एका गोभक्ताची भेट
हरिशंकर परसाई
मराठी अनुवाद : नारायण खराड़े
एका संध्याकाळी रेल्वे स्टेशनवर एका स्वामीजींचे दर्शन झाले. साधु महाशय उंच, गोरे आणि धष्टपुष्ट होते. चेहरा लाल. भगवे रेशमी कपडे. सोबत आकाराने लहान एक किशोर सन्यासी होता. त्याच्या हातात एक ट्रान्झिस्टर होता आणि तो गुरुजींना रफीची गाणी ऐकवीत होता.
मी विचारले, स्वामीजी कुठे चाललाय?
स्वामीजी म्हणाले, बच्चा, दिल्लीला चाललोय.
स्वामीजी मजेदार वाटले. मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो. त्यांनीसुद्धा बाकड्यावर आसन ठोकले आणि सेवकाला गाणे बंद करायला सांगितले. म्हणाले, बच्चा, धर्मयुद्ध पेटले आहे. गोरक्षा आंदोलन तीव्र झाले आहे. दिल्लीत संसदेसमोर सत्याग्रह करणार आहे.
मी विचारले, स्वामीजी हे आंदोलन कशासाठी चालले आहे?
स्वामीजी म्हणाले, तू फारच अडाणी दिसतोयस बच्चा. अरे, गाईचे रक्षण करायचे आहे. गाय आपली माता आहे. तिचा वध होतो आहे.
वध कोण करतो आहे, मी विचारले.
मी विचारले, त्यांना मारण्यासाठी गाई विकतं कोण? ते आपले स्वधर्मी गोभक्तच आहेत ना?
स्वामीजी म्हणाले, ते तर आहे. पण त्यांनी तरी काय करावं? एक तर गाय व्यर्थ खात राहते, दुसरे म्हणजे, विकल्यामुळे पैसे मिळतात.
मी म्हटले, म्हणजे पैशासाठी जो मातेचा वध करील, तो सच्चा गो पूजक झाला.
स्वामीजी माझ्याकडे पाहू लागले. म्हणाले, वादविवाद चांगला करतोस बच्चा. पण ही तर्काची नाही, भावनेची बाब आहे. यावेळी जे गो भक्त आंदोलन करताहेत, त्यांच्यापैकी क्वचितच कुणीतरी गाय पाळत असेल. पण आंदोलन करतायत. हा भावनेचा प्रश्न आहे.
स्वामीजींशी चर्चेचा मार्ग मोकळा झाला होता. त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या. त्यांमध्ये तात्विक चर्चा होती. तात्विक चर्चेच रस असणाऱ्यांसाठी तो वार्तालाप सारांश खाली देत आहे.
स्वामी आणि बच्चामधील बातचित.
स्वामीजी, तुम्ही तर गायीचेच दूध पित असाल?
नाही बच्चा, आम्ही म्हशीचे दूध प्राशन करतो. गाय कमी दूध देते आणि ते पातळही असते. म्हशीच्या दुधाला चांगली जाड साय येते आणि त्याची रबडी बनते.
म्हणजे सगळेच गोभक्त म्हशीचेच दुध पितात का?
हा बच्चा, जवळजवळ सगळेच.
तर मग म्हशीच्या रक्षणासाठी आंदोलन झाले पाहिजे. दूध म्हशीचे पितात आणि माता गायीला म्हणतात. जिचे दूध प्यायले जाते, तिलाच तर माता म्हटले जाते.
म्हणजे आम्ही म्हशीला माता… नाही बच्चा, तर्क ठीक आहे, पण भावना वेगळी आहे.
स्वामीजी प्रत्येक निवडणुकीआधी गोभक्तीला जोर का चढतो ? या हवामानात काही खास असते का?
