पॅरिस कम्युन: पहिल्या मजूर राज्याची सचित्र कथा (पुष्प सातवे)

आज भारतातच नाही, तर संपूर्ण दुनियेत कामगार भांडवली लुटखोरांच्या वेगवान होत चाललेल्या हल्ल्यांचा सामना करत आहेत, आणि कामगार आंदोलन विखुरलेपण, साचलेपणा, आणि हताशेने ग्रासलेले आहे. अशामध्ये इतिहासाची पाने उलटून कामगार वर्गाच्या गौरवशाली संघर्षांपासून शिकण्याचे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे महत्व फार वाढते. आजपासून 150 वर्षे अगोदर, 18 मार्च 1871 ला फ्रांसची राजधानी पॅरिस मध्ये पहिल्यांदा कामगारांनी आपले शासन कायम केले. याला पॅरिस कम्युन म्हटले गेले. त्यांनी शोषकांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या या विचारांना ध्वस्त केले की कामगार राज्यकारभार चालवू शकत नाहीत. पॅरिसच्या बहादूर कामगारांनी फक्त भांडवली सत्तेच्या रथालाच उलटवले नाही तर 72 दिवसांच्या शासनाच्या दरम्यान येणाऱ्या दिवसांचे एक छोटे मॉडेल जगासमोर प्रस्तुत केले आणि दाखवले की समाजवादी समाजामध्ये भेदभाव, असमानता, आणि शोषण कशाप्रकारे समाप्त केले जाईल. पुढे चालून 1917 च्या रशियन कामगार क्रांतीने या क्रांतीचा पुढचा टप्पा रचला.

कामगार वर्गाच्या या साहसी कारवाईने फक्त फ्रांसमधीलच नाही तर जगातील भांडवलदारांचे काळीज थरथरले. त्यांनी कामगारांच्या पहिल्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी जीवतोड प्रयत्न केले आणि शेवटी कामगारांच्या कम्युनला त्यांनी रक्ताच्या नद्यांमध्ये न्हाऊन काढले. पण कम्युनचे सिद्धांत अमर झाले.

पॅरिस कम्युनच्या पराजयातूनसुद्धा जगातील कामगार वर्गाने महत्वाचे धडे घेतले. पॅरिसच्या कामगारांचे बलिदान कामगार वर्गाला सतत आठवण देत राहील की भांडवलशाहीला नष्ट केल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळू शकत नाही.

पॅरिस कम्युनला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘कामगार बिगुल’ च्या या अंकापासून आम्ही जगातील पहिल्या कामगार राज्याच्या सचित्र कथेची सुरूवात करत आहोत. ‘मजदूर बिगुल’ मध्ये मार्च 2012 पासून प्रकाशित झालेल्या धारावाहिक कथेचा अनुवाद पुढील अंकांमध्ये आम्ही देत राहू.

या साखळीतील पहिल्या काही पुष्पांमध्ये आपण पॅरिस कम्युनच्या पार्श्वभूमीमध्ये जाणून घेतले की कामगारांनी कशाप्रकारे भांडवलाच्या सत्तेविरोधात लढण्याची सुरूवात केली आणि कशाप्रकारे चार्टीस्ट आंदोलन आणि 1848 च्या क्रांत्यांमधून जात कामगार वर्गाची  चेतना आणि संघटीतपणा वाढत गेला. आपण कामगारांच्या मुक्तीच्या वैज्ञानिक विचारधारेचा विकास आणि कामगारांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय संघटनेबद्दल (इंटरनॅशनलबद्दल) जाणले. गेल्या अंकात आपण पाहिले की कम्युनची स्थापना कशाप्रकारे झाली आणि तिच्या रक्षणाकरिता कामगार वर्गीय जनता कशाप्रकारे शौर्याने लढली. यावेळी आपण पाहूयात की कम्युनने खऱ्या लोकशाहीच्या नियमांना इतिहासात पहिल्यांदा व्यवहारात कसे लागू केले आणि हे दाखवले कीजनतेची सत्ताखरोखर काय असते.

