मॅक्सिम गॉर्कीच्या वाढदिवसानिमित्त (28 मार्च) एक साहित्यिक परिचय

✍️ राजकुमार

मॅक्सिम गॉर्की (28 मार्च 1868 – 18 जून 1936) हे एक महान क्रांतिकारी लेखक आणि समाजवादी वास्तववादाचे प्रणेते म्हणून जगभरात ओळखले जातात. रशियातील झारशाही राजवटीत 1907 च्या अयशस्वी क्रांतीपासून ते 1917 च्या ऑक्टोबर समाजवादी क्रांती आणि त्यानंतरच्या समाजवादी बांधणीपर्यंतच्या दीर्घ काळात, मॅक्सिम गॉर्कीने आपल्या कथा, नाटके, लेख आणि कादंबऱ्यांद्वारे लोकांना त्यांच्या परिस्थितीविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक पावलावर प्रेरित केले. तो त्याच्या काळातील शोषित लोकांच्या आत्मिक भावनांचा आवाज म्हणून उदयास आला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते ऑक्टोबर क्रांतीनंतर सुमारे 40 वर्षांपर्यंत, गॉर्की यांनी त्यांच्या लेखणीने रशियन साहित्यात आणि लोकांमध्ये परिवर्तनाची नवी ऊर्मी निर्माण केली. शिवाय, त्यांचे सर्व सृजन लोकांच्या जीवनाशी आणि संघर्षांशी जवळून जोडलेले होते.

लहानपणापासूनच समाजातील शोषित वर्गांशी थेट संपर्कात असलेल्या गॉर्कीच्या लेखनाकडे त्यांच्या जीवनाच्या आणि त्या काळातील रशियन समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यांच्या साहित्यनिर्मितीचा स्रोत काय होता हे स्पष्ट होते. गॉर्कीचे आईवडील त्याच्या बालपणातच वारले आणि त्याने त्याचे बालपण त्याच्या आजीकडे घालवले, जिथे त्याला रशियन मध्यमवर्गीय कौटुंबिक वातावरणाचा अनुभव आला. आजीच्या मृत्यूनंतर, कुटुंबात मालमत्तेवरून भांडणे सुरू झाली, त्यानंतर गोर्कीने वयाच्या 13 व्या वर्षी घर सोडले आणि रशियामध्ये प्रवास केला, अनेक वेळा नोकरी बदलली. या काळात त्यांना समाजाचे अधिक जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळाली आणि ते अनेक प्रकारच्या लोकांच्या संपर्कात आले. अशाप्रकारे गोर्की लहानपणापासूनच मजूर म्हणून वाढला आणि त्याचे बालपण कठोर परिश्रम आणि संघर्ष करण्यात गेले, घरकामांपासून ते बेकरी कारखाने, जहाजे आणि शेतांपर्यंत विविध कामे करण्यात.

येणाऱ्या काळात, बालपणीचे हे अनुभव त्यांच्या साहित्यकृतींचा आधार बनले आणि ते लोकांच्या मुक्ती संग्रामाचा एक भाग म्हणून उदयास आले. त्यांच्या संपूर्ण साहित्यकृतीमध्ये, गॉर्की रशियन जीवनातील कठोर वास्तवांचे एखाद्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून वास्तववादी चित्रण सादर करत नाहीत, तर त्या परिस्थिती बदलण्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून ते वाचकासमोर येतात. गॉर्कीच्या शब्दांत सांगायचे तर, “दयेपेक्षा सत्य महत्त्वाचे आहे. आणि आज मी स्वतःची नाही, तर सामान्य रशियन लोक ज्या भयानक, गुदमरणाऱ्या वातावरणात जगत होते आणि अजूनही जगत आहेत, त्याची कहाणी लिहिण्यासाठी बसलो आहे.” “जुने जग निश्चितच एका प्राणघातक आजाराने ग्रस्त आहे आणि आपण त्या जगापासून लवकरात लवकर मुक्त झाले पाहिजे जेणेकरून त्याची विखारी हवेने आपल्यावर परिणाम करू नये.”

