क्रांतिकारी कामगार शिक्षण माला : पुष्प पहिले
मजुरी संदर्भात

अभिनव

आपण कामगार हे जाणतो की मजुरीच्या सरासरी दरात चढ-उतार होत राहतात. परंतु हे चढउतार एका विशिष्ट मर्यादेच्या आत होतात. या लेखात आपण भांडवलशाही व्यवस्थेत मजुरीमध्ये येणाऱ्या चढउतारांची मूलभूत कारणे काय आहेत आणि मजुरीच्या मर्यादा कशा ठरतात हे समजून घेणार आहोत. परंतु आपण सुरुवात काही मूलभूत गोष्टींपासून करणार आहोत.

वेतनी-मजुरी ही भांडवलशाहीच्या अस्तित्वाची मूलभूत अट आहे. याच्या माध्यमातूनच भांडवल वरकड मूल्य निर्माण करते आणि त्याला हडप करते, जे भांडवलदाराच्या नफ्याचा स्त्रोत असते. भांडवलदार आपले भांडवल दोन भागांत गुंतवतो: पहिला, यंत्रे, कच्चा माल, पायाभूत सुविधा इ, ज्याला आपण स्थिर भांडवल म्हणतो; दुसरे, कामगारांना कामावर ठेवण्यासाठी, म्हणजेच कामगारांची श्रमशक्ती विकत घेण्यासाठी, ज्याला आपण परिवर्तनशील भांडवल म्हणतो.

यंत्रे, कच्चा माल इ. स्वतःहून माल तयार करत नाहीत. केवळ जिवंत श्रम, म्हणजे काम करणारे कामगारच, या मशीन्स आणि कच्चा माल इत्यादींच्या उत्पादक वापराची प्रक्रिया पार पाडतात, ज्याच्या परिणामी वस्तूंचे उत्पादन होते. वस्तूच्या मूल्यामध्ये मशीन, कच्चा माल इत्यादींवर केलेली गुंतवणूक, म्हणजेच मशीन, कच्चा माल इत्यादींचे मूल्य जसेच्या तसे हस्तांतरित होते. ते स्वतःहून कोणतेही नवीन मूल्य निर्माण करू शकत नाही. म्हणूनच यावर केलेल्या गुंतवणुकीला स्थिर भांडवल म्हणतात.

कामगार त्याच्या संपूर्ण कार्यदिवसाच्या एका भागामध्ये त्याच्या श्रम-शक्तीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या मूल्याच्या बरोबरीचे मूल्य तयार करतो, ज्याच्या आसपासच्या मूल्याच्या बरोबरीचे वेतन सामान्यतः त्याला भांडवलदार देतो. श्रमशक्तीच्या मागणी व पुरवठ्यानुसार आणि मजुरी वाढवण्यासाठी केलेल्या वर्गसंघर्षानुसार मजुरी श्रमशक्तीच्या मूल्याच्या वर किंवा खाली असू शकते. वरील घटकांवर अवलंबून मजुरीच्या दरांत चढ-उतार होत राहतात.

