कामगार वर्गाचा पक्ष कसा असावा? (चौथे पुष्प)
पक्षाचा राजकीय प्रचार आणि जनसमुदाय
✍ सनी
कामगार वर्गाचा राजकीय प्रचार कशाप्रकारे ट्रेड युनियनवादापासून वेगळा असतो या प्रश्नावर लेनिनचा अर्थवाद्यांशी दीर्घ वाद चालला. गेल्या लेखात आम्ही उल्लेख केला होता की कशाप्रकारे संप-आंदोलन जोरात असताना स्वत:स्फूर्ततावादाचे समर्थक असलेल्या अर्थवादी लोकांनी कामगारांमध्ये फक्त आर्थिक मागण्यांसाठीच्या संघर्षापर्यंतच कम्युनिस्ट प्रचाराला मर्यादित ठेवले होते. परंतु, कम्युनिस्टांनी स्वत:ला कामगारांच्या आर्थिक मागण्यांपर्यंत मर्यादित करणे हाच फक्त अर्थवाद नाही, तर कामगार वर्गाशिवाय इतर जनसमुदायांच्या मागण्यांकडे डोळेझाक करणे सुद्धा अर्थवाद आहे. असे का? हे समजण्यासाठी आपल्याला कम्युनिस्ट राजकारणाचे सारतत्त्व समजावे लागेल.
कम्युनिस्ट राजकारणाचा निशाणा असतो भांडवली राज्यसत्ता. भांडवली राज्यसत्तेला ध्वस्त करूनच कामगार वर्ग आपल्या सत्तेला म्हणजे कामगार वर्गाच्या हुकूमशाहीला स्थापित करू शकतो. परंतु कामगार वर्ग फक्त स्वत:च्या जीवावर भांडवलदार वर्गाच्या राज्यसत्तेला ध्वस्त करू शकत नाही. ना कामगार वर्ग एकटा क्रांती करू शकतो, ना त्याचा पक्ष. इतिहास जनता घडवते. इतिहास निर्मितीच्या सद्यकाळात जनतेचे अग्रदल कामगार वर्ग आहे, आणि कामगार वर्गाचे अग्रदल त्याचा पक्ष आहे. भांडवली समाजात भांडवलदारवर्ग शासक वर्ग असतो, आणि तो त्याच्या शासनाला त्याच्या राज्यसत्तेमार्फत चालू ठेवतो. जनतेच्या प्रत्येक स्वत:स्फूर्त पद्धतीने उभ्या झालेल्या विरोधाला किंवा जन-उभाराला ही राज्यसत्ता चिरडू शकते किंवा थांबवू शकते. सत्य हे आहे की जनता इतिहास बनवते परंतु कामगारवर्गीय राजकीय दिशा आणि कामगारवर्गाच्या नेतृत्वाशिवाय नाही.
भांडवली समाजात शासक वर्ग आणि जनतेमधील अंतर्विरोध स्वत:हूनच क्रांतिकारी परिणामांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. या अंतर्विरोधांना क्रांतिकारी पद्धतीने सोडवण्यासाठी, त्यांना त्यांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे क्रांतीला यशस्वी बनवण्यासाठी लागणारी क्षमता कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्गाचा अंतर्विरोधच देतो. कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यामधील अंतर्विरोधच भांडवली समाजाचा प्रमुख अंतर्विरोध असतो, म्हणजे अंतर्विरोधांच्या सर्व कड्यांपैकी कळीची कडी असतो. फक्त कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्गाकडेच सत्तेची परियोजना असते आणि हे दोन्ही वर्ग जनसमुदायांमध्ये आपल्या प्रभावाला स्थापित करण्यासाठी संघर्ष करतात. यामुळेच कामगार वर्गाचा पक्ष व्यापक कामकरी जनसमुदायांच्या संघर्षांपासून वेगळा राहू शकत नाही.
जर कामगार वर्गाचा पक्ष कामकरी जनसमुदायांच्या मागण्या न उचलता फक्त कामगार वर्गाच्या तात्कालिक आणि आर्थिक वर्गीय मागण्याच सतत उचलेल किंवा त्यांना प्राधान्य देत राहील, तर तो सुद्धा अर्थवाद असेल. जसे की, कामगार वर्गाचा पक्ष जर गरीब शेतकऱ्यांच्या संघर्षापासून अलग राहील, तर ते कामगार वर्गाच्या दीर्घकालिक राजकीय हितांच्या विरोधात असेल, आणि त्याची राजकीय वर्गयुती संकटात येईल.
