मानखुर्द झोपडपट्टी : स्वच्छता, पाणी, प्रदूषण व आरोग्याच्या समस्या आज सुद्धा कायम!

बबन ठोके

संविधानाच्या मते प्रत्येकास समानतेचा व बरोबरीने जगण्याचा अधिकार आहे, परंतु ही बाब जमिनी स्तरावर वास्तविकतेपासून कोसो दूर आहे. प्रत्यक्षात येथे दोन दुनिया अस्तिवात आहेत. एकीकडे 2018 च्या आकड्यानुसार भारतात 119 अब्जपती व 3,26,052 करोडपती आहेत. ज्याच्यासाठी शॉपिंग मॉल, हाय – वे, मल्टिप्लेक्स, स्मार्ट सिटी सारखे ऐशो-आराम व मौजमजेचे जीवन जगण्यासाठी सर्व साधने उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे 84 करोड गरीब व कष्ट करणारी जनता आहे. ज्यांच्यापैकी 36 करोड लोकांच्या डोक्यावर पक्के छप्पर नाही किंवा छत सुद्धा नाही. देशात प्रत्येक दिवसाला 5000 हजार लहान मुलं भूक, कुपोषण, उपासमारी व प्राथमिक स्तरातील आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे मरत आहेत. अलीकडेच बिहारमधील मुझफ्फरपूर येथे ‘चमकी बुखार’ या मुख्यत्वे पोषणाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारामुळे 140 पेक्षा जास्त कुपोषित मुलांचा मृत्यू झाला आहे. काय हे सामान्य मृत्यू आहेत का? नफा-तोट्यावर आधारित नफेखोर व भ्रष्ट व्यवस्थेने केलेल्या हत्या आहेत! विचार करा मित्रांनो, आज भारतातील फॅसिस्ट सत्ताधारी जमात येणाऱ्या दिवसात भारत महासत्ता व विश्वगुरू बनण्याच्या घोषणा व वल्गना करत आहे. तर दुसरीकडे देशातील गरिब-कष्टकऱ्यांना पिण्यायोग्य पाणी साफ-सफाई, शौचालय व स्वच्छते सारखे मूलभूत मानवी हक्क देखील मिळत नाहीत.

मुंबई हे जगातील सर्वात श्रीमंत असलेले 12 वे शहर आहे. या शहराचे एक चित्र कुलाबा, बांद्रा, जुहूमध्ये पाहायला मिळते. तिथे मोठ -मोठे रुंद रस्ते, हॉस्पिटल, स्वच्छ पाणी, चोवीस तास वीज यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे या ठिकाणचे सरासरी लोकांचे आयुर्मान 73.05 वर्षे एवढे आहे. तर दुसरीकडे याच शहराचे दुसरे चित्र गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, मंडाला सारख्या गरिबांच्या वस्त्या आहेत जिथे एकीकडे देवनार डंपिंग ग्राउंड व दुसरीकडे बायोगॅस ट्रीटमेंट प्लांट (एस.एम.एस.) कंपनीने घेरलेले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना मानवी जीवनासाठी आवश्यक स्वच्छ पाणी, शौचालये आणि स्वच्छतेची व्यवस्थादेखील नशिबात नाही. तिथेच एस.एम.एस. कंपनी देखील आहे, जिच्यामध्ये मुंबई शहरातील सर्व हॉस्पिटलचा मेडिकल कचरा जाळला जातो. त्यामुळे लोकांना दमा, टीबी, अस्थमा, कॅन्सर व त्वचेचे रोग होत आहेत. आणि आजपर्यंत कित्येक नागरिक, लहान मुले यामुळे मरण पावली आहेत. किती, त्याचा निश्चित आकडा देखील सरकारकडे नाही! आणि ह्याच भागात राहणारे गरीब स्वच्छता करून संपूर्ण मुंबईला चंमकविण्याचे काम करतात. अशा पद्धतीने श्रीमंत धनदांडग्यांच्या नगरांना आणि कॉलनीला साफ स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी गरिबांच्या वस्त्या बकाल, कचराकुंडी समान व नरकमय बनविण्यात येत आहेत. या ठिकाणी स्वच्छ पाणी नाही, आणि जे पाणी येते त्या पाण्यात देखील अनेक ठिकाणी गटाराचे पाणी मिळालेले असते. लोकसंख्येच्या प्रमाणात याठिकाणी शौचालये अतिशय कमी आहेत व जी आहे त्यात नियमित स्वच्छता होत नाही आणि अनेकदा तर पाणी देखील नसते. त्यामुळे ही शौचालये बऱ्याच रोगांचे कारण बनत आहेत. याच कारणांमुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सरासरी आयुर्मान फक्त 39 वर्ष इतके आहे!