तथापि, कामगार त्याच्या कार्यदिवसाच्या म्हणजे दिवसातील कामाच्या तासांच्या दुसर्‍या भागात, भांडवलदार वर्गासाठी अतिरिक्त मूल्य तयार करतो, जे भांडवलदाराला कोणत्याही अतिरिक्त गुंतवणुकीशिवाय विनामूल्य प्राप्त होते. असे असले तरी, भांडवलदार वर्गाच्या आर्थिक दृष्टिकोनातून कामगाराची काहीही फसवणूक होत नाही! भांडवलशाहीचा नियम आहे की समतुल्य वस्तूंचा विनिमय केला जातो, म्हणजे सामान्य नियम म्हणून, केवळ समान मूल्याच्या वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. परंतु जर भांडवलदार कामगाराकडून जेवढे काही घेतो ते त्याला मजुरीच्या रूपात परत देतो, तर मग भांडवलदार वर्गाचा नफा कुठून येतो? याच गोष्टीला मार्क्सच्या आधीचे भांडवली राजकीय अर्थशास्त्रज्ञ समजू शकले नाहीत. मार्क्सने पहिल्यांदा ही गोष्ट समजली आणि सांगितले की भांडवलदार कामगाराकडून त्याचे श्रम नव्हे तर श्रमशक्ती (म्हणजेच एका निश्चित कालावधीत काम करण्याची त्याची क्षमता) विकत घेतो, जिचे भांडवली समाजात स्वतः एका मालामध्ये रूपांतर झाले आहे. हे प्रत्येकाला माहित आहे की, सामाजिकदृष्ट्या, एक उत्पादक एका दिवसात त्याच्या जीवनाच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंपेक्षा वरकड उत्पादन करू शकतो. तसे नसते तर समाजात वर्ग आणि वर्ग विभाजन निर्माणच झाले नसते. 18 व्या आणि 19 व्या शतकातील भांडवली राजकीय अर्थशास्त्रज्ञांनाही या सत्याची जाणीव होती की एखादा उत्पादक त्याच्या उपजीविकेसाठी आवश्यक वस्तूंपेक्षा वरकड उत्पादन करतो. म्हणून, जेव्हा भांडवलदार कामगाराकडून त्याची श्रमशक्ती विकत घेतो, तेव्हा तो त्याला त्याच्या श्रमशक्तीचे मूल्य देतो, जे श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या मूल्यावरून ठरवले जाते. अशाप्रकारे फक्त समतुल्य गोष्टींचीच देवाणघेवाण केली गेली आहे आणि कामगाराच्या शोषणाची व्याख्या कोणत्याही प्रकारची “फसवणूक” किंवा “चोरी” म्हणून केली जाऊ शकत नाही. परंतु एका कामगाराची श्रमशक्ती कामाच्या दिवसात खर्च होण्याच्या प्रक्रियेत स्वतःच्या मूल्यापेक्षा जास्त मूल्य निर्माण करते. दुसऱ्या शब्दांत, जेवढ्या श्रमाच्या खर्चात श्रमशक्ती तयार होते, ती स्वतःच्या खर्च होण्याच्या प्रक्रियेत त्यापेक्षा जास्त श्रम प्रदान करते.

म्हणून कामगार त्याच्या कामाच्या दिवसाच्या एका भागात स्वतःच्या श्रमशक्तीचे पुनरुत्पादन करण्यासाठी काम करतो, ज्याला आपण आवश्यक श्रम-काळ म्हणतो, तर दुसऱ्या भागात तो भांडवलदारासाठी अतिरिक्त-मूल्य तयार करतो, ज्याला आपण अतिरिक्त श्रम-काळ म्हणतो. आवश्यक श्रमकाळात काम केल्याच्या बदल्यात कामगाराला मजुरी मिळते, तर अतिरिक्त श्रमकाळात काम केल्याच्या बदल्यात त्याला काहीही मिळत नाही आणि त्याचे अतिरिक्त उत्पादन भांडवलदार हडप करतो, जे विकले गेल्यानंतर अतिरिक्त मूल्याचे रूप धारण करते आणि भांडवलदाराच्या नफ्याचा स्रोत बनते. हे आहे भांडवलदाराच्या नफ्याच्या स्त्रोताचे घृणास्पद क्षुद्र रहस्य! भांडवलीव्यवस्थेत मजुरी ही ‘एका दिवसात दिलेल्या श्रमाच्या मूल्याचे’ स्वरूप धारण करते आणि भांडवली शोषण लपवते कारण आवश्यक आणि अतिरिक्त श्रमकाळ वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी घडत नसून ते एकाच कार्यदिवसाचा सातत्यपूर्ण भाग असतात. त्यामुळे कामगाराला ‘एक दिवसाच्या श्रमाची किंमत’ दिल्याचे दिसून येते. भांडवलशाही व्यवस्थेत, मजुरीचे हे स्वरूप कामगाराचे शोषण लपवते आणि भांडवली शोषणावर पडदा टाकते. वास्तवात, कामगार आपली श्रमशक्ती विकतो आणि त्या बदल्यात आवश्यक श्रमाच्या वेळेत त्याच्या श्रमशक्तीइतक्या मूल्याच्या बरोबरीचे सुद्धा उत्पादन करतो आणि अतिरिक्त श्रमाच्या वेळेत भांडवलदारासाठी वरकड मूल्याचे सुद्धा उत्पादन करतो, जे भांडवलदाराच्या नफ्याचा स्रोत असते.

