 हजार पर्यंतच जात होती. त्यामुळे पुन्हा तेच चक्र सुरु झाले. शेवटी नाईलाजाने काही महिने करून हे काम देखील सोडावे लागले. त्यानंतर पुन्हा बेरोजगार म्हणून भटकंती केली आणि हाताला जे मिळालेलं ते काम करत गेलो. यातच मी मागील तीन महिन्यांपासून बेरोजगार असल्यामुळे घरीच बसून आहे, पण एक बाब बरी झाली की, बायको एका ठिकाणी कामाला लागली आणि तिला मिळणाऱ्या पगारात घरखर्च सुरु आहे.”
“जेमतेम आयुष्य जगत आहोत.”
उत्तरप्रदेशातील समशेर अन्सारी मागील वीस वर्षापासून मुंबईतील गोवंडी भागात राहायला आहेत. मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात जी मिळतील ती कामं करत या महानगरात आयुष्याला सुरुवात झाली. नंतर समशेर हॉटेल लाईनला वळाले. सुरुवातीला अनेक छोट्या-मोठ्या हॉटेल मध्ये काम करत समशेर यांनी आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत असतांना आठ वर्षाआगोदर स्वत:चे छोटेसे कबाब पराठ्याचे हॉटेल टाकायचा निर्णय घेतला. या हॉटेलमधील दैनिक कामासाठी कोणीही पगारी कामगार ठेवलेला नाही. समशेर , त्यांची दोन मुलं आणि पत्नी मिळून हे हॉटेल चालवत असतात. यातून मिळालेल्या उत्पन्नावर आज समशेर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे बिघडलेली घडी सुरळीत झाली का? असे विचारले असता समशेर सांगतात की, “कोरोना अगोदर परिस्थिती फार चांगली होती असे नाही पण थोड ठीक होतं! कोरोनातील लॉकडाऊनमुळे सर्व धंदाच उध्वस्त झाला. जवळ थोडे जमा असलेले पैसे सुरुवातीच्या काही महिन्यातच संपून गेले होते. त्यानंतरचे आयुष्य आज सुद्धा डोळ्यात अश्रू उभे करणारे होते. या कठीण परिस्थितीमधून डोकं वर काढून आज एक वर्ष झाले पण वाढलेली महागाई पाहता गॅस, तेल, व अन्य सामानाच्या किमंती आभाळाला टेकल्या आहेत. वरून जागेचे भाडे हे खूपच महागडे आहे. अशात झोपडपट्टीतील या छोट्याशा हॉटेल वर आमच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम चालला आहे.”
“आयुष्यात कोंडी झाल्यासारखे वाटत आहे, कोरोना पासून कामधंदे चौपट झाले आहेत.”
गोवंडी मधील झाकीर हुसैन नगर मध्ये राहणारे शब्बीर शाह मुंबईतील दारूखाना या भागात शिपयार्ड वर्कशाप मध्ये मोटर मेकॅनिक म्हणून काम करतात. शब्बीर यांच्या कामाचे स्वरूप तसे फिरस्ती कामाचे आहे. दारूखान्यात जहाजाच्या डागडूगीचे अनेक इंजीनिअरिंग वर्कशाप आहेत. त्यात अनेक वेगवेगळ्या कामासाठी लागणाऱ्या मशीन्सच्या मोटार मिळतील तशा रिपेयरिंग करणे हे काम आहे. शब्बीर भावनिक होऊन आपल्या हतबलतेबद्दल सागतांना बोलतात की, “कोरोना अगोदर थोडे काम मिळत होते पण आज कोरोना संपून एक वर्ष झाले तरी पाहिजे तसे काम मिळत नाही. माझे रहायचे ठिकाण आणि कामाचे ठिकाण यात 20 कि.मी अंतर आहे. कामाच्या इलाक्यात पण बरंच फिरावे लागते त्यामुळे मोटारसायकल शिवाय दुसरा पर्याय नाही आणि आज पेट्रोलचे भाव पहिले तर माझे प्रत्येक महिन्याचे अडीच ते साडेतीन हजार रुपये खर्च होत आहेत. अशात कमावणार काय आणि घरखर्च चालवणार कसा? अनेक वेळेस तर काम करून देखील वर्कशॉपवर पैशासाठी अनेक वेळेस फेऱ्या माराव्या लागतात. घरात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या आणि राशन-पाण्याच्या किंमती देखील प्रचंड वाढल्यामुळे खूप काटकसर करून देखील प्रत्येक महिन्याला तारेवरची कसरत करून जीवन जगत आहोत. त्यात मुलांच्या शाळेचा खर्च वाढत चालला आहे. तीन मुलांच्या आरोग्याच्या अडचणी उभ्या राहिल्या कि पुरतं खचून गेल्यासारखं वाटते. कितीही हातपाय मारले तरी किमान गरजा देखील पूर्ण होत नाहीत. आयुष्याची कोंडी झाल्यासारखे वाटत आहे.”
