तुमच्या देवाचा ऱ्हास

राहुल सांकृत्यायन (अनुवाद – प्रवीण सोनवणे)

लेखकाचा   परिचय

राहुल सांकृत्यायन (1893-1963) खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री  गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे  हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.

जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ  शकते की,  ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा,  साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती.  इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र,  मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?,  बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.

राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर  करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”

राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं साचलेपणा. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त  भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख  करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.

समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरुध्द तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.


मूल आईच्या पोटातून देवाचा विचार घेऊन जन्माला येत नाही. भूत, प्रेत तसेच इतर संस्कारां प्रमाणेच देवाचा विचार सुद्धा मुलाला आई-वडील तसेच भोवतालच्या सामाजिक वातावरणातून मिळत असतो. विश्वातील धर्मांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी आज सुद्धा सर्वात जास्त आहेत, परंतु त्यांच्या मनामध्ये सृष्टीकर्त्याचा विचार सुद्धा येत नाही. रशियाची नव्वद टक्के जनता सुद्धा ईश्वराच्या भानगडी पासून मुक्त झालेली आहे आणि काही म्हाताऱ्यांना सोडलं तर हा विचार इतर कोणालाही भेडसावत नाही. हे निश्चित आहे की या म्हाताऱ्यांच्या मरणानंतर देवाचे नाव घेणारे तिथे कोणीच उरणार नाहीत. हिंदुस्थानामध्ये प्रार्थना सभा आणि हरिकीर्तन पाहून काही माणसांना असे वाटते की देवाचा विचार पुन्हा जोर धरत आहे. त्यांना माहीत नाही की ज्या लोकांमध्ये देवावरचा विश्वास आहे, त्यांच्यात सुद्धा आता त्याची व्याप्ती खूपच कमी झाली आहे.
ज्या समस्यांना, ज्या प्रश्नांना, ज्या नैसर्गिक रहस्यांना जाणून घेण्यात माणूस स्वतःला असमर्थ समजत होता, त्याचसाठी तो ईश्वराचा समज करून घेत होता. प्रत्यक्षात देवाचा विचार तर आहे सुद्धा अज्ञानाचीच निर्मिती. सुरुवातीचा माणूस जेव्हा घर बांधून राहत नव्हता, स्वतःच्या रक्षणासाठी जेव्हा त्याच्याकडे काही ओबडधोबड दगडां शिवाय काहीच नव्हते आणि सोबतच सर्व जमीन जंगलाने व्यापलेली होती ज्यामध्ये सिंह, वाघ, हत्ती, लांडगे इत्यादी मोठ-मोठे हिंस्र पशू फिरत फिरत असायचे. दिवसासुद्धा झाडांवर चढून, गुहांमध्ये लपून, अतिशय जागरूक राहून तो कसा तरी आपला जीव वाचवत होता. अंधारामध्ये त्याची वाट पाहत टपून बसलेल्या जंतूंची भीती तर त्याला घाबरवून टाकत होती. अशाप्रकारे तो अंधार प्राकृतिक मानवाच्या आजपर्यंतच्या भीतीचं कारण बनून राहिला आहे. हो, जेव्हा पुढे चालून माणसाने भाषेचा विकास केला, विचारांना व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे काही शब्दकोश तयार झाला आणि जेव्हा प्रत्येक पिढी आपल्या अनुभवांच्या कटू आठवणींना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला लागली, तेव्हा प्रत्यक्षातील वास्तवापेक्षा काल्पनिक भीतींची संख्या खूपच वाढत गेली. आयुष्यभर आपले बलिष्ठ शासक आणि नेत्यांना माणूस थर-थर कापत होता. तो आपल्या आश्रितांसोबत बोलण्यापेक्षा, त्यांना लाथांनीच तुडवायचा. या सामान्य शिक्षण-प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये कित्येक आंधळे, कित्येक लंगडे व्हायचे आणि कित्येक जिवानिशी जायचे. अशा निर्दयी मालक आणि प्रमुखांची भीती त्यांच्या मरणानंतर सुद्धा लोकांच्या मनातून जायची नाही. मेल्यानंतर सुद्धा ते आपल्या वस्त्यांमध्ये एखाद्या झाडावर अथवा एखाद्या कट्ट्यावर त्याचे संचार आहे असे मानू लागायचे. अंधार पडल्यावर कोणत्याही वेळी त्यांच्या प्रकट होण्याची भीती होती. अज्ञात भयाने अशाप्रकारे देवाचं रूप धारण केलं. आणि हेच विचार पुढे चालून महान देव (महादेव) किंवा ईश्वराच्या रूपामध्ये विकसित झाले.