लेनिनने म्हटले आहे की आपण कामकरी जनसमुदायांमध्ये प्रचार अभियाने घेतली पाहिजेत. हा प्रचार जनसमुदायाच्या वेगवेगळ्या हिश्श्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतींनी नेला पाहिजे. जसे की, गरीब कामगारांच्या संघर्षाचे मुद्दे वेगळे असतील तसेच शहरी निम्न भांडवलदार वर्ग म्हणजे निम्न आणि निम्न-मध्यम वर्गाच्या मागण्या वेगळ्या असतील. वेगवेगळ्या वर्गांच्या फक्त मागण्याच वेगवेगळ्या नसतात, तर कामगार वर्गाच्याही वेगवेगळ्या हिश्श्यांच्या वेगवेगळ्या मागण्या असतात. लेनिन कामगार वर्गाच्या मित्र वर्गांमध्ये प्रचार अभियानांबद्दल चर्चा करताना म्हणतात की: “क्रांतिकारी कामगारवर्गाचे नेहमीचे सहानुभूतीदार या नात्याने कामगारांच्या अर्धकामगार हिश्श्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी तसेच मधल्या समूहांचा कामगारवर्गाबद्दल अविश्वास दूर करण्यासाठी कम्युनिस्टांनी भूस्वामी, भांडवलदार आणि भांडवली सत्तेसोबतच्या त्यांच्या विशेष शत्रूतापूर्ण अंतर्विरोधांचा वापर केला पाहिजे. याकरिता त्यांच्यासोबत दीर्घ संभाषणाची, त्यांच्या आवश्यकतांबद्दल समजदार-सहानुभूतीची आणि त्यांच्या त्रासावेळी त्यांना मोफत सहाय्य आणि सल्ला देण्याची गरज पडू शकते. या सर्व बाबींमुळे कम्युनिस्ट आंदोलनाबद्दल त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होईल. कम्युनिस्टांनी त्या विरोधी संघटनांच्या नुकसानदायक प्रभावाला समाप्त करण्यासाठी काम केले पाहिजे ज्या त्यांच्या जिल्ह्यांमध्ये वर्चस्वाच्या स्थितीत असतील किंवा ज्यांचा कष्टकरी शेतकरी समुदायावर, घरगुती उद्योगांमध्ये काम करणाऱ्यांवर वा इतर अर्धकामगार वर्गांवर प्रभाव असेल. शोषित लोक त्यांच्या स्वत:च्या कडव्या अनुभवांच्या आधारावर ज्या लोकांना पूर्ण गुन्हेगार असलेल्या भांडवली व्यवस्थेचे प्रतिनिधी वा साक्षात मूर्तरूप समजतात, त्या लोकांचा पर्दाफाश गरजेचे आहे. कम्युनिस्ट आंदोलना (किंवा आंदोलनपर प्रचारा) दरम्यान रोजच्या जीवनातील त्या सर्व घटनांचा हुशारीने आणि जोरदारपणे वापर केला गेला पाहिजे ज्या सरकारी नोकरशाही आणि निम्न-भांडवली लोकशाही आणि न्यायाच्या आदर्शांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण करतात.
“प्रत्येक स्थानिक गामीण संघटनेने आपल्या जिल्ह्याच्या सर्व गावांमध्ये, रहिवाशी जागांमध्ये आणि विखुरलेल्या वस्त्यांमध्ये कम्युनिस्ट प्रचार-प्रसाराकरिता घरोघरी फिरून प्रचार करण्याचे काम काळजीपूर्वक आपल्या सदस्यांमध्ये वाटले पाहिजे.”
