समाजवादी रशिया आणि चीनने व्यसनबाजीचे उन्मूलन कसे केले?
मूळ लेख : तजिंदर
मराठी अनुवाद : अमित शिंदे
आपल्या समाजात दारूबाजी अगदी महामारीसारखी पसरलेली आहे. जगभरात दर वर्षी दारूशी संबंधित कारणांमुळे ३० लाख लोक आपला जीव गमावतात. आपल्या देशाची अवस्था तर अत्यंत चिंताजनक आहे. आपल्याकडे दर वर्षी हजारो मृत्यू तर फक्त विषारी दारूमुळेच होतात. अलीकडेच मुंबईच्या मालवणी भागात बेकायदेशीरपणे विकल्या जाणाऱ्या विषारी दारूमुळे १५० माणसे मरण पावली. या घटनेने एकीकडे गरीब जनतेच्या जखमांवर मीठ चोळले तर दुसरीकडे प्रशासन आणि पोलिसांचे खरे रूपसुद्धा उघडे पाडले. प्रशासनाने या घटनेनंतर वस्त्यांमध्ये दारूबाजी बंद करण्यासाठी ठिकठिकाणी पोस्टर बॅनर लावले, परंतु परिस्थिती काही बदललेली नाही. मालवणीची घटना फक्त एक उदाहरण आहे. खरे तर दर वर्षी अशा शेकडो घटनांमध्ये हजारो लोकांचे जीवन नष्ट होते, काही घटना काही दिवसांसाठी मिडिया, प्रशासन आणि जनतेमध्ये चर्चेचा विषय बनतात, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे नाटक केले जाते आणि प्रकरण थंड झाल्यानंतर पुन्हा पोलिस, प्रशासन, माफिया आणि राजकारणी यांच्या साट्यालोट्यांतून दारूचे बेकायदेशीर अड्डे पुन्हा खुलेआम सुरू होतात. शिवाय, स्वस्तात मिळणारी खराब दारू पिणारी देशातील बहुसंख्य गरीब जनता स्वतःला हळूहळू मृत्यूच्या दाढेत ढकलत असते. जगातील सगळे भांडवलदारी देश आज या समस्येने ग्रस्त आहेत. भांडवली सरकार आणि प्रशासनाने केलेले कोणतेही दारुबाजी विरोधी प्रयत्न या समस्येच्या मूळ कारणापर्यंत कधी पोचतच नाहीत. दुसरीकडे, रशिया आणि चिनने आपल्या समाजवादी काळात दारूबाजीचे उन्मूलन करून जगासमोर एक आदर्श ठेवला होता.
व्यसनबाजी ही आपल्या समाजाची प्रदीर्घ काळापासूनची समस्या आहे. आज ह्या समस्येने आपल्या पिढीभोवती अजगर मिठी घातली आहे. एकट्या पंजाब मध्येच जवळपास ७३.५ टक्के तरुण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. पंजाब मधील ग्रामीण भागात जवळपास ७६.४७ टक्के लोक दररोज दारू पितात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्ट नुसार जगात दर वर्षी ३० लाखांहून अधिक लोक दारू पिल्यामुळे मरतात.
समाजाला व्यसनमुक्त करण्याचे प्रयत्न वेळोवेळी करण्यात आले आहेत. परंतु नशेच्या ह्या दलदलीत समाज अधिकच आत ओढला जात आहे. वेगवेगळ्या देशांमधील सरकारे, समाजसेवी संस्था आणि ह्या नफा-केंद्रित व्यवस्थेच्या सेवेत गुंतलेले बुद्धीजीवी या समस्येवर ह्याच व्यवस्थेच्या चौकटीमध्ये राहून विविध उपाय सुचवत असतात. त्या उपायांची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली आहे. परंतु समाजातील व्यसनांचा प्रादुर्भाव रोखण्यात हे सर्व मार्ग अपयशी ठरले आहेत.