परिणामी या भागांमध्ये मानवी विकास निर्देशांक आफ्रिकन देशांपेक्षा देखील मागे आहे. इथे 1000 हजार नवजात बालकापैकी 55 बालकांचा मृत्यू होतो. 57 टक्के मुले कुपोषित आहेत. एक मोठी लोकसंख्या दमा, टीबी, अस्थमा कॅन्सर व त्वचेचे रोग यांना रोज तोंड देत आहे. मागील वर्षी पावसाळ्याच्या अगोदर 17 नागरिक डेंगू आणि मलेरियाने मरण पावले. खरं तर हा आकडा फार कमी आहे. निश्चित सरकारी आकडा उपलब्ध नाही. संपूर्ण मुंबईला चमकविणारी गरीब व कष्टकरी जनता नरकमय जीवन जगण्यासाठी मजबूर व हतबल आहे व आपण राहत असलेल्या निवासी भागात मुलभूत सुविधा व स्वच्छतेच्या समस्येशी संघर्ष करत आहे. यांने हे स्पष्ट होते की, सरकार गरीब आणि श्रीमंतांसाठी दुहेरी मापदंड वापरत आहे. सामान्य जनतेकडून जमा केलेल्या टॅक्सच्या बळावर नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक व सरकारी अधिकारी मोठा पगार व पेन्शन घेतात व सोबत सर्व सरकारी सुविधांसह मजेत जीवन जगत असतात. परजीवी धनदांडग्यांसाठी चकचकीत अपार्टमेंट, मोठ्या पॉश कॉलन्या व अलिशान बंगले बनविण्यात येतात, शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, एक्सप्रेस-वे बनविले जातात. धनदांडग्यांच्या व श्रीमंतांच्या मस्तीखोरीने निर्माण झालेला कचरा, घाण व मलमूत्र आपल्या वस्त्या, चाळी, झोपड्यांच्या आसपास फेकले जाते. कारण आपण कष्टकरी लोक त्यांच्यालेखी जनावरापेक्षा देखील खाली आहोत. हेच आजचे वास्तव आहे.