बच्चा, जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा नेत्यांना गोमाता स्वप्नात येऊन दर्शन देते. म्हणजे, बेटा, निवडणूक येते आहे. आता माझ्या रक्षणासाठी आंदोलन कर. देशाची जनता अजून मूर्ख आहे. माझ्या रक्षणाचे आंदोलन चालवून मते मिळव. बच्चा, जसे काही पक्षांना बैल मते मिळवून देतात, तसेच काही पक्षांना गोमाता मते मिळवून देते. म्हणून हे नेते ताबडतोब आंदोलन पुकारतात व आम्हां साधूंना त्यात सामील करून घेतात. आम्हांलासुद्धा मजा येते राजकारणात. बच्चा, तू आम्हांलाच काहीबाही विचारत आहेस, तूसुद्धा काहीतर सांग. चाललायस कुठे?
स्वामीजी, मी मनुष्य रक्षा आंदोलनासाठी जातोय.
ते काय असतं बुवा?
स्वामीजी, मी जसा गायीबाबत अज्ञानी आहे, तसेच तुम्ही मनुष्याबाबत अज्ञानी आहात.
पण मनुष्याला कोण मारतं आहे?
या देशातील मनुष्याला दुष्काळ मारतो आहे, महागाई मारते आहे, मनुष्याला नफेखोर मारताहेत, काळा बाजारवाले मारताहेत, भ्रष्ट शासनतंत्र मारतं आहे, सरकारसुद्धा जिकडे तिकडे पोलिसांच्या गोळीने मनुष्याला मारतं आहे, स्वामीजी तुम्हीसुद्धा मनुष्य रक्षा आंदोलनात सामील व्हा ना.
नाही बच्चा, आम्ही धर्मात्मा आहोत. आम्ही हे नाही करू शकत. एक तर मनुष्य आमच्या नजरेत फारच तुच्छ आहे. मंदिर आणि मठांमध्ये असलेली सगळी संपत्ती सरकारने जप्त केली पाहिजे म्हणून सांगणारे मनुष्यच तर आहेत. बच्चा, मनुष्याला मरू दे. गोमातेची रक्षा करा. कोणताही जीव मनुष्यापेक्षा श्रेष्ठ आहे. गोरक्षेच्या जुलुसामध्ये जेव्हा तंटे होतात तेव्हा मनुष्यच मरतात, हे बघितलं नाहीस का तू. आणखी एक गोष्ट बच्चा. तुझ्या बोलण्यावरून असं दिसतंय की मनुष्यरक्षेसाठी नफेखोरी आणि काळाबाजारच्या विरोधात लढावं लागणार. हे आमच्यानं होणार नाही. हेच लोक तर मंदिर, मठ आणि गोरक्षा आंदोलनासाठी देणग्या देतात. आम्ही त्यांच्या विरोधात कसे काय लढू शकतो?
असो, मनुष्यरक्षा जाऊ द्या. गोरक्षेबद्दल माझ्या ज्ञानात आणखी थोडी भर पडू द्या. एक गोष्ट सांगा. समजा, तुमच्या पडवीत गहू वाळत टाकले आहेत. तेवढ्यात एक गोमाता येऊन गहू खाऊ लागली. तुम्ही काय कराल?
बच्चा, आम्ही तिला काठीचा फटका देऊन हाकलून लावू.
पण स्वामीजी, ती तर गोमाता आहे, पूज्य आहे. आपल्या मुलाचे गहू खायला आली आहे. तुम्ही हात जोडून स्वागत का नाही करत, की माते, मी कृतार्थ झालो, सगळे गहू फस्त करू टाक.
बच्चा, आम्हांला मूर्ख समजतोस का?
नाही, मी आपल्याला गोभक्त समजतो.
ते तर आम्ही आहोतच, पण इतके मूर्ख नाही की गायीला गहू खायला देऊ.
पण स्वामीजी ही कसली पूजा झाली ? म्हणजे गाय हाडांचा सापळा होऊन रस्त्यावर कागद आणि कपडे चघळत फिरते आहे आणि ठिकठिकाणी मार खाते आहे?
बच्चा, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आपल्याकडे ज्याची पूजा होते त्याची दुर्दशाच करून टाकली जाते. हीच तर खरी पूजा आहे. स्त्रीलासुद्धा आम्ही पूज्य मानतोच. तिची कशी वाट लावून टाकली आहे ते तर तुला माहीत आहेच.