परंतु मानवी समाजाच्या इतिहासामध्ये एक सुवर्णकाळ असाही होता ज्यात व्यसन आणि शरीर-विक्रय यांसारख्या सामाजिक समस्या पूर्णपणे संपवण्यात आल्या होत्या. हा काळ होता रशिया आणि चीन मधील समाजवादी काळ. मानवी समाजाच्या इतिहासातील तो असा काळ होता जेव्हा शेकडो वर्षांपासूनच्या शोषणाच्या जोखडातून मुक्त होत सर्वहारा वर्गाने सत्तेची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली होती. तिथे केवळ आर्थिक प्रगतीचीच नवीन शिखरे पादाक्रांत केली गेली नाहीत तर नफाकेंद्रित व्यवस्थेतील सर्व विकृतींचा समूळ नायनाट करण्यात आला. ह्या लेखामध्ये आपण समाजवादी रशिया आणि चीनमधील व्यसन विरोधी प्रयोगांची चर्चा करणार आहोत, जेणे करून आपण आजच्या जगभरातील सरकारांची ह्या प्रश्नावरील दुतोंडी भूमिका, साम्राज्यवादी फंडिंगवर चालणारे धंदेवाईक एनजीओ आणि त्याच बरोबर व्यसनाधीन-व्यसन विक्रेत्या लोकांना दिल्या जात असलेल्या धार्मिक व नैतिक उपदेशांचे फसवे धुके साफ करू शकू.
रशिया मधील दारूबाजी विरुद्धची लाट
रशिया मध्ये १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीच्या अगोदरच्या काळाची आणि त्यानंतरच्या दारूबाजी, वेश्यावृत्ती, स्त्रियांची खरेदी-विक्री, भ्रूण हत्या इत्यादी विरुद्धच्या लाटेची चर्चा अमेरिकी पत्रकार डायसन कार्टर यांच्या ‘पाप आणि विज्ञान’ ह्या पुस्तकात वाचावयास मिळते. डायसन कार्टर यांनी स्वतः क्रांती पश्चातच्या रशियामध्ये जाऊन बदललेल्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्याच बरोबर त्या वेळी अमेरिका-युरोपमध्ये ह्या समस्येवर उपाय म्हणून उपयोगात आणल्या गेलेल्या (अपयशी) प्रयत्नांची चर्चा सुद्धा केली आहे. आपण आपली चर्चा दारूबाजी विरुद्धच्या प्रयात्नांपुरती मर्यादित ठेवणार आहोत.
क्रांतीच्या अगोदरचा काळ :
ऑक्टोबर क्रांतीच्या आधी रशिया मध्ये दारू ही आयुष्याचा सामान्य भाग होती. जवळपास सर्व रशियन्स दारू पीत असत. रस्त्यांवर दारूच्या नशेत झोकांड्या घेत चालणारे लोक हे सामान्य चित्र होते. दारूबाजीचे हे वाढते प्रस्थ रोखण्याच्या प्रयत्नांची सुरुवात झाली ती १८१९ मध्ये. झार सरकारने दारूबाजी कमी करण्यासाठी जी प्रतिबंधात्मक पाऊले उचलली होती ती खालील प्रमाणे आहेत:
दारू विक्रीला सरकारी नियंत्रणात ठेवणे : ह्यामुळे दारूच्या विक्रीमध्ये तरी कमी आली नाही पण त्यातून झारच्या उत्पन्नामध्ये मात्र नक्कीच भरघोस वाढ झाली. हे प्रस्थ ८ वर्षे चालले. त्याची अंमलबजावणी करणे दिवसेंदिवस अवघड होत गेल्यामुळे दारू विक्री पुनश्च खाजगी हातांमध्ये सुपूर्त करण्यात आली.
