इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन पेटले!
इस्लामी धर्मवादी सत्तेविरोधात इराणी जनतेचा एल्गार !

✍अभिजित

इराणमध्ये हिजाबविरोधात पेटलेल्या प्रचंड जनांदोलनाने इराणी सरकारसमोर  आव्हान उभे केले आहे. इराणच्या 150 पेक्षा जास्त शहरांमध्ये पोलिसांच्या आणि सैन्याच्या लाठ्या, बंदुकांसमोर इराणमधील महिला आणि पुरुष हिजाबच्या सक्तीविरोधात उभे ठाकले आहेत, आंदोलनाने इराणचे “सर्वोच्च नेते”, धार्मिक राष्ट्रप्रमुख अयातुल्ला खोमेनी यांच्या सत्तेलाच आव्हान देण्याकडे वाटचाल केल्यानंतर सुसंघटित नेतृत्वाच्या आणि योग्य राजकीय दिशेच्या अभावी आंदोलनाच्या भविष्यासमोरही प्रश्न उभे आहेत.

आंदोलनाची पार्श्वभूमी: महिसा अमिनीच्या मृत्यूची घटना

इराणमधील कुर्दिस्तानच्या सकीज शहरातून आलेल्या महिसा अमिनी या 22 वर्षीय महिलेला 16 सप्टेंबर 2022 रोजी तिने हिजाब नीट परिधान केला नाही म्हणून “नैतिक पोलिसां”नी राजधानी तेहरानमध्ये अटक केली. पोलिस कोठडीत ठेवल्यानंतर महिसाला इस्पितळात भरती करावे लागले आणि तिथे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिला हृद्यविकाराचा झटका आला, असे खोटे वक्तव्य दिले आहे; परंतु तिच्या वडिलांनी दिलेले वक्तव्य की 22 वर्षीय महिसाला कोणताचा आजार नव्हता, आणि महिसाच्या शरीरावरील घाव याची साक्ष आहेत की इराणी पोलिसांनी तिच्यावर अत्याचार केले होते आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. महिसाच्या मृत्यूनंतर इराणमध्ये पुन्हा एकदा हिजाबसक्ती विरोधात आंदोलन उभे राहिले आहे.

इराणमध्ये आंदोलन पेटले

इराणमध्ये आजवर झालेल्या आंदोलनांपैकी सर्वात मोठे असे एक आंदोलन या घटनेनंतर उभे राहिले आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत 215 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. इराणी कुर्दिस्तानाच्या जवळपास सर्व भागांमध्ये आणि इराणच्या अनेक भागांमध्ये आंदोलन पसरले आहे. बंदर-अब्बास, तेहरान, नजफबाद, शहर-ए-कोर्द, इसफहान, सनदज, बाबोल, तबरीज, अरबगील, कराज, रश्त, महाबाज, सागेझ, बुशहर, जहेदान, तारीझ, इ. अनेक शहरांमध्ये आंदोलन पसरले आहे. आंदोलनाचा मुख्य जोर कुर्दस्तान आणि नजिकच्या भागांमध्ये असला, तरी मध्य, दक्षिण, दक्षिण-पूर्व आणि पूर्व इराणच्या अनेक भागांमध्ये, आणि काही अंदाजांनुसार एकूण 80 शहरांपर्यंत आंदोलन पोहोचले आहे.

गोळ्या, अश्रूधूर, लाठीमार, अटकांना न जुमानता डोक्यावरील हिजाब भिरकावून देणाऱ्या, सार्वजनिकरित्या आपले मुंडन करवून घेणाऱ्या, पोलिसांसमोर हिजाब न घालता जोरजोरात घोषणा देणाऱ्या, अयातुल्लाह खोमेनीला देशावरचा डाग म्हणत त्याच्या राजीनाम्याच्या आणि मृत्यूच्या घोषणा देणाऱ्या महिलांचे व्हिडिओ जगभरात सोशल मीडियावर पसरले आहेत.

आंदोलन फक्त मोठमोठ्या चौकांपर्यंत मर्यादित न राहता छोट्या वसाहतींमध्ये सुद्धा पसरले आहे. अनेक ठिकाणी कामगार वर्गीय जनता आणि उच्चभ्रू लोकही सामील आहेत. रात्री घरांच्या छतांवरून खोमेनीविरोधी घोषणा देऊनही लोक आपला राग व्यक्त करत आहेत.