बालपणी, गॉर्कीची रशियातील झारशाहीच्या हुकूमशाही आणि दडपशाहीविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकांशी वेळोवेळी ओळख झाली. त्यांच्या जीवनाचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. “आणि अशा असंख्य लोकांच्या समूहातील एका व्यक्तीशी माझी पहिली मैत्री संपली, असे लोक जे स्वतःच्या देशात परदेशी आहेत, पण प्रत्यक्षात त्याचे सर्वोत्तम पुत्र आहेत…” या लोकांशी संपर्क साधल्याने गॉर्कीला पुस्तकांची ओळख झाली. गॉर्कीच्या जीवनातील परिस्थितीमुळे त्यांना कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही, परंतु त्यांनी स्व-अभ्यासाला आणि जनतेशी जोडून मिळवलेल्या अनुभवाला स्वत:च्या शिक्षणाचे केंद्र बनवले. गॉर्कीच्या शब्दात सांगायचे तर, “मी स्वतःची तुलना मधमाश्यांच्या पोळ्याशी करू शकतो, जिथे देशातील असंख्य सामान्य लोकांनी त्यांच्या ज्ञानाचा आणि तत्वज्ञानाचा मध गोळा केला आहे. सर्वांच्या मौल्यवान योगदानामुळे माझे चारित्र्य विकसित झाले. अनेकदा देणाऱ्याने घाणेरडा आणि कडू मध दिला, तरीही तो ज्ञानाचा मध होता.”

गॉर्कीने त्याच्या बालपणातच झारशाहीतील रशियन लोकांची गरिबी आणि अत्याचार पाहिले होते आणि त्या समाजात एक मोठ्या भागास शोषित वर्ग म्हणून जगण्यास आणि प्राण्यांसारखे जीवन जगण्यास भाग पाडले जात होते याची त्याला जाणीव होती. “मला त्यांच्यामध्ये स्वत:बद्दल जळत्या अंगाऱ्यात टाकलेल्या जळत्या लोखंडाच्या तुकड्यासारखे वाटत असे – दररोज मला अनेक तिखट अनुभव येत होते. माणसं त्यांच्या पूर्ण नग्नतेत – स्वार्थ आणि लोभाचे मूर्त स्वरूप म्हणून दिसू लागली. जीवनाबद्दलचा त्यांचा राग, जगातील प्रत्येक गोष्टीबद्दलचा त्यांचे उपहासात्मक शत्रुत्व आणि त्याच वेळी स्वतःबद्दलचा त्यांचा बेफिकीरपणा -“

त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या सुरुवातीला, गॉर्कीची ओळख टॉल्स्टॉय आणि चेखोव्ह सारख्या महान रशियन वास्तववादी लेखकांशी झाली. गॉर्की त्याच्या सुरुवातीच्या काळापासून क्रांतिकारी चळवळींशी संबंधित होते. नंतर, ते बोल्शेविक कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील झाले आणि लोकांच्या संघर्षांमध्ये जवळून सहभागी झाले आणि या काळात त्यांनी पक्षात सहभागी असलेल्या कामगार आणि क्रांतिकारकांच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित त्यांची जगप्रसिद्ध कादंबरी ‘आई’ (1906) लिहिली. जिच्याबद्दल लेनिन म्हणाले होते की ती वाचल्याने क्रांतीची उद्दिष्टे समजून घेण्यासाठी उत्स्फूर्तपणे चळवळीत सामील झालेल्या सर्व कामगारांना मदत होईल.