दारूवर कर : ह्या मागे झार सरकारचा हेतू सामान्य जनतेसाठी दारू महाग व्हावी, परंतु दारूच्या माध्यमातून मिळणारा पैसा कायम राहावा हा होता. ह्या उपायामुळे दारुविक्री मध्ये कुठलीही कमी आली नाही, कारण जनतेने खाण्यावरील खर्च कमी करून पिण्यावरती खर्च करण्यास सुरुवात केली.
लाइसेंस व्यवस्था : तीस वर्ष रशियामध्ये दारूचे व्यसन वाढतच गेले. धर्मगुरूंनी उपदेश करूनही लोकांनी दारू पिणे सुरूच ठेवले. त्यानंतर लाइसेंस व्यवस्था लागू करण्यात आली, जेणे करून दुकानांची संख्या कमी करता यावी. त्यानंतर रशियामध्ये दारू विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या २,५०,५०० वरून १,१५,००० पर्यंत खाली आली पण दारूची विक्री अजूनच वाढली.
व्यसन विरोधी संघटना : झार सरकारकडून नशामुक्तीसाठी जे प्रयत्न केले जात होते त्यामागची चालक शक्ती रशियातील उद्योगपती होते. कामगार दारूच्या नशेमध्ये काम करत. त्यामुळे त्यांच्या उत्पादकतेमध्ये प्रचंड फरक पडत असे. दुसऱ्या बाजूला जमीनदारांचा समर्थक झारचा चुलत भाऊ अलेक्सान्द्र (जो स्वतः सुद्धा एक श्रीमंत जमीनदार होता) याचे मत होते की शेतकऱ्यांमधील वाढत्या दारूच्या व्यसनामुळे शेतीमधील उत्पादकतेमध्ये सुद्धा प्रचंड खालावते आहे. त्यातून त्याने स्वतःला झारपासून वेगळे केले आणि स्वतःचीच व्यसन विरोधी संघटना उभी केली. व्यसनाचा विळखा रोखण्यासाठी ह्या संघटनेने खालील मार्ग अवलंबले:
ह्या संघटनेने मोठ्या प्रमाणावर बाग-बगीचे, आराम-गृह यांची सोय केली. मनोरंजन केंद्र, नाटक गृह इत्यादींची स्थापना केली. अशा ठिकाणी बहुतेक वेळा लोकांचा जास्त पैसा खर्च होत नसे. ह्या ठिकाणी भाषणे दिली जात असत. त्यात दारूमुळे होणाऱ्या नुकसानाचे वैज्ञानिक दाखले देण्यात येत असत. १९०३ पर्यंत ह्या संघटनेचे काम जोरात चालू होते. परंतु ह्या सगळ्या प्रयत्नाचा परिणाम हा झाला की लोक ह्या ठिकाणी मोफतचे मनोरंजन करून घेत असत आणि वाचलेल्या पैश्यांची दारू पीत.
दारूबंदी : व्यसन विरोधी आंदोलन सुरू झाल्यापासून १९१४ पर्यंत रशिया मधील ‘वोडका’ची विक्री ५०० टक्क्यांनी वाढली होती. शाळांमधील ८० टक्क्यांहून अधिक मुले वोडका पीत असत. त्याच वेळी पूर्व आघाडीवर युद्ध सुरू झाले होते तर दुसरीकडे औद्योगिक व कृषी क्षेत्रातील उत्पादन घटले होते. रशियातील उद्योगपतींनी झार सरकारवर व्यसनमुक्तीसाठी दबाव वाढवला. परिणामतः १९१६ मध्ये झार सरकारने ही समस्या सोडवण्यासाठी दारूवर पूर्णपणे बंदी आणली. दारू विक्री करणारी व बनवणारी दुकाने नष्ट करण्यात आली.
