तुमच्या जळवांचा ऱ्हास

राहुल सांकृत्यायन( अनुवाद: अभिजित)

लेखकाचा   परिचय

राहुल सांकृत्यायन (1893-1963) खऱ्या अर्थाने जनतेचे लेखक होते. ते आजच्यासारख्या तथाकथित प्रगतिशील लेखकांसारखे नव्हते, जे जनतेच्या जीवन आणि संघर्षापासून अलिप्त राहून आपापल्या महालांमध्ये बसून कागदावर प्रकाश टाकत असतात. जनतेच्या संघर्षाचे मोर्चे असोत वा सरंजामदार-जमीनदारांच्या शोषण-दमनाच्या विरूद्ध शेतकऱ्यांच्या संघर्षाचा लढा असो, ते नेहमीच पहिल्या फळीत उभे राहिले. अनेक वेळा तुरूंगात गेले, यातना सहन केल्या. जमीनदारांच्या भाडोत्री  गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्लासुद्धा केला, परंतु स्वातंत्र्य, समानता आणि मानवी स्वाभिमानासाठी ते ना कधी संघर्षातून मागे  हटले आणि ना कधी त्यांची लेखणी थांबली.

जगभरातील 26 भाषा अवगत असलेल्या राहुल सांकृत्यायन यांच्या अचाट बुद्धीचे अनुमान यावरूनसुद्धा लावता येऊ  शकते की,  ज्ञान-विज्ञानाच्या अनेक शाखा,  साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये त्यांनी हातोटी मिळवली होती.  इतिहास, तत्वज्ञान, पुरातत्वशास्त्र,  मानववंशशास्त्र, साहित्य, भाषा-विज्ञान इ. विषयांवर त्यांनी अधिकारवाणीने लेखन केले. बौद्धिक गुलामी, तुमचे अध:पतन, पळू नका-जगाला बदला, तत्वज्ञान-संदर्भ, मानवसमाज, वैज्ञानिक भौतिकवाद, जय यौधेय, सिंह सेनापती, साम्यवादच का?,  बावीसावे शतक इ. रचना त्यांच्या महान प्रतिभेची ओळख स्वत:हूनच करून देतात.

राहुल देशातील दलित-शोषित जनतेला हर-तऱ्हेच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी लेखणीचा हत्यारासारखा वापर  करायचे. त्यांचं म्हणणं होतं की, “साहित्यकार जनतेचा जबरदस्त सहकारी, सोबतच तो त्यांचा नेता (पुढारी) आहे. तो सैनिक आहे आणि सेनापतीसुद्धा.”

राहुल सांकृत्यायन यांच्यासाठी जीवनाचं दुसरं नाव गती होतं आणि मरण किंवा स्तब्धतेचं दुसरं नाव होतं साचलेपणा. यामुळेच अगोदरच तयार असलेल्या मार्गावर चालणे त्यांना कधीही आवडले नाही. ते नव्या मार्गाचे संशोधक होते. परंतु फिरणे म्हणजे त्यांच्यासाठी फक्त  भूगोलाची ओळख करून घेणे नव्हते. ते सुदूर देशांतील जनतेचं जीवन आणि त्यांच्या संस्कृतीशी, त्यांच्या जिजीविषेशी ओळख  करून घेण्यासाठीचं फिरणं होतं.

समाजाला मागे ढकलणाऱ्या हरतऱ्हेच्या विचार, रूढी, मूल्ये, मान्यता-परंपरांच्या विरूद्ध त्यांचे मन अतिशय तिरस्काराने भरलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन आणि लिखाण याविरूद्ध विद्रोहाचं जितं-जागतं उदाहरण आहे. यामुळेच त्यांना महाविद्रोहीसुद्धा म्हटले जाते. राहूल यांची ही वेगळी रचना आजसुद्धा आपल्या समाजातील प्रचलित रूढी-परंपरांच्या विरुद्ध तडजोड विहीन संघर्षाची आरोळी आहे.