आजही, जेव्हा जगभरातील कामगार चळवळी गतिरोधित आहेत आणि प्रगतीवर प्रतिरोध वर्चस्व गाजवत आहे, तेव्हा गॉर्कीच्या कादंबऱ्या आणि कथा जगभरातील लोकांच्या संघर्षांशी अत्यंत प्रासंगिक आहेत. आजही त्यांचे लिखाण संपूर्ण जगातील कष्टकरी लोकांना समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी, परिस्थिती बदलण्यासाठी, क्रांतिकारी इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी आणि सर्वहारा वर्ग जाणीव विकसित करण्यासाठी उभे राहून लढण्यासाठी प्रेरित करते. गॉर्कीचे साहित्य आपल्या मनात सध्याच्या समाजातील लोकांच्या दयनीय परिस्थितीबद्दल द्वेष निर्माण करतेच, शिवाय त्या परिस्थितींविरुद्ध लढण्याची आणि त्या बदलण्याची इच्छाही निर्माण करते.

गॉर्की त्यांच्या ‘आई’ या कादंबरीत एका कामगाराच्या शब्दात आपले विचार व्यक्त करतात, “आपण फक्त पोट भरण्याची काळजी करतो का? नक्कीच नाही.” “आपल्या मानेवर बसलेल्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधणाऱ्याना आपण हे दाखवून दिले पाहिजे की आपल्याला सर्व काही दिसते. आपण मूर्ख नाही किंवा जनावरं नाहीत की आपल्याला पोट भरण्याशिवाय इतर कशाचीही चिंता नाही. आपल्याला माणसांसारखे जीवन जगायचे आहे! आपण हे सिद्ध केले पाहिजे की त्यांनी आपल्यावर लादलेले कठोर परिश्रमाचे जीवन आपल्याला बुद्धिमत्तेत त्यांच्यापेक्षा पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही!”

गॉर्कीने आपल्या साहित्यात रशियातील शोषित लोकांचे जीवन जितके जवळून पाहिले तितकेच स्पष्टपणे चित्रित केले आणि व्यापक जनतेला शिक्षित करण्यात त्यांनी अतिशय ऐतिहासिक भूमिका बजावली. त्यांच्या आत्मचरित्रात, गॉर्की यांनी लिहिले आहे की, “परिस्थितीच्या बंधनांना सहन करण्याची आणि त्यांच्या अधीन होण्याची गरज जितकी भयंकर आहे तितकी जगात कोणतीही गोष्ट माणसाला अपंग बनवत नाही.” गॉर्कीने त्यांच्या कथा, नाटके, कादंबऱ्या आणि लेखांमधून समाजाचे चित्रणच केले नाही तर त्यांचा वापर एक शस्त्र म्हणूनही केला, “अशा घृणास्पद गोष्टींचे वर्णन इतक्या प्रमाणात करणे आवश्यक आहे का? हो, ते आवश्यक आहे! हे आवश्यक आहे, साहेब, जेणेकरून तुमची फसवणूक होऊ नये, जेणेकरून तुम्हाला असे वाटू नये की अशा गोष्टी फक्त भूतकाळात घडल्या आहेत! आजही तुम्ही बनावट आणि काल्पनिक भयानक घटनांमध्ये रस घेता, सुंदर लिहिलेल्या भयानक कथा आणि कथा वाचण्यास तुम्हाला आवडते. अंगावर काटा आणणाऱ्या विचारांनी तुम्ही तुमचे हृदयाला भुलवण्यात घालमेल करत नाही.  पण मी खऱ्या भयानक घटनांशी, दैनंदिन जीवनातील भयानक घटनांशी परिचित आहे आणि हा माझा अविभाज्य अधिकार आहे की त्यांचे वर्णन करून तुमचे हृदयाला ओरबाडणे, त्यात ठणका निर्माण करणे जेणेकरून तुम्हाला नेमके कळेल की तुम्ही कोणत्या जगात आणि कोणत्या प्रकारचे जीवन जगता.” “आपण सर्वजण जगत असलेले हे नीच आणि घाणेरडे घृणास्पद जीवन आहे.” “मला मानवजातीवर प्रेम आहे आणि मी तिला कोणत्याही प्रकारचे दुःख देऊ इच्छित नाही, परंतु यासाठी आपण भावनिकता स्वीकारू नये किंवा चमकदार शब्द आणि सुंदर खोट्या गोष्टींचे जाळे बांधून जीवनाचे भयानक सत्य लपवू नये! आपण जीवनाकडे वळले पाहिजे आणि आपल्या हृदयात आणि मनात जे काही चांगले आणि मानवीय आहे ते जीवनात ओतले पाहिजे.”