आंदोलकांनी अनेक भागांमध्ये पोलिस गाड्यांवर दगड फेकले आणि सार्वजनिक संपत्तीवरही हल्ले चढवले. आंदोलकांच्या हल्ल्यात 25 च्या जवळपास सुरक्षा अधिकारी मारले गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

रश्त भागातील लकन येथे जेल मध्ये सुध्दा आंदोलन झाले आणि झडपा झाल्या. इराणी सरकार याला कैद्यांमधील भांडण म्हणत आहे, परंतु यामागे राजकीय कारणे होती असे काही प्रसारमाध्यमांनी वार्तांकन केले आहे.

शाळा आणि डझनावारी महाविद्यालये व विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी अनेक शहरांमध्ये आंदोलन केले आहे. इराणमधील शिक्षकांच्या ‘कोओर्डिनेटींग कौन्सिल ऑफ टिचर्स सिंडिकेट्स’ या युनियनने सुद्धा “इराणी विद्यार्थ्यांच्या निर्घृण हत्येविरोधात आणि न्याय मागणाऱ्यांच्या अन्याय्य रक्तपाताविरोधात” दोन दिवसांच्या शोकाची घोषणा केली आहे.

या आंदोलनाच्या समर्थनात जगभरात जवळपास 150 शहरांमध्ये आणि 100 च्या आसपास विद्यापीठांमध्ये आंदोलने झाली आहेत.

आंदोलनाचे दमन

 इराणी सरकारने या आंदोलनाला पाश्चात्य शक्तींचे कारस्थान म्हटले आहे. अमेरिकाप्रणित साम्राज्यवादी शक्तींचा हस्तक्षेप इराणमध्ये नेहमीच राहिला आहे, परंतु या आंदोलनाचे जमिनी वास्तव आणि इराणी जनतेच्या तळागाळातून उभ्या राहिलेल्या प्रतिकाराचे वास्तव लपू शकलेले नाही. हिजाबसक्ती विरोधातील आंदोलनाला विरोध दर्शवत सरकार समर्थकांनी स्वत:चे आंदोलनही चालू केले आहे आणि हिजाबसक्ती विरोधकांना शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

आंदोलनाच्या तीव्रतेमुळे इराणमध्ये इंटरनेट बंद केले गेले आहे. इराणने व्हाट्सॲप आणि इंस्टाग्रामवर बंदी आणली आहे कारण या माध्यमांचा वापर करून आंदोलक प्रचार करत आहेत. इराणच्या सेनेने, ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने आंदोलकांना राजद्रोही म्हणत इतर लोकांना धडा शिकवण्यासाठी आंदोलनाला चिरडण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. अमिनीची कहाणी सर्वांसमोर आणणाऱ्या निलोफर हमेदी या पत्रकाराच्या पत्नीला सुद्धा 18 दिवसांपासून बेकायदेशीरपणे इराणी पोलिसांनी अटकेत ठेवले आहे.

आंदोलनाच्या दमनाच्या विरोधात वैद्यकीय आणि वकिली पेशातील व्यावसायिक सुद्धा समोर आले आहेत. वैद्यकीय पेशातील सदस्यांनी जाहीर वक्तव्य दिले आहे की आंदोलकांना ॲंब्युलन्स मधून बाहेर काढून मारले जात आहे. इराणी गृहमंत्रालयाने वक्तव्य केले की आंदोलकांना धडा शिकवणारी शिक्षा दिली जाईल, यावर वकिलांनी दमनाच्या विरोधात वक्तव्य केले आहे की कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिली गेली पाहिजे.

आंदोलनाची तीव्रता इतकी आहे की खोमेनींना टीव्हीवर येऊन म्हणावे लागले की इराणी गणतंत्र एक “शक्तिशाली वॄक्ष” आहे आणि “त्याला कोणीही उखडून टाकू शकत नाही.”