— संपादक मंडळ

वीर कम्युनार्डांच्या रक्ताने लिहिलेला इतिहासाचा कठीण धडा

  1. याच दरम्यान व्हर्साय येथे थियेर आणि त्याचे प्रतिक्रियावादी सरकार प्रशियन अधिकाऱ्यांच्या मदतीने पॅरिस कम्युनवर हल्ला करण्याची योजना आखत होते. परंतु थियेर धोकेबाजीची भाषा करत होता. 21 मार्चला, जेव्हा त्याची सेना तयार झालेली नव्हती, तेव्हा थियेरने राष्ट्रीय सभेत घोषणा केली, “काही झाले तरी मी पॅरिस विरूध्द आपली सेना पाठवणार नाही.

    कम्युनने जी ऐतिहासिक पावले उचलली होते, त्यांना घेऊन ती खूप दूरवर जाऊ शकली नाही. जन्मापासूनच ती अशा शत्रूंनी घेरलेली होती जे तिला नेस्तनाबूत करण्यास टपलेले होते. “कम्युनिस्ट घोषणापत्रा”तील शब्दांनुसार म्हाताऱ्या युरोपला कम्युनिझमची जे भूत 1848 मध्येच सतावत होते, त्याला पॅरिस मध्ये समक्ष उभे राहताना बघून युरोपच्या भांडवलदारांचे काळीज चरकले होते. कम्युनला चिरडण्यासाठी सर्व प्रतिक्रियावादी शक्ती एकत्र झाल्या होत्या. प्रशिया(जर्मनी)च्या सैनिकांद्वारे कब्जा करून पॅरिसला तुडवून टाकण्याचा भांडवलदारांचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही कारण जर्मनीचा शासक बिस्मार्क या गोष्टीसाठी तयार नव्हता. 18 मार्चला त्यांनी दुसऱ्यांदा प्रयत्न केला, ज्या मध्ये त्यांची सेना हारली आणि पूर्ण सरकार पॅरिस सोडून व्हर्सायला पळून गेले. थियेरने पॅरिससोबत तहासाठी बोलणी करण्याचे नाटक केले आणि पॅरिस विरूध्द लढाईची तयारी करण्याची करण्याची संधी साधली. परंतु त्याचे उरले-सुरले सैन्य या परिस्थितीत नव्हते की ते कम्युनचा सामना करू शकेल. कम्युनार्डांच्या शौर्याला बघून थियेरला समजून चुकले होते की पॅरिसला विरोध करून नेस्तनाबूत करणे त्याच्या सैनिकी प्रतिभेला आणि सैन्यदलाला शक्य नाही. म्हणून तो बिस्मार्कच्या भरवशावर होता

  2. कम्युनार्ड पण आपली तयारी करत होते. रस्त्यांवर अडथळे उभे केले होते. स्त्रिया आणि पुरूषांनी मिळून ते उभे केले होते आणि त्यावर आपला मोर्चा सांभाळला होता.

    कार्ल मार्क्स यांना हे स्पष्टपणे समजले होते की, पॅरिस कम्युनला चिरडून टाकण्यासाठी बिस्मार्कची जी प्रशियाई सेना पॅरिसच्या सीमेवर उभी आहे, ती एकतर थियेरला मदत करेल किंवा स्वत: पॅरिसवर आक्रमण करेल. त्यामुळे ते एकामागून एक सल्ला देत देत होते की पॅरिस कम्युनचा विजय निश्चित करण्यासाठी गरज आहे ती कामगारांच्या सेनेने पॅरिसमध्ये प्रतिक्रांतीचा प्रत्येक प्रयत्न चिरडून, न थाबंता, व्हर्सायच्या दिशेने पुढे जाण्याची; ते व्हर्साय, जे थियेर सरकार सहीत पॅरिसच्या सर्व श्रींमतांचे आश्रयगृह बनले होते. त्यांचे असे म्हणणे होते की यामुळे कम्युनची विजयी स्थिती मजबूत झाला असती आणि कामगार क्रांती पूर्ण देशात पसरली असती. नंतर हे समोर आले की थियेर जवळ एकूण 27 हजार हतोत्साहीत सेना होती, जिला पॅरिसच्या एक लाख ‘नॅशनल गार्ड’ने चुटकीसरशी धुळ चारली असती.