मुंबईत मानखुर्द, शिवाजीनगर व गोवंडी विभागातील झोपडपट्ट्यात राहणाऱ्या लोकांचे प्रमुख व्यवसाय हे बांधकाम मजूरचे काम करणे, खाजगी ठिकाणी हाउसकीपिंग, महानगरपालिकेत कचरा गाडीवर, झाडू खात्यात ठेकेदारी ने काम करणे, ऑफिसमध्ये खालच्या दर्जाची कामे करणे, रिक्षा चालवणे आहे. साठेनगर येथे महिला श्रीमंतांच्या घरात घरकाम करणे, डोक्यावर टोपली घेऊन नवी मुंबई मध्ये लसून विकणे, तसेच घरात बसून पीस रेटवर विणकाम, ड्रेस आणि साड्यांना डिझाईन लावण्याचे काम करतात. या कामात डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अनेक जण छोटे-मोठ्या गाड्या लावणे, फेरीवाल्यांची कामे करणे अशी देखील कामे करतात व सोबत अनेक छोटे उद्योग व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी चालू असतात. संपूर्ण मुंबईभर लागणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीची कामे व एकूणच पोटापाण्यासाठी मिळेल ते काम करण्याची तयारी या ठिकाणी लोकांची दिसून येते. मानखुर्द विभागात प्रारमुख्याने मराठवाड्यातून, उत्तर प्रदेश व बिहार या ठिकाणावरून कामाच्या शोधात मुंबईत आलेल्यांचे प्रमाण मोठे आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी कडे पाहिले जाते पण आता हे समीकरण बदलले आहे कारण धारावीला मागे टाकत मुंबईत धारावी पेक्षाही मोठ्या चार झोपडपट्ट्या उदयास आल्या आहेत. मागील काही वर्षात कुर्ला, घाटकोपर, भांडुप, गोवंडी व मानखुर्द झोपडपट्टी उदयास आली आहे. गोवंडी व मानखुर्द प्लास्टिक आणि पत्र्याच्या घरात उदयास आलेली झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी 1980 च्या दरम्यान वसण्यास सुरुवात झाली. याच झोपडपट्टीच्या बाजूला देवनार डंपिंग ग्राउंड आहे.

देवनार डंपिंग ग्राउंडची समस्या

देवनार डंपिंग ग्राउंडवर 1 करोडी 24 लाख लोकांचा 9000 हजार मेट्रिक टन कचरा प्रत्येक दिवसाला टाकला जातो. डंपिंग ग्राउंडची कचरा टाकण्याची क्षमता 2016 मध्येच संपली आहे. देवनार डंपिंग ग्राउंड ला बंद करण्यासंबंधीचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तरीसुद्धा पालिका यासाठी काहीच पावले उचलत नाही. किंबहुना असे म्हणायला काहीच हरकत नाही की, हे डंपिंग ग्राउंड गरिबांच्या वस्ती शेजारी असल्याने पालिका उदासीन आहे. देवनार डंपिंग ग्राउंडवर वारंवार आग लागत असल्याने वायू प्रदूषणाची समस्या फार गंभीर झाली आहे. त्यामुळे आज आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे. व त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या मिर्माण होत आहेत. हे डंपिंग ग्राउंड बंद न होण्याचे हे देखील कारण आहे की, या ठिकाणी भंगार माफिया द्वारे प्रत्येक महिन्याला करोडोंचा व्यापार केला जातो आणि यात पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यापासून ते आमदार, खासदारांपर्यंत सर्वांचे हित जोडलेले आहे.

बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट (एस.एम.एस. कंपनी) व विषारी धुराचे साम्राज्य

चकचकीत मुंबईत एक भाग असा देखील आहे की, जिथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मानखुर्द-घाटकोपर लिंक रोडवर साठेनगर च्या बाजूला असलेल्या बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट चा काळा धूर नियमित पाहणे आणि नाकातून शोषणे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसाठी आयुष्याचा भाग बनला आहे. मुंबईतील सरकारी व खाजगी हॉस्पिटल, डिस्पेंसरी व इतर जागेवर निघालेला बायोमेडिकल कचरा या ठिकाणी जाळला जातो. याच कारणामुळे हा प्रकल्प दिवसाचे 24 तास व वर्षाचे 365 दिवस हवेत विषारी धूर सोडत असतो. यामुळे बहुतेक लोकांना दमा, टीबी, अस्थमा, कॅन्सर व त्वचेचे रोग अशा प्रकारे रोग झाले आहेत. व कित्येक लोकांचे जीव याच कारणामुळे गेले आहे. व आज देखील हे सत्र नियमित चालू आहे. याची कल्पना पर्यावरण मंडळाला व पालिकेला पूर्णपणे आहे. तरी देखील कोणीच याबद्दल बोलत नाही. कारण 50 करोड वार्षिक उत्पन्न असलेल्या कंपनीकडून यासाठी मोठी रक्कम नियामितपणे मोजली जाते. 2001 मध्ये सुरू झालेला हा प्लॉट अगोदर शिवडी मध्ये होता. श्रीमंत वस्तीच्या शेजारी असल्या कारणामुळे त्या ठिकाणावरून हटविण्यात आला. उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश असताना देखील 2009 मध्ये या प्लॉटला नागरिक वस्तीच्या मधोमध पर्यावरण मंडळ व महानगरपालिकेच्या सहयोगाने व सहकार्याने गरिबाच्या वस्तीत हा प्लांट लावण्यात आला. गरिबाच्या जीवाची किंमत सरकारला अजिबात नाही याचे हे प्रतिनिधिक उदाहरण आहे. 10 लाख लोकसंख्या असलेल्या भागात हा प्लॉट 2009 पासून सुरू आहे. हा प्रकल्प या विभागातील नागरिकांची जीवन-मरणाची मोठी समस्या आहे.