इराणमध्ये हिजाबसक्ती विरोधी आंदोलनाची पूर्वपिठीका

इराणमध्ये 1979 साली झालेल्या इस्लामिक क्रांती (जिला खरेतर इराणी भांडवलदार वर्गाची इस्लामिक प्रतिक्रिया म्हटले गेले पाहिजे) अगोदर पेहलवी घराण्याच्या ‘उदारवादी’ सत्तेने, जिला स्वत:ला आधुनिक सिद्ध करावयाचे होते, हिजाब घालण्यावरच बंदी घातली होती. उदारवाद्यांच्या या अनुदार (आणि उदारवादी असे अनुदार बनतच असतात!) वागण्यामुळेही इस्लामिक प्रतिक्रियेला खतपाणी मिळण्यात हातभार लागला. अनेक स्त्रिया ज्या पेहलवींच्या अमेरिकाधार्जिण्या, भ्रष्ट राजवटीविरोधात होत्या त्यांनी प्रतिक्रियेचे रूप म्हणून हिजाब घालणे चालू केले होते. परंतु 1979 साली ‘इस्लामिक क्रांती’नंतर हिजाब सक्तीचा झाल्यानंतर मात्र त्याविरोधात प्रगतीशील महिलांनी विरोध जाहीर केला. तात्पुरती हिजाबसक्ती हटली, परंतु विरोधकांचे दमन साध्य झाल्यानंतर 1981 साली पुन्हा हिजाबसक्ती लागु केली गेली. त्यानंतर वेळोवेळी हिजाबसक्ती विरोधात छोटी-मोठी आंदोलने होत राहिली.

इस्लामिक राजवटीमध्ये महिलांवर घटस्फोट, मुलांचा ताबा, रोजगाराचा अधिकार, पुरूष साथीदाराशिवाय बाहेर फिरण्याचा अधिकार अशा महिला अधिकाराच्या अनेक मुद्यांवर चालू असलेल्या आंदोलनांचाच एक भाग आहे हिजाबसक्ती विरोधातील आंदोलन.

नजिकच्या काळात, 2017 साली विदा मोवाहेद नावाच्या 31 वर्षांच्या एका महिलेने तेहरान मध्ये भरचौकात आपला हिजाब काढला आणि काठीच्या टोकावर घेऊन फिरवला. यानंतर अनेक महिलांनी तिची कृती अंगिकारली आणि ‘क्रांतीच्या मुली’ (गर्ल्स ऑफ रिव्हॉल्युशन) या सडकेवरील आंदोलनाला जन्म दिला. सरकारने या आंदोलनाचे दमन केले.

2019 मध्ये सहर खोदायारी या 29 वर्षीय महिलेने पुरुषांच्या फूटबॉल स्पर्धेत चोरून प्रवेश केला आणि यामुळे अटक झाल्यावर आत्मदहन केले. यानंतर झालेल्या आंदोलनामुळे आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे इराणने कायदा बदलला आणि महिलांना फूटबॉल मॅच बघायला परवानगी दिली. याचवर्षी नसरीन सोतुदेह या हिजाब काढणाऱ्या महिलांच्या केसेस लढणाऱ्या इराणी वकिल महिलेला, अयातोल्लह खोमेनीचा अपमान केल्याच्या आरोपाखाली आणि व्यवस्थाविरोधी कटाच्या आरोपाखाली 38 वर्षे तुरुंगवासाची आणि 148 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा दिली गेली.

अमीनिच्या हत्येनंतर सुरू झालेले हिजाबसक्ती विरोधी आंदोलन याच आंदोलनांच्या परंपरेचे पुढचे पाऊल आहे.

आंदोलनाची दिशा सत्ताविरोधी झाली आहे

हिजाबपासून सुरू झालेले आंदोलन लवकरच खोमेनीच्या सत्तेविरोधातील आंदोलनात बदलले. इतर अनेक क्षेत्रातील कामगारांनी हिजाबसक्ती विरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत वा स्वतंत्रपणे आपल्या मागण्यांची आंदोलने उभी करत सत्तेसमोर संकट उभे केले आहे. इराणच्या तेल प्रकल्पांमधील कामगारांनी संप करत हिजाबसक्ती विरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कंगनमधील अबादन तेल रिफायनरी आणि बुशहर येथील पेट्रोकेमिकल प्रकल्पातील कामगार संपावर गेले आहेत. कामगारांनी खोमेनीच्या विरोधात घोषणा दिल्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहेत. इराणच्या अर्थव्यवस्थेमध्ये तेल आणि पेट्रोकेमिकल उद्योगांचे मोठे महत्त्व आहे आणि या प्रकल्पांमधील कामगारांचे संप स्पष्टपणे दाखवतात की या आंदोलनामुळे इराणी सत्तेसमोर संकट नक्कीच उभे केले आहे. इराणी सरकारने या संपाला मजुरीच्या मुद्याचे आंदोलन म्हणत त्याचे राजकीय गांभीर्य कमी करून दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