म्हणजेच, कामगाराच्या कार्यदिवसाचे दोन भाग असतात, ज्यापैकी एकामध्ये मजुरीच्या बरोबरीचे मूल्य तयार केले जाते, तर दुसऱ्यात नफा. कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग या नव्याने निर्माण झालेल्या मूल्यामधील आपला वाटा वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. कामगार वर्ग आपली मजुरी वाढवण्याचा प्रयत्न करतो तर भांडवलदार वर्ग विविध माध्यमांनी मजुरीच्या तुलनेत नफ्यातील आपला हिस्सा वाढवण्याचा प्रयत्न करतो. भांडवलदार वर्ग हे कार्यदिवसाला वाढवूनही(ज्याला भौतिक मर्यादा आहे) साध्य करतो ज्याला आपण निरपेक्ष अतिरिक्त मूल्य म्हणतो, आणि श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनाची किंमत कमी करूनही साध्य करतो, जेणेकरून एकूण श्रमकाळ तेवढाच राहतो, परंतु आवश्यक श्रम-काळाचा हिस्सा, म्हणजेच ज्यामध्ये कामगार ‘स्वतःसाठी’ काम करतो, तो तुलनेने कमी होतो आणि परिणामी अतिरिक्त श्रम-काळाचा हिस्सा वाढतो, याच्या परिणामी अतिरिक्त-मूल्याचा दरही वाढतो. या दुसऱ्या पद्धतीला आपण सापेक्ष वरकड मूल्य म्हणतो. भांडवलशाही जसजशी प्रगत होत जाते, तसतसे सापेक्ष वरकड मूल्याद्वारे वरकड मूल्य वाढवण्याची पद्धत अधिक प्रमुख होत जाते. अशा प्रकारे अतिरिक्त मूल्य तेव्हा वाढवता येते जेव्हा कामगार वर्गाच्या श्रमशक्तीच्या पुनरुत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणार्‍या उद्योगांमध्ये, म्हणजे मजुरी-उत्पादन उत्पादक उद्योगांमध्ये, उत्पादकता वाढते, खर्च कमी होतो आणि परिणामी, सरासरी किंमत कमी होते. जेव्हा मजुरी-उत्पादनांच्या किंमती घसरतात, तेव्हा कामगाराच्या श्रमशक्तीचे मूल्य देखील कमी होते आणि भांडवलदार वर्ग त्याची मजुरी कमी करू शकतो (जरी ही कपात पैशाच्या बाबतीत नेहमीच दिसून येत नाही). म्हणूनच भांडवलदार वर्ग नेहमी श्रमशक्तीचे मूल्य कमी करू इच्छितो, मजुरी-उत्पादनांच्या किमती नियंत्रणात ठेवू इच्छितो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अंतर्गत विरोधाभास आणि अराजकतेमुळे ती नेहमीच असे करू शकत नाही, ही बाब वेगळी.

