कामगार वर्गाचा पक्ष कसा असावा? (पाचवे पुष्प)
✍ सनी
या लेखमालेच्या पहिल्या चार पुष्पांमध्ये आपण कामगार पक्षाच्या क्रांतिकारी प्रचाराच्या स्वरूपावर बोललो. लेनिनने रशियातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसमोर “सुरुवात कुठून करावी” या लेखामध्ये खालील क्रमाने मांडणीची योजना बनवली होती: क्रांतिकारी प्रचारावर, संघटनात्मक कार्यभारांवर, अखिल रशियन क्रांतिकारी पक्ष बनवण्याच्या योजनेवर. या लेखाचे स्वरूप सुद्धा आम्ही लेनिनच्या लेखनाच्या वरील योजनेच्या धर्तीवरच ठेवले आहे. क्रांतिकारी प्रचाराच्या समस्यांवर चर्चेनंतर आता आपण कामगार पक्षाच्या संघटनात्मक स्वरूपावर बोलूयात. आपण अगोदर इतिहासाच्या माध्यमातून हे समजण्याचा प्रयत्न करू की कशाप्रकारे पक्षाच्या संकल्पनेचा जन्म झाला आणि कशाप्रकारे लेनिनने पक्षाच्या धारणेला विकसित केले.
आपण इतिहासात मागे वळून पाहिले तर मार्क्स-एंगल्सच्या नेतृत्वात बनलेल्या कामगार वर्गाच्या पक्षाच्या संरचनेचे पहिले प्रारुप कम्युनिस्ट लीगच्या स्वरूपात समोर आले. युरोपातील क्रांतिकारी उभाराच्या काळात अग्रदल वर्गाला आणि त्याच्या संघटनेला बहुमोल अनुभव मिळाला. ‘लिग ऑफ जस्ट’ मधून ‘कम्युनिस्ट लीग’ बनणे हे ते पहिले पाऊल होते जेव्हा कामगार वर्गाच्या अग्रदलाला कम्युनिस्ट संघटनेचे रूप मिळाले. नंतर मार्क्स आणि एंगल्सने पहिल्या इंटरनॅशनलची स्थापना केली जी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार वर्गाची संघटना होती. 1860 च्या दशकात कामगार आंदोलन पुन्हा तीव्र झाले तेव्हा ही संघटना एका राजकीय नेतृत्वाच्या, ताळमेळ केंद्राच्या आणि सल्लागाराच्या भूमिकेत काम करत होती. मार्क्सच्या नंतर एंगल्सच्या नेतृत्वातच आठव्या आणि नवव्या दशकात युरोपात कम्युनिस्ट पक्ष उभे होऊ लागले. कम्युनिस्ट पक्षाची संरचना हा काही कोणी अगोदरच बनवून ठेवलेला सिद्धांत नव्हता, तर भांडवली राज्यसत्तेच्या बदलत्या स्वरूपासोबत तो विकसित होत गेला.
यावर साथी अभिनव यांनी लिहिले आहे की: “मार्क्स आणि एंगल्सच्या काळात भांडवली राज्यसत्तेची संपूर्ण संरचना त्याप्रकारे व्यापक, व्यवस्थित आणि सुदृढ झालेली नव्हती ज्याप्रकारे ती लेनिनच्या काळात झाली होती. एंगल्सच्या जीवनकाळाच्या उत्तरार्धात असे कम्युनिस्ट पक्ष बनू लागले जे बोल्शेविक पक्षासारखे तर नव्हते, पण जन-पक्षासारखे सुद्धा नव्हते. लेनिनने पक्षाच्या सिद्धांताला पहिल्यांदा व्यवस्थित केले, किंवा असे म्हटले पाहिजे की मार्क्सवादातील पक्षाच्या सिद्धांताचे निर्माते लेनिनच होते.”
मार्क्स-एंगल्सच्या अगोदर कामगारांच्या पक्षाचे चरित्र जन-पक्षाचे, अभ्यास मंडळांचे, किंवा सत्तापालट उलथवण्याकरिता बनलेल्या गुप्त संघटनांसारखेच होते. मार्क्स आणि एंगल्सने कम्युनिस्ट लीगच्या माध्यमातून संघटनेची एक स्पष्ट संरचना देण्याचा प्रयत्न केला. या अगोदर कामगारांनी ज्या संघटना बनवल्या होत्या, त्या चार्टीस्ट पक्ष, लीग ऑफ जस्ट, आणि असोसिएशन म्हणजे जन-पक्ष किंवा जनसंघटनेसारख्या संघटनात्मक संरचनेत काम करत होते. त्यांचे चरित्र सत्ता उलथवण्याकरिता बनलेल्या दस्त्यांचे, किंवा अभ्यासगटांच्या जाळ्यासारखे, किंवा जनसंघटनेसारखे होते. या संरचना वर्गसंघर्षाच्या आगीत तावून-सुलाखून मजबूत होत गेल्या. याच प्रक्रियेत कम्युनिस्ट संघटनात्मक तत्त्वे सुद्धा निर्माण झाली. त्यांना सूत्रबद्ध करण्याचे काम नंतर सर्वात व्यवस्थित आणि सुसंगत रूपाने लेनिनने केले.