स्वच्छ व पिण्यायोग्य पाण्याची समस्या

स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी मिळणे हा खरतर मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येकाला तो मिळणे गरजेचे आहे. (डब्ल्यूएचओ) जागतिक आरोग्य संघटनेने देखील सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीला 150 लिटर पिण्यायोग्य पाणी मिळायला पाहिजे. पण गरिबांची मुंबई असलेल्या मानखुर्द मधील जवळजवळ सर्वच भागातील 60% लोकांना हा अधिकार मिळतच नाही.आणि जे मिळते ते देखील इतके घाण असते कि ते पिण्यायोग्य तर नसतेच, कधी-कधी तर गटाराचे पाणी देखील त्यात मिळालेले असते. साठेनगर सारख्या झोपडपट्ट्यात पाच घरांना मिळून एक नळ अशी व्यवस्था असते. त्यामुळे सर्वांना पुरेसे पाणी मिळत नाही. आणि त्यामुळे कित्येक वेळेस मारामारी झाल्याचे प्रकार देखील वारंवार समोर येतात. कधी कधी तर हे प्रकार एकमेकांच्या जीवावर उठल्याचे निदर्शनात येते. उन्हाळा लागल्यानंतर पालिकेकडून जाहीर फर्मान काढून गरिबांच्या वस्तीतील पाण्यात कपात केली जाते. तर श्रीमंतांना मुबलक प्रमाणात पाणी सुरूच असते. अशा झोपडपट्ट्यात ‘पाणी माफियां’ कडून पाणी चोरी करून इतर झोपडपट्टीवासियांना विकले जाते. पाण्यासाठी लोकांना 400 ते 100 हजार रुपये प्रतिमहिना एवढी रक्कम मोजावी लागते. अजून एक चित्र हे देखील आहे की, झोपडपट्टीतील 50% झोपडपट्ट्यांची नोंद पालिकेच्या दरबारी नाही. पालिका यंत्रणा पाणीपुरवठा करण्यात असक्षम ठरली असून त्यामुळे देखील पाण्याची विक्री करणारे पाणी माफिया पालिका कर्मचारी, अधिकारी व प्रशासनाच्या आशिर्वादाने सक्रिय आहेत. गरिबीत राहणाऱ्या या नागरिकांच्या व्यथाकडे मात्र व्यवस्थेकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे व त्याची किंमत हातावर कमावून पानावर खाणाऱ्या गरिबांना मोजावी लागते आहे.