भौतिकवादी म्हणून, गॉर्कीने मानवी स्वभावासाठी परिस्थितीला जबाबदार धरले आणि याकरिता जीवनातील भौतिक परिस्थिती बदलण्याचा आग्रह धरला: “रशियन लोक त्यांच्या गरिबी आणि एकाकीपणामुळे हे करतात. व्यथा आणि दु:ख्ह हे त्यांच्या मनोरंजनाचे साधन आहे.” “जेव्हा जीवनाचा प्रवाह एकसंध असतो, तेव्हा संकटे देखील मनोरंजनाचे साधन बनतात. घरात आग देखील नवीनतेचा आनंद प्रदान करते.”

गॉर्की, त्यांच्या काळातील वर्तमान जीवनावर टीका करण्याबरोबरच, वर्गीय समाजातील स्पर्धेच्या शर्यतीत मानवांच्या वैयक्तिक विघटनावरही जोरदार टीका करत होते आणि त्यांचा असा विश्वास होता की जोपर्यंत काही परजीवी कष्टकऱ्यांचे कष्ट हिसकावत राहतात तोपर्यंत समाजात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही. “संपूर्ण वातावरणात एकमेकांना गिळंकृत करण्याची एक अराजक प्रक्रिया सतत सुरू आहे; सर्व मानव एकमेकांचे शत्रू आहेत; स्वतःचे पोट भरण्यासाठी या घाणेरड्या लढाईत सहभागी होणारा प्रत्येक माणूस फक्त स्वतःचा विचार करतो आणि आजूबाजूला संशयाने पाहतो, जेणेकरून त्याच्या शेजाऱ्याने त्याचा गळा दाबू नये. या थकवणाऱ्या, क्रूर लढाईच्या भोवऱ्यात अडकून, बुद्धिमत्तेच्या सर्वोत्तम शक्ती इतरांपासून स्वतःचे रक्षण करण्यात वाया जातात; मानवी अनुभवाची ती प्राप्ती जिला “मी” म्हणतात ती एक अंधारे तळघर बनते ज्यात अनुभवाला अधिक समृद्ध न करण्याच्या आणि जुन्या अनुभवाला तळघराच्या गुदमरणाऱ्या खोल्यांमध्ये बंद ठेवण्याच्या क्षुद्र प्रवृत्ती वर्चस्व गाजवतात. भरलेल्या पोटाशिवाय माणसाला आणखी काय हवे आहे? हे ध्येय साध्य करण्यासाठी, माणूस त्याच्या उदात्त आदर्शांपासून घसरला आहे आणि जखमी अवस्थेत, डोळे फाडून वेदनेने ओरडत आणि कण्हत आहे.”

लोकांच्या मुक्तीलढ्यावर पूर्ण विश्वास असल्याने आणि क्रांतिकारी म्हणून त्या लढ्यात सहभागी असल्याने, गॉर्कीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आशावादाने भरलेला होता आणि लोकांवर दृढ विश्वास होता, “आपल्या जीवनाचे वेगळेपण असे नाही की ते पाशविकता आणि क्रूरतेच्या जाड थरात गुंडाळलेले आहे, तर या थराखाली तेजस्वी, बलवान, सर्जनशील आणि चांगल्या शक्ती विजयी होत आहेत आणि एक दृढ आशा निर्माण करत आहेत की तो दिवस दूर नाही जेव्हा आपल्या देशातील लोकांच्या जीवनात सौंदर्य आणि तेजस्वी मानवतेचा सूर्य उगवेल आणि तो नक्कीच उगवेल.”