परिणामी १९१६ च्या सुरुवातीचे काही महिने दारू बंद झाली. पण अचानकच पुन्हा सबंध रशियातील जनता पुनश्च दारूच्या आहारी गेली. एका बाजूने युद्धात होत असलेले मृत्यू आणि दुसरीकडे गरिबी, भूकबळी ह्यामध्ये रशियातील जनता अडकली होती. ह्या पासून सुटका करून घेण्यासाठी रशियन जनता दारूकडे वळली. रशियात घराघरात अवैध्य दारू बनवली जाऊ लागली. लोकांनी धान्यापासून दारू बनवून विकण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत आपण झार सरकारने व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम उलटा झालेलाच बघितला. आता आपण १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीनंतरच्या सोवियत समाजवादी काळात व्यसनमुक्ती साठी केलेल्या उपायांचा विचार करूयात, जेणे करून ह्या दोन्ही मधील फरक स्पष्ट करत व्यसनाधिनतेच्या समस्येचे मूळ काय हे ध्यानात येईल.
क्रांती पश्चातचा काळ
१९१७च्या ऑक्टोबर क्रांतीनंतर रशियामध्ये कामगारांची सत्ता स्थापन झाली. खाजगी मालकीवर आधारलेली व्यवस्था नष्ट करून समाजवादी व्यवस्था स्थापन करण्यात आली. परंतु त्या वेळी रशियामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती. लोक धान्य गोदामांमध्ये जमा करण्याऐवजी त्यापासून दारू बनवत होते. धान्यापासून बनवलेली ही दारू अत्यंत विषारी असे. सोवियत सरकारसाठी सर्वप्रथम ह्या दारूची विक्री थांबवणे आवश्यक बनले जेणे करून धान्याचा तुटवडा कमी होईल. सोवियत अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम बटाट्यापासून दारू बनवणे कायदेशीर घोषित केले. सोवियत सरकारने तोपर्यंतच्या दारूविरोधी अभियानाचे रिपोर्ट अभ्यासले. ह्या रिपोर्ट्समधील तथ्य अभ्यासल्यानंतर सोवियत अधिकाऱ्यांनी दारूबाजीच्या समस्येचा नव्याने अभ्यास करण्याचे काम हाती घेतले. ह्या अभ्यासाच्या दरम्यान हे तथ्य समोर आले की दारुबाजीची समस्या ही सामाजिक आणि आर्थिक समस्यांशी जोडलेली समस्या आहे. लोक दारूकडे तेव्हाच वळतात जेव्हा ते बेकारी, गरिबी, भूक ह्या समस्यांमध्ये भरडले जातात. त्यांना आपले दुखः विसरण्याचा एकमेव आधार दारूमध्ये दिसतो. दुसऱ्या बाजूला सरकार टॅक्सच्या माध्यमातून महसूल गोळा होत असल्यामुळे तिला प्रोत्साहन देते. झार सरकारला एकूण उत्पन्नापैकी एक चतुर्थांश भाग दारूच्या महसुलामधून मिळत असे.
ही समस्या निकालात काढण्यासाठी सोवियत सरकारने खालील पाऊले उचलली :
घरगुती व विषारी दारू बनवणाऱ्यांचा नायनाट : सोवियत अधिकाऱ्यांनी घरगुती दारू बनवणाऱ्यांना बाजारातून बाहेर करण्यासाठी दारूवरील टॅक्स काढून टाकला आणि बाजारातील दारूंच्या किमती कमी केल्या. त्याच बरोबर झार सरकारची दारूच्या व्यापारामध्ये किती हिस्सेदारी होती ह्याचे आकडे सुद्धा जाहीर केले. त्यामुळे लोकांना हे समजले की सोवियत सरकार दारू विक्रीपासून लाभ कमवू इच्छित नाही. दारूच्या किमती कमी झाल्यामुळे लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. डायसन कार्टर यांच्या शब्दांमध्ये – “तो दिवस आपोआपच राष्ट्रीय उत्सवाचा दिवस बनला होता. त्या दिवशी सर्वांनीच मनसोक्त नवी-जुनी, उत्कृष्ट प्रतीची वोडका पिली. परंतु त्यामुळे झाले हे की घरगुती दारू बनवणारे नष्ट झाले”.