आंदोलनामुळे इराणमधील अनेक वरिष्ठ राजकारण्यांनी हिजाबच्या मुद्यावर पुनर्विचाराचे सुतोवाच केले आहे. महंमद अली अबताही, अहमद मझानी, रसुल मोंतजाब निया यांनी इराणी लोकांच्या तक्रारींना जागा देण्यासाठी अजून चांगल्या कायदेशीर चौकटीची गरज अधोरेखित केली आहे. मझानींनी “नैतिक पोलिसां”च्या बरखास्तीची मागणी केली आहे. अली लारिजानी या वरिष्ठ नेत्याने हिजाबसक्ती बद्दल ‘पुनर्विचारा’ची मागणी केली आहे आणि आंदोलन फक्त अमेरिकन वा इस्त्रायली कट नसून त्याची खोलवर राजकीय पाळेमुळे आहेत हे मान्य केले आहे.

आंदोलनाच्या विरोधात वातावरण बनवण्यासाठी इराणी सरकारने तकलादू प्रयत्न चालवले आहेत. 50 प्रमुख इराणी महिलांचा हिजाबच्या समर्थनातील एक फोटो इराणी सरकारने जाहीररित्या लावला. परंतु या महिलांनी व त्यांच्या नातेवाईकांनी विरोध दाखवल्यानंतर हा फोटो काढून घेण्याची नामुष्की इराणी सरकारवर ओढवली आहे.

फार्स भागातील स्टील कामगारांनी आणि तेहरानमधील टायर कामगारांनी सुद्धा 17 ऑक्टोबर रोजी संपाला सुरूवात केली आहे. टायर कामगारांची प्रमुख मागणी वैद्यकीय सुविधांना घेऊन आहे. इतर क्षेत्रांमधील कामगारही संपात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इराणमध्ये सत्ताविरोधी भावनेचे कारण

इराणमध्ये हिजाबसक्ती विरोधातील आंदोलनाने राजकीय रूप घेऊन सत्तेला आव्हान देण्यापर्यंत जाण्यामागे इराणमधील गेल्या काही वर्षांमधील बिघडलेली आर्थिक स्थिती आणि विकसित होत आलेला राजकीय असंतोष एक प्रमुख कारण आहे.

2009 साली झालेल्या निवडणुकांमध्ये खोमेनीने आपल्या मर्जीतील महमुद अहमदेनिजाद या राष्ट्राध्यक्षाला निवडून आणण्यासाठी गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून इराणमध्ये आंदोलन छेडले गेले होते. याला “ग्रीन मुव्हमेंट” म्हटले गेले. या आंदोलनात मध्यमवर्गाने आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लक्षणीय सहभाग घेतला होता. या आंदोलनाचे सुद्धा इराणी सरकारने दमन केले. 2017 आणि 2019 मध्येही कामगार वर्गाने, आणि कमी उत्पन्न गटातील कामकऱ्यांनी संपावर जाऊन निषेध व्यक्त केला होता.

