दक्षिण कोरियाच्या सांगयोंग कार कंपनी कामगारांचा झुंजार संघर्ष

विराट

ssangyong2b-Colदक्षिण कोरियाच्या सांगयोंग मोटर्स या कार कंपनीचे कामगार गेल्या ७ वर्षांपासून एक शानदार लढा देत आहेत. या सात वर्षांत त्यांनी सियोल शहरापाशी असलेल्या प्योंगतेक कारखान्यावर ७७ दिवस कब्जासुद्धा केला, राज्यसत्तेचे भयंकर दमन सोसले, कित्येक वेळा पराभवाला तोंड दिले मात्र आजसुद्धा ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. दमन दुष्टचक्रात अडकून २००९ पासून आत्तापर्यंत २८ कामगार किंवा त्यांचे कुटुंबीय यांनी आत्महत्या केल्या आहेत किंवा ते मृत्यूमुखी पडले आहेत. तसे पाहता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कामगार संघर्ष करत असतील तर तो संघर्ष फक्त त्यांचा राहत नाही, तर अवघ्या कामगार वर्गाचाच तो लढा असतो. सांगयोंग मोटर्सच्या कामगारांच्या सोबत उभे राहून भारतातील कामगार तर या संघर्षांत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात. सांगयोंग मोटर्सची मालकी एप्रिल २०१४ पासून भारतातील महिंद्रा अॅूण्ड महिंद्रा ग्रुप्सपाशी आली आहे. भारतातील कामगारांचा पाठिंबा मिळवून महिंद्रा अॅलण्ड महिंद्रा ग्रुपवर दबाव आणता येईल व या संघर्षात विजय मिळवता येईल म्हणून सप्टेंबर २०१५ मध्ये सांगयोंग मोटर्सचे कामगार दक्षिण कोरियाहून मुद्दामहून भारतात आले होते, परंतु सध्या तरी त्यांना प्रतिबंध हटण्याचे तोंडी आश्वासन घेऊनच माघारी जावे लागले आहे. अशी आश्वासने याआधीसुद्धा या कामगारांना मिळालेली आहेत, परंतु त्यांतून काहीही साध्य झालेले नाही. तरीही दक्षिण कोरियाचे हे कामगार आपला लढा शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहेत, आणि म्हणूनच भारतातील लढाऊ कामगार संघटनांनी या संघर्षात या कामगारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

सांगयोंग मोटर्सच्या कामगारांचा शानदार लढा

संप फोडण्यासाठी सशस्त्र पोलिसांनी केलेल्या भयंकर हल्याचा कामगारांनी खंबीरपणे सामना केला

संप फोडण्यासाठी सशस्त्र पोलिसांनी केलेल्या भयंकर हल्याचा कामगारांनी खंबीरपणे सामना केला