सर्वसाधारणपणे ऐतिहासिक प्रवृत्ती म्हणून भांडवलशाही प्रत्येक वस्तूचेच मूल्य कमी करते कारण त्यामुळे नफ्यासाठी उत्पादकतेचा विकास होत जातो. भांडवलदार वर्गाची अंतर्गत स्पर्धा आणि भांडवलदार वर्ग आणि कामगार वर्ग यांच्यातील स्पर्धा या गोष्टीला खात्रीशीर करते. काही बालिश विचाराच्या लोकांना वाटते की भांडवलदार वर्ग किमती वाढवून नफा वाढवतो! सत्य हे आहे की ज्या प्रक्रियेद्वारे भांडवलदार वर्ग नफा वाढवण्याचा प्रयत्न करतो, तीच प्रक्रिया श्रमाची उत्पादकता विकसित करते, आणि ऐतिहासिकदृष्ट्या सर्व वस्तूंचे प्रति नग मूल्य कमी करते आणि दीर्घकाळात किंमती या सामाजिक मूल्याभोवती फिरतात. परंतु महागाईचा दर हा केवळ सर्व वस्तूंच्या घटत्या मूल्यावरून ठरत नाही, तर तो सर्व वस्तू आणि सेवांचे मूल्य आणि कामगार वर्ग व सामान्य कष्टकरी जनतेच्या सरासरी उत्पन्नाच्या पातळीतील परस्परसंबंधांवरून निश्चित होतो. या दोघांमधील संबंधाच्या आधारेच कामगार व सामान्य कष्टकरी जनतेचे खरे उत्पन्न आणि महागाईचा खरा दर कळतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अराजक गतीमुळे, भांडवलशाहीमध्ये असे काळ येतात जेव्हा वास्तविक महागाई मोठ्या प्रमाणात वाढते. असा काळ आज आपण आपल्या समोर पाहत आहोत.

भांडवलशाही व्यवस्थेतील महागाईची सर्वसाधारण आणि विशिष्ट, दूरगामी आणि तात्कालिक कारणांविषयी आम्ही मजदूर बिगुल, जून 2022 च्या संपादकीयात तुलनात्मकरित्या विस्ताराने चर्चा केली आहे आणि पुढील अंकात यावर अधिक विस्ताराने लिहू. परंतु आत्ता हे समजून घेणे पुरेसे आहे की क्रांतिकारी कामगार वर्ग त्याच्या विज्ञानाच्या म्हणजे मार्क्सवादाच्या विश्लेषणाच्या साधनांनी महागाईची परिघटना समजतो, आणि हे जाणतो की महागाईचे विश्लेषण करताना मूलभूत कारण म्हणून उत्पादन क्षेत्र महत्वाचे आहे, अभिसरण अर्थात वस्तूंचे संचरण (वस्तूंच्या खरेदी-विक्रीची प्रक्रिया) नाही. अभिसरणातील बदल उत्पादनाच्या क्षेत्रातील बदलांद्वारे निर्धारित केले जातात. ते उत्पादनाच्या क्षेत्रावर परिणाम करतात परंतु अंतिम विश्लेषणात उत्पादन क्षेत्रच निर्णायक भूमिका बजावते.

त्यामुळे महागाईचे कारण काही मक्तेदारी भांडवलदारांकडून मक्तेदारी किमतींद्वारे वसूल केला जाणारा मक्तेदारी कर नाही कारण तो संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मूल्याच्या एकूण त्पादनाला प्रभावित करत नाही आणि जेवढे मूल्य उत्पादित होते तेवढेच मूल्य विनिमयाच्या प्रक्रियेच्या म्हणजेच खरेदी-विक्रीच्या माध्यमातून संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवर वास्तवात येते. तात्कालिकरित्याही महागाईला केवळ मक्तेदार भांडवलदार वर्गच जबाबदार नाही, तर नफेखोर भांडवलदार, श्रीमंत शेतकरी-कुलक, साठेबाजी करणारे व्यापारी-आडते-दलाल, छोटे-मध्यम भांडवलदार आणि मोठे मक्तेदारी व गैर मक्तेदार भांडवलदारांसह संपूर्ण भांडवलदार वर्गच जबाबदार आहे. जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आणि/किंवा कोविड किंवा युद्धासारख्या बाह्य धक्क्यांमुळे सर्व वस्तू आणि सेवांच्या पुरवठा साखळ्या तुटतात आणि विस्कळीत होतात तेव्हा साठेबाजी, सट्टेबाजी आणि चढ्या दराने विक्री करून कामगार आणि कष्टकरी लोकांची लूट करण्याचे काम संपूर्ण भांडवलदार वर्ग एकत्रितपणे करतो. परंतु बाजारात चढ्या भावाने विक्री, मालाची साठेबाजी आणि त्यांच्या किमतीवर होणारी सट्टेबाजी यामागे असलेली जी मूलभूत कारणे आहेत ती आपण उत्पादनाच्या क्षेत्रात शोधली पाहिजेत. आजच्या युगात महागाईच्या अभूतपूर्व वाढीच्या बाबतीतही, भांडवलशाही व्यवस्थेच्या अराजक स्वरूपामुळे आणि भांडवलदार वर्गाच्या नफेखोर स्वभावामुळे उत्पादनाच्या क्षेत्रात आलेले धक्के, म्हणजे पुरवठा साखळी विस्कळीत होणे हेच मूळ कारण आहे. हे काही बदमाश मक्तेदार, दुकानदार, व्यापारी इत्यादींचे षडयंत्र नाही. अशा प्रत्येक प्रसंगी ते संकटाला संधीत रूपांतरित करतात ही त्यांची वर्गीय प्रवृत्ती आहे.