कामगार वर्गाच्या पक्षाच्या राजकीय प्रचाराची दुसरी बाजू ही आहे की कामगार वर्गाचा प्रचार जनतेच्या विविध हिश्श्यांमध्ये याकरिता केला जातो की त्यांच्या वर्ग चेतनेला वर आणता येईल आणि त्यांच्यासमोर भांडवलशाही आणि भांडवली राज्यसत्तेच्या वास्तवाला उघडे पाडता येईल. फक्त कामगार वर्गाचे कार्यक्षेत्र आणि कामगार वर्गाच्या जीवन संघर्षांच्या क्षेत्रापर्यंत मर्यादित राहून राजकीय चेतना निर्माण होऊ शकत नाही. कामगार वर्गाचा राजकीय प्रचार तेव्हाच क्रांतिकारी प्रचार बनेल, जेव्हा तो “राज्यसत्ता तसेच सरकारसहीत सर्व वर्गांच्या व स्तरांच्या परस्परसंबंधांच्या क्षेत्रापर्यंत” आणि “सर्व वर्गांमधील परस्परसंबंधांपर्यंत” विस्तारीत होईल. आम्ही या लेखाच्या दुसऱ्या भागात हे सांगितले होते की कामगार वर्गाच्या पक्षाच्या प्रचारकाने जनतेच्या प्रत्येक वर्गापर्यंत गेले पाहिजे आणि त्याद्वारे प्रत्येक वर्गाच्या चेहऱ्याला आणि त्याच्या मनात लपलेल्या गोष्टीला समोर आणले पाहिजे. म्हणजे भांडवलशाहीचा सर्वांगीण भंडाफोडच कामगार वर्गाचा राजकीय नारा असला पाहिजे. हाच नारा कम्युनिस्ट राजकारण आणि ट्रेड-युनियनवादी राजकारणात फरक आहे. लेनिन म्हणतात:”आपण पाहिले आहे की अधिकाधिक व्यापक राजकीय आंदोलन चालवणे आणि त्यासाठी सर्वांगीण राजकीय भंडाफोड संघटित करणे हा आपल्या कामांपैकी एक अत्यंत गरजेचा आणि सर्वात जास्त तात्कालिकरित्या गरजेचा कार्यभार आहे, अर्थात ही कारवाई सामाजिक-जनवादी पद्धतीची असली पाहिजे. परंतु या निष्कर्षावर आपण फक्त याच आधारे पोहोचलो आहे की कामगार वर्गाला राजकीय शिक्षण आणि राजकीय ज्ञानाची तात्काळ गरज आहे. परंतु ही प्रश्न प्रस्तुत करण्याची एक अत्यंत संकुचित पद्धत आहे, कारण की सामान्यपणे ही पद्धत सामाजिक-जनवादी आंदोलनाच्या आणि विशेषत: वर्तमानकाळातील रशियन सामाजिक-जनवादी आंदोलनाच्या सर्वसाधारण लोकशाही कार्यभारांना विसरवते. या गोष्टीला अजून ठोसपणे समजवण्यासाठी आपण मुद्याच्या त्या बाजूबद्दल बोलूयात जी ‘अर्थवाद्यांच्या’ सर्वाधिक ‘जवळ’ आहे, म्हणजे आपण व्यावहारिक बाजूबद्दल बोलूयात. ‘प्रत्येक मनुष्य हे मानतो’ की कामगार वर्गाची राजकीय चेतना पुढे नेणे गरजेचे आहे. प्रश्न आहे की हे काम कसे केले जाईल, ते करण्यासाठी काय आवश्यक आहे?” लेनिन पुढे म्हणतात: “कामगारांमध्ये राजकीय वर्ग-चेतना बाहेरूनच आणली जाऊ शकते, म्हणजे फक्त आर्थिक संघर्षांच्या बाहेरून, कामगार-मालक संबंधांच्या क्षेत्राबाहेरून. ही चेतना ज्या एकमेव क्षेत्रातून येऊ शकते, ते आहे राज्यसत्ता तसेच सरकारसोबत सर्व वर्ग आणि स्तरांच्या संबंधांचे क्षेत्र, जे सर्व वर्गांच्या आपसातील संबंधांचे क्षेत्र आहे. म्हणूनच या प्रश्नाचे उत्तर, की कामगारांमध्ये राजकीय ज्ञान घेऊन जाण्यासाठी काय केले पाहिजे, फक्त एवढेच असू शकत नाही की ‘कामगारांमध्ये जा’ – बहुतेक व्यावहारिक कार्यकर्ते, विशेषत: ते लोक ज्यांचा कल ‘अर्थवादा’कडे आहे, ते हेच उत्तर देऊन समाधानी राहतात. कामगारांमध्ये राजकीय ज्ञान घेऊन जाण्यासाठी सामाजिक-जनवादी कार्यकर्त्यांना लोकसंख्येच्या सर्व वर्गांमध्ये जावे लागेल आणि आपल्या सैन्य-तुकड्यांना सर्व दिशांनी पाठवावे लागेल.”