  3. कामगारांच्या पहिल्या राज्याच्या सुरक्षेसाठी पॅरिसचे सर्व कामगार जीव तोडून लढले. कम्युनच्या प्रत्येक पावलावर ठामपणे सक्रीय असलेल्या स्त्रियांनी बॅरिकेडच्या लढाईमध्ये चढाओढीने भाग घेतला. अनेकदा जेव्हा त्यांचे पुरूष सोबती शत्रूच्या हल्ल्याने हताश होत असत तेव्हा स्त्रिया पुढे येऊन त्यांची उमेद वाढवत असत.

    परंतु पॅरिसचे शूर कम्युनार्ड येथेच चुकले. त्यांनी पॅरिस मध्ये कामगारांची फौलादी सत्ता कायम केली आणि भांडवलदार वर्गावर कोणतीही दयामाया दाखवली नाही, परंतु ते विसरून गेले की थियेरच्या मागे फक्त फ्रांस देशाचे नाही तर पूर्ण युरोपातील प्रतिक्रांतिकारी एकत्र येत होते. मार्क्सने कम्युनचे प्रमुख नेते फ्रांकेल आणि वाल्या यांना सुचित केले होते की पॅरिसला घेरण्यासाठी थियेर आणि प्रशिया मध्ये सौदा होऊ शकतो; त्यामुळे प्रशियाई सेनेला मागे ढकलण्यासाठी मॉंतमात्र डोंगराच्या उत्तर बाजूची किल्लेबंदी केली पाहिजे. मार्क्स या गोष्टीमुळे खूप चिंतेत होते की कम्युनचे लोक स्वत:ला फक्त बचाव करण्यापुरते मर्यादित ठेवून किमती वेळ वाया घालवत आहेत आणि व्हर्सायवाल्यांना आपली सेना मजबूत करण्यासाठी वेळ देत आहेत. त्यांनी कम्युनार्डांना लिहिले की प्रतिक्रियावादाची गुहा ध्वस्त करून टाका, फ्रेंच राष्ट्रीय बॅंकेचा खजिना जप्त करा आणि क्रांतिकारी पॅरिससाठी प्रांतांचे समर्थन मिळवा..

  4. दहा हजार कामगार महिला
    पॅरिसच्या लढाईत आघाडीवर
    लढत होत्या. त्याशिवाय हजारो
    इतर स्त्रिया बचाव करण्याच्या इतर
    कामांमध्, लाग ये णाऱ्या सामानाची
    रसद पुरवणे, घायाळ लोकांची सेवा
    करण्यात गुंतल्या होत्य

    कम्युनार्डांनी धीराने लढा दिला, परंतु हल्ला करणाऱ्या फौजांपुढे त्यांना माघार घ्यावी लागली आंणि पॅरिसच्या एका छोट्या कोपऱ्यात त्यांनी शेवटचा मोर्चा बांधला.


    आता प्रत्येक बोळ युध्दाचे मैदान आणि प्रत्येक घर एक किल्ला बनले होते. अशा भीषण हल्ल्यापुढे, ज्यामध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचाही जीव घेतला गेला, थकलेले कम्युनार्ड मागे हटण्यास मजबूर होते. एका रस्त्यावर मोर्चा बांधून लढताना कम्युनार्ड.


