शहीद चंद्रशेखर आझाद: भविष्यात होणाऱ्या नव्या भारतीय समाजवादी क्रांतीचे प्रेरणास्रोत!
✍ अरुण
23 जुलै, शहीद चंद्रशेखर आझादांचा जन्मदिवस. चंद्रशेखर आझादांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेशमधील भाबरा या गावी झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, ज्यामुळे ते आपले प्राथमिक शिक्षणदेखील पूर्ण करू शकले नाहीत, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे लवकरच आझाद बाहेर मिळेल ते काम, मजुरी करु लागले. सामान्य आर्थिक कुटुंबातील असणाऱ्या उणिवांची त्यामुळे त्यांना पूर्ण जाणीव होती. लहानपणी भावरा आणि त्याच्या आजूबाजूच्या भागातील आदिवासी, शेतकरी यांचे जीवन, सामाजिक परिस्थिती त्यांनी जवळून बघितली होती. काही दिवस त्यांनी मुंबईमध्येही कामगार म्हणून काम केले होते. मुंबईतील कामगारांचे जीवन स्वतः जगले होते आणि याचा आझादांच्या संवेदनशील व्यक्तित्वावर झालेला परिणाम वयाच्या अगदी 15 व्या वर्षी त्यांना स्वातंत्र्य चळवळीकडे घेऊन आला. 1921 मध्ये सुरु असलेल्या असहकार चळवळी मध्ये त्यांनी भाग घेतला. आंदोलनादरम्यान घोषणा देत असताना त्यांना पोलीसांनी पकडले होते, एवढ्या लहान वयातही न्यायाधीशाने त्यांना वेताचे फटके मारण्याची शिक्षा दिली होती. तेव्हा न्यायालयात बाल चंद्रशेखरने आपले आडनाव ‘आझाद’ असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
पुढे गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतल्यावर आशाभंग झालेले आझाद 1922 साली राम प्रसाद बिस्मिल यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदूस्थान रिपब्लिकन असोशिएशन’( एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेत सामील झाले. त्यानंतर ते एच.आर.ए.चे सक्रिय सदस्य झाले आणि त्यांनी एच.आर.ए.साठी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. संघटना उभा करायला लागणारा पैसा सरकारी मालमत्तेवर दरोडा टाकून घेतला पाहिजे, या मताचे होते. त्यासाठी एच.आर.ए.च्या राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, राजेंद्र लाहिरी, सचिन्द्र बक्षी, केशव चक्रवर्ती, मन्मथ गुप्ता, मुकुंदी लाल, मुरारी लाल, बनवारी लाल आणि चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांनी 9 ऑगस्ट 1925 या दिवशी काकोरी येथे ट्रेनवर दरोडा टाकून सरकारी खजिना लुटला. त्यानंतर पोलिसांकडून झालेल्या धरपकडीमध्ये एच.आर.ए.च्या क्रांतिकारकांचे मोठ्या प्रमाणात दमन झाले. फाशी, तुरुंगवास यांचे चक्र सुरु झाले आणि यात एच.आर.ए.ची मुख्य फळीच मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. विखुरलेल्या संघटनेला उभे करण्याचे महत्त्वाचे काम आझादांनी केले. पुढे 1928 साली संघटनेने स्वीकारलेल्या समाजवादी सिद्धांतांमुळे एच.आर.ए.चे नामकरण ‘हिंदूस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन’ (एच.एस.आर.ए.) झाले. उद्देश होते, भारताला स्वातंत्र्य मिळवून समाजवादी राज्याची स्थापना करणे. आझाद या संघटनेचे कमांडर बनले.
मानवी शोषणाचा अंत, समानता, वर्गविहीन समाज या कल्पना आणि समाजवादाने आझाद प्रेरित झालेले होते. त्याकाळी समाजवादावरील बहुतेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत असायची, हिंदी मध्ये उपलब्ध नव्हती. इंग्रजी भाषा, शिक्षण यांच्या मर्यादा असूनदेखील आझाद वैज्ञानिक समाजवाद समजून घेण्यासाठी आपल्या साथींकडून इंग्रजी पुस्तके वाचून, हिंदीमध्ये त्याचा अनुवाद करून घेत, त्याचा अर्थ समजून घेत, त्यावर चर्चा करत. त्यांनी ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’, सत्यभक्त यांचे ‘ए बी सी ऑफ कम्युनिझम’ ही पुस्तके अशाच प्रकारे समजून घेतली होती. संघटनेतील इतर सहकाऱ्यांनी देखील पुस्तके वाचली पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे याबाबत आझाद अत्यंत आग्रही होते.