दारू विक्रीशी संबंधित नियम : दारू स्वस्त केल्यानंतर सोवियत अधिकाऱ्यांनी तिच्या विक्रीसंदर्भात काही नियम बनवले. हे नियम पुढील प्रमाणे होते : कारखान्यांच्या आसपासच्या परिसरात दारू विकली जाणार नाही, सुट्टी आणि पगाराच्या दिवशी सुद्धा तिथे दारू विकली जाणार नाही, तरुणांना आणि दारूच्या नशेत असलेल्यांना दारू विकणाऱ्यास कडक शिक्षा देण्यात येईल.
दारूबाजीच्या विरोधात प्रचार मोहीम : रशियातील एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत दारूबाजीच्या विरुद्ध जबरदस्त प्रचार मोहीम चालवण्यात आली. दारूबाजीच्या विरुद्ध ह्या नवीन प्रचाराच्या माध्यमातून जनतेला दारूशी संबंधित वैज्ञानिक तथ्य अगदी स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले. त्यांना सांगितले गेले की दारूच्या अतिसेवनामुळे मेंदूच्या शिरांना गंभीर नुकसान पोहोचते. त्यांना सांगण्यात आले की दारू पिणे गरजेचे नाही. रशियातील लोकांमध्ये हे तथ्य नाट्यगृह व टेलीविजन सारख्या नवनवीन माध्यमांमार्फत पोहोचवण्यात आले. हे तथ्य लोकांसाठी केवळ भाषणापुरते मर्यादित नव्हते. कारण आता रशियामधील परिस्थिती बदलली होती. आता रशियातील जनतेला हे माहिती होते की आता त्यांची सत्ता आली आहे आणि त्यांच्याद्वारे निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तूंवर आता जमीनदार-कारखानदारांची मालकी नसून त्या वस्तू आता संपूर्ण समाजाच्या सामूहिक हितासाठी आहेत. त्यामुळेच जनतेला दारूच्या शारीरिक दुष्परिणामाबरोबरच हे सुद्धा सांगितले गेले की दारूच्या सेवनामुळे देश निर्माणावरती काय दुष्परिणाम होतो. शेत-कारखाने-खाणी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना सांगितले गेले की दारू पिल्यामुळे त्यांच्या कामामध्ये काय फरक पडतो. लोकांना दारू सोडण्यासाठी ना नैतिक उपदेश दिले गेले, ना दारू पिणाऱ्यांना पापी समजले गेले. पण त्यांना समाजाला नुकसान पोहोचवणाऱ्यांच्या रूपात मात्र चित्रित करण्यात आले.
सामाजिक दबाव: रशियामध्ये असे दारुडेसुद्धा अर्थातच होते ज्यांनी वोडकाच्या बाटलीसाठी दारू विरोधी अभियानाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष केले. ह्या दारुड्यांसाठी सोवियत अधिकाऱ्यांनी वेगळा मार्ग अवलंबला. हा मार्ग होता सामाजिक दबावाचा मार्ग. जिथे जिथे दारूची समस्या गंभीर होती तिथे दारू-विरोधी-केंद्र सुरू करण्यात आले. जेव्हा केव्हा एखादा दारुडा मिळत असे, त्याला अशा केंद्रांमध्ये भरती केले जात असे. त्याला स्वच्छ आंघोळ घालून त्याची काळजी घेतली जात असे, त्यानंतर त्याचे नाव, पत्ता आणि कामाची जागा ह्याबद्दल माहिती काढून त्याला तिथे पाठवण्यात येत असे. त्यानंतर तो जिथे काम करतो तिथल्या कामगार सभेला त्याची संपूर्ण रिपोर्ट पाठवली जात असे. अश्या लोकांशी निपटण्यासाठी खास सिमिती बनवण्यात आल्या. जेव्हा तो दारुडा पुन्हा कामावर पोहोचत असे, तेव्हा समितीचे लोक हातात दारूच्या बाटल्या आणि त्याचे व्यंगचित्र घेऊन स्वागत करत असत. दारुडा जर पुन्हा दारू प्याला तर त्याची अजूनच नाचक्की करण्यात येत असे. काही हाताबाहेर गेलेल्या दारूड्यांच्या विरोधात कडक कारवाईसुद्धा करण्यात येत असे. ही पद्धत खूपच यशस्वी झाली कारण आता दारूड्यांवर प्रचंड सामाजिक दबाव होता. लोक त्याला देशाच्या प्रगतीमध्ये अडसर समजतील, अशी भीती त्याला वाटत होती.