भांडवलशाही अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर भांडवली सत्तेचे सैनिकीकरण आणि अतिकेंद्रीकरण होते. कामगार वर्गाच्या पक्षाची बोल्शेविक संकल्पना सुद्धा एक गरज बनते. लेनिनवादी पक्षाची संकल्पना जॅकोबिन गटापेक्षा किंवा कम्युनिस्ट लीगपेक्षा वेगळी होती. असेच असू शकले असते. वर्गसंघर्ष तीव्र होण्यासोबत आणि सोबतच कामगार वर्गाच्या अग्रदलाच्या केंद्रीकृत संघटनात्मक संरचनेच्या गरजेला धरून निर्माण झालेले ते संघटनात्मक स्वरूप होते. कामगार वर्गाच्या पहिल्या सचेतन क्रांतीला घडवणाऱ्या बोल्शेविक पक्षाच्या संघटनात्मक संरचनेचा इतिहास एका दीर्घ प्रक्रियेचा परिणाम आहे. संघटनेच्या स्वरूपाच्या इतिहासाच्या चर्चेची सुरूवात जॅकोबिन गटापासून होऊ शकते.
लक्षात घ्यावे की लेनिनने रशियातील कम्युनिस्ट आंदोलनात उपस्थित असलेल्या दोन प्रवृत्ती ओळखल्या होत्या, तेंव्हा त्यातील संधिसाधू आणि क्रांतिकारी प्रवृत्तींची तुलना फ्रेंच क्रांतीमधील भांडवलदार वर्गाच्या नेतृत्वात उपस्थित असलेल्या दोन प्रवृत्तींशी केली होती. जॅकोबिन गट हे इतिहासातील संघटनेचे ते पहिले रूप होते ज्यात क्रांतिकारी भांडवलदार वर्ग संघटित झाला होता. त्यांच्या नेतृत्वातच कामकरी वर्ग सुद्धा संघटित झाला होता कारण त्यावेळी व्यापक कामकरी जनता, मध्यमवर्ग, आणि भांडवलदार वर्गाचा एक समाईक शत्रू होता: सरंजामदार वर्ग आणि राजेशाही. या इतिहासावर चर्चा करणे वर्ग संघर्षातील अग्रदलाची भुमिका समजण्यासाठी आणि संघटनात्मक रूप समजण्यासाठी गरजेचे आहे, ती काही पांडित्यपूर्ण कवायत नाही. निरंकुशकतेच्या आणि प्रतिक्रांतिच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या जॅकोबिन्सच्या विरोधात जिरोंदिन गटाने तडजोड केली. लेनिनने रशियन संधीसाधूंना ‘समाजवादी जिरोंदिन गट’ म्हटले आणि क्रांतिकारी गटांना ‘कामगार वर्गीय जॅकोबिन’ म्हटले. बोल्शेविक पक्षातील या दोन प्रवृत्तींची चर्चा रशियन कम्युनिस्ट आंदोलनात अनेक ठिकाणी दिसून येते. प्लेखानोव्ह सुद्धा त्यांच्या क्रांतिकारी काळात दोन गटांची तुलना याचप्रकारे करतात. लेनिन जॅकोबिन गटाबद्दल चर्चा करताना म्हणतात:
“कामगार वर्गाचे इतिहासकार जॅकोबिनवादाला दडपलेल्या वर्गाच्या स्वतंत्रतेच्या एका उच्चतर संघर्षाच्या रूपात बघतात…विसाव्या शतकात जॅकोबिनवाद म्हणजे युरोप आणि आशियाच्या(रशियात) सीमांतावर क्रांतिकारी कामगार वर्गाची सत्ता असेल, जिला शेतकऱ्यांचे समर्थन असेल आणि समाजवादाकडे अग्रेसर होण्याचा भौतिक आधार अस्तित्वात असेल. ही क्रांती ना फक्त 18 व्या शतकातील जॅकोबिन्सच्या क्रांतीच्या महान आणि अमिट प्राप्तींना मिळवून देईल, तर ती कामगारांच्या एका विश्व-विजयी विजयाकडे वाटचाल करू शकते…तो जॅकोबिन ज्याने खऱ्या अर्थाने वर्गहितांना समजले आहे आणि खऱ्या अर्थाने कामगार वर्गाचे अग्रदल आहे, तो एक बोल्शेविक आहे.”