    प्रचंड तोफखान्याने सज्ज थियेरच्या सेनेला थोपवण्यासाठी मागे हटत असताना कम्युनार्डांनी खूप इमारतींना आग लावली. भांडवलदार वर्गाचे लेखक यावर खूपच आरडाओरडा करत आलेत आणि कम्युनार्डांना “असभ्य” आणि “जाळपोळ करणारा माथेफिरू जमाव” म्हणत आलेत. मार्क्सने या लोकांना कडक शब्दात उत्तर देत लिहले होते: “जेव्हा थियेरने सहा आठवडे पॅरिसवर बॉंबफेक केली होती, हे सांगत की ते केवळ त्या घरांना आग लावत होते ज्या घरात लोक होते, तेव्हा ती जाळपोळ नव्हती का? युध्दात आग पण एक हत्यार असतेच. जगातील प्रत्येक लढाईत सेना इमारतींना आग लावतच आल्यात. परंतु आपल्या मालकांविरूध्दच्या गुलामांच्या युद्धात, जी इतिहासातील एकमात्र न्यायपूर्ण लढाई आहे, याला चुकीचे म्हटले जाते. कम्युनने आगीचा वापर फक्त आपल्या बचावासाठी केला होता. त्यांनी अगोदरच इशारा दिला होती की जर त्यांना भाग पाडले तर ते पॅरिसच्या भग्नावशेषांमध्ये स्वत:ला दफन करतील पण मागे हटणार नाहीत. त्यांना माहित होते की त्यांच्या शत्रुकरिता पॅरिसच्या लोकांच्या जीवाची काहीच किंमत नाही परंतु पॅरिसमधील इमारती खूप प्रिय आहेत.

    परंतु कम्युनने व्हर्सायच्या बाजूने आपल्याला कमी धोका आहे असे गृहित धरण्याची चूक केली. त्यानी फक्त व्हर्सायवर हल्ला न करण्याची चूक केली नाही तर आपल्या बचावासाठी सुद्धा गंभीरपणे विचार केला नाही. 27 मार्च 1871 पासूनच वर्सायच्या सेनेच्या पुढच्या फळ्या आणि पॅरिसच्या चारी बाजूच्या बुरुजांवरच्या सैन्यामध्ये गोळीबार होऊ लागला होता. 2 एप्रिलला जेव्हा कम्युनच्या सेनेची एक तुकडी कूर्बेवाईच्या बाजूला जात होती तेव्हा तिच्यावर हल्ला केला गेला. थियेरच्या सेनेने ज्या सैनिकांना बंदी बनवले, त्यांना लगेच गोळ्या घालून ठार केले. पुढील दिवशी नॅशनल गार्डच्या दबावाखाली कम्युनने शेवटी तीनही बाजूने व्हर्सायवर हल्ला केला. परंतु कम्युनच्या बटालियनचा जबरदस्त उत्साह असूनही, गंभीर राजकीय आणि सैनिकी तयारी अभावी, उशिरा झालेल्या या हल्ल्यात पराजय पत्करावा लागला. या पराजयामध्ये कम्युनला अनेक जीव देऊन मोठी किंमत चुकवावी लागली. कम्युनचे दोन सक्षम बहादूर कमाडंर फ्लोरेंस आणि दुवाल यांना वर्सायच्या सेनेने बंदी बनवल्यावर मारून टाकले.