खाण्या-पिण्याच्या ठिकाणी दारू : सोवियत मनोवैजानिकांनी सुचिवल्याप्रमाणे खाण्या-पिण्याच्या जागी दारूचा उपयोग वाढवण्यासाठी एक मोहीम चालवण्यात आली. वरवर बघता हा दारूला प्रोहत्सान देणारा प्रयोग वाटेल, परंतु ह्या मागे वैज्ञानिक कारण होते. एक तर हे की लोकांनी अश्या दारू अड्ड्यांवर दारू पिणे सोडून द्यावे जिथे फक्त दारू मिळते. कारण केवळ दारू पिणे शरीरास अपायकारक असते. दुसरे म्हणजे जुन्या अनुभवावरून हे लक्षात आले होते की लोक गरीबीमुळेच दारूच्या आहारी जात असत. त्यांना दारू किंवा जेवण ह्यापैकी एकाची निवड करावी लागत असे. त्यातून ते साहजिकच दारूची निवड करत असत. सोवियत सरकारने बनवलेल्या नवीन कायद्यानुसार दारू केवळ अश्या खाण्यापिण्याच्या ठिकाणी मिळत असे जिथे परिवार जेवण्यास येत असत आणि जिथे संपूर्णपणे पारिवारिक वातावरण असेल. ह्यामुळे लोकांच्या सवयींमध्ये आणि व्यवहारामध्ये मोठे बदल घडून आले. आता लोक कमी दारू पीत असत कारण सोबत जेवणही करावे लागत असे. अश्या उपायांच्या माध्यमातून सोवियत रशियामध्ये दारूबाजी खूप वेगाने कमी झाली.
सोवियत रशियामधील व्यसन विरोधी अभियानानंतरच्या २० वर्षांनंतरची परिस्थिती
डायसन कार्टर व त्यांची पत्नी सोवियत रशियामधील दारूबाजी संबंधित तथ्य अभ्यासण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी व्यसन विरोधी अभियानानंतरच्या परिस्थितीचे वर्णन पुढील शब्दात केले आहे –
“आम्ही बघितले की साधारणपणे पाहुण्यांच्या स्वागताला जे लोक येत असत ते पाण्याचा किंवा ज्यूसचा ग्लास घेऊन उभे असत. त्यानंतर वाढपी जेव्हा वेगवेगळे पदार्थ वाढू लागे तेव्हा लोक स्पष्ट इशारा करीत की ते बीयर किंवा हल्की दारू घेऊ इच्छितात”
… “आम्ही भोजनालयांमध्ये आणि छोट्या-मोठ्या हॉटेल्समध्ये जेवण केले. त्यापैकी अर्ध्या पेक्षा जास्त ठिकाणी दारू सादर केली गेली. आम्ही हजारो सोवियत नागरिकांना खात-पित असताना बघितले. परंतु एकदासुद्धा आम्ही जेवण करतेवेळी किंवा रस्त्यांवर चालत असताना एकही व्यक्ती नशेमध्ये झुलत असताना बघितला नाही.”
…“वीस-तीस वर्षांचे बहुतेक तरुण तेथे एखाद्या विशिष्ट वेळी दारू पीत. बहुतेक तरुण तर दारूच पीत नसत.”