जळवा? – ज्या आपल्या पोषणाकरिता धरतीवर कष्टाचा आधार घेत नाहीत. त्या दुसऱ्यांनी कमावलेल्या रक्तावर गुजराण करतात. मानवी जळवा या पशूजगतातील जळवांपेक्षा जास्त भयंकर असतात. यांनी मानवी जीवनाला किती हीन आणि संकटग्रस्त बनवले आहे याचा उल्लेख थोडे अगोदर झाला होता आणि पुढेही करू. या जळवांची उत्पत्ती कशी झाली? सुरूवातीचा मनुष्य असभ्य होता, तो जंगलात रहायचा. परंतु आपली जीविका तो पृथ्वीवर शोधायचा. तो शिकार करायचा. तो जंगलामध्ये फळे तोडत असे, परंतु दुसऱ्याची कमाई, दुसऱ्याच्या रक्ताला शोषून गुजराण करणे त्याला पसंद नव्हते. स्वरक्षणासाठी तो आपला नेताही निवडी. समाजाचे साधारण संघटनही करत असे. परंतु शोषण करणाऱ्यांसाठी तिथे स्थान नव्हते. शिकारी अवस्थेतून मनुष्य पशुपालक अवस्थेत आला. अजूनही त्याचे नायक आणि शासक स्वत:च आपल्या मेंढ्या आणि गाई राखत. हो, आता कधी-कधी एखादी मेंढी-गाय त्यांच्यापर्यंत पोहोचू लागली आणि अशाप्रकारे खूप हलक्या रूपात मानवी जळवांचा आविर्भाव झाला. कृषक अवस्थेला पोहोचल्यावर नेते आणि शासकांचा प्रभाव अजून वाढला. त्यांनी राजाचे रूप धारण करणे सुरू केले. अर्थात, सुरूवातीला समाजाच्या स्वरक्षणासाठी शस्त्रांच्या आणि शासनाच्या सुव्यवस्थेची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती आणि त्यांचे पद तोपर्यंत सुरक्षित होते जोपर्यंत ते कामांच्या संचालनाची योग्यता बाळगत. योग्यतेवरून निवडलेला राजा भेटवस्तू आणि कराच्या रूपाने अधिक धन एकत्र करण्यात यशस्वी झाला आणि अशाप्रकारे योग्यतेपेक्षा जास्त धनाची शक्ती त्याच्या हातात आली. आता एकीकडे तो आपल्या शासक आणि नेता होण्याद्वारे लोकांवर प्रभाव टाकत असे, तर दुसरीकडे धनाचे प्रलोभन देऊनही लोकांना आपल्याकडे खेचू शकत असे. अशाप्रकारे तो एकीकडे अनेक अत्याचार करण्याचे साहस करू शकत असे, तर दुसरीकडे हा प्रयत्नही करू लागला की त्याच्यानंतर त्याचे स्थान त्याच्या मुलाला मिळावे. शतकांच्या प्रयत्नांनंतर योग्यतेचे कारण रसातळाला गेलेच आणि राजाचा ज्येष्ठ मुलगा राजा बनू लागला. सगळ्या राजघराण्याचा खर्च दुसऱ्यांवर लादला जाऊ लागला. या जळवांनी फक्त आपले संगोपनच दुसऱ्यांच्या कमाईवरून चालू ठेवले नाही, तर  धरतीपासून धन पिकवू शकणाऱ्या कितीतरींना आपले नोकर-चाकर बनवून समाजाला त्यांच्या श्रमापासूनही वंचित ठेवले. खानदानी राजे तोपर्यंत अशाप्रकारचे शोषण, नाकर्तेपणा, आणि आपल्या वासना-पूर्तीसाठी विविध