तसेच, एकूण नवीन उत्पादित मूल्यातील नफ्याचा वाटा वाढणे स्वतःहून कामगारांच्या सरासरी वेतनातील घट आणि महागाईला कारणीभूत ठरत नाही. तेजीच्या काळात संपूर्ण उत्पादनच वाढणे, नफ्याचे प्रमाण आणि दर झपाट्याने वाढणे आणि मजुरीचे प्रमाण आणि दर देखील वाढणे आणि तरीही नवीन उत्पादित मूल्यामध्ये मजुरीचा वाटा तुलनेने कमी होणे हे शक्य आहे. त्याचे उलटे देखील शक्य आहे. हे देखील शक्य आहे की उत्पादन थंडावले, कामगार चळवळ मजबूत झाली आणि कामगार वर्ग त्याच्या वर्गसंघर्षाद्वारे मजुरीचे प्रमाण, दर आणि नवीन उत्पादित मूल्यामधील त्यांचा हिस्सा वाढविण्यात यशस्वी झाले. त्याचे उलटे देखील शक्य आहे. हे देखील शक्य आहे की मंदीमुळे उत्पादन कमी होत असताना, भांडवलदार त्यांच्या नफ्याचे दर, प्रमाण आणि नवीन उत्पादित मूल्यामध्ये त्यांचा वाटा वाढवण्यात यशस्वी झाले. एवढे निश्चित आहे की उत्पादन स्थिर राहिल्यास किंवा कमी झाल्यास, नवीन उत्पादित मूल्यातील नफ्याच्या वाट्यामध्ये कोणत्याही वाढीचा अर्थ मजुरीचा दर, प्रमाण आणि नवीन उत्पादित मूल्यातील मजुरीचा वाटा, तिन्हींमध्ये घट हा असेल आणि बाजारभावात वाढ किंवा ते स्थिर असताना किंवा त्यांमध्ये तुलनेने कमी दराने घट झाल्यास त्याचा अर्थ असेल कामगार आणि कष्टकरी लोकांच्या सरासरी वास्तविक उत्पन्नात घट आणि त्यांच्यासाठी वास्तविक महागाईत वाढ.

आता वेतनातील चढउतारांच्या मूळ कारणांच्या प्रश्नाकडे जाऊया कारण वास्तविक महागाई आणि वास्तविक उत्पन्न हे केवळ वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाच्या आधारे मोजले जाऊ शकत नाही, तर ते सरासरी मजुरी दराच्या सोबत त्याच्या आकलनाच्या आधारेच मोजले जाऊ शकते. बाजारातील किमती दीर्घकाळापर्यंत उत्पादनाच्या किमतींच्या अवतीभोवतीच फिरतात आणि उत्पादनाच्या किंमती शेवटी वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात लागणाऱ्या सामाजिक श्रमाद्वारे निर्धारित होतात. (उत्पादन खर्चाची संकल्पना समजून घेण्यासाठी मजदूर बिगुल, जून 2022 चे संपादकीय वाचा)