  5. वैज्ञानिक समाजवादाच्या सिद्धांतावर संघटीत झालेल्या पक्षाचा अभाव या ऐतिहासिक घटनांमध्ये कम्युनच्या कारवायांना वाईट प्रकारे प्रभावित करत होता. इंटरनॅशनलची फ्रेंच शाखा कामगार वर्गाची राजकीय अग्रदल बनली नाही. तिच्यामध्ये मार्क्सवादी विचारधारेच्या लोकाची संख्या खूप कमी होती. फ्रेंच कामगारांची सैद्धांतिक बाजू खूप कमजोर होती. त्या वेळेपर्यंत ‘कम्युनिस्ट घोषणापत्र’, ‘फ्रांसमध्ये वर्ग संघर्ष’, ‘भांडवल’ अशा मार्क्सच्या प्रमुख रचना फ्रेंच भाषेत प्रकाशित झाल्या नव्हत्या. कम्युनच्या नेतृत्वामध्ये बहुतेक सर्व ब्लांकीचे आणि प्रूधोचे अनुयायी सामिल होते. ते एकतर मार्क्सवादी सिद्धांतांशी परिचित नव्हते किंवा त्याच्या विरोधात होते. सर्वसाधारण कामगारांद्वारे पुढे ढकलले गेल्यावर त्यांनी सत्ता हातात घेण्याकरिता बहुतेक गोष्टींना योग्य प्रकारे घडवले आणि पुढे येणाऱ्या कामगारवर्गीय क्रांत्यांकरिता बहुमूल्य शिक्षण दिले; पण आपल्या राजकीय चेतनाच्या कमतरतेमुळे त्यांनी खूप चुकाही केल्या. कम्युनार्डांची एक मोठी चूक ही होती की, ते शत्रूच्या शांततेच्या वाटाघाटींच्या धोकेबाजीला बळी पडले. आणि शत्रूने या मधल्या काळात युध्दाची तयारी पूर्ण केली. जसे की मार्क्सने लिहिले आहे “जेव्हा व्हर्साय आपल्या चाकूला धार लावत होते तेव्हा पॅरिस मतदानामध्ये गुंतले होते; जेव्हा व्हर्साय युध्दाची तयारी करत होते तेव्हा पॅरिस शांततेच्या वाटाघाटी करत होते”. शत्रूचा पूर्णपणे खातमा न करणे, व्हर्साय वर हल्ला न करणे, आणि क्रांतीला संपूर्ण देशात न पसरवणे ही कम्युनची सर्वात मोठी चूक होती आणि ही गोष्ट खरी आहे की नेतृत्वामध्ये मार्क्सवादी विचारांच्या कमतरतेमुळे या चुका होणारच होत्या.
  6. शहराच्या जळत्या भग्नावशेषांमधून लढणाऱ्या हजारो कम्युनार्डांना कैद केले गेले आणि हजारोंना तेथेच ठार मारण्यात आले

    खूप कठीण परिस्थिती असताना आणि कामगारांच्या नव्या राज्यासमोर उभे ठाकलेली अनेक कामे करत असताना सुद्धा शत्रूसोबत लढाई करण्याची तयारी कम्युनार्ड करत होते. गुलाम-मालकांच्या विरूद्ध गुलामांच्या या लढ्यात पॅरिसची जनता सुद्धा जीव ओवाळून टाकायला तयार होती. 1871 च्या मे पर्यंत थियेरच्या सैनिकानी पॅरिसवर हल्ला चढवला होता. व्हर्सायच्या लुटखोरांच्या भाड्याच्या सैनिकांशी कम्युनार्डांनी ठामपणे लढा दिला आणि एकदा तर त्यांना मागे ढकलूनही दिले परंतु परंतु व्हर्सायच्या सेनेने पॅरिसला घेरले आणि गोळीबार करत राहिली. याच वेळी प्रशियाने फ्रांसच्या कैदी बनवलेल्या दहा हजार सैनिकांना सोडून दिले आणि थियेरची भरभक्कम मदत केली. थियेरची सेना दक्षिणेकडचे दोन किल्ले जिंकून पॅरिसच्या दारात पोहोचली होती. प्रशियाच्या सेनेने सुध्दा त्यांना पुढे जाण्यात अप्रत्यक्षपणे मदतच केली. जे बुर्झ्वा पॅरिसमध्ये शिल्लक होते त्यांनी व्हर्सायच्या सेनेपर्यंत खबर पोहचवली की कुठल्या भागात कमजोर बचाव आहे आणि अरक्षित दरवाज्यांनी व्हर्सायची फौज आत घुसली. 21 मे 1871 ला व्हर्सायची दरोडेखोर टोळी आपल्या खाटकाच्या सुऱ्यांसहीत पॅरिसमध्ये घुसली. शहराच्या सडकांवर, चौका-चौकात, आणि विशेषत: कामगार वस्त्यांमध्ये घनघोर युद्ध झाले. शेवटी 8 दिवसांच्या कमालीच्या शौर्यपूर्ण कठिण संघर्षा नंतर पॅरिसचे बहादूर कामगार योद्धे पराजित झाले.

    अनेक हजार लोकांना ज्यामध्ये मुले, रुग्ण आणि वृद्धही होते, हाकलत मोकळ्या जागेत आणले गेले आणि तेथे त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. शेकडो कम्युनार्डांना भिंती जवळ उभे करून गोळ्या घातल्या गेल्या.