प्रकारची घाणेरडी कृत्ये करत राहत जोपर्यंत जनतेला त्रस्त होताना पाहून एखादा सेनापती वा मंत्री राजाचा वध करून नवीन राजवंशाची पायाभरणी करत नसे. जेव्हापासून राजा अधिक संपत्तीचा मालक आणि गैर-उत्तरदायी बनू लागला, तेव्हापासून ‘जसा राजा, तशी प्रजा” चे अनुकरण करत कितीतरी लोक स्वत:च जळवा बनून आरामात सुख आणि चैनीचे जीवन जगू जागले. राजा सुद्धा प्रलोभने देऊन त्यांना याकरिता प्रोत्साहित करत होते. धरतीपासून धन पैदा करणाऱ्यांचे स्थान समाजात खूप खालावले होते आणि राजा, राजकुमार, पुरोहित, मंत्री, सामंतच नाहीत तर त्यांचे नोकर सुद्धा धन पैदा करणाऱ्यांपेक्षा जास्त सन्माननीय समजले जात. शारीरिक श्रमाला अत्यंत खालच्या नजरेने पाहिले जाई. आता जळवांची अजून एक श्रेणी पैदा झाली जी कारागीर आणि शेतकऱ्यांद्वारे उत्पादित वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे काम करत होती. या सामान्य बनियांनी जास्त लाभासोबतच आपल्या कामालाही पसरवले आणि सुव्यवस्थित केले. त्यांचे मोठमोठे तांडे देशाच्या एका कोपऱ्यातील वस्तू दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचवत आणि भरभक्कम नफा कमावत. राजा, राजकुमारांच्या नंतर आपल्या सेवेच्या बदल्यात ज्या मंत्र्यांना आणि सेनापतींना मोठमोठ्या जागिरी मिळत, त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान होते आणि त्यांच्या नंतर बनियांचा नंबर येई. समाजात जुना विचार अजूनही कधीकधी दिसून येई, ज्यात शेतकऱ्याच्या कमाईला सर्वात शुभ कमाई समजले जायचे आणि राजाची चाकरी आणि व्यापाराला खालच्या श्रेणीतील कमाई मानले जायचे, परंतु जगातील सुख आणि वैभव तर त्याच्यासाठीच आहेत ज्याच्याकडे धन आहे, मग ते धन कसेही मिळवलेले असो. राजकार्य आणि व्यापार तर सोडाच, व्याजाचा लाभ – ज्याला की पापाचे धन अजूनही समजले जाते – त्यालाही कोणी सोडण्यास तयार नसे. सामंत दास आणि अर्ध-दास शेतकऱ्यांच्या पलटणींकडून शेती करवत आणि कारागिरांना वेठबिगारी करवून त्यांच्याकडून वस्तू तयार करवत. व्यापारी फक्त स्थल मार्गाने आणि जलमार्गाने व्यापर करत नसत, तर कधीकधी काही कारागिरांना जमा करून त्यांच्याकडून व्यापाराच्या अनेक गोष्टी बनवत. विना मेहनतीची कमाई आता सर्वाधिक सन्मानाची कमाई झाली होती. आणि का न व्हावी, जेव्हा हजारो वर्षांपासून पुरोहित लोक स्वत: या लुटीच्या नफ्यावर मौज करत आले होते. त्यांच्याच हातात चांगले-वाईट ठरवण्याची व्यवस्था होती.

