युद्धाची विभीषिका आणि शरणार्थ्यांचे भीषण संकट
भांडवलशाहीपाशी मानवतेला देण्यासाठी आता फक्त शोकांतिकाच आहेत
आनंद सिंह
भांडवलशाहीने आपल्या जन्मापासूनच लोकांच्या उपजीविकेची साधने त्यांच्याकडून हिरावून त्यांना उघड्यावर पाडून एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, एका देशातून दुसऱ्या देशात, इतकेच नाही तर एका खंडातून दुसऱ्या खंडात पळ काढण्यास भाग पाडले आहे. जोपर्यंत भांडवलशाही सरंजामशाहीच्या विरोधात लढा देत होती, तोपर्यंत तिच्यापाशी मानवतेला देण्यासाठी काही सकारात्मक मूल्ये आणि चांगल्या जीवनाची स्वप्ने होती, तसेच तिच्या येण्यामुळे मानवता निश्चितच एका अधिक उन्नत अवस्थेला पोचली, मात्र आज ही व्यवस्था इतकी मानवद्रोही झाली आहे की तिच्यापाशी मानवतेला देण्यासाठी विनाशकारी युद्धे आणि त्यातून उद्भवणाऱ्या शोकांतिकांखेरीज दुसरे काही शिल्लक राहिलेले नाही. शरणार्थ्यांतचे संकट हे भांडवलशाहीने जन्माला घातलेली अशीच एक शोकांतिका आहे, व जसजसे भांडवलशाहीचे वय वाढत चालले आहे, तसतशी ही शोकांतिका एक विक्राळ रूप धारण करू लागली आहे.
दोन महिन्यांपूर्वी अलान कुर्दी नावाच्या तीन वर्षीय मुलाच्या टर्कीमध्ये भूमध्यसागराच्या तटावर पालथ्या पडलेल्या शवाची ह्दयद्रावक छायाचित्रे जगभरातील मीडिया आणि सोशल मीडियाच्या बातम्यांमध्ये झळकली. तान्ह्या अलान कुर्दीचा जन्म सिरियात राहणाऱ्या एका कुर्दी कुटुंबातला. हे कुटुंब सिरियात सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे नौकेतून कॅनडात शरण घेण्यासाठी जात होते, व नौकेच्या क्षमतेहून जास्त लोक भरल्यामुळे ही नौका बुडाली. या घटनेनंतर युरोप आणि अमेरिकेतील तमाम भांडवली देशांच्या शासकांनी शरणार्थ्यांंच्या प्रश्नावर मगरीचे अश्रू ढाळले. मानवतावादाचा मुखवटा लावलेल्या या भांडवली शासकांच्या आणि त्यांच्या तुकड्यांवर जगणाऱ्या मुख्य प्रवाहातील मीडियाने मगरीच्या अश्रूंच्या पुरामध्ये हे नंगे सत्य दाबून टाकण्यात आले की या भयंकर शोकांतिकेला जबाबदार तेच आहेत.
शरणार्थ्यांतचा प्रश्न हाताळणारी संयुक्त राष्ट्रची संस्था यूएनएचसीआर (युनायटेड नेशन्स हाई कमिश्नर फॉर रिफ्यूजीज) नुसार जगभरातील शरणार्थ्यांची संख्या आज ६ कोटींच्या पलीकडे गेलेला आहे आणि हा आकडा आजवरच्या इतिहासात सर्वांत मोठा आहे. या शरणार्थ्यांंमध्ये बहुतेक मुले आहेत, हेही उल्लेखनीय आहे. २०१४ साली जवळपास १.४ कोटी लोकांना गृहयुद्धांमुळे व अन्य प्रकारच्या हिंसेमुळे विस्थापित व्हावे लागले आहे. यांपैकी १.१ कोटी आपापल्या देशाच्या सीमे अंतर्गत विस्थापित झाले आहेत, तर ३० लाख लोकांना आपला देश सोडावा लागला आहे. या वर्षी तर ही संख्या आणखीनच वाढली आहे. कोणत्या भागांतून आज हे विस्थापन सगळ्यात जास्त होते आहे हे समजून घेणे एवढ्या मोठ्या प्रमाणातील विस्थापन समजून घेण्यासाठी गरजेचे आहे. आकड्यांवरून असे लक्षात येते आहे की अलीकडच्या वर्षांमध्ये ज्या देशांमध्ये साम्राज्यवादी हस्तक्षेप वाढलेला आहे त्याच देशांमध्ये सर्वाधिक लोकांना विस्थापनाचा दंश सहन करावा लागला आहे, जसे की सीरिया, अफगाणीस्तान, इराक आणि लिबिया. गेल्या दिड दशकामध्ये अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली चाललेल्या साम्राज्यवादी हस्तक्षेपातून उत्पन्न झालेली हिंसा आणि अराजकतेने या प्रदेशांत राहणाऱ्या लोकांसमोर जणू अस्तित्त्वाचे संकट उभे राहिले आहे. या हिंसेमध्ये मोठ्या प्रमाणात जीविताची आणि संपत्तीची हानी झाली आहे, आणि जे लोक बचावले आहेत त्यांनासुद्धा सुरक्षित जीवनासाठी आपले वसतीस्थान सोडून देणे भाग पडले आहे. अमेरिकेने २००१ साली अफगाणीस्तानमध्ये