तुमच्या इतिहासाभिमानाचा आणि संस्कृतीचा ऱ्हास

राहुल सांकृत्यायन(अनुवाद: अभिजित)

लेखकाचा   परिचय

राहुल सांकृत्यायन (1893-1963) खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री  गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे  हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.

जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ  शकते की,  ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा,  साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती.  इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र,  मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?,  बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.

राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर  करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”

राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं साचलेपणा. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त  भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख  करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.

समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरुद्ध तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.


‘इतिहास’-‘इतिहास’ – ‘संस्कृती’-‘संस्कृती’ चा सारखा ओरडा चालू असतो. असं वाटतं की इतिहास आणि संस्कृती फक्त गोड, सुखकारकच गोष्टी होत्या. तसा तर आपल्या समाजाचा पंचवीस वर्षांचा अनुभव आम्हालाही आहे. हा अनुभवच तर भविष्यातील पिढ्यांसाठी इतिहास असेल, नाही? आज जो अंधकार दिसतोय, तो हजार वर्षे अगोदर आजच्या पेक्षा कमी होता का? आपला इतिहास तर राजांचा आणि पुरोहितांचा इतिहास आहे जे आजच्यासारखेच त्या काळातही मौजमजा करत होते. त्या असंख्या माणसांचा इतिहासात कुठे उल्लेख आहे ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून ताजमहाल आणि पिरॅमिड बनवले, ज्यांनी आपल्या अस्थिमज्जेनं नूरजहॉंला अत्तराचे स्नान करवले, ज्यांनी लाखोंच्या संख्येने प्राण देऊन पृथ्वीराजाच्या महालात संयोगितेला पोहोचवले? त्या असंख्य योद्ध्यांच्या शौर्याबद्दल कधी माहिती होऊ शकते का, ज्यांनी सन सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले प्राण अर्पण केले? दुसऱ्या देशातील लुटखोरांची मोठमोठी स्मारके बनली, पुस्तकांमध्ये त्यांच्या कौतुकानं पानं भरली. गेल्या महायुद्धातच कोट्यवधींनी बलिदान दिले, पण इतिहास त्यांच्यापैकी कितींबद्दल कृतज्ञ आहे?

इतिहास आपल्या समाजाच्या जुन्या बेड्यांना मजबूत करतो. इतिहास आपल्या मानसिक स्वातंत्र्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. इतिहास आपल्या जुन्या शत्रुत्वाला आणि झगड्यांना सतत ताजेतवाने करत राहतो. हजारो वर्षांपासून माणसाचा घोर शत्रू सिद्ध झालेला धर्म तर बऱ्यापैकी इतिहासावरच टिकलेला आहे. विश्वामित्र असो वा वशिष्ठ, मनू असो वा याज्ञवल्क्य, व्यास असो वा पतंजली, नानक असो वा कबीर, मोझेस असो वा येशू – सर्व पन्नासेक वर्षे जगले. न जाणे किती लोकांचे मन त्यांनी दुखावले असेल, किती जणांचा अधिकार हिरावला असेल, किती दास-दासी विकत घेऊन आयुष्यभर त्यांच्याकडून पशुसारखे काम करवले असेल. आपल्या मालकांच्या आणि अन्नदात्यांच्या चापलुसीमध्ये किती कुकर्म केले असतील. यशस्वी दरोडेखोरांचे आणि खून्यांचे गौरवीकरण करण्याची जी प्रवृत्ती दिसून येते, तिच्यातून दिसून येते की इतिहासात वीरपुजेमध्येही तिचा मोठा हिस्सा राहिला असेल.