आरोग्याचा प्रश्न

मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर व मंडाला सारख्या लाखो लोक राहत असलेल्या विभागात लोक आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. ज्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिवसाचे 24 तास व वर्षाचे 365 दिवस असेल, त्या ठिकाणी या समस्या असणे यात तस आश्चर्य देखील नाही. या परिसरात गर्दी व कोंदट वातावरणामुळे टीबीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर आहे असे निरीक्षण अनेक डॉक्टरांनी नोंदविले आहे. देवनार डंपिंग ग्राउंडमुळे होणारे धुराचे प्रदूषण व दाटीवाटीच्या वस्त्या, उघडी गटारे, घाणीचे साम्राज्य, व 10 लाख लोकांना सरळ प्रभावित करणारा बायोवेस्ट ट्रीटमेंट प्लांट हे अनेक कारणांपैकी प्रमुख कारणे आहेत. मुंबई शहरात 40,000 टीबी पेशंट ची नोंद आहे. त्यापैकी सर्वात मोठा हिस्सा हा मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर भागातील आहे. प्रदूषणाचे प्रमाण जास्त असल्या कारणामुळे अनेकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत. हॉस्पिटलमधील उपचार सुरु जरी केला तरी आर्थिक कारणामुळे उपचारात सातत्य ठेवणे परवडणारे नसते. त्यामुळे अनेकांचा श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला आहे. सोबतच घाणीच्या साम्राज्यामुळे क्षयरोग, दमा, अस्थमा, डेंगू, मलेरिया यासारखे अनेक रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागते. परिणामी मृत्यूला देखील कवटाळावे लागते. साठेनगर, मंडाला, पीएमजीपी, लल्लूभाई कंपाउंड, झाकीर हुसेन नगर, शिवाजीनगर अशा 6 ते 7 लाख लोकसंख्या असलेल्या विभागात एक सुद्धा दर्जेदार सरकारी दवाखाना नाही. त्यामुळे सायन हॉस्पिटल किंवा शताब्दी हॉस्पिटल यासारख्या हॉस्पिटला पोहोचेपर्यंत कित्येकांना मधीच जीव सोडावा लागतो.

गटर, नाली,चेंबर, दिवाबत्ती व सांडपाण्याची समस्या

मानखुर्द सारख्या झोपडपट्टीत गटर, नाली, चेंबर या समस्या फार गंभीर आहेत. साठेनगर सारख्या चाळीमध्ये तर चाळीच्या मधोमध जाणारे नाले हे उघडेच असते त्यामुळे घाणीतील माशा जेवणावर सहज येऊन बसतात. तर उघड्या नाल्यांचे डास चावल्याने देखील आजारांना तोंड द्यावे लागते . साठेनगर, देवनार, झाकिर हुसेन नगर सारख्या भागात कित्येक चेंबरचे ढापे तुटल्याने नवीन ढापे लावले जात नाहीत. परिणामी बऱ्याच वेळेस अंधारात लहान मुला सहित मोठी माणसे देखील यात पडली आहेत व त्यात कित्येकांचा मृत्यू देखील झाला आहे; पण पालिकेच्या नाकावरची माशीदेखील उठायला तयार नाही. इथे नाले हे वर्षानुवर्षे असेच मोडकळीस पडलेले आहे,. त्याची देखील दुरुस्ती नाही. दिवाबत्ती देखील बऱ्याच ठिकाणी बंदच असते किंवा अजिबातच नसते. पावसाळ्यात या सर्व बाबीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो. भांडवली राजकीय पक्ष, शासनकर्ते आणि सरकारने स्वतःच्या स्वार्थासाठी गरज म्हणून झोपडपट्टी आणि झोपडपट्टीतील नागरिकांचा वापर केला पण त्यांच्या नियोजन व गरजांची पूर्ततेकडे कधीच पाहिले नाही. मानखुर्द, देवनार, गोवंडी भागातील जनतेमध्ये स्वछता, पिण्याचे पाणी, नाली, चेंबर, सांडपाणी, प्रदूषण इत्यादी मुद्यांवर असंतोष खदखदत आहे. जनतेने संघटीत होऊन सन्मानाने जगण्याच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरणे आज गरज बनली आहे.

 

कामगार बिगुल, जुलै 2019