ईश्वर आहे किंवा नाही यावर आझादांचे निश्चित मत बनले नसले तरी, ईश्वराची सत्ता नाकारणाऱ्या भगत सिहांच्या विधानांना त्यांनी कधीही विरोध केला नाही, ना कधी ईश्वराची वकालत केली, ना कधी ईश्वराच्या मागे लागले. अगोदर त्यांच्यावर आर्यसमाजी विचारांचा प्रभाव होता मात्र जेव्हापासून संघटनेने समाजवादाचा रस्ता धरला, तेव्हापासून आझाद कधीही ईश्वराच्या मागे लागलेले दिसले नाहीत. समाजवादी राज्यात भविष्यात दिसणारे शेतकरी- मजुरांचे, सामान्य जनतेचे हित ओळखल्याने समाजवादी विचार स्वीकारायला त्यांना वेळ लागला नाही.
आजकाल सर्वच क्रांतिकारक, महापुरुष, इतिहासातील नेत्यांना जाती-धर्म यांसारख्या अस्मितावादी चौकटीत बंदिस्त करून त्यांच्या खऱ्या विचारांना फाटा देण्याचे काम काहीजन अजाणतेपणी आणि काहीजन त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थाकरिता अगदी जाणीवपूर्वक करत असतात. चंद्रशेखर आझाद पण यातून सुटू शकले नाहीत कारण या जगात मानवी समाजात जन्म घेणारा प्रत्येक व्यक्ती ‘क्रांतिकारक’, ‘महापुरुष’, ‘नेता’ घडण्याआधी आणि नंतर तो एक माणूस असतो. मानवी समाजात ‘माणूस’ म्हणून जन्म झाल्याकारणाने तो किंवा ती क्रांतिकारक त्या समाजाने आखलेल्या किंवा निर्माण केलेल्या किंवा निर्माण झालेल्या कुठल्या ना कुठल्या जात, धर्म, भाषा, पंथ, देश, प्रांत, राष्ट्र, रंग, लिंग यातील कुठल्यातरी सामाजिक पार्श्वभूमीतून येत असतो. ‘जन्म’ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ,त्यावर कुणाही व्यक्तीचा ताबा नसतो त्यामुळे कुठल्या सामाजिक पार्श्वभूमीत जन्म घ्यायचा यावरही कुणा व्यक्तीचा ताबा नसतो. कोणताही व्यक्ती जेव्हा क्रांतिकारी चळवळीत सहभागी होतो तेव्हा तो रोज सामाजिक क्रांतिकारी व्यवहारातून शिकत असतो, क्रांतीचे नवीन सिद्धांत, व्यवहार जन्माला घालत असतो आणि स्वतः देखील सकारात्मकपणे बदलत असतो, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अगदी तसेच चंद्रशेखर आझाद ब्रिटिशकालीन भारतात आत्ताच्या मध्यप्रदेश राज्यात एका ब्राह्मण कष्टकरी कुटुंबात जन्मले, पण जीवनात त्यांनी क्रांतीचा मार्ग स्विकारला आणि स्वत:ला बदलत गेले. जसे कुठल्याही सर्वसाधारण भारतीय कुटुंबात वाढणाऱ्या प्रत्येक लहान मुलावर जशी आजूबाजूची सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती, कुटुंबातील धार्मिक वातावरण प्रभाव पाडते तसे आझादांवरही तो प्रभाव पडला. त्यामुळे काही जुन्या फोटोंमध्ये, त्याच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळातील, ब्राह्मण जातीची ओळख असणारे ‘जानवे’ आझादांनी परिधान केलेले दिसते.
पण सुरुवातीपासून अगदी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ मध्ये सामील होईपर्यंत त्यांनी कधीही धार्मिक, जातीय द्वेष केल्याच्या अथवा पसरवल्याचा कुठलेही उदाहरण इतिहासात नाही. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे आझादांवर सुरुवातीच्या काळात ‘आर्य समाजी’ विचारांचा देखील प्रभाव होता, हे देखील कुणापासून लपलेले नाही. पण जेव्हापासून आझाद ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन’ मध्ये सामील झाले, तेव्हापासून ते क्रांतिकारी जीवन जगले, जात, धर्म यांसारख्या कुठल्याही भेदाला किंचितही स्थान न देता त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेऊन या उद्दिष्टाप्रती शक्य तितक्या ऐहिक गोष्टींचा त्याग करून ते जीवन जगले.
पुढे ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन’ समाजवादी तत्वांना स्वीकारून ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन’ बनले आणि चंद्रशेखर आझाद हे संघटनेचे ‘कमांडर इन चीफ’ या सर्वोच्च जबाबदारीवर आले. समाजवादी संघटनेच्या क्रांतीच्या, धर्मनिरपेक्षतेच्याता, आंतर्राष्ट्रीयतावादाच्या मतांची त्यांना पूर्णपणे जाणीव होती, एवढेच नाही तर त्यांनी संघटनेची ही धोरणे फक्त कागदावर न ठेवता समाजवादी मूल्य आपल्या आणि संघटनेच्या क्रांतिकारी दैनंदिन आयुष्यात लागू केली आणि त्या समाजवादी मूल्यांकरिता, क्रांतीकरिता, मानवी समाजाकरिता सर्वोच्च त्याग म्हणजेच बलिदान द्यायला किंचितही मागे हटले नाहीत, त्याकरिता कुठलीही तडतोड केली नाही अथवा कुठली माफी मागितली नाही. प्रसंगी स्वतःच्या हाताने पोलिसांच्या हाती न लागता वयाच्या अगदी 25व्या वर्षी शहीदत्व पत्करले, हा इतिहास आहे जो कुणीही नाकारू शकत नाही.