हिंदुंच्या इतिहासात रामाचे स्थान मोठे आहे. आजकाल आपले मोठे नेते, गांधीजी, सदानकदा रामराज्याचा दाखला देत असतात. ते रामराज्य कसे असेल जिथे बिचाऱ्या शंबुकाचा एवढाच गुन्हा होता की तो धर्मप्राप्तीकरिता तपस्या करत होता आणि या कारणाने रामासारख्या अवतार धर्मात्म्याने त्याची मुंडी छाटली? ते रामराज्य कसे असेल जिथे एका माणुस फक्त बोलला म्हणून रामाने गर्भवती सीतेला जंगलात सोडले? रामराज्यात दास-दासींची संख्या कमी नव्हती. अठराव्या-एकोणीसाव्या शतकापर्यंत जगात गुलामीची पद्धत किती क्रूरपणे अस्तित्वात होती याबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. त्याकाळी  स्वेच्छेने स्वत:ला आणि मुलाबाळांना विकले जात नव्हते, उलट समुद्र आणि नदीकिनारी असलेल्या गावांमध्ये माणसांना पकडून आणण्यासाठी हल्ले केले जात. डाकू गावावर छापा मारत आणि धनासकट तिथल्या काम करण्यालायक माणसांनाही धरून घेऊन जात. दरवर्षी पोर्तुगीज डाकू अशाप्रकारचे हजारो गुलाम पकडून बर्माच्या अराकन प्रदेशात घेऊन जात. रामराज्यात या प्रकारची लूट आणि दरोडेखोरी नसेल पण दास-प्रथा तर नक्कीच होती. आत्ता दहा-बारा वर्षेच झाली असतील की हिंदूंना अभिमान वाटतो त्या नेपाळच्या राजाने, दास-प्रथा समाप्त करवली आहे. मिथिलेत अजूनही कितीतरी घरांमध्ये कागदपत्रे आहेत ज्यांमध्ये बहियांच्या (दास) खरेदी-विक्रीच्या नोंदी आहेत. दरभंगा जिल्ह्याच्या तरोनी गावात (बहेडा ठाणे) दिगंबर झा यांच्या पणजोबांनी  दुसऱ्या कोणत्या तरी मालकाकडून मॅंडर हमालाच्या आजोबांना विकत घेतले होते आणि दिगंबर झाने पन्नास रूपये नफ्याला त्यांना विकून टाकले होते. तीन पिढ्या अगोदर पर्यंत इंग्रजी राज्यात सुद्धा ही प्रथा चालूच होती आणि सर्व धार्मिक हिंदू आणि मुसलमान जेव्हा आपल्या मनुस्मृतींमध्ये आणि हदीस मध्ये गुलामांवर मालकांच्या हक्कांबद्दल वाचतात, तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही.

चला, रामराज्यातील दासप्रथेवर एक नजर टाकूयात. एक साधारण बाजार आहे जिथे फक्त दास-दासींची विक्री होते. लाखभर झाडे असलेली बाग आहे. खाण्यापिण्याची दुकानं सजलेली आहेत. शेळ्या-मेंढ्या आणि शिकारीच्या जनावरांव्यतिरिक्त उच्चवर्णीय आर्यांचे जेवण आणि पंचांमृतासाठी गोमांस विशेष पद्धतीने बनवून विकले जात आहे. जागोजागी सफेद दाढ्यांवाले ऋषी, दुसरे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आपल्या राहुट्या ठोकून आहेत. कोणी नवीन दास किंवा दासी विकत घ्यायला आले आहे. एखाद्याचे दिवस वाईट चाललेत, त्यामुळे तो आपल्या दासांना किंवा दासींना विकून जरा रोकड गोळा करू पहातोय. काही फक्त या विचारांनी आपल्या दास-दासींना जत्रेत घेऊन आलेत की त्यांना विकून ‘नवीन’ घ्यावेत. काही मोठे व्यापारी असेही आहेत जे झटपट विकून निघू पाहणाऱ्यांकडून स्वस्तात दास-दासी विकत घेतात आणि जास्त नफ्याने विकतात. मालकांनी काही महिने अगोदरच जत्रेत जायचा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच दास-दासींना चांगले खाऊ -पिऊ घालणे सुरू केले होते जेणेकरून चरबीने त्यांची हाडं झाकली जावीत आणि बाजारात अधिक भाव मिळावा. त्यांचे पांढरे केस रंगवून काळे केले गेले आहेत आणि जत्रेत चांगल्या-चुंगल्या कपड्यांनी सजवून त्यांचा बाजार लावला आहे. एखाद्या ठिकाणी कोणी एखाद्या दास-दासीला घेऊन बसले आहे तर कुठे शे-दोनशे दास-दासींची रांग लागली आहे. घेणाऱ्यांची गर्दी आहे. विकत घेणारे म्हणतात  – यावेळी बाजार जरा महागच होता, गेल्या वेळी अठरा वर्षांची सुंदर दासी दहा रूपयांना मिळत होती, पण यावेळी तर तीसमध्येही हात धरू देत नाहीत. एकाला दासी विकत घ्यायची आहे, पण पैसे कमी पडताहेत. तो एका चाळीस वर्षांच्या सौद्याजवळ जातो. दासीचे तृतीयांश केस सफेद झालेत, पण रंगवून काळे केले होते. मालकाचे नशीबच की दासीचे सगळे दात शाबित होते. घेणाऱ्याने जवळ जाऊन दात पाहिले – एकदम ठीक. डोळे पाहिले  – काही समस्या नाही. कान व्यवस्थित काम करताहेत. हात उचलून चाचपून पाहिले  – कमजोर नाहीत. चालवून पाहिले  – पाय पण ठिकच आहेत. म्हटला  – “वशिष्ठ जी! तुमची दासी तर म्हातारी झालीये. पण असो, आमच्याकडे काम पण हलके आहे; भाव काय आहे?”