वाढता-वाढता स्थिती आता इथवर पोहोचल्यावर असे मानले जाऊ लागले की राजा त्याच्या जुन्या तपस्येचा उपभोग घेण्यासाठी किंवा ईश्वराच्या(खुदाच्या) प्रसादाचा उपभोग घेण्यासाठी धरतीवर आला आहे, आणि खूप झाले तर राजवंशांच्या संस्थापक पहिल्या व्यक्तींनी आपल्या काही योग्यतांना सिद्ध केले आणि त्यांचे उत्तराधिकारी – मग ते योग्य असोत वा अयोग्य, फक्त भोगविलासाकरिता सिंहासनावर बसत असत. फुकटचा भोग-विलास पाहून कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही? आणि त्याकरिता जेव्हा राजे आपसात लढू लागत, तेव्हा योग्य सेनानायकांचे महत्त्व वाढणे गरजेचे होते. मग त्यांच्या जहागिरी वाढल्या आणि स्थिती इथवर पोहोचली की राजा खुद्द सामंतांच्या हातातले बाहुले बनला.

शिकार आणि शेतीसोबतच पहिल्या जळवांचा जन्म होतो. राजेशाहीच्या युगात त्यांची संख्या थोडी वाढते आणि राजकुमार, राजकर्मचारी, व्यापारी आणि त्यांचे सेवक जळवांच्या श्रेणी मध्ये सामील होऊन संख्या अजून वाढवतात. जेव्हा राजा सामंतांच्या हातातील बाहुली बनतो, तेव्हा सामंतांच्या स्वेच्छाचारितेची पाठराखण करणे आपले कर्तव्य समजू लागतो – अशा सामंतशाहीच्या युगात जळवांची संख्या अनेक पटींनी वाढते. या युगाचा अंत होते वेळी युरोपातील बनियांना आपला प्रभाव वाढवण्याची नवी संधी मिळते. “वाणिज्ये वसते लक्ष्मी:” ही म्हण तर प्रसिद्धच आहे. इंग्लंडचे व्यापारी सुद्धा पोर्तुगाल, स्पेन इत्यादींंच्या स्पर्धेत दुनियेतील दूरदूरच्या देशांमध्ये व्यापार करू लागले. इंग्लंडमध्ये त्यांच्याकडे अपार संपत्ती जमा होऊ लागली. युरोपातील विविध देशांमध्ये व्यापाराच्या संबंधात स्पर्धा वाढू लागली, तरीही पृथ्वीचा मोठा भाग अस्पर्शित होता आणि सर्व साहसी लोकांसाठी कुठे ना कुठे कामाची जागा शिल्लक होती. अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत युरोपातील व्यापारात इंग्रजांनी अग्रणी स्थान मिळवले होते. त्यांच्याकडे दुनियेतील सर्वात मोठे बाजार होते. त्यांच्या मालाने भरलेली जहाजं इंग्लंडमधून बाजारांकडे आणि बाजारांकडून इंग्लंडकडे सहा-सहा महिने प्रवास करून पोहोचत असत. त्या काळातील लाकडाच्या जहाजांमधून – ज्यांना शीडं आणि सुकाणूच्या मदतीने एका जागेहून दुसऱ्या जागी नेले जाई – प्रवास फारच धोक्याचा होता. पण प्रचंड नफ्यापुढे संकटं काय चीज होती? व्यापाऱ्यांची सर्वात मोठी चिंता होती की जास्तीत जास्त प्रमाणात माल कसा तयार होईल? याच काळात इंग्लंडमध्ये इंजिनाचा आविष्कार झाला. वाफेने चालणारी यंत्र जास्त प्रमाणात आणि जास्त वेगाने माल तयार करू लागली. इंजिनांना रेल्वे आणि जहाजांवर लावल्यावर मोठमोठ्या यात्रा अजूनच छोट्या झाल्या आणि धोके व अवलंबित्व सुद्धा कमी होत गेले.

यंत्रांच्या शोधामुळे, त्यांच्याद्वारे बनवल्या गेलेल्या वस्तूंच्या तुलनेत हाताने बनवलेल्या वस्तू महाग होऊ लागल्या आणि हातांचे कारागीर बेरोजगार होऊ लागले. बेरोजगारीने चिडलेल्या कारागिरांनी कितीतरी कारखान्यांना तोडले, जागोजागी बंड झाले. पण आता व्यापाऱ्यांची शक्ती साधारण राहिलेली नव्हती. संपत्तीमुळे राजदरबारांमध्ये त्यांचा प्रभाव आणि सन्मान सामंतांसारखा होऊ लागला होता आणि धनबळावर आता ते शासन तंत्रावर अधिकार सांगू लागले होते. ज्या यंत्रचलित कारखानदारामागे-भांडवलदारामागे राज्यशक्ती होती, त्यांच्याशी काय कारागीर लढू शकले असते? हळूहळू त्यांचे बंड तर थंड पडत गेले, ज्यामागे दमनाशिवाय एक हे सुद्धा कारण होते की यांत्रिक कारखाने मुख्यत: इंग्लंडमध्येच स्थापित झालेले होते आणि इंग्लंडकडे साऱ्या दुनियेचा बाजार होता. यामुळे तिथले भांडवलदार सर्व कारागिरांना बेरोजगार न करता त्यांना नवनवीन कारखान्यांमध्ये कामाला लावत. जसजसा व्यापार वाढत गेला, तसतशी भांडवलदारांकडे अपार संपत्ती एकत्र होत गेली. तेथील राज्यकारभार सुद्धा भांडवलदारांच्या हातात गेला आणि राजेशाही वा सामंतशाही सरकारांच्या जागी भांडवली सरकारे स्थापित झाली. त्यांचे पवित्र कर्तव्य होते भांडवलदारांच्या स्वार्थांचे रक्षण करणे.