वेतन नेहमीच श्रमशक्तीच्या बरोबर नसते. भांडवली राजकीय अर्थशास्त्रात ‘मजुरीचा पोलादी नियम’ निर्माण झाला होता ज्यामध्ये असे मानले गेले होते की वेतन नेहमीच अशा पातळीवर निश्चित केले जाते जेणेकरून कामगार केवळ त्याच्या श्रमशक्तीचे जेमतेम पुनरुत्पादन करू शकतो. पण मार्क्सने सांगितले की कामगार वर्ग त्याच्या शोषणाप्रती उदासीन किंवा निष्क्रीय राहत नाही तर त्याविरुद्ध संघर्ष करतो. त्यासोबतच भांडवली अर्थव्यवस्थेच्या टप्प्यांनुसार, म्हणजे तेजी, मंदी किंवा स्थिरतेनुसार, दुसऱ्या शब्दात नफ्याच्या सरासरी दराच्या गतीनुसार, गुंतवणुकीची दरं सुद्धा बदलतात, रोजगाराचा दर बदलतो आणि श्रमशक्तीची मागणी आणि पुरवठा यामध्ये फरक येतो. तरीही, मजुरीच्या दरात चढ-उतार येतो आणि तो श्रमशक्तीच्या मूल्यापेक्षा वर किंवा खाली जाऊ शकतो. हे ते दोन मुख्य घटक आहेत ज्यांच्या संमिश्र प्रभावामुळे मजुरीच्या सरासरी दरात चढ-उतार होतात. परंतु या घटकांमुळे सुद्धा मजुरी कितीही वर किंवा कितीही खाली जाऊ शकत नाही. दुसऱ्या शब्दांत, या घटकांमुळे मजुरीच्या सरासरी दरात येणारा चढ-उतार ठराविक मर्यादेतच होतो. त्या मर्यादा काय आहेत? चला समजून घेऊया.

भांडवलशाही ही ऐतिहासिक प्रवृत्ती म्हणून श्रमशक्तीसह सर्व वस्तूंचे सामाजिक मूल्य कमी करते हे आपण वर पाहिले आहे. आपण हे देखील पाहिले की वास्तविक महागाईचा दर मजुरी आणि वस्तूंचा बाजारभाव यांच्यातील संबंधांवरून निर्धारित होतो. आणि आपण हे देखील पाहिले आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या अराजक गतीमुळे आणि भांडवलदार वर्गाच्या नफेखोरीमुळे, आर्थिक संकटाच्या वेळी आणि कोणत्याही महामारी किंवा युद्धाच्या बाह्य धक्क्यांमुळे, महागाई खूप वेगाने वाढते आणि कामगार वर्गाचा वास्तविक मजुरीचा दरसुद्धा झपाट्याने कमी होतो. शेवटी, आपण हे देखील पाहिले आहे की भांडवल संचयाच्या विशिष्ट कालखंडानुसार (तेजी, मंदी, स्थिरता) तसेच कामगार वर्गाच्या वर्गसंघर्षाच्या परिणामी मजुरी श्रमशक्तीच्या मूल्याच्या वर किंवा खाली जाऊ शकते. परंतु ऐतिहासिक प्रवृत्ती म्हणून मजुरी श्रमशक्तीच्या मूल्याभोवतीच फिरत असते.