आणि २००३ साली इराकवर हल्ला केला. त्यामुळे या दोन्ही देशांतील लाखो लोक विस्थापित झाले आहेत, व आता त्यांना शेजारच्या देशांमध्ये नारकीय जीवन जगावे लागत आहे. २०११ साली इजिप्तमध्ये मुबारक यांच्या सत्तेच्या पतनानंतर सीरियामध्ये उत्फूध्येर्तपणे लोकविद्रोहाला सुरुवात झाली. याचा फायदा घेऊन अमेरिकेने साउदी अरबच्या साहाय्याने इस्लामिक स्टेन नावाच्या सुन्नी इस्लामिक कट्टरपंथी संघटनेला आर्थिक मदत आणि सैन्य प्रशिक्षण देऊन सीरियातील गृहयुद्ध आणखीनच विनाशकारी बनवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यामुळे २०११ नंतर सीरियातील १ कोटीहून जास्त लोक विस्थापित झाले आहेत. त्यांपैकी ४० लाख लोकांनी देशत्याग केला आहे. तसे पाहता भांडवलशाहीच्या इतिहासाची परिचय असणाऱ्यांसाठी ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या शतकातसुद्धा भांडवलशाही-साम्राज्यवादाने दोन महायुद्धे आणि त्यानंतर इजराइल-पॅलेस्टाईन विवाद, कोरियाचे युद्ध, विएतनाम युद्ध आणि सोमालिया, रवांडा, कांगोसारख्या आफ्रिकेतील देशांतील क्षेत्रीय युद्धांना उत्तेजन देऊन लाखो लोकांच्या माथी विस्थापन मारले आहे. भांडवलशाही देशांतील शासक वर्गामध्ये उजव्या आणि डाव्या गटांमध्ये शरणार्थ्यांच्या प्रश्नावरची एकूण चर्चा, त्यांना देशात येऊ द्यावे अथवा नाही, याच एका मुद्द्यावर केंद्रित झालेली असते. सापेक्षतः मानवतावादी चेहऱ्याच्या शासकवर्गाच्या डाव्या गटाशी जोडलेले लोक साधारणपणे शरणार्थ्यांबाबत उदार आचरणाचे समर्थन करतात आणि शरणार्थ्यांमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला लाभच मिळत असल्याचा युक्तीवाद करतात. परंतु शासकवर्गाचे असे डावे गटसुद्धा शरणार्थ्यांच्या समस्येचे मूळ कारण काय आहे, हा प्रश्न कधी उपस्थित करीत नाहीत. त्यांनी असे प्रश्न विचारायला सुरुवात केल्यास भांडवली व्यवस्थाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी केली जाईल व तिचे मानवद्रोही चारित्र्य उघडे पडेल, हे त्यांना माहीत असल्यामुळेच ते तसे करीत नाहीत. साम्राज्यवादाच्या काळात कच्चा माल, स्वस्त श्रम आणि बाजारांवर कब्जा यासाठी वेगवेगळ्या साम्राज्यवादी देशांमध्ये शर्यत लागणे अटळपणे युद्धाच्या संकटाला जन्म देते, हे वास्तव आहे. एवढेच नाही, संकटग्रस्त भांडवलशाहीसुद्धा संकटापासून सुटका करून घेण्यासाठी युद्धाचा आधार घेत असते कारण युद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादक शक्तींचा नाश भांडवलाच्या अतिउत्पादनाच्या संकटावर संजीवनीचे कार्य करतो. याशिवाय, जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये छोट्यामोठ्या प्रमाणात युद्धे होणे किंवा तणावाची स्थिती राहणे शस्त्रांचा विश्वव्यापी व्यापार कायम राण्यासाठी गरजेचे असते. हीच भौतिक परिस्थिती शरणार्थ्यांचे संकट निर्माण करते.
जगाच्या विभिन्न भागांमध्ये राहणाऱ्या कामगार वर्गाची शरणार्थ्यांप्रति भूमिका मित्रत्त्वाची असायला हवी कारण हे शरणार्थीसुद्धा कामगार वर्गाचाच एक भाग आहेत. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा अत्याचारांच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. कामगार वर्गाने आंतरराष्ट्रीय भावनेचे दर्शन घडवीत प्रत्येक देशात शरणार्थ्यांजच्या हक्कांसाठी लढले पाहिजे तसेच शरणार्थ्यांमध्ये कामगार वर्गाचे ऐतिहासिक उत्तरदायित्वाचे, म्हणजेच भांडवलशाहीचे उच्चाटन आणि समाजवादाची स्थापनेचे विचार घेऊन गेले पाहिजे, आणि शरणार्थ्यांच्या दुर्दशेचा शेवटसुद्धा सर्वहारा क्रांतीतच दडलेला आहे, हेसुद्धा त्यांना समजावले पाहिजे.
कामगार बिगुल, नॉव्हेंबर २०१५