या नव्या आर्थिक व्यवस्थेमुळे दुनियेत विविध प्रकारच्या उलथापालथी होऊ लागल्या. देशातील श्रमिक भांडवलदारांचे अर्थदास (पैशाचे गुलाम) बनू लागले. ज्या देशांवर भांडवलदारांचे शासन होते, तेथे सुद्धा त्याच स्वार्थाला समोर ठेवून काम करवले जाऊ लागले. इंग्लंडमध्ये सामंतशाहीची जागा भांडवलशाहीने घेतली होती, परंतु हिंदुस्तानात तोपर्यंत सामंतशाहीच चालू होती. तरीही इंग्रजी भांडवलदारांनी आपल्या देशाप्रमाणे हिंदुस्तानातील सामंतशाहीला लुप्त होऊ दिले नाही. याचाच परिणाम आहे की जरी भारतवर्षावर इंग्रजी भांडवलशाहीचे शासन आहे तरीही देशांतर्गत सामंतशाहीला संस्थानांच्या आणि मोठमोठ्या जमीनदाऱ्यांच्या रूपात जपले गेले आहे. भांडवलशाही माणसाला अर्थदास बनवते आणि सोबतच बेरोजगारी निर्माण करून त्यांना नरकयातना भोगायला लावते, ही गोष्ट तर आता स्पष्ट झाली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बाजार आणि साम्राज्यविस्ताराकरिता आपसात लढणाऱ्या युरोपातील राज्यशक्तींनी हे सुद्धा दाखवून दिले की भांडवलशाही युद्धांचे प्रमुख कारण आहे.

याचवेळी जर्मनीमध्ये एक विचारवंत जन्माला आला, ज्याचे नाव होते कार्ल मार्क्स. त्याने सांगितले की बेरोजगारी आणि युद्ध भांडवलशाहीचे अनिवार्य परिणाम राहतील, जोपर्यंत भांडवलशाहीच्या संरक्षणामध्ये यंत्रांचा वापर वाढत जाईल, बेरोजगारी आणि युद्ध तितकेच भयावह रूप धारण करत जातील – त्याने यातून वाचण्याचा एकच उपाय सांगितला – साम्यवाद. जर्मनी, फ्रांस – जिथे कुठे त्याने आपले हे विचार प्रकट केले, तेथील सरकारे त्याच्या मागे पडली. भांडवलदार समजले की साम्यवाद त्यांची मुळे कापून टाकण्यासाठी आहे. त्यामध्ये तर सर्व संपत्तीचा मालक व्यक्ती न राहता समाज बनेल. त्यावेळी प्रत्येकाला आपल्या योग्यतेनुसार काम करावे लागेल आणि आवश्यकतेनुसार जीवनाची साधनं मिळतील. सर्वांसाठी प्रगतीचा मार्ग एकसारखा खुला राहील. कोणी कोणाचा ना नोकर असेल, ना दास. आता धनिकांना हे कसे पसंत पडले असते? परंतु अजुनही मार्क्सचे हे विचार हवेतच गुंजत होते. कामगारांवर त्यांचा परिणाम अत्यंत हलका पडत होता, त्यामुळेच भांडवलदारांचा विरोध तीव्र नव्हता – खास करून जेव्हा त्यांनी पाहिले की एकेकाळी आग ओकणारे प्रलोभने समोर दिसताच भांडवलशाहीचे सहाय्यक बनू शकतात. जगातील जळवांना वाटले की साम्यवाद नेहमीच आसमानी गोष्ट बनून राहील आणि त्याला कधी ठोस जमिनीवर उतरण्याची संधी मिळणार नाही.