वशिष्ठ – “गौतमजी, चुकीचं बोलताय तुम्ही. ही तर आत्ताशी वीस वर्षांची छोकरी आहे. तुम्ही पाहिले नाही का की हिचे हात-पाय किती मजबूत आहेत, किती सुंदर आहे ती; दहा वर्षांमध्ये तर हिला दहा मुलं होतील. दुप्पट दाम तर एका मुलातच वसूल होईल. तुमच्याशी भाव करायची इच्छा नाहीये. पन्नास रूपये मिळत होते हिचे, पण तुम्ही ओळखीचे आहात, तर दहा रूपये कमी करू.”

गौतम – “तुम्ही तर फारच भाव सांगताय. केस काळे केल्याने आणि दोन महिने खाऊ-पिऊ घातल्याने— असे समजू नका की मला हे माहित नाही—ही पन्नास वर्षांची म्हातारी आहे. मला स्वस्तातला माल पाहिजे, जर तुम्ही भाव नीट सांगाल, तर मी घेईल हिला.”

वशिष्ठ – “मला काय जत्रेतल्या इतरांसारखे समजले का तुम्ही? हिच्या बहिणीला मी शंभर रूपयात अयोध्येचे महाराज रामचंद्र यांना विकले आहे. आजकाल महाराज यज्ञ करत आहेत, दक्षिणेत ते प्रत्येक ऋषीला एकेक सुंदरी दासी देऊ इच्छितात. दिसत नाही का, की या वर्षी दासींचा भाव चढा आहे. चला जाऊ द्या, तीस रूपये द्या, आम्हालाही घरी जायचंय परत. ही दासी अशी-तशी नाही, नाचगाणं येतं हिला. काली! एक गाणं गावून दाखव तर.”

कालीने एक गाणं गावून दाखवलं आणि नाचाचेही एक-दोन नमुने दाखवले. शेवटी पंधरा रूपयांना सौदा झाला.

लोक आपापले दास घेऊन घरी जात आहेत. कितीतरी दासींची मुलं विकून शेकडो कोस दूर पोहोचली आहेत. कित्येकांची प्रियकरांपासून कायमची ताटातूट झाली आहे. मुलं आणि प्रियकरांपासून विरहामुळे अनेकांचे कामात मन लागत नाहीये, पण नवीन मालक काम करवून घ्यायला उतावीळ झाले आहेत. दोन-चार दिवस जी नरमाईची वागणूक होती, ती संपवून आता लहान-सहान कारणांवरून दासींना चाबकाचे फटके बसत आहेत. दासीचा जीव घेतला तरी मालकाला कोणत्याही मोठ्या शिक्षेचे भय नाही. मालकांसाठी त्या आणि जनावरं सारखीच!

