अमेरिकेतील राष्ट्रपती पदाची निवडणूक: सर्वाधिक विकसित भांडवली देशातील “विकसित” प्रचारतंत्राचा तमाशा
✍ आशय
अमेरिकेतील राष्ट्रपती पदासाठी निवडणूक येणाऱ्या 5 नोव्हेंबरला पार पडेल. दर 4 वर्षांनी होणारी ही निवडणूक, आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादाच्या शीर्षस्थानी कोणता व्यक्ती बसेल यासाठी होते. या निवडणुकीत, अमेरिकेतील दोन प्रमुख पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक पार्टी, आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार अनुक्रमे कमला हॅरिस, आणि डॉनाल्ड ट्रम्प आहेत. या निवडणूकीच्या प्रक्रियेतून जगातील सर्वाधिक “विकसित” भांडवली देशातील निवडणुकीचे प्रचारतंत्र कसे काम करते, आणि जनतेला भरकटवून तिच्या विचारविश्वाला कसे नियंत्रित केल जाते याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर येते. या निवडणुकीच्या घडामोडींपैकी काही प्रमुख घडामोडींवर नजर टाकता हे पुन्हा लक्षात येते.
कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार बनण्यामागची कहाणी थोडी हास्यास्पदच आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्रपती डेमोक्रॅटिक पार्टीचे जो बायडन आहेत. जो बायडन यांनी पुनः राष्ट्रपती पदासाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती. अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका आधी पक्षांतर्गत प्राथमिक (प्रायमरी) निवडणुका होतात. या प्राथमिक निवडणुका “लोकशाहीचा” आभास निर्माण करण्यामध्ये महत्त्वाच्या ठरतात. या प्राथमिक निवडणुकांचे खरे उद्दिष्ट, एक गाळणी प्रक्रिया, म्हणून काम करणे असते. पक्षाचा पाठीराखा असलेल्या भांडवलदार वर्गाच्या हिश्श्याला नापसंत असलेले सर्व उमेदवार या प्राथमिक निवडणुकांच्या प्रक्रियेमध्येच बाहेर काढले जातात.
2016 आणि 2020 च्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्राथमिक निवडणुकीमध्ये बर्नी सॅंडर्स, या स्वयंघोषित “समाजवाद्याने” (म्हणजे लोकशाही-समाजवादी व्यक्तीने) सुद्धा राष्ट्रपती पदासाठी स्वतःची दावेदारी केली होती. दोन्ही वेळी बर्नी सॅंडर्सच्या उमेदवारीला हरवण्यासाठी सर्व “गैर-लोकशाही” डावपेच, म्हणजेच संयम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून हे निश्चित केले गेले की डेमोक्रॅटिक पार्टीचा उमेदवार हा “प्रस्थापितां”मधलाच, म्हणजे बर्नी सॅंडर्स सारखा छुपा आणि कमजोर समर्थक नव्हे तर भांडवलदार वर्गाचा नग्न समर्थक असेल.
2016 मध्ये डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी (डिएनसी) ने केलेले ईमेल उघडकीस आले होते. या ईमेल्स मध्ये हे दिसून आले, की कशाप्रकारे डेमोक्रॅटिक पार्टीच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जाणीवपूर्वक, स्वतःच्या प्रसार माध्यमांसोबत संगनमताने, हिलरी क्लिंटनला पडद्या मागून मदत केली, आणि मुक्त आणि न्याय्य निवडणुकीच्या भांडवली लोकशाहीच्या स्वतःच्याच आश्वासनांची अक्षरशः खिल्ली उडवली. 2016च्या या प्रायमरी निवडणुकीत, डिएनसी ने हिलरी क्लिंटनची एक पूर्वलिखित (ठरवेलेली!) मुलाखत आयोजित केली होती, आणि बर्नी सॅंडर्स व हिलरी क्लिंटनमधल्या वादविवादाचे प्रश्न अगोदरच हिलरी क्लिंटनला सांगून टाकले होते!
2020 मध्ये सुद्धा असेच काही चित्र दिसून आले. या वेळी फक्त, डिएनसीचा, म्हणजेच डेमोक्रॅटिक पार्टीच्या पाठी उभा असलेल्या भांडवलदारांच्या पसंतीचा उमेदवार जो बायडन होता. सॅंडर्सला हरवावं म्हणून एलिझाबेथ वॉरेन, तथाकथित “पुरोगामी” सिनेटर, स्वतःच्या जिंकण्याच्या सगळ्या शक्यता संपल्यानंतर सुद्धा काही काळ निवडणुकीत याच भांडवलदारांच्या जोरावर तगून राहिली. या मुळे सॅंडर्सला जाणारी मते कापली गेली आणि जो बायडेन 2020 मध्ये डेमोक्रॅटिक प्रायमरी जिंकला. अर्थातच या वेळी सुद्धा सर्व प्रसार माध्यम जो बायडेनच्या पाठीशी खंबीर पणे उभी होती. तसेही बर्नी सॅंडर्स सारखी मार्क्सवाद विरोधी व्यक्ती राष्ट्रपती पदावर बसून कोणतेही क्रांतिकारी परिवर्तन झाले नसते; परंतु अमेरिकेतील भांडवलशाहीचे आर्थिक संकट आता तेथील मुख्य पक्षांना सतत जास्त उजव्या उमेदवारांनाच निवडण्याकडे ढकलत आहे हे दिसून येते.