“आमच्या दोघा नवरा बायकोचे पोट भरणेच अवघड असल्याने गरोदर राहायचा पण विचार केला नाही!”
27 वर्षीय आरती कोरोना महामारीपासून बेरोजगार आहे. त्या सांगतात की, “कामाची वणवण करून देखील कुठेच काम मिळत नाही. नवऱ्याच्या हाताला मागील दोन वर्षापासून नियमित काम नाही, अशात मी गरोदर झाल्यावर घरातील घरखर्च चालवायला देखील पैसे नव्हते. त्यात माझ्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष झाले आणि दोन महिन्याची गरोदर असताना पोटात दुखत असल्याने दवाखान्यासाठी देखील पैसे नव्हते. सरकारी दवाखान्यात गेल्यावर सरकारी डॉक्टरांनी माझ्या आरोग्याकडे कोणतेच लक्ष दिले नाही आणि पोटात प्रचंड दुखत असल्याने माझं दोन महिन्याचं बाळ पोटातच मरण पावलं! त्यानंतर माझी तब्येत बराच काळ खराब झाली होती, मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. लग्नाला चार वर्ष होऊन देखील मुलं नाही म्हणून सासू आणि इतर नातेवाईक अगोदर बोलत असत त्यामुळे मानसिक घुसमट देखील होत होती. अशा कठीण परिस्थितीतून मी आणि माझा नवरा एकमेंकांना मानसिक आधार देत बाहेर आलो आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की, “जो पर्यंत आमच्या दोघाच्या हाताला काम लागत नाही, घराची विस्कळीत झालेली घडी थोडी नीट बसत नाही, तो पर्यंत बाळाचा विचार करायचा नाही.” आता मी मागील पाच महिन्यापासून एका सुपर मार्केट मध्ये कामाला लागली आहे. त्यांतून मिळणाऱ्या पैशातच नवरा बेरोजगार असतांना घरचा घरखर्च कसातरी सुरु आहे.”
“आयुष्याचा कचरा झाला आहे.”
पन्नालाल गुप्ता अगोदर साठेनगर आणि मानखुर्द गोवंडीतील झोपडपट्टीत घरोघरी जाऊन स्टोव्ह आणि गॅस रिपेरिंगचे काम करत असत. दिवसभर वणवण भटकंती करून आयुष्याच्या किमान गरजा भागत नसल्यामुळे अनेक दिवस हे काम करून कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी दुसरे काम करायचे ठरवले; पण इतर कुठेच चांगल्या पैशाचे काम मिळत नव्हते. शेवटी कंटाळून महानगरपालिकेत कचरा गाडीवर काम करायचे ठरवले. पन्नालाल सांगतात की, “हे काम नियमित असल्यामुळे थोडं बर आहे, पण घाणीचे काम असल्यामुळे मला आरोग्याच्या अडचणी यायला लागल्या आहेत. त्यात प्रत्येक महिन्याला दवाखान्यात बराच पैसा खर्च होतो. आजारी झालो तर कामावर सुट्ट्या देखील पडतात, त्यामुळे ठेकेदार त्या दिवसाचा पगार कापून घेतो. कामाच्या ठिकाणी घाणीत हात घालून काम करावे लागते. सुरक्षेसाठी मिळणारी हॅन्डग्लोव्ह, गमबूट देखील दिले जात नाहीत. ठेकेदार या सुरक्षा साधनांना घेऊन विकून टाकतो आणि आम्हाला देत नाही. विचारायला गेलो तर ‘काम करायचे असेलं तर करा नाहीतर सोडून द्या!’ असे बोलतो. इतर कुठे काम मिळत नाही म्हणून नाईलाजाने हे घाणीचे काम करावे लागत आहे. सकाळी पाच वाजता उठून कामाला जावे लागते तरी पण आयुष्यात काहीच बदल होत नाही. गरिबांना सरकार कडून कोणतीच मदत मिळत नाही; उलट महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात घरभाडे, मुलांचे शिक्षण, राशन औषध-पाणी, अशा गरजा भागवताना दमछाक होत आहे.”
राज्य आणि देश विकास करत असल्याच्या गमजा मारणारे मोदी सरकार, आणि दलालीचे तुकडे खाण्यासाठी आपसात साठमारी करणारे महाराष्ट्रातील शिवसेनेचे गट, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीची ठाकरे-शिंदे सरकारे याच पद्धतीने गरिब कामगार-कष्ट्कऱ्यांनी रक्त-घाम गाळून संपत्ती निर्माण करत रहावी आणि मालकांचा भांडवल संचय वाढवावा यासाठीच काम करतात हे स्पष्ट आहे.