भांडवलदार वर्ग आपल्या नफ्याचा दर शक्य तितका वाढवण्यासाठी मजुरी कमीत कमी पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर कामगार वर्ग आपल्या संघटित आर्थिक संघर्षांद्वारे मजुरी वाढवण्यासाठी नेहमीच संघर्ष करतो. नव्याने उत्पादित झालेल्या मूल्यातील आपला हिस्सा वाढवण्यासाठी कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यातील हा संघर्ष आहे. तात्कालिकरित्या हा संघर्षच मजुरी आणि नफा यांच्यातील सापेक्ष संबंध ठरवतो. परंतु सर्वसाधारणपणे मजुरी ही श्रमशक्तीच्या मूल्यापेक्षा दीर्घ काळासाठी कधीही कमी राहू शकत नाही. जर कामगार वर्ग एक वर्ग म्हणून स्वतःच्या श्रमशक्तीचे पुनरुत्पादनच करू शकत नसेल, तर तो मूल्य आणि अतिरिक्त मूल्याच्या उत्पादनासाठी सतत काम करण्यायोग्यच राहणार नाही आणि भांडवलदार वर्गासाठी नफा निर्माण होणार नाही. या कारणास्तव भांडवलदार वर्गाच्या दीर्घकालीन सामूहिक वर्गहिताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भांडवली राज्यसत्तेने एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये आणि इतर अनेक देशांमध्ये कामाच्या दिवसाची लांबी आणि किमान वेतन निश्चित करण्यासाठी काम केले, कारण वैयक्तिक भांडवलदार स्वभावतःच भांडवलदार वर्गाच्या दीर्घकालीन सामूहिक हिताचा विचार करण्यास असमर्थ असतात. बाजारातील गळेकापू प्रतिस्पर्धा त्यांना तसे करू देत नाही. श्रमशक्तीच्या भौतिक पुनरुत्पादनाची ही अत्यावश्यक अट ती भौतिक मर्यादा आहे ज्याच्या खाली मजुरीचा सरासरी दर जास्त काळ राहू शकत नाही.

पण कामगार वर्गही आपल्या वर्गसंघर्षातून मजुरी अमर्यादपणे वाढवू शकत नाही. जर मजुरीचा सरासरी दर इथपर्यंत वाढला की ज्यामुळे भांडवलदार वर्गाच्या नफ्याचा सरासरी दर एवढा कमी झाला की भांडवल जमा करण्याची प्रक्रियाच ठप्प झाली, तर भांडवलदार वर्ग ‘गुंतवणूक संपा’वर जाईल, म्हणजेच त्याच्या गुंतवणुकीला कमी करेल. जेव्हा तो आपली गुंतवणूक कमी करतो, तेव्हा रोजगाराचा दर घसरतो, बेरोजगार कामगारांची राखीव फौज कार्यरत कामगारांच्या सक्रिय फौजेच्या तुलनेत वाढते, श्रमशक्तीचा पुरवठा त्याच्या मागणीच्या तुलनेत वाढतो आणि मजुरीचा सरासरी दर पुन्हा खाली जातो, जेणेकरून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ववत होईल. म्हणजेच भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आणि त्याचे सातत्य मजुरीचा सरासरी दर वाढण्याची वरची मर्यादा निर्धारित करतो.

त्यामुळे भांडवलशाही व्यवस्थेत मजुरीचा सरासरी दर या दोन मर्यादांच्या मध्ये फिरतो. या फिरण्याचे कारण म्हणजे भांडवलशाहीच्या संचयाच्या विशिष्ट टप्प्यात, म्हणजे तेजी, मंदी किंवा स्थिरतेच्या कारणाने श्रमशक्तीची मागणी आणि पुरवठ्याचे बदलते समीकरण आणि कामगार वर्ग आणि भांडवलदार वर्ग यांच्यात उत्पादित मूल्यातील आपला वाटा वाढवण्यासाठी चालू असलेला वर्गसंघर्ष हे होय. परंतु या दोन्ही कारणांमुळे मजुरीच्या सरासरी दरातील जे चढउतार होतात ते वर उल्लेखलेल्या दोन मर्यादांमध्ये होतात. एकुणात, भांडवल संचयाची ही एकंदर गतीच आहे जी मजुरीत येणाऱ्या चढ-उतारांच्या मर्यादा ठरवते आणि एका भांडवलशाही व्यवस्थेत असेच होऊ शकते. त्यामुळे मजुरीसाठीचा संघर्ष कामगार वर्गासाठी नक्कीच आवश्यक आहे, परंतु तो स्वत: कामगार वर्गाच्या संघर्षाची शेवटची सीमा नाही. कामगार वर्गाचे राजकीय उद्दिष्ट मजुरी वाढवणे किंवा सर्वांसाठी समान मजुरी करणे हे नसून मजुरीची व्यवस्थाच नष्ट करणे हे आहे. मजुरी वाढवण्याच्या सतत सुरु असलेल्या संघर्षालासुद्धा या राजकीय उद्दिष्टासाठीच्या संघर्षाचा एक भाग बनवणे आवश्यक आहे, अन्यथा तो एक आर्थिक संघर्षच बनून राहील जो आपल्याला आपल्या राजकीय ध्येयापासून दूर करेल, राजकीयदृष्ट्या विचार करण्याच्या आणि राज्यसत्तेचा प्रश्नाला हात घालण्याच्या क्षमतेपासून आपल्याला वंचित करेल. भांडवलदार वर्गाला हेच हवे असते. ज्या कामगार संघटना कामगार वर्गाच्या आर्थिक मागण्यांसाठीच्या लढ्याला अर्थवादी स्वरूप देऊन कामगार वर्गाचे अराजकीयीकरण करतात, त्या भांडवली कामगार संघटना आहेत, ज्या कामगार वर्गाच्या संपूर्ण चळवळीला भांडवली चौकटीत कैद करून ठेऊ इच्छितात. भारतातील सर्व निवडणुकबाज संसदीय डावे पक्ष जसे की भाकपा, माकपा, भाकपा माले लिबरेशन इत्यादी तसेच इतर भांडवली पक्षांच्या केंद्रीय ट्रेड युनियन्स जसे की सिटू, एटक, इंटक व ऐकटु हेच कामकरतात.