2024 च्या निवडणुकीत सुद्धा हे दिसून आले की शेवटी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तोच व्यक्ती पात्र ठरतो ज्याच्या पाठीशी भांडवलदार वर्गाचा एक मोठा हिस्सा उभा असतो. हे तर आपण फक्त प्रायमरी निवडणुकांबद्दल बोलतोय, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तर हे अजून जास्त स्पष्ट होताना दिसते. हे माहिती असताना सुद्धा की, बायडेन 81 वर्षांचा झालेले आहेत, आणि जर ते परत निवडले गेले तर त्यांची राष्ट्रपती पदाची मुदत संपेपर्यंत ते 85 वर्षांचा वृद्ध होतील, या वेळी पुन्हा सर्व भांडवली प्रसारमाध्यमे जो बायडेनचेच समर्थन करत होती. तसे जर कोणी व्यक्ती 85 वर्षांचा असेल आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल तर असा व्यक्ती राष्ट्रपती होण्यात काही हरकत असू नये; परंतु जो बायडनचे आजारपण लपवण्याचे सर्व प्रयत्न तोकडे पडले! बायडेन अनेकदा स्वतःची भाषणे विसरत, शब्द गोंधळवत, सुरू केलेले वाक्य अपूर्ण सोडत. इतके स्पष्ट झालेले की बायडेन अजून 4 वर्ष राष्ट्रपती म्हणून स्वतःची जबाबदारी नाही पाडू शकणार. असे असूनही भांडवलदार वर्गाच्या एका प्रमुख हिश्श्याला काहीच अडचण नव्हती की बायडन राष्ट्रपती व्हावेत. याचमुळे सर्व मुख्यधारेतील प्रसारमाध्यमे पूर्णपणे बायडनच्या समर्थनात बातम्या प्रसारित करीत होती. परंतु शेवटी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार डॉनाल्ड ट्रम्प सोबत झालेल्या वादविवादात जो बायडन यांनी असंख्य वेळा स्वतःचा विस्मृतीचा आजार जगासमोर लाईव टिव्ही वर उघड पाडला. यानंतर मात्र नाईलाजाने भांडवलदार वर्गाने आणि त्याच्या पाळीव प्रसारमाध्यमांनी जो बायडनवर दबाव आणून त्यांना राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडण्यास पार पाडले. यानंतर डेमोक्रॅटिक पार्टीच्या पाठीशी उभ्या असलेल्या भांडवलदार वर्गाने त्यांची दुसरी पसंत असलेल्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कोणत्याही लोकशाही प्रक्रियेच्या नाटकाशिवाय राष्ट्रपतीपदीची उमेदवार घोषित करून टाकले.
अर्थात जशी हॅरिस, तसाच ट्रम्प . विविध मुद्द्यांवर या दोघांमध्ये एकोणीस-वीसचाच फरक आहे. आर्थिक धोरणाबद्दल बोलायचे झाले तर हॅरिस म्हणत आहेत की मी जनतेला गोड बोलून लुटेन, तर ट्रम्प उद्धटपणे लुटण्याचे आश्वासन देताहेत. दोघांपैकी एकही अमेरिकेतील कामगार वर्गाचे खरे मुद्दे उचलून, त्या बद्दल काहीतरी करू असे म्हणतच नाहीयेत. अमेरिकेसारख्या पुढारलेल्या भांडवली देशामध्ये आज सुद्धा सर्वांना मोफत उच्च शिक्षण नाहीये, सर्वांना मोफत आरोग्य व्यवस्था नाहीये, सार्वत्रिक पेन्शन व्यवस्था सुद्धा सतत धोक्यात असते. ज्या महिला काम करतात त्यांना प्रसूती रजा (मॅटरनिटी लीव) नाहीये, आणि धड पाळणी गृह पण नाहीयेत. बेघरी प्रचंड मोठी आहे. मागच्या 50 वर्षात पगार खऱ्या अर्थाने वाढले नाहीयेत, पण महागाई प्रचंड वाढलीये. थोडक्यात कामगार-कष्टकरी वर्गाची अभूतपूर्व दैन्यावस्था आहे, परंतु भांडवलदार वर्गानेच उभ्या केलेल्या डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांना या मुद्यांशी देणेघेणेच नाही.