    पॅरिसचे श्रींमत, ज्यांपैकी काही लोक आता परत आले होते, रस्त्याच्या कडेला उभे राहून हा घाणेरडा तमाशा पहात होते आणि या यशासाठी स्वत:ची पाठ थोपटत होते.

  7. माथेफिरू झालेल्या व्हर्सायच्या सेनेची प्रत्येक तुकडी खाटकांचा कंपू होती आणि कम्युनप्रती सहानुभूति दाखवण्याच्या संशयावरून कोणाही व्यक्तीला लगेचच ठार मारत होती. या रक्तरंजित आठवड्यात 30,000 कामगार कम्युनचे रक्षण करताना शहीद झाले. विजयी प्रतिक्रियावादींनी रस्त्यावर जो हरण्याचा जल्लोश केला तसे इतिहासात कोणतेही उदाहरण नाही. नागरिकांना ओळीत उभे केले जात होते आणि हाताच्या घट्ट्यांवरून कामगार ओळखून त्यांना वेगळे करून गोळी मारली जात होती. पकडलेल्या व्यक्तींशिवाय चर्चमध्ये शरण आलेले लोक, आणि हॉस्पिटल मध्ये घायाळ पडलेल्या सैनिकांनाही गोळी घालून ठार मारण्यात आले. त्यांनी म्हाताऱ्या कामगारांना हे सांगून मारले की त्यांनी वेळो-वेळी बंड केली आहेत आणि ते सर्व पक्के अपराधी आहेत. स्त्री कामगारांना हे म्हणत गोळ्या मारल्या की त्या “अग्नी बॉंब” आहेत आणि “त्या मेल्यानंतरच स्त्रिया वाटतात”. कामगाराच्या मुलांना हे म्हणत गोळ्या घातल्या की “ते मोठे झाल्यावर बंडखोर होतील”. कामगाराच्या या हत्याकांडाचे सत्र पूर्ण जून महिनाभर चालत राहीले ज्यामध्ये कमीत-कमी 20,000 लोक मारले गेले. पॅरिस प्रेतांनी भरले गेले. सैन नदी रक्ताची नदी झाली. कम्युनला रक्ताच्या थारोळ्यात बुडवले गेले. कम्युनार्डांच्या रक्ताने इतिहासात कामगारांसाठी ही कडू शिकवण लिहीली की कामगारवर्गाला क्रांतीला शेवटपर्यंत चालवावे लागेल. सत्ता ना शांततेने मिळेल ना शांततेने तिची काळजी घेता येईल.

    हजारोच्या संख्येने कम्युनार्डांना घेरून पेरे-लाशेज दफनभूमी आणि इतर डझनभर जागी नेऊन गोळ्यांनी छिन्नविछिन्न केले गेले. भिंतीला उभे करून धीट जमावावर जेव्हा सेना गोळीबार करत होती तेव्हा पॅरिसच्या कामगारांचा खूनी जनरल गॅलीफेट तेथे उभा राहून तमाशा बघत होता. प्रेताचे मोठ-मोठे ढीग जमा झाले होते, ज्यात ते लोक पण होते ते अजून मेलेले नव्हते.

    कम्युनार्डांच्या भिंतीचा”चा एक भाग अजूनही पॅरिसमध्ये आहे. त्यावर बनवलेले वीर कम्युनार्डांचे चेहरे भांडवली सरकारला आव्हानही आहेत आणि कम्युनच्या शहीदांचे स्मारकही आहेत. हे स्मारक कामगारांच्या पुढील पिढीला कम्युनच्या शिकवणीची आठवण करून देत राहते की पळणाऱ्या डाकूचा शेवटपर्यंत पाठलाग केला पाहिजे, पाण्यात बुडणाऱ्या उंदराना पोहून काठापर्यत येऊ देता कामा नये, शत्रूला परत त्याची ताकद मिळू देता कामा नये आणि तोपर्यंत उसंत घेता कामा नये जोपर्यंत भांडवली शत्रू कुठल्याही कोपऱ्यात जिवंत आहेत.

 पुढील अंकात चालू