गॉर्कीचे संपूर्ण जीवन आणि त्यांचे साहित्यिक कार्य जगभरातील कामगारांसाठी प्रेरणास्त्रोत आहे आणि आपल्याला प्रत्येक पावलावर अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रोत्साहित करते. त्यांचा असा विश्वास होता की, “भांडवली समाजात, माणूस एकूणच निरर्थक ध्येये साध्य करण्यासाठी आपली अद्भुत क्षमता वाया घालवतो. स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी, त्याला रस्त्यावर हातावर चालावे लागते, कमी किंवा काहीच व्यावहारिक मूल्य नसलेले वेगाचे रेकॉर्ड प्रस्थापित करावे लागतात, एकाच वेळी वीस लोकांसोबत बुद्धिबळाचे सामने खेळावे लागतात, आश्चर्यकारक कसरती आणि कविते रचनेचे खोटे पराक्रम करावे लागतात आणि सामान्यतः अशा सर्व प्रकारच्या निरर्थक कृती कराव्या लागतात ज्यामुळे कंटाळलेल्या आणि थकलेल्या लोकांचे मनोरंजन करता येईल….”

ऑक्टोबर क्रांतीनंतर, गॉर्की त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत सोव्हिएत युनियनमधील समाजवादी छावणीतील अनेक तरुण लेखकांचे उत्साहाने नेतृत्व करत राहिले. “पोलादाला चढले पाणी (अग्निदीक्षा)” या कादंबरीचे लेखक निकोलाई ओस्त्रेव्स्की यांनी 1936 मध्ये गॉर्कीबद्दल लिहिले: “आमच्या तुकडीतील कमांडर, एक उंच, पांढऱ्या केसांचा कमांडर – प्रसिद्ध आणि आदरणीय, त्याच्या कलेत पारंगत. मिशावर ताव मारत, हळू आणि अतिशय गंभीर स्वरात म्हणतो: ‘मी या ड्रॅगर्सचे काय करावे? ते मागे कुठेतरी बसून नाश्ता करत असतील’ .  ते पुढच्या पथकापेक्षा 50 मैल मागे असतील. त्यांचे स्वयंपाकघर मागे कुठेतरी दलदलीत बुडाले आहे. माझ्या केसाना लाजवताहेत ते. हा एक विनोद आहे, पण एक कटू विनोद आहे, त्यात सत्य कमी नाही.”

शेवटी, गॉर्कीच्या स्वतःच्या शब्दांत, “माझ्यासाठी, विचार माणसाच्या पलीकडे अस्तित्वात नाहीत. माझ्यासाठी, माणूस आणि फक्त माणूसच सर्व गोष्टींचा आणि सर्व कल्पनांचा निर्माता आहे. तोच चमत्कार घडवणारा आहे आणि तोच निसर्गाच्या भविष्यातील सर्व  शक्तींचा स्वामी आहे. आपल्या जगात जे काही सर्वात सुंदर आहे ते मानवी श्रम आणि त्याच्या कुशल हातांनी निर्माण केले आहे. आपल्या सर्व भावना आणि कल्पना श्रमाच्या प्रक्रियेत उद्भवतात आणि कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास याची पुष्टी करतो. विचार या वस्तुस्थितीचे अनुसरण करतात. मी माणसाला सलाम करतो कारण मला या जगात असे काहीही दिसत नाही जे त्याच्या ज्ञानाचे, त्याच्या कल्पनाशक्तीचे आणि त्याच्या निष्कर्षाचे मूर्त स्वरूप नाही.”

“जर एखाद्या “पवित्र” गोष्टीवर चर्चा करायची असेल, तर ती म्हणजे माणसाचा स्वतःबद्दलचा असंतोष, तो जे आहे त्यापेक्षा चांगले बनण्याची त्याची इच्छा. त्याने स्वतः जन्म दिलेल्या जीवनातील सर्व घाणेरड्या गोष्टींबद्दलचा त्याचा द्वेष मी पवित्र मानतो. जगातील लोकांमधील मत्सर, पैशाचा लोभ, गुन्हेगारी, रोग, युद्ध आणि शत्रुत्व संपवण्याची त्याची इच्छा आणि त्याचे श्रम मी पवित्र मानतो.”

मूळ लेख: मजदूर बिगूल, मार्च 2013

अनुवाद: राहुल