लेनिन जॅकोबिन्सची थोडी-थोडी प्रशंसाही करतात. जॅकोबिन गटाने 1789 नंतर क्रांतीला तिच्या निष्कर्षापर्यंत पोहोचवण्याचे काम केले, ज्यामध्ये त्यांना सामान्य कामकरी जनतेचे समर्थन मिळाले. या क्रांती मध्ये सचेतनतेचे तत्त्व सुद्धा होते. प्रबोधन काळातील तत्त्वज्ञांनी एक स्पष्ट राजकीय आधार दिला. एंगल्स फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल लिहितात की:
“महान फ्रेंच क्रांती हा बुर्झ्वा वर्गाचा तिसरा, आणि धार्मिक बुरखा फेकून देण्याच्या बाबतीत पहिला उठाव होती, जी स्पष्ट राजकीय समजदारीच्या आधारावर लढली गेली होती. ती या अर्थाने सुद्धा पहिली होती की तिथे एका स्पर्धकाचा समूळ नाश झाला, आणि दुसऱ्या स्पर्धकाचा म्हणजे भांडवलदार वर्गाचा पूर्ण विजय झाला.
“फ्रांस मध्ये क्रांतीने भूतकाळातील सर्व परंपरांशी पूर्ण विच्छेद केला; क्रांतीने सरंजामशाहीच्या अवशेषांना नष्ट केले आणि सिव्हिल कोड द्वारे रोमन कायद्यांचे कुशल रूपांतरण केले जे मार्क्सने सांगितलेल्या माल उत्पादनाच्या आर्थिक टप्प्याच्या, म्हणजे भांडवलशाहीच्या, कायदेशीर संबंधांना जवळपास पूर्णतेत अभिव्यक्त करत होते.”
युरोपात 15 व्या शतकात भांडवलशाहीच्या उद्याची सुरुवात झाली. सामंती समाजाच्या गर्भातच जन्माला आलेल्या भांडवलदार वर्गाने एकेक पाऊल टाकत स्वत:ला मजबूत केले आणि एका दीर्घ ऐतिहासिक संघर्षानंतर सामंती सत्तेचा अंत केला. भांडवलदार वर्गाने या संघर्षात कामकरी वर्गांना सोबत घेतले. एंगल्स भांडवलदार वर्गाच्या तीन महान संघर्षांचा उल्लेख करतात: जर्मन शेतकरी बंड, इंग्लिश क्रांती आणि फ्रेंच क्रांती. फ्रेंच राज्यक्रांती यामध्ये सर्वात प्रमुख आहे जिने सामंती सत्तेला मुळापासून उखडून फेकले. फ्रेंच राज्यक्रांतीला तिच्या निष्कर्षापर्यंत पोहोचवण्याचे काम जॅकोबिन गटाच्या नेतृत्वात झाले. 1789 नंतर 1791 च्या गृहयुद्धात जॅकोबिन्सला सामान्य कष्टकरी वर्गांचे समर्थन मिळाले. 1792 ते 1794 पर्यंत जॅकोबिन्सच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी सरकार टिकले. मार्क्सच्या शब्दांमध्ये “जॅकोबिन्सनी सामंतवाद ज्या जमिनीत पाय रोवून होता, तिलाच ध्वस्त केले, आणि अनेक वर्षांपासून रुजलेल्या सामंती श्रीमंतांना उखडून फेकले.” जॅकोबिन्सचा नेता रोबेस्पियर याला भांडवलदार वर्गानेच सत्तापालट करवत क्रांतीच्या जरा “जास्तच” पुढे जाण्याची शिक्षा दिली आणि त्याचे मुंडके गिलोटिन लावून कलम केले. जॅकोबिन्सनी 1792 ते 1794 या काळात क्रांतीला पुढे नेले आणि बड्या भांडवलदारांनी जुन्या संरचनेसोबत चालवलेल्या तडजोडीच्या प्रयत्नांना आणि प्रतिक्रांतीला हरवले. जॅकोबिन्स आर्थिक स्तरावर निम्न-भांडवलदार वर्गाचे प्रतिनिधित्व करत होते, पण तो विविध मतांचा एक समूह अधिक होता, ज्यात केंद्रियतेचा अभाव होता. जॅकोबिन्सकडे क्रांतीचा बोल्शेविक पक्षासारखा कार्यक्रम नव्हता, पण एक स्पष्ट राजकीय समज मात्र होती.
फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी झाल्यानंतर समानता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे नारे कामकरी जनतेकरिता फक्त कागदी नारेच सिद्ध झाले. एंगल्स सांगतात की भांडवलशाही अस्तित्वात आल्यानंतर “संपत्तीचे स्वातंत्र्य”हे छोट्या उत्पादकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी “संपत्तीला वंचित होण्याचे स्वातंत्र्य” बनले आणि सरंजामी कु-रितींच्या जागी भांडवली कु-रिती आल्यामुळे व्यापार अधिकाधिक धोकेबाजीचा आणि लबाड बनत गेला. “बंधुत्वाच्या” क्रांतिकारी आदर्शाची जागा व्यापारी स्पर्धेच्या धोकेबाजीने आणि ईर्ष्या व द्वेषाने घेतली. बळ-जुलूम-जबरदस्तीची जागा भ्रष्टाचाराने घेतली सामाजिक शक्तीचे मुख्य अस्त्र तलवारीच्या जागी पैसे बनले. वेश्यावृत्ती तर कधी ऐकले नव्हते इतकी वाढली. विवाह अगोदरप्रमाणेच वेश्यावृत्तीला झाकून ठेवणारे एक आवरण, त्याचे कायद्याद्वारे स्वीकृत रूप बनून राहिला, आणि व्यभिचार मात्र समाजात होतच राहिला. याच परिस्थितीमध्ये मनोराज्यमय समाजवाद्यांनी (फ्रांसचे सेंट सिमोन, फुरिये आणि इंग्लंडचे रॉबर्ट ओवेन) समाजवादाचे आपले सिद्धांत प्रस्तुत केले.
मार्क्सवादी विचारधारा सुद्धा आभाळातून टपकत नाही, तर इतिहास आणि समाजाच्या वैज्ञानिक विश्लेषणाच्या प्रक्रियेत इतिहासातील सिद्धांतांशी टीकात्मक नाते कायम करूनच पैदा होते. कामगार वर्गाच्या पक्षाचे पहिले रूप सुद्धा याचप्रकारे बुर्झ्वा वर्गाच्या संघटनेच्या पहिल्या प्रयोगापासून पुढे जाते. इतिहासातील सर्वाधिक मूलगामी बुर्झ्वा क्रांतीचे नेतृत्व करणारी अग्रदलाची फळी जॅकोबिन गट सुद्धा याच काळात उभा राहतो.
जॅकोबिन गटाचे चरित्र विविध सामाजिक समूहांच्या एका ढिल्या संघासारखे होते, जेव्हा की बोल्शेविक पक्षाने भांडवलदार वर्गाच्या विरोधात एक केंद्रीकृत नेतृत्व प्रदान केले. बोल्शेविक पक्षाने कामगार वर्गाच्या एका किंवा दुसऱ्या गटाचे प्रतिनिधित्व नाही केले, तर बुर्झ्वा वर्गाविरोधातील संघर्षात एका वर्गाच्या रूपाने कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व केले. जॅकोबिन क्लबप्रमाणे कम्युनिस्ट पक्ष हा विविध प्रवृत्तींचा मुक्त “संघ” असू शकत नाही. फ्रेंच क्रांतीचे नेतृत्व जॅकोबिन गटच करू शकत होता, आणि ऑक्टोबर क्रांतीचे नेतृत्व बोल्शेविक पक्ष.
फ्रेंच राज्यक्रांतीनंतर ल्योन शहरात औद्योगिक दंगली, जर्मनीत सिलेसियन कामगारांचे संघर्ष आणि चार्टिस्ट आंदोलनाच्या मैलाच्या दगडांच्या मार्गाने इतिहास 1848 च्या क्रांतीपर्यंत पोहोचतो. याच काळात कामगारांच्या पक्षाच्या रूपात चार्टीस्ट पक्ष आणि लीग ऑफ जस्ट सारख्या संघटना उभ्या होतात. कामगार आंदोलनाने स्वयंस्फूर्त कारवायांच्या पुढे जाऊन जेव्हा देशस्तरावर एकजूट होण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो काळ कामगार क्रांत्यांचा पहिला काळ होता जेव्हा कम्युनिझमचे भूत सर्व युरोपाला सतावत होते. या काळात जी संरचना अस्तित्वात आली ती परिस्थितींच्या प्रकाशात जन्माला आली होती. हीच कम्युनिस्ट लीग होती. याच काळात मार्क्स व एंगल्सने प्रूधोंवादी, ब्लांकीवादी, लासालवादी, आणि नंतर बर्नस्टीनवाद्यांशी संघर्ष चालवत पक्षाच्या तत्त्वांची पायाभरणी करणे सुरू केले होते. याच वादांनी सुद्धा मार्क्सवादाला उन्नत केले. मार्क्स आणि एंगल्सने कामगार वर्गाच्या संघटनेच्या तत्त्वांच्या पायाभरणीचे सुद्धा काम केले. या काळाबद्दल पुढील पुष्पात चर्चा करुयात.
(मूळ लेख: मजदूर बिगुल, एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित)
अनुवाद: अभिजित