लुधियाना मधील वर्धमान निशंभू गारमेंट कारखान्यातील महिला कामगारांची भयानक अवस्था

कृष्णा( अनुवाद: अविनाश साठे )

भांडवलशाही रचनेमध्ये सर्व कामगारांची भयंकर अवस्था आहे. फोकल पॉइंट, फेज–८, लुधियाना येधील वर्धमान निशंभु गारमेंट कंपनी लिमिटेड या कारखान्यामध्ये पण कामगारांची परिस्थिती वाईटाहून वाईट आहे. ही कंपनी भारतामध्ये लुई फिलीप, सिसिले, बेनेल्तन इत्यादी सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडचे कपडे तयार करते. इथे शर्टची शिलाई, इस्तरी आणि पॅकींगचे काम केले जाते . इथे काम करणाऱ्या महिला कामगाराची संख्या जवळपास ८०० आहे . या कामगार महिलांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे तर काहींचे वय ३० वर्षांपर्यंत असू शकते. यापैकी बहुतेक महिला दुसऱ्या शहर व राज्यांमधील आहेत आणि काही स्थानिक सुद्धा आहेत. ज्या दुसऱ्या शहर आणि राज्यांमधून आहेत, त्या तिथेच हॉस्टेल मध्ये राहतात. त्यांना सकाळी ४ वाजता उठविले जाते आणि उठून आवरून सावरून त्या काही न खाता पिता सकाळी ७ वाजता काम करू लागतात. त्यांना सकाळी ८ वाजता चहा आणि ११ वाजता जेवण दिले जाते. ज्या महिला स्थानिक आहेत त्या पण बहुतेक उपाशीच असतात. त्या दुपारीच जेवण करतात आणि त्या नंतर पूर्ण दिवस भर काम करत असतात. त्यांना रात्रीचे जेवण ८ वाजता मिळते. त्यानंतर रात्री ११ किवा १२ वाजेपर्यंत काम करून घेतले जाते.

या कारखान्यांमध्ये कामगार कायद्या नुसार त्यांचे अधिकार त्यांना दिले जात नाहीत. या कारखान्यातील ज्या महिला कामगारांशी बोलणे झाले त्यांनी सांगितले कि एकतर त्यांना पगार कमी दिला जातो आणि ईपीएफ, ईएसआई, बोनस, सुट्टी आणि ग्रेज्युईटी इत्यादीचा लाभ पण सर्व महिला कामगारांना नाही मिळत. ओव्हरटाईम करून कसा तरी त्या आपला घर खर्च चालवतात. तिने सांगितले कि स्थानिक आणि दुसऱ्या शहर व राज्यांमधील शिलाई सेंटर मध्ये मोफत शिलाई शिकत असलेल्या मुली किंवा महिला यांची भर्ती या सारख्या कारखान्यांमध्ये होत असते. हे शिलाई सेंटर सरकारी आहेत की खाजगी हे तिला माहित नाही. ज्या महिला कामगारांनी हे सांगितले तिची भर्ती पण कॉलनी मधील शिलाई सेंटर मधील शिलाई-ट्रेनिंग दरम्यान झाली होती. कामाच्या दरम्यान जर एखाद्याची डोळ्याची दृष्टी कमी झाली किंवा आजारी पडले तर त्यांना कामावरून काढून टाकले जाते.

या महिला कामगारांकडे लुटमार आणि अन्यायाच्या विरोधात एकत्र येण्याशिवाय काही पर्याय नाहीये. आज लुधियाना असो किंवा इतर कोणतेही शहर, बघितले तर संपूर्ण भारतातच भांडवलदार ज्यांच्याकडे उत्पनाचे साधन आहे, ते पुरुष आणि महिला दोघांची पण श्रम शक्ती लुटत आहेत. आज कामगारांना हे समजून घ्यावे लागेल, मग तो पुरुष कामगार असो किंवा महिला कामगार, की त्यांची हि अवस्था बदलायला कोणी अवतार येणार नाही. त्यांना आपल्या हक्कांसाठी आपल्या संघटना बनवून, एकजूट होऊन, संघर्ष करावा लागेल.