स्वामीजी, इतर देशांमध्ये लोक गायीची पूजा करत नाहीत, मात्र तिची चांगली काळजी घेतात, तिला नीट खायला घालतात आणि ती उत्तम दूध देते.
बच्चा इतर देशांच्या गोष्टी सोडून दे. आपण त्यांच्यापेक्षा उच्च आहोत. म्हणून देवता फक्त आपल्याकडेच अवतार घेतात. इतर देशांमध्ये गाय फक्त दुधाच्या उपयोगासाठी असते, आपल्याकडे ती दंगा भडकवण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी असते. आपली गाय इतर गायींपेक्षा वेगळी आहे.
स्वामीजी, बाकी सगळे प्रश्न सोडून आपण याच कामला कां लागला आहात?
कारण यामुळे सर्वांचंच भलं होणार आहे, बच्चा. जर गोरक्षा कायदा आला तर देश आपोआप समृद्ध होईल. मग ढग वेळी पाऊस देतील. जमीन भरपूर अन्न देईल, आणि कारखाने न चालताच उत्पादन करतील. धर्माचा प्रताप तुला ठाऊक नाही बच्चा. आज जी देशाची दुर्दशा झालेली आहे, ती गोमातेच्या अनादरामुळे झालेली आहे.
स्वामीजी, पाश्चात्य देश गोमातेची पूजा करत नाहीत, उलट गोमांस खातात. तरी ते समृद्ध आहेत.
त्यांचा देव वेगळा आहे बच्चा. त्यांचा देव या गोष्टींना महत्त्व देत नाही.
आणि रशियासारखे देशसुद्धा गायीची पूजा करत नाहीत, तरी समद्ध आहेत.
त्यांचा तर देवच नाही बच्चा. त्यांना दोष लागत नाही.
म्हणजे, देव बाळगणं म्हणजे एक कटकटच आहे. प्रत्येक गोष्टीची शिक्षा देऊ लागतो.
तर्क बरोबर आहे बच्चा, पण भावना चुकीची आहे.
स्वामीजी, माझ्या माहितीप्रमाणे, लोकांच्या मनात आज गोरक्षा नाही, महागाई आहे आणि आर्थिक शोषण आहे. जनता महागाईच्या विरोधात आंदोलन करते आहे. जनता आर्थिक न्यायासाठी लढते आहे. आणि आपण मात्र इकडे गोरक्षा आंदोलन घेऊन बसला आहात. याला काय अर्थ आहे?
याला अर्थ आहे बच्चा. तुला आतली गोष्ट सांगतो. जनता जेव्हा आर्थिक न्यायाची मागणी करत असते तेव्हा तिला दुसऱ्या एखाद्या गोष्टी अडकवून टाकलं पाहिजे, नाहीतर ती फार धोकादायक बनते. जनता म्हणते, आमची मागणी आहे महागाई कमी करा, नफेखोरी बंद करा, पगार वाढवा, शोषण बंद करा, तेव्हा आम्ही तिला सांगतो, नाही, तुझी खरी मागणी आहे गोरक्षा! आर्थिक क्रांतीकडे जाणाऱ्या जनतेला आम्ही वाटेतच गायीच्या खुंट्याला बांधून टाकतो. हे आंदोलन जनतेला गुंगवून टाकण्यासाठी आहे.
कोणातर्फे आपण जनतेला असे गुंगवत आहात?
जनतेच्या मागणीचा ज्या लोकांवर परिणाम होणार आहे, त्यांच्यातर्फे. हाच धर्म आहे. एक उदाहरण देतो.