सुरुवातीच्या माणसाचा मानसिक विकास अजूनही खालच्या पातळीवर होता. त्याच्या शंका साध्या आणि निरसन सोपं होतं. पाऊस का पडतो? पर्जन्य देवतेच्या नेतृत्वामध्ये ढगांचे समूह एखाद्या जलाशय किंवा डोंगरांमध्ये चरायला जातात, ते तेथून पाणी घेऊन पर्जन्याच्या आदेशानुसार ठिकठिकाणी पाऊस पाडतात. इंद्र हा पावसाचा स्वामी आहे. तो कधीकधी वज्र चालवून आपला राग दाखवत असतो. हाच मेघनाद किंवा वीज आहे. डोंगरांच्या आकारांना ढगांच्या आकाराशी मिळतेजुळते पाहून त्या काळातील लोक समजत होते की डोंगरच आकाशामध्ये ढगांच्या रूपांमध्ये उडत आहेत. त्यांच्या विश्वासा नुसार डोंगरांना पंखसुद्धा होते, ज्यांना इंद्राने नाराज होऊन कधीकाळी आपल्या वज्राने कापून टाकले. प्रातःकाळी पूर्व दिशेला तांबडं फुटल्याबरोबर लाली का पसरते? हा उषेचा, स्वर्गातील देवीचा प्रताप आहे. त्याकाळी सूर्य आपल्या प्रखर तेजामुळे तप्त देव होता, आणि तो सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन त्रिभुवनाच्या यात्रेसाठी निघत होता. आगीच्या जवळ मोठ-मोठे हिंस्र पशू येऊ शकत नाहीत. मोठ-मोठाली झाडं आणि विशाल (ब्रम्ह) जंगलांना ती ढणा-ढणा जाळून टाकते. यामुळेच आग प्रत्यक्ष होती आणि तिला ते प्रत्यक्ष महान म्हणत होते. नदी, समुद्र हे सगळेच त्या माणसांसाठी देव होते, कारण त्यांच्यामध्ये ते अमानवीय दिव्यशक्ती पहात होते, विनाश घडवून आणण्याची भीषण क्षमता पाहत होते. त्यांच्यामध्ये अशी अद्भुत रहस्य माणसांना दिसत होती ज्यांच्या गुंत्याला ते देवाच्या कल्पनेनेच सोडवू शकत होते. मानवाने नैसर्गिक शक्तींमध्ये अनेकेश्वरवादाला आपल्या ज्ञानाच्या मर्यादा खूप संकुचित असल्या कारणाने स्वीकारले होते. आता आम्हाला माहिती आहे, की ढग कसे तयार होतात, पाऊस कसा पाडतात, कुठून कुठला प्रवास करतात. कोण- कोणते देश त्यांच्या मार्गावर आहेत आणि कोणते दूर. वीज ढगांमध्ये कोणत्या कारणाने निर्माण होते? गडगडाट काय आहे? सूर्य आता आपल्यासाठी घोड्यांच्या रथावर स्वार राहिलेला नाही, आणि ना त्याचे ते गोल तोंड, दोन डोळे आणि आणि काळ्या मिशा असलेला चेहरा राहिलाय. त्याचा प्रवास सुद्धा आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. उषादेवी आता सूर्याच्या निम्नतर लाल किरणांच्या व्यतिरिक्त वेगळं काहीच नाहीये. सुरुवातीच्या माणसासाठी सूर्य आकाशामधील सर्वात मोठा विशाल आणि तेजस्वी देव होता. आता आम्हाला माहिती आहे, की आकाशामध्ये चमकणारे हे छोटे -छोटे तेजपुंज तारे तेवढे छोटे नाहीत जेवढे आम्हाला दिसतात. त्यांच्यापैकी बहुतेक आपल्या सुर्यापेक्षाही लाखो पटींनी मोठे आणि तेजस्वी आहेत. आकाशाला अनंत म्हणून पूर्वजांनी त्याच्या विस्ताराचा एक अंदाज लावला होता, परंतु तो वास्तवाच्या आधारावर न होता अज्ञानाच्या आधारावर बांधलेला होता. प्रकाशाची गती प्रतिसेकंद एक लाख ऐंशी हजार मैल आहे. आजपर्यंत आम्हाला सर्वात जवळचा जो तारा माहित झाला आहे, तो इतका दूर आहे की त्याची किरणं आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडीच वर्षे लागतात. ध्रुव तारा आमच्यापासून दूर नाहिये, पण त्याच्या ज्या रूपाला आम्ही यावेळी पहात आहोत, ते आजपासून पन्नास वर्षांपूर्वीचे आहे. दहा-वीस हजार वर्षांमध्ये आपल्या किरणांना आमच्या पर्यंत पोहोचवणाऱ्या ताऱ्यांबद्दल आपण आश्चर्य करण्याची गरज नाही.. नक्षत्रमंडळामध्ये असेही तारे आहेत ज्यांच्या अंतराला किरणांच्या प्रवासाच्या वर्षांमध्ये सुद्धा सांगणे अवघड आहे. तारे, खगोल आणि प्राकृतिक जगाबद्दलच्या आपल्या या अज्ञानाला मनुष्य देवतांच्या आणि ईश्वराच्या आड लपवत होता..