सांगयोंग मोटर्सची मालकी २००९ पूर्वी चीनच्या शंघाय ऑटोमोटिव कॉर्पोरेशन या कंपनीकडे होती, मात्र सर्वच मालकांप्रमाणे चीनच्या कंपनीनेसुद्धा आपल्या मालकीच्या काळात कामगारांच्या हक्कांना अजिबात महत्त्व दिले नाही, व शेवटी सांगयोंग मोटर्समार्फत बऱ्यापैकी नफा कमावल्यानंतर नफ्याचा दर घसरताच कंपनी दिवळखोरीत असल्याचे दाखवून काढता पाय घेतला. कोणत्याही देशात बहुराष्ट्रीय कंपन्या विकासाचा डांगोरा पिटत येतात खऱ्या पण त्यांचा खरा हेतू कामगारांना पिळून नफा उकळणे हाच असतो. सांगयोंग मोटर्सची अवस्था काही दिवाळखोरीत जाण्यासारखी नव्हती, परंतु या निमित्ताने सांगयोंग मोटर्सने एप्रिल २००९ साली कंपनीतील ३७ टक्के (७१७९ पैकी २६४६) कामगारांच्या कपातीची नोटीस काढली. नंतर कंपनीने सांगितले की फक्त ९७८ कामगारांनाच कामावरून कमी करण्यात येईल व कंपनीची परिस्थिती सुधरताच त्यांना पुन्हा कामावर घेण्यात येईल. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाशी बोलणी केली, परंतु व्यवस्थापन राजी झाले  नाही. शेवटी या निर्दय निर्णयाच्या विरोधात सांगयोंग मोटर्सच्या जवळपास १००० कामगारांनी २२ मे रोजी कारखान्यावर कब्जा केला. यावेळी कामगारांमध्ये प्रचंड चीड पसरलेली होती कारण ५ महिन्यांपासून कामगारांना पगारसुद्धा मिळालेला नव्हता. यानंतर ७७ दिवस कंपनीचे गुंड व पोलिसांसोबत कामगारांनी झुंजार लढा दिला. मालकांनी गुंड आणि पोलिसांची मदत घेताच कामगारांनीसुद्धा स्वतःला हत्यारबंद केले. पोलिसांनी शरीरावर भयंकर जखमा करणाऱ्या इलेक्ट्रिक गनचा वापर केला. कामगारांनी पेट्रोल बाँब, स्टीलचे दांडे आणि आपल्या हत्यारांनी याला प्रत्युत्तर दिले. जसे जसे दिवस जाऊ लागले तसतसा हा संघर्ष तीव्र होत गेला. २० जुलै रोजी सरकारने पूर्ण शक्तीनिशी कामगारांवर हल्ला केला आणि पाणी व गॅसचा पुरवठा तोडला. दुसऱ्या दिवशी विजही तोडण्यात आली व हॅलिकॉप्टरमधून मोठ्या प्रमाणात अश्रूधुर सोडण्यात आला. अश्रूधुराबरोबरच त्वचा भाजून काढणाऱ्या रसायनाचाही वापर करण्यात आला. ३००० पोलिस व कंपनीचे गुंड कित्येक दिवस कारखाना कामगारांच्या हातून सोडवण्यासाठी प्रयत्न करीत होते, तर कामगार गोफणींतून नट बोल्ट फेकून बंदूकींच्या गोळ्यांना उत्तर देत होते. आजुबाजूच्या कारखान्यांतील कामगारांनीसुद्धा या प्लांटमधील कामगारांना यथासंभव मदत पोचवली. बाहेरही ते पलिसांच्या नाकी नऊ आणत होते. पोलिसांनी कामगारांच्या अन्नाचा आणि औषधोपचारांचा पुरवठाही बाहेरून बंद केला. तरीसुद्धा कामगारांनी हार मानली नाही, व ते खंबीरपणे लढत राहिले. शेवटी ४ व ५ ऑगस्ट रोजी त्यांचा हा लढा निर्दयपणे चिरडून टाकण्यात आला व कामगारांचा तात्पुरता पराभव झाला. ९७८ पैकी ४८ टक्के (४७८) कामगारांना एका वर्षासाठी बिनपगारी रजेवर पाठवण्यात आले व ५२ टक्के (५१०) कामगारांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली. युनियनला सांगण्यात आले की कंपनीची स्थिती पुन्हा सामान्य होईपर्यंत या कामगारांना तरजीह देण्यात येईल. एवढेच नाही तर या नंतर कंपनीने कारखान्याच्या झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी युनियनवर खटला भरला व सुमारे २० कोटी रुपयांचा दंड कामगारांच्या माथी मारला. तेव्हापासून आत्तापर्यंत सांगयोंग मोटर्सचे कामगार, हा दंड रद्द केला जावा, त्यांना पुन्हा कामावर घेतले जावे व या प्रकरणात ज्या कामगारांचे जीव गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेची सोय केली जावी यासाठी अखंडपणे लढा देत आहे. या दरम्यान चार वेळा दीर्घ उपोषणे झाली आहेत, कामगारांनी ७० मिटर उंच टॉवरवर थंडीत तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहून आपला विरोध दर्शविला आहे. व आता भारतातील कामगारांचा पाठिंबा मिळवून महिंद्रा अॅ ण्ड महिंद्रा कंपनीवर दबाव आणून आपल्या न्याय्य मागण्या मान्य करून घेण्याच्या इराद्याने दक्षिण कोरियातून कामगारांचे प्रतिनिधी मंडळ भारतात आले होते..