भांडवलशाही हळूहळू प्रत्येक देशात वाढत होती. युरोपात तर तिची गती खूपच तीव्र होती. शेवटी सैनिकांचा देश जर्मनी सुद्धा तिच्या लोंढ्यातून वाचला नाही. उलट प्रतिभाशाली जर्मनीने यंत्रांच्या शोधामध्ये आणि वापरात अजूनच जास्त योग्यता दाखवली. भांडवली सरकारांनी डावपेच वापरून जगाचे हिस्से वाटून घेतले. जर्मनीने पाहिले की तिच्यासाठी तर कुठेच जागा शिल्लक नाही. त्याकरिता जर्मनीने अनेक वर्षे तयारी केली कारण तिला माहित होते की हत्यारांच्या जोरावर नवीन बाजार मिळू शकतात. याच आकांक्षेचा, याच तयारीचा परिणाम होता 1914 चे पहिले महायुद्ध. भांडवलदार कारखान्यांमध्ये गरीबांचे रक्त पिऊन तृप्त नव्हते. ते बाजार आणि नफ्याला लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नरसंहार करू पहात होते. जे म्हणतात की महायुद्ध ऑस्ट्रीयाच्या राजपुत्राच्या हत्येमुळे झाले, ते एकतर भोळे आहेत किंवा जाणून बुजून खोटे बोलत आहेत. युद्ध झाले होते जळवांच्या रक्ताच्या लालसेपोटी. जर्मनीच्या जळवा हरल्या. फ्रांस आणि इंग्लंडच्या जळवा जिंकल्या. या जळवांच्या लढाईत एक फायदा झाला की जगातील सहाव्या हिश्श्यावरील – रशियावरील – जळवांचे राज्य संपले. आता तिथे इमानदारीने कमावून खाणाऱ्यांचे राज्य आहे. सुरूवातीला जगातील जळवांनी पूर्ण प्रयत्न केला की तिथे साम्यवादी शासन बनू नये. पण रशियातील कामगार आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक प्रकारचा त्याग करून, जीवावर खेळून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. लेनिनच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेले साम्यवादी सरकार आज जगभरातील जळवांच्या डोळ्यांमध्ये काट्याप्रमाणे खुपते आहे. सगळे भांडवली देश बघत आहेत की जगातील सर्व कामगार-शेतकरी रशियाकडे स्नेहाने पाहतात आणि त्यांच्याकडून अंत:प्रेरणा घेतात.

महायुध्दाच्या शेवटी जळवांचा रक्तपिपासू नंगानाच पाहून तसेच रशियन क्रांतीने प्रभावित होऊन युरोपातील कितीतरी देशांच्या कामगारांमध्ये साम्यवादाचा जोर वाढला. सामग्री तयार होती, जिचा वापर करून तेथे सुद्धा साम्यवादी शासन स्थापित होऊ शकले असते. परंतु श्रमजीवींचे नेतृत्व ज्या कमजोर मनाच्या शिक्षितांच्या खांद्यावर होते, त्यांनी आपल्या भ्याडपणाला आणि कमजोरीला जनतेच्या माथी मारले आणि अशाप्रकारे श्रमजीवी-जागृतीचा तो वेग विस्कळीत झाला. भांडवलदार महत्त्वाकांक्षी साम्यवादी नेत्यांना – जे आपसात स्पर्धा आणि कलहामुळे कोणत्याही मोठ्या गोष्टीची आशा ठेवून नव्हते – आपल्याकडे ओढू शकत होते, आणि याकरिता फक्त दोन गोष्टींची गरज होती. एकतर आदर्श-द्रोही नेत्यांना नेतृत्व दिले जावे, आणि यामध्ये भांडवलशाहीचे कोणतेही नुकसान नव्हते, दुसरे, त्यांना थैल्यांची मदत दिली जावी आणि यात भांडवलदारांना वाईट वाटण्यासारखे काहीच नव्हते कारण नाहीतर कामगार त्यांच्याकडून सर्व थैल्या हिसकावून घेणार होते. अशाप्रकारे भांडवलशाहीने नवे रूप – ‘फॅसिझम’चे रूप धारण केले. आपले खरे उद्दिष्ट लपवून सामंतशाहीचा विनाश करणाऱ्या भांडवलशाहीची हातसफाई वापरली आणि राष्ट्रीयतेच्या नावावर जनतेला आपल्या झेंड्याखाली एकत्र होण्याचे आवाहन केले. अनेक वर्षांपासून कामगार आणि शेतकरी आपल्या शिक्षित मध्यमश्रेंणीच्या साम्यवादी नेत्यांच्या भ्याडपणाला आणि विश्वासाला कंटाळले होते. त्यांनी फॅसिझमला राष्ट्रीय पुनरूज्जीवनचा संदेशवाहक समजत मदत केली आणि अशाप्रकारे पुन्हा भांडवलशाहीला मजबूत केले. शोषक आणि शोषितांना कायम ठेवणारा फॅसिझम श्रमिकांच्या दु:खाला आतून तर संपवू शकत नव्हते, म्हणून त्यांनी दुसऱ्या देशांकडे रोख वळवला. इटलीमध्ये फॅसिझमच्या जन्माचा हा इतिहास आहे.