आपण कामगारांनी मजुरीची संपूर्ण व्यवस्था समजून घेतली पाहिजे. या मजुरी व्यवस्थेच्या मुळाशी उत्पादनाची साधने आणि उपभोगाच्या साधनांपासून प्रत्यक्ष उत्पादक वर्गाचे वंचित असणे आणि त्यावर भांडवलदार वर्गाची मक्तेदारी असणे हे आहे. या उत्पादनाच्या साधनांपासून वंचित असल्यामुळेच कामगार वर्गाला आपली श्रमशक्ती भांडवलदारांना विकावी लागते. हा उत्पादन संबंध असेपर्यंत मजुरीची व्यवस्था म्हणजेच मजुरी-संबंध आणि भांडवल-संबंध कायम राहतील. ही व्यवस्था संपवून सर्वहारा वर्गाचे शासन आणि समाजवादी व्यवस्था प्रस्थापित करणे हे कामगार वर्गाचे राजकीय ध्येय आहे, ज्यामध्ये सर्व कारखाने, खाणी आणि शेतजमीन भांडवलदार वर्गाकडून हिसकावून सार्वजनिक मालमत्तेत बदलले जातील आणि कामगार वर्ग आपल्या पक्षाच्या नेतृत्वात आपल्या राज्यसत्तेच्या माध्यमातून सर्व आवश्यक गोष्टींचे योग्य प्रमाणात उत्पादन आणि वितरण करेल. असा समाज मूठभर भांडवलदारांचा नफा केंद्रस्थानी ठेवून सामाजिक उत्पादन करणार नाही, तर समाजाच्या गरजेनुसार उत्पादन आणि वितरण करेल. तरच आपण कामगार मुक्त होऊ शकतो आणि संपूर्ण मानवतेला भांडवलशाहीरुपी या जर्जर कोंबडीपासून मुक्त करू शकतो जी जगाला युद्ध, दारिद्र्य, बेरोजगारी, पर्यावरणाचा ऱ्हास, उपासमार, निरक्षरता आणि कुसंस्कृतीसारख्या कुजलेल्या अंड्याशिवाय काहीही देऊ शकत नाही. या व्यवस्थेची जागा इतिहासाच्या कचरापेटीतच आहे आणि तिला या कचरापेटीच्या हवाली करण्याचे काम केवळ सर्वहारा वर्गाच्या नेतृत्वाखाली व्यापक कष्टकरी जनताच करू शकते.

(अनुवाद: जयवर्धन. मूळ लेख मजदूर बिगुल, जून 2022 मध्ये प्रकाशित)

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2022