समाजवादी चीनने व्यसनांचे उन्मूलन कसे केले?
१९४९च्या क्रांतीच्या अगोदर चीनमधील लोक गरिबी, दारिद्र्यामध्ये आयुष्य व्यतीत करीत होते. मुठभर जमीनदार, सरदार आणि वसाहतवाद्यांकडून चीनी जनतेचे प्रचंड शोषण करण्यात येत असे. क्रांती अगोदर व्यसनांचा विळखा इतका घट्ट होता की ७ कोटी लोक गांजा, मौर्फ़िन आणि हेरोइनच्या आहारी गेले होते. भुकेले-गरीब लोक आपले दुखः-कष्ट विसरण्यासाठी गांजाची मदत घेत असत. दूसरीकडे श्रीमंत आणि जमीनदार आपला रिकामा वेळ घालवण्यासाठी व्यसन करीत असत. परिस्थिती ईतकी वाईट होती की मादक पदार्थ छोट्या-छोट्या बाटल्यांमध्ये भरून रस्त्यांवर आईसक्रीम विकावेत तसे विकले जात असत. परिणामी लोक मादक पदार्थ खरेदी करण्यासाठी आपली मुलंसुद्धा विकत असत वा महिलांना वेश्यावृत्ती करायला भाग पाडीत.
चीनमध्ये व्यसनांची सुरुवात कशी झाली?
चीनवर अमली पदार्थ यूरोप आणि अमेरिकेच्या वसाहतद्यांकडून लादण्यात आले. चीनने ब्रिटनकडून गांजाची निर्यात कबूल करावी यासाठी आणि चीनमध्ये गांजा कायदेशीर ठरवण्यासाठी १८३९ मध्ये युद्ध लादण्यात आले, जे इतिहासातील प्रसिद्ध ‘गांजा युद्ध’ म्हणून ओळखले जाते. ब्रिटनकडून मोठ्या प्रमाणात चीनमध्ये गांजाची निर्यात करणात आली, जेणेकरून प्रचंड नफा मिळवला जाऊ शकेल. चीनी जनतेवर गांजाचे व्यसन लादण्यात आले, व गांजाच्या माध्यमातून मिळालेला नफा पुन्हा चीनी जनतेला गुलाम बनवण्यासाठी उपयोगात आणला गेला. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष रीगनच्या कार्यकाळात सीआईए द्वारा कित्येक टन कोकेन अमेरिकेमध्ये आणण्यात आली, तसेच हे होते. जिच्याकडे आला दिवस ढकलण्यापलीकडे प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी कुठलाही मार्ग शिल्लक नव्हता अशी अमेरिकेतील गरीब बेरोजगार जनता कोकेनच्या आहारी गेली. त्यानंतर अमेरिकन सरकारने ‘व्यसन विरोधी लढाई’च्या नावाखाली ह्या जनतेवर आणि खास करून कृष्णवर्णीय लोकांवर अमानुष अत्याचार करण्यास सुरुवात केली. यालाच ‘क्रैक कोकेन महामारी’ म्हटले जाते. दुसरीकडे अमेरिकन सरकार कोकेन विक्रीतून होणाऱ्या नफ्यातून निकारागुआ मधील साम्यवादी सरकार विरुद्धच्या गुप्त युद्धाला आर्थिक सहाय्य करत होते.
वर सांगितलेल्या तथ्यांमधून एक गोष्ट स्पष्ट आहे की विद्यमान व्यवस्था व्यसने संपवू शकत नाही.
चीनमधील व्यसन विरोधी अभियान
चीनमध्ये अमली पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि सेवन रोखण्यासाठी जनतेच्या भागीदारीचा मार्ग निवडण्यात आला. व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांना व्यसन सोडण्यास प्रेरित करण्यात आले. व्यसन सोडलेले लोक, त्यांचे कुटुंबीय, शाळेतील मुले आणि वृत्तपत्रे, रेडियो इत्यादींना व्यसन विरोधी अभियानासाठी एकजूट करण्यात आले.