भूकंप का होतो? चपट्या सपाट पृथ्वीच्या अवजड वजनाला शेषनागाने आपल्या खांद्यावर उचलून धरले आहे. थकल्यावर तो जेव्हा तिला एका खांद्यावरून उचलून दुसऱ्या खांद्यावर ठेवतो तेव्हा भूकंप होतो. आज कोण बरे या व्याख्येला मानू शकतो? कोण चंद्र आणि सूर्याच्या ग्रहणाला राहू राक्षसाचा अत्याचार म्हणू शकतो? परंतु कधीकाळी आपल्या पूर्वजांसाठी ह्या गप्पा म्हणजे अटळ सत्य होत्या. विज्ञानाने आपल्या अज्ञानाच्या मर्यादांना, कित्येक बाजूंनी अतिशय मर्यादित करून टाकलं आहे; आणि जितक्या लांब पर्यंत आपल्या ज्ञानाच्या सीमा वाढत गेल्या, तिथून ईश्वर आणि देवाच्या नावाचे उत्तर बाजूला सरत गेलं. अजूनही अज्ञानाचे क्षेत्र अतिशय विस्तृत आहे, परंतु आजची माणसं त्याला सरळ अज्ञानाच्या रूपात स्वीकारण्यासाठी तयार आहेत, ना की ईश्वर आणि देवाच्या पडद्याआड लपविण्यात.
धर्माच्या, भाषांच्या आणि कथांच्या तुलनात्मक अभ्यासातून दिसून येते की सृष्टिकर्त्या एका ईश्वराचा विचार माणसांमध्ये खूप नंतर आलेला आहे. जगातील सर्वात जास्त प्रगत जमाती युनानी, रोमन, हिंदू, चिनी, मिस्र इत्यादी तर आपल्या भरभराटीच्या मध्य काळापर्यंत याला स्वीकारण्यास तयार झाल्या नाहीत ;आणि त्यांच्यापैकी एखादीने या विचाराला मानले सुद्धा तरी सामीय धर्म वाल्यांसारखे वैयक्तिक ईश्वराच्या रूपांमध्ये नाही, तर विश्वरूप ईश्वराच्या रूपामध्ये.
अज्ञानाचे दुसरे नावच ईश्वर आहे. आपण आपल्या अज्ञानाला सरळ स्वीकारण्यास लाजत असतो, त्याच मुळे त्याच्यासाठी गोंधळलेले नाव ‘ईश्वर’ शोधून काढले गेले आहे. ईश्वरावरील विश्वासाचं दुसरं कारण म्हणजे माणसाची दुर्बलता आणि लाचारी आहे.