बच्चा, लुटणाऱ्यांच्या गोटात सगळ्या धर्माचे लोक सामील आहेत हे तर तुला माहीत आहेच. आणि लुटल्या जाणाऱ्या कामकऱ्यांमध्येसुद्धा सगळ्या धर्माचे लोक सामील आहेत. कल्पना कर, एक दिवस सगळ्या धर्माचे हजारो उपाशी लोक एक दिवस गोळा होऊन आपल्या धर्माच्या एखाद्या व्यापाऱ्याच्या गोदामामध्ये साठवलेले अन्न लुटण्यासाठी निघाले. व्यापारी आमच्याकडे आला. म्हणाला, स्वामीजी काहीतरी करा. हे लोक तर माझी सगळी पुंजीच लुटून नेतील. तुम्हीच वाचवू शकता. म्हणाल तशी सेवा करू. बस्स, आम्ही उठलो, हातात एक हाडूक घेतला आणि मंदिराच्या चबुतऱ्यावर उभे राहिलो. ते हजोर लोक जेव्हा गोदाम लुटण्याच्या घोषणा देत आले त्यावेळी हाडूक दाखवून जोरात आरोळी ठोकली, कुणीतरी देवाचे मंदिर भ्रष्ट केले आहे. हे हाडूक कुणी पाप्याने देवळात फेकले. परधर्मी आपले मंदिर अपवित्र करीत आहेत. आपला धर्म नष्ट करीत आहेत. लाज वाटली पाहिजे आपल्याला. या क्षणापासून मी इथे उपवास करणार आहे. देवळाच्या पुन्हा रंगरंगोटी होईल आणि होम हवन करून ते पुन्हा पवित्र केले जाईल तेव्हाच माझा उपवास संपेल. बस्स! झालं. ती जमाव जो व्यापऱ्याशी दोन हात करायला आला होता, तो धर्माच्या नावावर आपापसात लढायला लागला. मी त्यांची घोषणा बदलून टाकली. त्यांच्या लढून झाल्यावर मी म्हटले, धन्य आहे या देशाची धर्मशील जनता! धन्य आहेत धान्याचे व्यापारी अमुकजी. त्यांना मंदिराच्या शुद्धीसाठी सगळा खर्च द्यायला सांगितले. बच्चा, लोक ज्या व्यापाऱ्याचे गोदाम लुटण्यासाठी आले होते, ते त्याचाच जयजयकार करायला लागले. बच्चा, असा असतो धर्माचा प्रताप. या जनतेला जर गोरक्षा आंदोलनात नाही लोटले, तर ते रोजगार मिळवण्यासाठी आंदोलन करतील, पगारवाढीसाठी आंदोलन करतील, नफेखोरीच्या विरोधात आंदोलन करतील. जनतेला गुंतवून ठवणे आमचे काम आहे.
स्वामीजी, तुम्ही खरोखर माझ्या ज्ञानात फारच भर टाकलीय. आणखी एक गोष्ट सांगा. कित्येक राज्यात गोरक्षेसाठी कायदा आहे, इतर राज्यांत लागू होईल. तेव्हा हे आंदोलनसुद्धा संपून जाईल. त्यानंतर आपण कोणत्या गोष्टीसाठी आंदोलन करणार?
अरे बच्चा, आंदोलनासाठी विषय बरेच आहेत. सिंह दुर्गेचे वाहन आहे. त्याला सर्कसवाले पिंजऱ्यात डांबतात. त्याचे खेळ करतात. हा अधर्म आहे. सर्कसवाल्यांच्या विरोधात आंदोलन करून देशातच्या सगळ्या सर्कस बंद करून टाकू. मग देवाचा आणखी एक अवतार आहे, मत्स्यावतार. मासा देवाचे प्रतीक आहे. माच्छिमारांच्या विरोधात आंदोलन पुकारू. सरकारचा मासेपालन विभागच बंद करून टाकू. बच्चा, जोपर्यंत लूट संपत नाही, तोपर्यंत काही लोकांच्या अडचणी संपणार नाहीत. एक मुद्दा आणखी आहेच बच्चा. आम्ही जनतेत पसरवू, की आपल्या धर्माच्या लोकांच्या सगळ्या अडचणींचे कारण दुसऱ्या धर्माचे लोक आहेत. या ना त्या प्रकारे आम्ही जनतेला धर्माच्या नावाखाली गुंतवून ठेवूच बच्चा.
एवढ्यात गाडी आली. स्वामीजी गाडीत बसून निघून गेले. बच्चा तिथेच राहिला.