हे आहे रामराज्यातील मनुष्यांच्या एका भागाचे जीवन! आणि हे आहे रामराज्यातील माणसाचे मोल! आम्हाला याचाच अभिमान आहे! ऋषींची दया आणि सहृदयतेचे गुणगान करताना तर आम्ही थकतही नाही आणि ज्या ऋषींच्या आश्रमांजवळ माणसांना अशाप्रकारे गुलाम बनवून ठेवले जाई, ज्या ऋषींना स्वर्ग, वेदांत, आणि ब्रह्मावर मोठमोठी व्याख्याने द्यायला आणि सत्संग करायला फुरसत होती, जे दानावर आणि यज्ञावर मोठमोठ्या पोथ्या लिहू शकत होते, कारण यातून त्यांना आणि त्यांच्या संततींना फायदा होता, परंतु माणसावर पशूप्रमाणे होणाऱ्या अत्याचाराला मूळातून नष्ट करण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रयत्नांची आवश्यकता वाटली नाही. या ऋषींपेक्षा आजच्या जमान्यातील साधारण माणसातही मानवता जास्त आढळेल.

संस्कृतीचे एक अंग आहे कला. कलेमध्ये सुद्धा आम्ही कुठवर सगळ्या समाजाचा विचार केला आणि जुन्या काळातही साधारण जनतेला कलेचा आस्वाद घेता येत होता? हजारो वर्षे संगीताचा उपयोग राजांच्या आणि धनिकांच्या कामुकतेला उत्तेजित करण्यासाठी केला गेला. माणसाला असलेले संगीताचे आकर्षण नैसर्गिक आहे. सभ्यतेच्या सर्वात खालच्या स्तरावरील जातींपासून ते सभ्यतेच्या उत्कर्षाच्या शिखरापर्यंत पोहोचलेल्या जातींपर्यंत सर्वांमध्ये नृत्याबद्दल प्रेम बघायला मिळते. पण फक्त आपलाच देश आहे जो सभ्य म्हणवणाऱ्या जगातील सर्व देशांपुढे  स्वत:ला ठेवू पहातो पण या दोन्ही ललित कलांना अशा खालच्या श्रेणीत मोजतो, ज्याला जगात तोड नाही.  इंग्लंड, अमेरिका आणि जपानच्या सुशिक्षित घरांमध्ये संगीत आणि नृत्य कलेला सभ्य जीवनाचे एक अंग समजले जाते, पण आमच्या इथे या गोष्टी फक्त वेश्यांसाठी सोडल्या आहेत. यामुळे संगीत आणि नृत्य कला प्रतिष्ठित घरातील स्त्रियांसाठी त्याज्य मानली जाते.

आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्ही सभ्य आहोत – अशा पद्धतीने आत्मस्तुती केल्याने दुनिया आपल्याला सभ्य म्हणणार नाही. आपल्या जीवनाचे प्रत्येक अंग ज्याप्रकारे कलुषित आणि दिखाव्याने भरलेले आहे, तसे जगात इतर कोणा समुदायाचे नसेल. अजून तर आम्ही माणसासारखे रहायलाही नाही शिकलो. परिसराच्या सफाईच्या बाबतीत तर आम्ही जनावरांपेक्षा मागास आहोत. हिंदुस्तानाच्या गावांसारखी घाणेरडी गावं तर जगात शोधून सापडणार नाहीत. हे तर आमच्या गावांचे वैशिष्टयच म्हटले पाहिजे की एक आंधळा माणूसही मैलभर अंतरावरून गाव आले हे ओळखू शकतो, कारण त्याचे नाक विष्ठेच्या दुर्गंधीने फाटू लागते. स्वच्छतेच्या बाबतीत स्वत:ला अद्वितीय समजणारे आमच्या देशाचे हिंदू-मुसलमान मलविसर्जनासाठी व्यवस्था गरजेचीही समजत नाहीत. गावाशेजारची शेतं तर त्यासाठीच आहेत.  एखादा विदेशी जर एकदाही भारताच्या गावांमध्ये फिरेल आणि आसपासच्या शेतांमध्ये विखुरलेल्या आणि उन्हात सुकणाऱ्या विष्ठेला पाहिल तर त्याला कसे समजेल की भारतात माणसं राहतात.  एकदा माझ्या एका जपानी मित्राला भारतात येण्याची संधी मिळाली. अनेक दिवस या मित्राच्या आतिथ्याचा लाभ मी घेतला होता. त्यांनी ही इच्छा व्यक्त केली की ते भारतातील ग्रामीण जीवन जवळून पाहू इच्छितात. पत्र मिळाल्यावर मी चिंतेत पडलो की यांना कोणत्या गावात घेऊन जाऊ सर्वात मोठी समस्या तर शौचाची आणि आंघोळीची होती. भारतातील गावांमध्ये खुल्या शेतांशिवाय तर शौचाची सोयच नाही. गावांचे तर सोडाच, शहरात सुद्धा पन्नास हजारांचा महाल बांधणारे शौचालयासाठी पन्नास रुपयांचा ‘सेप्टीक टॅंक’ लावणे शिक्षा समजतात. स्नानगृह तर इंग्रज आणि ख्रिस्ती लोकांची गोष्ट आहे. माझ्या चिंतेला पाहून एका मित्राने स्वत:च्या घरी विशेषत: शौचालय आणि स्नानगृह बनवण्याचा मनोदय जाहीर केला. असो, माझ्या जपानी मित्राचे येणे टळले. पण पत्र मिळाल्यावर जे अनेक महिने मी चिंतेत घालवले, त्यातून मला समजले की आपण किती पाण्यात आहोत. मला आश्चर्य वाटते की आपल्या पूर्वजांनी स्वच्छतेसाठी आवश्यक या गोष्टींवर लक्ष का नाही दिले? उलट लक्ष घातले असेलच तर उफराटे, ज्यामुळे स्वच्छतेच्या कामात अडथळेच येतात. विष्ठा उचलण्याच्या कामाला आपल्या देशात सर्वात हलके काम समजले जाते. त्या जातींना तर आम्ही आर्थिक जात्यात भरडून काढले आहे आणि भुकेसमोर त्यांना सन्मान-आत्मसन्मानाचा विचारही मनात येत नाही. पण एक दिवस तो विचार येईल नक्की. त्या दिवशी समाजाच्या केलेल्या सर्वात मोठ्या सेवेच्या बदल्यात प्रचंड लांछन सहन करण्यास ते कसे तयार होतील? आणि जर त्यांनी विष्ठा साफ करणे बंद केले तर आमचे महाल काही दिवसातच सूनसान होणार नाहीत काय? इंग्लंडला जा, तिथे जो व्यक्ती अन्न शिजवतो, तोच शौचालयतही झाडू मारतो. जपानला जा, तर तिथे  विष्ठा विकणारे अनेक उच्चभ्रू व्यापारी आहेत. कोणालाही विष्ठा उचलण्यात घृणा वाटत नाही. आमची दुनियाच न्यारी आहे.