आल्या दिवशी येणारी सगळ्या प्रकारची संकटं, नैसर्गिक दुर्घटना, शारीरिक आणि मानसिक आजारांच्या असहाय्य वेदना सहन करता-करता जेव्हा माणसाला वाचण्याचा कोणताच रस्ता दिसत नाही, तेव्हा तो हे म्हणून समाधान करून घेऊ पाहतो की देवाची हीच इच्छा आहे; तो जे काही करतो, चांगलंच करतो; तो आमची परीक्षा घेत आहे, भविष्यातील सुखाला आणखीनच सुंदर बनवण्यासाठी त्याने हे नियोजन केले आहे. अज्ञान आणि असमर्थते शिवाय जर कोणताही इतर आधार ईश्वर-विश्वासासाठी आहे, तर तो आहे श्रीमंत आणि धूर्तांचा आपल्या स्वार्थाच्या रक्षणासाठीचा प्रयत्न. समाजामध्ये होत असलेल्या हजारो अत्याचार आणि अन्यायांना योग्य ठरविण्यासाठी त्यांनी ईश्वराचा बहाणा शोधून काढला आहे. धर्माच्या पाखंडाला चालविण्यासाठी आणि त्याला न्याय सिद्ध करण्यासाठी ईश्वराचा विचार खूपच सहाय्यक आहे. या संबंधात धर्माविषयी आम्ही अगोदरच लिहिले आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज वाटत नाही.
देवावरील विश्वास एका छोट्या मुलाच्या भोळ्याभाबड्या विश्वासा व्यतिरिक्त काहीच नाही. फरक एवढाच आहे की छोट्या मुलांचा शब्दकोश, दृष्टांत आणि तर्कशैली मर्यादित असते आणि मोठ्यांची थोडीशी विकसित. बास एवढाच विशेष फरक आपण या दोघांमध्ये पाहत असतो. एकदा तीन छोट्या-छोट्या मुलांनी माझ्याशी ईश्वरा बाबत चर्चा केली. त्यांचे वय सात आणि दहा वर्षांमधील होते. विचारले की देव कुठे राहतो, तर उत्तर मिळाले—”आकाशामध्ये”. पृथ्वीवर म्हटले असते तर प्रत्यक्ष दाखवण्याची गरज पडली असती कारण धरती प्रत्यक्षाच्या सीमेमध्ये आहे. आकाश अज्ञानाच्या सीमेअंतर्गत आहे म्हणून तिथे देवाचे अस्तित्व जास्त सुरक्षित आहे. देवाच्या रंग-रूपाविषयी मुलांचं एक मत नव्हतं. कोणी त्याला आपल्यासारख्या चेहऱ्याचा सांगत होते तर कोणी विचित्र चेहऱ्याचा. “ईश्वर काय करतो?” हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता. याला मुलेसुद्धा अनुभवत होती कारण ज्या वस्तूचा आकार प्रत्यक्ष नसतो, तिची सत्ता तिच्या कार्यानेच सिद्ध केली जाऊ शकते. मुलांनी सांगितले—”तो आम्हाला जेवण देतो.” “आणि तुमचे वडील?”—”वडिलांना देव देतो.”
“ज्या दिवशी वडील कचेरीत वकिली करण्यासाठी जात नाहीत, त्या दिवशी का नाही त्यांच्या खिशात पैसे येत?” मुलांना समाजाच्या कठीण बांधणीची तेवढी माहिती नसते आणि जुगाराच्या खेळांसारखं वास्तविक न्याय न करता, कशाप्रकारे शंभर रुपये हरवून दोघांना जिंकले जाते, याची सुद्धा त्यांना कल्पना नसते. म्हणून त्यांनी अशा प्रकारचे प्रश्नोत्तर विचारले नाहीत. हो, त्यांना हे समजले की जोपर्यंत खाणेपिणे, कपडे, घर, खेळ-तमाशांचा खर्च देण्याचा प्रश्न आहे, त्याची काळजी आई-वडील आणि नातेवाईकांकडून घेतली जाते. तिथे ईश्वराची मदत संदिग्ध होऊन जाते. परंतु जेव्हा त्यांना विचारले गेले—”तुम्हाला डोकेदुखी कोण देतं? आई-वडील की सगे-सोयरे?”— तर ते व्याकूळ होऊन जातात, “आई आणि वडील असं का करतील?” तिथे ईश्वराचा हात असणं त्यांना सहजतेने मान्य करायला लावता आलं.
“आणि पोटदुखी?”— देव देतो.
“टीबी ने खंगवून खंगवून तुमच्या शेजाऱ्याला कोणी मारले?”— “देवाने.”
“सात दिवसाच्या बाळाच्या आईला मारून कोण त्याला अनाथ करतो?”— “देव.”