हे सर्व असतांना दोन्ही प्रमुख उमेदवारांचे मुद्दे काय आहेत तर, ट्रम्प म्हणे अमेरिका आणि मेक्सिकोच्या सीमेवर एक मोठी भिंत बांधणार, ज्यामुळे दक्षिण अमेरिकेतील दारिद्र्य आणि गृहयुद्धापासून पळून येणारे निर्वासित शरणार्थी अमेरिकेत घुसू शकणार नाहीत. तसे बघायला गेले तर दक्षिण अमेरिकेतील हे देश म्हणजे, कोलंबिया, निकाराग्वा, एक्वाडोर, होंडूरास, जिथून हे शरणार्थी जास्त येतात, अमेरिकी साम्राज्यवादाच्या वेग वेगळ्या धोरणांमुळेच उद्ध्वस्त झालेले आहेत. हॅरिस म्हणतात की त्या हेच काम भिंत न बांधताच करू शकतात! आर्थिक धोरणाबद्दल बोलायचे तर कमला हॅरिस यांची नीती नव-उदारवादी, तर डॉनल्ड ट्रम्पची नीती सामाजिक सुरक्षेविना नव-उदारवादी अशीच आहे!
एक महत्त्वाची गोष्ट या निवडणूक प्रचारादरम्यान घडली, ती म्हणजे डॉनल्ड ट्रम्पना जीवे मारण्याचा प्रयत्न. एका भाषणादरम्यान एक व्यक्तिने ट्रम्पवर गोळ्या झाडल्या. ट्रम्प थोडक्यात वाचले. बऱ्याच षड्यंत्रकारी सिद्धांतांना या घटनेनी उफाळी दिली. अब्जाधीश इलॉन मस्कच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “X”, जे आधी ट्विटर म्हणून प्रसिद्ध होते, त्यावर तर भरपूर षडयंत्र सिद्धांत “उघडकीस आणले गेले”. यानंतर मात्र स्वतः इलॉन मस्कने सुद्धा ट्रम्पला जाहीर पाठिंबा दिला आणि दर महिन्याला 45 मिलियन डॉलर सुद्धा ट्रम्पला द्यायचे घोषित केले. बदल्यात ट्रंप यांनी घोषित केले की निवडून आल्यास मस्कना महत्त्वाचे पद दिले जाईल आणि सरकारी यंत्रणेवरचा खर्च कमी करण्याची जबाबदारी दिली जाईल. अमेरिकेचे राजकारण गेली अनेक दशके सतत अशाचप्रकारे भांडवलदार वर्गाच्या खुल्या आर्थिक समर्थनातून आणि प्रचारातून चालू आहे, ज्यातून दिसून येते की भांडवली विचार, भांडवली मूल्य-मान्यता, भांडवलदार वर्गाचे हित हेच सर्व जनतेचे हित यासारख्या कल्पना तेथील प्रसारमाध्यमे किती प्रभावीपणे रुजवून आहेत.
या सगळ्या प्रक्रिये मध्ये एक गोष्ट गायब आहे; ती म्हणजे, कामगार वर्गाचा स्वतंत्र आवाज. ट्रंप जिंकून येवो वा हॅरीस, अमेरिकन कामगार वर्गाच्या जीवनात कोणताही मूलभूत फरक पडणार नाही. अमेरिकेतील कामगार वर्गाच्या चळवळीची स्थिती आज खूप दयनीय आहे. तेथे युनियन सदस्यता खूप कमी आहे, वेतन वाढीचे लढे सुद्धा फारसे होताना दिसत नाहीत. 2018 मध्ये शिक्षकांनी वेग-वेगळ्या राज्यांमध्ये संप पुकारला, आणि थोडे फार विजय सुद्धा झाला; पण त्यात एक स्वतःस्फूर्तता होती.; संघटित आणि योजनाबद्ध पद्धतीने राजकीय मागण्या घेऊन लढाया लढणे अजून अमेरिकेचा कामगार वर्ग करत दिसत नाही; याचे मुख्य कारण म्हणजे एका खऱ्या क्रांतिकारी कामगार पक्षाचा अभाव. कामगारांचे मुद्दे तेव्हाच ऐरणीवर येऊ शकतात जेव्हा एक खरा क्रांतिकारी कामगार पक्ष त्या मुद्द्यांना पुढे आणतो. जगात सर्वत्र असलेली कामगार चळवळीची वैचारिक आणि सांघटनिक कमजोरी अमेरिकेतही दिसून येते आणि तिला दूर केल्याखेरीज ना कामगार वर्गाचा पक्ष उभा राहील, ना क्रांतिकारी कामगार चळवळ उभी राहील, ना अमेरिकेतील भांडवली निवडणुकीच्या राजकारणात काही फरक पडेल.