आज चंद्रशेखर आझादांना ब्राह्मण म्हणून, हिंदू म्हणून, राष्ट्रवादी म्हणून साजरे करणारे वा त्यांच्या सामाजिक क्रांतिकारी व्यवहाराला नाकारून केवळ त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीमुळे त्यांच्या कार्याला कमी लेखणारे असे सर्वजण हे आझादांचे समाजवादी विचार, समाजवादाचा आंतर्राष्ट्रीयतावाद, धर्म , जात याबद्दलची भूमिका, खरी धर्मनिरपेक्षता, आझादांचे समाजवादी क्रांतीचे उद्दिष्ट, त्यांचा खरा वैचारिक वारसा आणि त्यांनी क्रांतीसाठी दिलेले बलिदान या सर्वांना नाकारून आझादांचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी करून त्यांच्या शहीदत्वाचा अपमान करत आहेत, ते सर्वच समाजवादी क्रांतीचे, कामगार वर्गाचे आणि आझादांचे शत्रू आहेत.
स्वभावाने अत्यंत संवेदनशील, काळजीवाहू , धीट, शिस्तबद्ध, प्रसंगी कठोर असणारे आझाद संघटनेच्या ‘कमांडर इन चीफ’ या पदाला अगदी साजेसे क्रांतिकारक होते. लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 1928 मध्ये लाहोर येथे जॉन पी. साँडर्सवर केलेल्या गोळीबारात स्वतः आझाद देखील सामील होते. जनतेत क्रांतिकारकांना मिळणार प्रतिसाद बघता, क्रांतिकारी कारवाया रोखणे आणि क्रांतिकारकांचा बंदोबस्त करणे साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेची अत्यंत तातडीची गरज बनली होती. याचाच भाग म्हणून ब्रिटिश सरकारने ‘हिंदूस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोशिएशन’च्या क्रांतिकारकांवर हल्ले, अटक, तुरुंगवास, गोळीबार यांचे सत्र सुरु केले. बराच काळ सरकारच्या हिट लिस्ट वर असणारे आझाद एकदाही पोलिसांच्या ताब्यात सापडले नाहीत. अटकेत असणारे त्यांचे सहकारी विशेषतः भगत सिंहांना लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढले पाहिजे, या नियोजनात आझाद होते. राजगुरू जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी, 1913 रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क मध्ये गेले होते. एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना याची बातमी दिली. थोड्याच वेळात पोलिसांनी मैदानाला चहू बाजूंनी वेढा घातला आणि आझादांवर गोळीबार सुरु केला, आझादांनीही आपले पिस्तूल काढून पोलिसांना हल्ल्याचे उत्तर दिले, ज्यात त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, पोलिसांच्या हातून मरण्यापेक्षा शेवटची गोळी त्यांनी स्वतःच्या डोक्यात मारली आणि अशा रीतीने भारतीय क्रांतिकारी चळवळीतील एक महान क्रांतिकारक शहीद झाला.
क्रांतिसारख्या महान आणि उदात्त समाजकार्याला आपले संपूर्ण जीवन अर्पण केलेले चंद्रशेखर आझाद शरीराने जरी आज आपल्यात नसले तरी, समाजवादी क्रांतीच्या विचाराच्या प्रेरणेच्या रूपाने, आपल्याला सदैव अन्याय, अत्याचार, शोषण यांच्या विरोधात, समाजवादी क्रांतीच्या दिशेने अग्रेसर करण्याकरिता सदैव मार्गदर्शक म्हणून प्रकाशरत आहेत. आज देशभरात बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे, भांडवलदार वर्ग दिवसेंदिवस जनतेवर करांचा बोजा लादत चालले असल्याने महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दोन वेळेचा सकस आहार, मुलांचे शिक्षण, दवाखाना या गोष्टींची पूर्तता करता-करता सामान्य जनतेच्या नाकी नऊ आले आहेत. दिवस -रात्र मालकवर्गासाठी राबून संपत्ती निर्माण करणे आणि स्वतः जनावरांसारखे कसेबसे दिवस काढणे, हेच कामगार, मजूर वर्गाचे जीवन बनले आहे. चंद्रशेखर आझाद हे देशांत निर्माण झालेल्या निराशेच्या विरोधात नवा समाजवादी समाज निर्माण करण्यासाठी तरुणांमध्ये आदर्श असा निरंतर आशेचा स्रोत आहेत.