कोणत्याही नवीन उपयुक्त गोष्टीचा स्विकार करताना आम्ही आपल्या संस्कृती आणि सभ्यतेला वाखाणणे चालू करतो. हॅट, कोट, पॅंट पाहून कितीतरी लोक नाक मुरडतात, भुवया उंचावतात. ऐपतीपेक्षा जास्त खर्च करायचा असेल तिथे आम्ही काही बोलत नाही; पण ढगळ थोतर किंवा लांबलचक सलवार काय काम करणाऱ्या माणसाला सोयीस्कर असू शकते? अर्ध्या बाहीचा कुडता, विजारी आणि सोलो हॅट (मोठी टोपी) काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त पोशाख आहेत. उन्हापासून बचाव करायचा असेल तर सोलो हॅट खूपच कामाची गोष्ट आहे. या गोष्टींना पाश्चात्य युरोपीयन किंवा ख्रिस्ती म्हणून आम्ही झिडकारतो. पण आम्हाला माहितही नाही की त्या ना पाश्चात्य आहेत, ना युरोपीयन ना ख्रिस्ती.  दोनशे वर्षे अगोदर इंग्रजांचे पूर्वजही डोक्यावर जटा वाढवायाचे. त्यांचा पोशाखही चित्रविचित्र असायचा. आधुनिक पोशाख गेल्या दोनशे वर्षांच्या चिंतन आणि परिवर्तनाचा परिणाम आहे. अगदी महायुद्धाच्या अगोदर पर्यंत युरोपातील स्त्रिया लांबलचक केस ठेवत. त्यांच्या पोशाखांमध्ये आत्तापेक्षा बरेचे जास्त कापड लागत असे. अनैसर्गिक पद्धतीने आवळून ठेवून त्यांच्या कंबरी बारीक ठेवल्या जात. आज युरोपातील स्त्रियांनी केस कापले आहेत, त्यांचा पोशाख हलका झाला आहे. कंबर बारीक ठेवण्याची जुनी फॅशनही आता राहिली नाही.

स्त्री-पुरूषाचा विवाह का होतो? संतती ही त्यातली मुख्य गोष्ट नाही. वास्तवात आपल्याकडे तर विवाहाचं ओझं आई-वडील जबरदस्तीने आपल्या डोक्यावर घेऊ पाहतात. अपत्यांनी यात लक्ष घालू नये, म्हणून लहानपणीच लग्न लावू पाहतात. हे सुद्धा आमच्या संस्कृतीचे एक मोठे ‘उज्ज्वल’ अंग आहे की सारे आयुष्या ज्यासोबत घालवायचे आहे, त्यांना एकमेकांच्या सवयी आणि आवडीनिवडींशी परिचय करण्याची संधी सुद्धा न देता कायमस्वरूपी एकमेकांच्या गळ्यात बांधले जाते. अशाप्रकारच्या निरंकुशतेने लाखो कुटुंबांचे जीवन नरकासमान बनवले आहे , तरीही कोणी शिकायला तयार नाही. आई-बाप लग्न लावून देतात, तरीही विवाहित जोडप्याला समाजाचा कडक धाक आहे की त्यांनी तरूणपणात तरी खुलेपणाने एकमेकांना भेटता कामा नये. जगाच्या सर्वच भागांमध्ये विवाहित स्त्री-पुरूषांचा वेगळा बिछाना नसतो. तिथे बिछाना वेगळा असण्याचा अर्थ आहे विभक्त होण्याची तयारी. पण आमच्याकडे बिछानाच वेगळा नाही, तर झोपण्याची जागाही वेगळी असते आणि शिष्टाचार म्हणून पतीने घरच्यांंच्या ध्यानात येईल अशा पद्धतीने पत्नीजवळ जावू नये. विवाहित पुरूष आपल्या पत्नीला सोबत ठेवू शकत नाही. वर्षानुवर्षे व्यापार किंवा नोकरीमुळे दूर रहावे लागले तरी अशाप्रकारच्या स्वातंत्र्याला शिष्टाचाराविरुद्ध समजले जाते.

थोडक्यात असे की ज्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे, ती आम्हाला एका सामान्य माणसासारखे जगू देत नाहीत. खाणे-पिणे, रहाणीमान, लग्न, आरोग्य-स्वच्छता, आणि बंधुता – या सर्व बाबतीत ती आम्हाला दुनियेसमोर अवमानित करू पाहतात. आपल्यासाठी सर्वात चांगले हेच असेल की आपल्या इतिहासाला फाडून फेकून द्यावे आणि स्वत:ला संस्कृतीपासून वंचित समजून जगातील इतर समुदायांकडून पुन्हा क, ख, ग शिकणे चालू करावे.

कामगार बिगुल, जून  2021