जर्मनीच्या जळवा सुद्धा महायुद्धात हरल्या, पण विजेते कधीच पराभूत जळवांना पूर्णत: नष्ट करू पहात नाहीत. त्यांना माहित होते की जर्मनीमधील जळवांचा लोप, हा इंग्लंड आणि फ्रांसवर मोठा प्रभाव पाडेल. त्यामुळे त्यांनी जर्मनीला जगू दिले. लढाईनंतर जर्मनीचे श्रमजीवीं सुद्धा आपल्या देशातील जळवांच्या अत्याचारांना वैतागलेले होते, आणि त्यांच्यामध्ये मोठी जागृती झालेली असली तरी सुद्धा शब्दपटू पण मैदानात अत्यंत भ्याड असलेल्या शिक्षित नेत्यांनी त्यांना धोका दिला आणि ते सुवर्ण युग आणण्याचा दिलासा देत दिवस घालवत राहीले. जळवा इतक्या मूर्खही नव्हत्या. त्या संधीची वाट पहात होत्या. जेव्हा साम्यवादी नेते अशाप्रकारे आपला मूल्यवान वेळ वाया घालवत होते, तेव्हा जळवा सुद्धा योजना बनवत होत्या. युद्धानंतरच्या घटनांना पाहून भांडवलदारांना विश्वास झाला की त्यांच्या स्वार्थांचे रक्षण तेच करू शकतात जे स्वत: श्रमजीवी श्रेणीचे असतील परंतु ज्यांना मनातून भांडवली श्रेणीच्या अस्तित्त्वाची आवश्यकता ठीक वाटत असेल. जर्मनी मध्ये नाझिझमने देशाचा पराभव आणि अपमानाच्या नावावर लोकांना आपल्याकडे ओढणे चालू केले. भांडवलदारांनी हिटलरच्या खाकी वर्दीतील संघटनेकरिता आपल्या थैल्या खुल्या केल्या. नेत्यांच्या विश्वासघाताने पीडीत आणि कर्तव्यविमूढ श्रमजीवी हळूहळू हिटलरच्या चालबाजीला भुलू लागले आणि 1933 पर्यंत हिटलरने आपली शक्ती इतकी मजबूत केली की शासनाचा लगाम त्याच्या हातात आला होता. हिटलरच्या शासनाच्या चार वर्षांमध्ये – 1933 ते 1937 दरम्यान – कामगारांची जीवनशैली जर्मनीमध्ये निम्म्यावर आली होती, आणि भांडवलदार चैनीची बासरी वाजवू लागले होते, तरीही भांडवलशाहीचा नवा अवतार असलेले फॅसिझम आणि नाझिझम हे श्रमजीवी जनतेच्या डोळ्य़ात धूळ फेकणे चांगल्या तऱ्हेने जाणतच होते. हिटलरने जर्मनीच्या स्वाभिमानाला परत मिळवून देण्याचा आणि बृहद जर्मनीच्या निर्माणाचा कार्यक्रम त्यांच्यासमोर ठेवला. फ्रांस आणि इंग्लंडचे भांडवलदार वैयक्तिक स्वार्थ आणि अदूरदर्शितेमुळे श्रमजीवी जनतेला आपल्याकडे तितके खेचू शकत नव्हते, म्हणूनच काळजीपूर्वक एकेक पाऊल टाकत होते. तिकडे जर्मनी भांडवलदारांच्या हिताला नजरेसमोर ठेवून राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला जबरदस्त दारू पाजत होता. दोन्हीकडे जळवांच्या स्वार्थाचाच प्रश्न होता, आणि दोन्हीकडे जळवा आपल्या स्वार्थासाठी जबरदस्त तयारी करत होत्या.