अशापकारे, राजकीय प्रचाराकरिता कम्युनिस्टांना सर्व वर्गांमध्ये जावेच लागेल. कम्युनिस्टांना विविध वर्गांच्या सामाजिक तसेच आर्थिक स्थितीच्या सर्व विशिष्टतांचा अभ्यास करावा लागेल. हाच कार्यभार कामगार वर्गाला लोकशाहीसाठी सर्वात पुढे येऊन लढणारा वर्ग बनवतो. लेनिन म्हणतात की: “सामाजिक-जनवाद्यांच्या सैद्धांतिक कामाचे लक्ष्य विविध वर्गांच्या सामाजिक व राजकीय स्थितीच्या सर्व विशिष्टतांचे अध्ययन असले पाहिजे. परंतु कारखान्यांच्या जीवनाच्या विशिष्टतांचा अभ्यास करण्याचा जेवढा प्रयत्न केला जातो, त्या तुलनेत अशा प्रकारचा अभ्यास करण्याचे काम फारच कमी, मर्यादेपलीकडे कमी केले जाते. समित्या आणि मंडळ्यांमध्ये तुम्हाला असे अनेक लोक सापडतील, जे उदाहरणार्थ धातू-उद्योगाच्या एखाद्या विशेष शाखेचेच अध्ययन करत बसलेत, पण या संघटनांमध्ये तुम्हाला असे सदस्य क्वचितच सापडतील जे (आणि असे अनेकदा होते, की एखाद्या कारणामुळे ते व्यावहारिक काम करू शकत नाहीत) आपल्या देशातील सामाजिक-राजकीय जीवनाच्या एखाद्या अशा तात्कालिक प्रश्नाच्या संदर्भात विशेष प्रकारे माहिती गोळा करत असतील जी लोकसमुदायांच्या इतर हिश्श्यांमध्ये सामाजिक-जनवादी काम करण्याचे साधन बनेल. कामगार वर्गाच्या आंदोलनाच्या सध्याच्या नेत्यांपैकी बहुसंख्यांमध्ये प्रशिक्षणाच्या अभावाबद्दल चर्चा करताना आपल्याला या बाबतीत सुद्धा प्रशिक्षणाच्या अभावाचा उल्लेख करावा लागेल कारण ‘कामगार वर्गाच्या संघर्षांसोबत घनिष्ठ आणि सजीव संपर्का’च्या ‘अर्थवादी’ संकल्पनेसोबत याचा गहन संबंध आहे. परंतु हे नक्की की जनतेच्या सर्व स्तरांमध्ये प्रचार आणि आंदोलन ही मुख्य गोष्ट आहे. याबाबतीत, पश्चिम युरोपातील सामाजिक-जनवादी कार्यकर्त्यांना सर्वजण भाग घेऊ शकतील अशा सार्वजनिक सभा आणि आंदोलनांमुळे, तसेच ते संसदेतील सर्व वर्गांच्या प्रतिनिधींशी ते बोलू शकतात यामुळे, बरीच सोय होते. आपल्याकडे (तत्कालिन रशियात: अनुवादक) ना संसद आहे ना सभेचे स्वातंत्र्य, तरीही आपण अशा कामगारांच्या बैठका बोलावण्यास समर्थ आहोत, जे सामाजिक-जनवाद्यांचे बोलणे ऐकू इच्छितात. आपण लोकसंख्येच्या त्या सर्व वर्गांच्या प्रतिनिधींच्या सभा बोलवण्यास समर्थ असले पाहिजे, जे एखाद्या लोकशाहीवाद्याचे ऐकू इच्छितात, कारण की तो व्यक्ती सामाजिक-जनवादी नाही जो व्यवहारामध्ये हे विसरतो की ‘कम्युनिस्ट प्रत्येक क्रांतिकारी आंदोलनाचे समर्थन करतात’. यामुळे आपले कर्तव्य आहे की आपल्या समाजवादी विश्वासांना थोडेही न लपवता आपण सर्व जनतेसमोर सामान्य लोकशाहीवादी कार्यभारांना व्याख्यायित केले पाहिजे आणि त्यांच्यावर जोर दिला पाहिजे. तो व्यक्ती सामाजिक-जनवादी असू शकत नाही जो व्यवहारात हे विसरतो की सर्व सामान्य लोकशाहीसंबंधित समस्यांना उचलून धरण्यात, तीक्ष्ण करण्यात आणि त्यांना सोडवण्यात त्याला सर्व लोकांपेक्षा पुढे रहायचे आहे.”
मूळ लेख प्रकाशित: मज़दूर बिगुल, ऑगस्ट 2022
(अनुवाद: राहुल)
कामगार बिगुल, ऑक्टोबर 2022