प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लिग कडून कामगार क्लिनिकचे आयोजन
डॉ. नेहा
प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीग द्वारे कामगार क्लिनिकच्या उपक्रमाचे सत्र पुढे चालू ठेवत ऑगस्ट महिन्यात अहमदनगर आणि पुणे या दोन ठिकाणी मोफत आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीग हि एक न्यायप्रिय डॉक्टरांची संघटना आहे. आरोग्यव्यवस्थेचे खाजगीकरण झालेल्या आजच्या काळात आरोग्य व्यवस्था हि सर्वसामान्य जनतेला, कामगार कष्टकऱ्यांना परवडणारी नाही. आजच्या नफ्याच्या व्यवस्थेत केवळ मूठभर श्रीमंत लोकच चांगले उपचार घेऊ शकतात. सर्वांना समान, मोफत, दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे, आरोग्याचा अधिकार हा सर्वांचा मूलभूत अधिकार झाला पाहिजे या उद्दिष्टानेच प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीग विविध भागातील वस्त्यांमध्ये, सामान्य जनतेमध्ये कामगार-क्लिनिक लावत असून सोबतच आरोग्य हक्कांबाबत व आरोग्याबाबत जनजागृतीचे काम पूर्णत: लोकसहभागातून आणि लोकसहयोगातूनच करत असते.
दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी अहमदनगर येथे अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिवसा निमित्त प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीग व भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षातर्फे अण्णा भाऊ साठे नगर येथे मोफत आरोग्य शिबीर लावण्यात आले होते. शिबीराच्या सुरुवातीला भारताचा क्रांतिकारी पक्षाचे कार्यकर्ते अविनाश म्हणाले की, “कोरोनाच्या काळात कामगार वर्गावर आर्थिक तसेच आरोग्याचे संकटही मोठ्या प्रमाणावर कोसळले आहे. महागड्या आरोग्य व्यवस्थेमुळे कामगार वर्गाला कोरोनाच्या साथीत सुध्दा योग्य उपचार घेता आले नाहीत. प्रगतीशील डॉक्टरांनी अशा परिस्थितीत पुढे येऊन कामगार-कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत आरोग्य सुविधा घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे.” प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीग कडून डॉ. जयवर्धन यांनी प्रतिपादन केले की कॉर्पोरेट हॉस्पिटलद्वारे व मोठ्या फार्मा कंपन्यांद्वारे होत असलेली जनतेची लूट थांबली पाहिजे व आरोग्यसेवेचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे. त्यानंतर रुग्ण तपासणीला सुरुवात केली, शिबीरामध्ये आलेल्या रुग्णांचे विविध आजारांचे निदान करून औषधोपचार करण्यात आला, त्यासोबत डॉ नेहा यांनी रक्तशर्करा तपासणे, जखमेच्या जागी मलमपट्टी करण्याचे, व औषधी वितरणाचे काम केले. जवळपास 100-120 कामगारांनी शिबीराचा लाभ घेतला. कामगार कष्टकऱ्यांना प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीगतर्फे आर्थिक सहयोगासाठीचे आवाहन सुद्धा करण्यात आले.
दिनांक 24 ऑगस्ट 2021 रोजी शहीद राजगुरू यांच्या जन्मदिवसा निमित्त पुण्यातील कात्रज भागातील संतोष नगर येथे, महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियन सोबत प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीगने दुसऱ्या शिबीराचे आयोजन केले होते. प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीग कडून डॉ जयवर्धन व डॉ नेहा यांनी रुग्णांचे वेगवेगळ्या आजारांचे निदान करून औषधोपचार केला. डॉ अर्चना यांनी औषधी वितरणाचे काम केले व सोबतच आरोग्याबद्दलची योग्य माहिती दिली. शिबीरामध्ये मोठ्या संख्येने बांधकाम कामगार रूग्ण सहभागी झाले होते. शिबीरामध्ये आलेले बहुतांशी रूग्ण हे बांधकाम क्षेत्रात काम करत असल्यामुळे अनेकांना सिमेंट कालविण्याच्या कामामुळे त्वचेचे आजार, सिमेंटमुळे झालेली ॲलर्जी , अंगावरील त्वचेचा कोरडेपणा व खाज, त्यासोबतच कामाच्या ठिकाणी सतत विटा , रेती, पोते उचलण्याचे काम असल्यामुळे हाता पायाला झालेल्या जखमा व जखमांमध्ये झालेले इन्फेक्शन इ. आजार डॉक्टरांच्या निदर्शनास आले होते. इलाजापर्यंत पोहोच नसल्यामुळे अनेक कामगार अशा जखमा अंगावरच काढतात आणि परिणामी आपल्या आरोग्याची किंमत देतात हे दिसून येत होते. कोट्यवधींच्या संख्येने बांधकामात लागलेल्या या कामगारांपर्यंत स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही प्राथमिक आरोग्य सुविधाही पोहोचलेल्या नाहीत हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे.
या अनुभवांमधूनही दिसून येते आहे की कामगार कष्टकऱ्यांना आज उत्तम आरोग्य सुविधेची गरज तर आहेच, सोबतच आरोग्य अधिकारा विषयी राजकीय जागृतीची गरज असून अशाप्रकारच्या आरोग्य शिबिराचा उपक्रम यापुढेही चालू ठेवण्याचा निर्धार ‘प्रोग्रेसिव्ह डॉक्टर्स लीग’ने केला.