सांगयोंग मोटर फॅक्टरीच्या छतावर लाल झेंड्यासह उभे कामगार

सांगयोंग मोटर फॅक्टरीच्या छतावर लाल झेंड्यासह उभे कामगार

महिंद्रा अॅ्ण्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी जानेवारी २०१५ मध्ये दक्षिण कोरियामध्ये सांगयोंग मोटर्सची नवी कार टिवोलीच्या उद्घाटनाच्या वेळी कामगारांना आश्वासान दिले होते की या गाडीने जर बाजारात चांगला नफा कमावला तर ते कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेतील. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान या गाडीची बऱ्यापैकी विक्री झाली परंतु कामगारांना दिलेला शब्द ते पूर्णपणे विसरून गेले. याचं आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही कारण मालक अशी आश्वासने विसरून जाण्यासाठीच देत असतात.

भारतातील दुरुस्तीवादी ट्रेड युनियनचा निर्लज्जपणा

सांगयोंग कामगारांच्या प्रतिनिधी मंडळाला मुंबईत आल्यावर येथील गद्दार ट्रेड युनियनचा कटू अनुभव घ्यावा लागला. संघर्षात भारतातून योग्य मार्गदर्शन मिळावे आणि महिंद्रा अॅनण्ड महिंद्रा ग्रुपवर दबाव आणता यावा, यासाठी सांगयोंगच्या कामगारांनी, स्वतःला प्रागतिक म्हणवून घेणाऱ्या मोठ्या ट्रेड युनियनच्या नेत्यांची भेट घेतली. परंतु या बाबतीत त्यांचा घात झाला. भारतातील कामगारांचा सर्वांत मोठा शत्रू ठरलेल्या दुरुस्तीवादी ट्रेड युनियननी आता दक्षिण कोरियातील कामगारांचा लढासुद्धा हाणून पाडण्याचा जणू विडा उचलला आहे. सांगयोंगच्या कामगारांसाठी जोरदार आवाज उठवण्याऐवजी ही युनियन त्यांना सल्ले देत आहेत आणि बोलणी करून हे प्रकरण सोडवण्याचे आश्वासन देत आहेत. अत्यंत कमी संसाधनांच्या बळावर करा किंवा मराचा लढ्याच्या तयारीने आलेल्या सांगयोंग कामगारांना या युनियननी आनंद महिंद्रा हे फार उदार आणि कामगार हक्कांचे रक्षणकर्ते असल्याचे या कामगारांना सांगून त्यांनी संयम पाळला तर आनंद महिंद्रा साहेब नक्कीच त्यांची प्रार्थना ऐकतील, असा विश्वास व्यक्त केला. कोलांट्या मारत मालकांशी बोलणी करायची आणि खोटी आश्वासन द्यायची, हेच या ट्रेड युनियनचे काम बनले आहे. येथेसुद्धा व्यवस्थापनाशी प्रतिनिधी मंडळाची बोलणी झाली परंतु त्याचा परिणाम एवढाच झाला की व्यवस्थापनाने या प्रकरणावर विचार करण्याचे व पुन्हा कामगारांना कामावर घेण्याचे तोंडी आश्वासन तेवढे दिले. आश्वासन तर जानेवारी महिन्यात आनंद महिंद्रा यांनीसुद्धा दिले होते. तेसुद्धा स्वतः दक्षिण कोरियात जाऊन. मग त्या आश्वासनाचे काय झाले? या ट्रेड युनियननी आपले कर्तव्य, टेबलावर बसून सर्व प्रश्न सोडवण्याच्या आपल्या जुन्या सवयीनुसार पार पाडले आहे. त्यामुळे सांगयोंगचे कामगार एक प्रकारे निराशा पदरी पाडूनच माघारी गेले आहेत. दुरुस्तीवादी ट्रेड युनियनच्या या गद्दारीनंतर सांगयोंगच्या कामगारांना आपल्या देशी माघारी जावे लागले असले तरी हा लढा सुरूच राहील. झुंजार कामगार संघटनांनी अशा वेळी सांगयोंग कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व नव्याने त्यांच्यासाठी भारतात आवाज उठवला पाहिजे.

या अमर घोषणेची आठवण आपण पुन्हा एकदा जागवली पाहिजे :

जगातील कामगारांनो एक व्हा! तुमच्यापाशी गमावण्यासाठी फक्त तुमच्या बेड्या आहेत, जिंकण्यासाठी संपूर्ण विश्व आहे!

कामगार बिगुल, नॉव्‍हेंबर २०१५