“आईच्या एकुलत्या एका मुलाला मारून कोण तिला असा दुःख विलाप करायला भाग पाडतो ज्याला ऐकून पशुपक्षी आणि दगडांचे सुद्धा हृदय पिळवटून निघते?”— “ईश्वर.”
“चैत्र वैशाखाच्या दिवसांमध्ये एका-एका आंब्यावर दहा-दहा कोटी किड्यांना फक्त ऊन आणि हवेमध्ये मरण्याची मजा चाखण्यासाठी कोण जन्माला घालतो? पावसाळ्याच्या दिवसात पृथ्वीवर असंख्य डास, जीवजंतूंना तिळातिळाने मरण्यासाठी जन्माला घालून आपल्या अमर्याद दयेचा परिचय कोण देतो?— “ईश्वर.”
“मग तर त्याच्यामध्ये थोडीशीही दया नाही. तेवढी सुद्धा नाही जितकी क्रुरातिक्रुर माणसामध्ये सुद्धा असू शकते. रडणाऱ्या मुलाला पाहून दगडाचं मन सुद्धा पघळतं . तुम्हीसुद्धा त्याच्या आईला त्यादिवशी छोट्या बाळाच्या मरणानंतर रडताना पाहून हळहळ व्यक्त करत होतात की नाही?”
“मी सुद्धा रडत होतो. कसं सुंदर बाळ, त्याचा गोल-गोल चेहरा, मोठ-मोठे डोळे आणि बिना दातांच्या चेहऱ्याने हसताना गालांवर पडलेली खळी अजूनही लक्षात आहे.”
“अशा बाळाला मारणारा कोण?— माणूस की राक्षस?”—”राक्षसापेक्षाही खराब.”
हो, जगामध्ये प्राण्यांच्या सुखाचे क्षण कमी आणि दुःखाचे जास्त आहेत. एक डासाचीच प्रजाती घ्यावी, तर त्याची संख्या शंख-महाशंखा (अनुवादकाचे टीपण: 1 शंख = 100 अब्ज) पेक्षाही वर जाईल आणि अशा प्रकारच्या प्रजाती सुद्धा आपल्या या पृथ्वीवर अब्जावधी असतील. अत्यंत सूक्ष्म अशा, सूक्ष्मदर्शीने दिसणाऱ्या किड्यांपासून ते समुद्रातील विशाल माशांपर्यंत अब्जावधी प्रजाती आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक प्रजातींमध्ये शंख-महाशंखाच्या संख्येने प्राणी आहेत. असे म्हटले जाते की जो मनुष्य इथे या लोकात निकृष्ट कर्म करतो तोच परलोकी किंवा पुनर्जन्मामध्ये निकृष्ट योनीमध्ये शिक्षा भोगण्यासाठी जन्माला येत असतो. परंतु हे म्हणणे टिकत नाही, कारण या पृथ्वीवर माणसांची सर्व संख्या दीड अब्जाच्या जवळपास आहे, मग दीड अब्ज माणसांच्या पूर्वीच्या कर्मांना भोगण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जीव कसे जन्माला येऊ शकतात? ईश्वराने या असंख्य जीवांना फक्त शिक्षा आणि त्रास भोण्यासाठी जन्माला घालून काय आपल्या कृपेचा परिचय दिला आहे? न्याय तर त्याला स्पर्शसुद्धा करून गेला नाही, उलट त्याच्या याच कर्मामुळे हेच कळून येते की त्याच्यापेक्षा क्रूर आणि दगडाच्या काळजाचा जगामध्ये इतर कोणीही इतर कुठेही मिळणार नाही. वाघ सुद्धा हरणाची शिकार करतो, आपली भूक भागवण्यासाठी; पाल पतंगाला पकडते पोट भरण्यासाठी. सर्वच सजीव दुसऱ्या सजीवांना स्वरक्षण आणि जीविकेसाठी मारत असतात. अतिशय हाल-हाल करून मारणे त्यांना सुद्धा आवडत नाही. परंतु देव ज्यांना मारतो, त्यांच्या मासाने काय तो आपली भूक शांत करतो वा आत्मरक्षणासाठी त्याला तसे करणे गरजेचे वाटते? या दोन्ही कारणांच्या अभावात, फक्त खेळासाठी केलेले असे अघोर कृत्य ईश्वराबद्दल काय सांगून जाते?