दुसरीकडे, अमली आवक कमी व्हावी यासाठी क्रांतीकारकांकडून लोकांना अमली पदार्थांचा व्यापार संपवण्यासाठी संघटित करण्यात आले. अमली पदार्थांची आवक घटल्यामुळे लोकांना अमली पदार्थांचे सेवन करणे अवघड झाले. व्यसनविरोधी अभियान, ज्यामध्ये प्रत्येक वर्गातील लोकांची सक्रिय भूमिका होती, ते सर्व लोक जुन्या व्यवस्थेद्वारे निर्माण केली गेलेली सामाजिक समस्या मुळापासून उघडून टाकण्यासाठी एकजूट झाले होते. ह्या व्यसन विरोधी मोहिमेने जनांदोलनाचे रूप घेतले होते.
चीन सरकारने व्यसनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन प्रकाराचे उपाय अमलात आणले : लोकांना सांगितले गेले की व्यसनांच्या आहारी गेलेले लोक हे जुन्या शोषणावर आधारलेल्या व्यस्थेचे बळी आहेत, त्यामुळे व्यसनांतून त्यांची मुक्तता करण्यासाठी त्यांना मदत केली जावी. अमली पदार्थ विक्री करण्याच्या धंद्यात गुंतलेल्या गरीब लोकांनासुद्धा ह्या धंद्यातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या संधी देण्यात आल्या आणि व्यसन विरोधी अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. कोणत्याही व्यक्तीशी व्यसन मुक्तीसाठी ना जबरदस्ती केली गेली ना त्याला शिक्षा देण्यात आली. लोकांना व्यसनापासून मुक्त होण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात आला. व्यसनाच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी व्यसनी माणसाला त्याच्या कुटुंबीयांसोबतच संपूर्ण समाजाचे सहकार्य मिळत असे.
लोकांच्या दुःखांचा-कष्टांचा फायदा घेऊन श्रीमंत बनणाऱ्या अमली पदार्थांच्या मोठ्या क्रांतिकारकांनी वेगळे धोरण स्वीकारले. त्यांची नावे ‘लोकांचे शत्रूच्या’ यादीमध्ये टाकण्यात आली. ज्या हजारो लोकांचे आयुष्य अशा नफेखोर व्यापाऱ्यांनी बरबाद केले होते, त्यांच्यासमोर या व्यापाऱ्यांना उभे करण्यात आले. बहुतेक गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. आणि ज्यांचे अपराध अक्शम्य होते त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.
१९५१ पर्यंत उत्तरी चीनमध्ये व्यसनबाजी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली. दक्षिण चीनमध्ये यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अजून १-२ वर्षांचा कालावधी लागला.
१९५३ मध्ये रशियात स्टालिन आणि १९७६ मध्ये चीनमध्ये माओच्या मृत्युपश्चात भांडवलशाहीची पुनर्स्थापना झाली. शोषणावर आधारलेली व्यवस्था पुनश्च कायम झाली. त्याचबरोबर ही व्यवस्था व्यसनबाजी सारख्या जुन्या समस्या पुन्हा घेऊन आली. परंतु रशिया आणि चीनमधील समाजवादी काळातील अनुभवांनी हे सिद्ध केले आहे की जर नफाकेंद्रित व्यवस्था नष्ट करून जिच्या केंद्रस्थानी माणूस आहे अशी क्रांतिकारी व्यवस्था निर्माण केली गेली तर जनतेच्या विराट शक्तीला आर्थिक शिखरे पादाक्रांत करीत एका निरोगी समाजाचे सृजन करण्याच्या दिशेने वळवले जाऊ शकते.
कामगार बिगुल, सप्टेंबर २०१५