गेले दशकभर खराब होत गेलेली इराणी अर्थव्यवस्थेची स्थिती आज अत्यंत नाजूक बनली आहे. इराणमधील भांडवली विकासाच्या अंतर्गत संकटाची यात प्रमुख भुमिका आहे; परंतु अमेरिकाप्रणित साम्राज्यवादी गटाने इराणवर लादलेल्या आर्थिक निर्बंधांनी स्थिती अजून बिकट केली आहे. गेली काही वर्षे प्रचंड महागाई, बेरोजगारी यांनी सामान्य जनतेचे जीवन दुर्धर केले आहे. अनेक कामगार दोन-दोन कामे शोधताना दिसतात आणि तरीही घर चालवणे मुश्किल झाले आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय दमन या परिस्थितीत राजकीय असंतोषाच्या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. अनेक उद्योगधंदे कोव्हिडनंतर बंद झाले आहेत, आयात घटल्यामुळे गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. खाद्यतेल आणि ब्रेड सारख्या वस्तूंच्या किमतीवरून इस्फहान आणि खुझेस्तान सारख्या प्रांतांमध्ये मोठमोठी आंदोलने झाली आहेत. शिक्षक, सार्वजनिक क्षेत्रातील कामगार, बस ड्रायव्हर्स, बाजार-व्यापारी यांनी गेल्या वर्षभरात पेंशन, वाढत्या किमतींना घेऊन आंदोलने केली आहेत. घराची भाडी चुकवणे कामगार-कष्टकरी वर्गाला अशक्य होत चालले आहे. महागाईचा दर 30 ते 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अन्नावरचा खर्च 75 टक्क्यांपेक्षाही वाढल्याने जगणे कठीण होऊन बसले आहे. इराणी सरकारच्याच मते तीनपैकी एक व्यक्ती आत्यंतिक गरिबी मध्ये ढकलली गेली आहे. इराणी चलनाचे अवमूल्यन होऊन महागाईचे प्रमाण इतके वाढले की इराणला रियाल हे चलन रद्द करून 10,000 रियालच्या जागी 1 असे प्रमाण असलेले तुमान हे नवीन चलन बाजारात आणावे लागले. बेरोजगारीमुळे इराणी उच्च-मध्यम, मध्यम वर्गाचे नोकरीकरिता इतर देशांमध्ये जाणेही प्रचंड वाढले आहे. अर्थव्यवस्थेला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी इराणी सरकार आटापिटा करत आहे, परंतु अर्थव्यवस्थेची स्थिती अगोदरच सुधारण्यापलीकडे गेलेली आहे.

अतिरुढीवादी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी 2021 मध्ये सत्तेत आल्यानंतर महागाई कमी करण्याचे, रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते त्यात सपशेल अपयशी ठरले आहेत आणि अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिकच जर्जर होत चालली आहे.

इराणमध्ये कामगार वर्गीय चळवळीचा वारसा

इराणमध्ये 60 च्या दशकात अमेरिकाप्रणीत शाह मुहंमद रझा शाह पहलवीच्या सत्तेविरोधात आणि अमेरिकन साम्राज्यवादाच्या विरोधात मोठे जनांदोलन उभे राहिले. या आंदोलनाची एक धारा कम्युनिस्टांच्या नेतृत्वात लढत होती, तर दुसरी इस्लामिक कट्टरपंथी असलेल्या अय्यातुल्लाह खोमेनीच्या नेतृत्वात. खोमेनीच्या नेतृत्वातील धारेच्या विजयानंतर धर्मवादी इस्लामी गणतंत्राची स्थापना केली गेली आणि कम्युनिस्टांच्या दमनाचे, शिरकाणाचे मोठे सत्र चालवले गेले, परंतु इराणी जनतेमध्ये डाव्या चळवळीच्या परिणामी निर्माण झालेल्या प्रगतीशील विचारांचा पगडा पूर्णपणे ती संपवू शकली नाही. इराणमध्ये निर्माण झालेला प्रगतीशील, वास्तववादी सिनेमा याच परंपरेचा एक हिस्सा होता. आज इराणमध्ये उभे झालेले आंदोलन इराणी जनतेच्या प्रगतीशील आकांक्षांची अभिव्यक्ती आहे.

आंदोलनाच्या राजकारणाच्या मर्यादा

सप्टेंबरमध्ये चालू झालेले हे आंदोलन त्याच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आता काहीसे उतरणीला लागले आहे. कोणतेही राजकीय आंदोलन खऱ्या अर्थाने सत्तापरिवर्तनापर्यंत तेव्हाच पोहोचू शकते जेव्हा त्याचे नेतृत्व एका सुसंघटीत राजकीय शक्तिकडे असेल. इराणमधील कामगार वर्ग सुद्धा जगातील बहुसंख्य देशांप्रमाणे आज राजकीयरित्या असंघटित आहे आणि तेथील कम्युनिस्ट चळवळ भरकटलेली व अशक्त आहे. अशामध्ये मोठा जन-उभार समोर येऊनही हिजाबसक्ती विरोधातील हे आंदोलन जुजबी सवलती प्राप्त करण्यापलीकडे राजकीय परिवर्तन प्राप्त करेल याची शक्यता कमीच आहे.

कामगार बिगुल, ऑक्टोबर 2022