तीन वर्षांच्या तयारी नंतर हिटलरने जर्मनीचा स्वाभिमान परत मिळवून देण्याकरिता काहीतरी करू पाहिले. जपानने मंचुरिया हडपून दाखवून दिले की इंग्लंड, फ्रांस आणि अमेरिकेचे भांडवलदार आपसात असहमत आहेत आणि लढाईला तयार नाहीत. त्याला फ्रांस आणि इंग्लंडचे आपसातील मतभेद माहीत होते आणि हे समजत होते की इंग्लंड फक्त स्वत:ला वाचवू पहात आहे. हे समजूनच 7 मार्च 1936 ला हिटलरने जर्मन फौजांना ऱ्हाईनलॅंड मधे उतरवले आणि फ्रांस व इंग्लंड तोंड पहात राहीले. दोन वर्षे चार दिवसांनंतर – जेव्हा मुसोलिनी अबेसिनीया मध्ये इंग्लंडला हरवून चुकला होता – 11 मार्च 1938 रोजी हिटलरने ऑस्ट्रियावर कब्जा केला. बाहेरच्या जळवांचा जळफळाट झाला. परंतु जर्मनीच्या जळवांची तहान एवढ्याने भागणार नव्हती अणि ना जर्मन जनतेला अनंत काळापर्यंत लोणी सोडून बटाटे खायला तयार ठेवले जाऊ शकत होते. जनतेला बटाटे खाण्यास तयार ठेवण्यासाठी हिटलरला अजून न जाणे किती कांड करावे लागतील. 1 ऑक्टोबर 1938 ला हिटलरने झेकोस्लोवाकिया कडून सुडटनलॅंड हिसकावले आणि 15 मार्च 1938 ला सर्व झेकोस्लोवाकियाला  अधिनता स्विकारण्यास बाध्य केले. जगभरातील जळवा पुढच्या युद्धाची जबरदस्त तयारी करून चुकल्या आहेत. पुढील युद्धातील नरसंहारापुढे मागील महायुद्ध फिकेच पडेल. जर्मनीकडे आता आठ कोटी लोक जळवांसाठी नव्या बाजाराकरिता रक्त वहावायला तयार आहेत, आणि तिने हवाई, सागरी आणि जमिनी युद्धाकरिता भयंकर शस्त्रास्त्रे बनवली आहेत. आता तिच्या विमानांच्या एका चढाईत पाऊण कोटी लोकसंख्येचे लंडन निर्जन होऊ शकते. लढाईत मरणारे आता फक्त सैनिक नसतील, तर मरणाऱ्यांमध्ये मोठी संख्या निरपराध नागरिकांची सुद्धा असेल. आबाल-वृध्दांची कोणी पर्वा करणार नाही. सर्व जळवा मोठ्या हिरीरिने जगात प्रलय आणण्याची तयारी करत आहेत. ज्या वेळी मनुष्य जातीने आपल्यातील पहिला परजीवी पैदा केला होता, त्यावेळी त्यांना काय माहित होते की जळवा वाढत जाऊन आज हा दिवस दाखवतील. यांच्या विनाशाशिवाय जगाचे कल्याण नाही! जळवांनो, तुमचा ऱ्हास होवो!