जगभरात व भारतातही तीव्र होत आहे आर्थिक विषमता

-जयवर्धन

भारत आणि जगभरात आर्थिक विषमतेचे भीषण वास्तव समोर येत आहे. ‘इनइक्वालिटी किल्स’ या 17 जानेवारी 2022 ला प्रकाशित ऑक्सफॅमच्या रिपोर्टनुसार जगातील सर्वात श्रीमंत दहा व्यक्तींची संपत्ती गेल्या दोन वर्षांच्या महामारीच्या काळात दुपटीपेक्षा जास्त, म्हणजे 700 अब्ज डॉलर (जवळपास 53 लाख-कोटी रुपये) वरून 1500 अब्ज डॉलर (जवळपास 114 लाख-कोटी रुपये) इतकी प्रचंड वाढली आहे. म्हणजेच सेकंदाला 15,000 डॉलर किंवा दिवसाला 1.3 अब्ज डॉलर (9.8 हजार कोटी रुपये) या गतीने वाढली आहे. तर दुसऱ्या बाजूला 99 टक्के जनतेचे उत्पन्न घसरले आहे आणि 16 कोटी लोक दारिद्र्यात ढकलले गेले आहेत.  जगातील सर्वात गरीब 310 कोटी लोकांकडे असलेल्या एकूण संपत्तीपेक्षा सहापट संपत्ती या दहा श्रीमंत लोकांकडे एकत्र झाली आहे. या दहा लोकांनी दिवसाला 1 कोटी रुपये याप्रमाणे जरी त्यांची संपत्ती खर्च करायचे ठरवले तर त्यांना ती संपूर्ण संपत्ती खर्च करायला तब्बल 3100 वर्षे एवढा काळ लागेल! 1995 पासून वरच्या 1 टक्के लोकांनी तळाच्या 50 टक्के लोकांपेक्षा 20 पट संपत्ती (एकूण जागतिक संपत्तीपैकी) जमवली आहे. याच रिपोर्टनुसार ही विषमता दररोज 21,300 मृत्यूंचे कारण ठरत आहे. भुकेने दरवर्षी 21 लाख लोकांचा बळी जात आहे. 56 लाख लोक आरोग्यसुविधा न मिळाल्याने जीव गमावत आहेत.

जागतिक आर्थिक विषमतेचे हे विदारक चित्र असताना भारताच्या बाबतीतही गरीब-श्रीमंत दरी आणखी खोल आहे. ऑक्सफॅमने 16 जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या ‘इनइक्वालिटी किल्स – इंडिया सप्लीमेंट 2022’ च्या रिपोर्टनुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या 102 वरून 142 वर गेली आहे. या अब्जाधीशांचे उत्पन्न गेल्या दोन वर्षांच्या महामारीच्या काळात—मार्च 2020 पासून नोव्हेंबर 2021 पर्यंत —23.14 लाख कोटींवरून वाढून 53.16 लाख कोटी इतके झाले आहे. जगात 24 व्या व भारतात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गौतम अडाणीची संपत्ती गेल्या एक वर्षाच्या काळात आठ पट वाढली आहे. 2020 मध्ये 8.9 अब्ज डॉलर (67 हजार कोटी रुपये) असलेली अडानीची संपत्ती 2021 मध्ये 82.5 अब्ज डॉलर (6 लाख 27 हजार कोटी रुपये) वर पोहोचली आहे. मुकेश अंबानीची संपत्ती 36.8 अब्ज डॉलरवरून (2 लाख 79 हजार कोटी रुपये) दुप्पट होत 2021 मध्ये 85.5 अब्ज डॉलर (6 लाख 49 हजार कोटी रुपये) झाली आहे. 98 सर्वात श्रीमंत व्यक्तींवर लावलेल्या 1 टक्के कराच्या रकमेत आयुष्यमान भारत योजना 7 वर्षे चालू शकते असे तज्ज्ञांचे अनुमान आहे. तसेच त्यांच्यावरील 4 टक्के कराच्या रकमेत मध्यान्ह भोजन योजना 17 वर्षे किंवा समग्र शिक्षण अभियान 6 वर्षे चालू शकते. तळाच्या 50 टक्के जनतेकडे राष्ट्रीय संपत्तीचा केवळ 6 टक्के हिस्सा आहे. FAO च्या अन्न सुरक्षा आणि पोषण स्थिती 2021 च्या रिपोर्टनुसार भारतात 20 कोटी लोक कुपोषित आहेत. जागतिक कुपोषित लोकसंख्येच्या 25 टक्के लोक भारतात आहेत.

या सर्व आकड्यांवरून हे अगदी स्पष्ट दिसत आहे की गेल्या दोन वर्षांच्या काळात जनता एका बाजूला दुःखाने होरपळून निघत असताना, रोजगार व भुकेसाठी वणवण फिरत असताना, आरोग्याच्या खर्चापायी दारिद्र्यरेषेखाली ढकलली जात असताना आणि उपचाराअभावी आपल्या जिवलगांचा मृत्यू बघण्यास बाध्य असताना, दुसऱ्या बाजूला धनदांडग्यांच्या व उद्योगपतींच्या संपत्तीत अमाप वाढ होत होती, त्यांच्या आयुष्याच्या ऐशोआरामात मात्र कुठलीही कमतरता येत नव्हती.

हे असे का होत असावे? एका बाजुला अश्रूंचा व दुःखाचा महासागर असताना त्यात हे संपत्तीचे ऐश्वर्याचे बेट कसे उभे राहत असावे? ते कोणाच्या कष्टाने निर्माण झाले? कोण आहे या सर्व संपत्तीचा खरा मालक? याच दुःखाच्या महासागरात वसलेल्या असंख्य कामगार कष्टकऱ्यांच्या हाड-मास-रक्त-घामातून ही सर्व संपत्ती, ऐश्वर्य उभे राहिले आहे. सर्व उत्पादित संपत्तीचा स्त्रोत तर कामगारांची श्रमशक्तीच आहे. कामगारांनीच तयार केलेल्या संपत्तीचा एक छोटा वाटा मजुरी म्हणून मालक त्यांना देतो आणि भलामोठा हिस्सा नफा म्हणून खिशात घालतो.  मालक वर्गाच्या संपत्तीत होणारी वाढ दिसते ती कामकऱ्यांनी निर्माण केलेल्या या संपत्तीमुळेच. उत्पादनाच्या साधनांपासून वंचित असलेला कामगार जगण्यासाठी त्याची श्रमशक्ती विकायला बाध्य असतो. उत्पादनाच्या साधनांची मालकी असलेल्या भांडवलदाराकडे तो त्याची श्रमशक्ती विकतो. त्याला मूल्य मिळतं केवळ श्रमशक्तीचं. बदल्यात तो त्या मूल्यापेक्षा कितीतरी अधिक मूल्याची संपत्ती निर्माण करतो. कारण श्रमशक्तीचा हा गुणधर्मच आहे की ती स्वतःच्या मूल्यापेक्षा जास्त मूल्य निर्माण करू शकते. त्यालाच वरकड मूल्य म्हणतात. हे मूल्य मात्र भांडवलदार हडपतो. हेच वरकड मूल्य सर्व नफ्याचा स्त्रोत असते. तो नफा अजून वाढवायचा ए    क मार्ग म्हणजे कामाचे तास वाढवणे, कामगारांची संख्या कमी करणे. बेरोजगारी निर्माण होण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. अशी बेरोजगारांची फौज समाजात असणे मालकवर्गासाठी फायद्याची असते कारण त्यामुळे त्यांची मोलभाव करून कमी पैशात कामगाराला कामावर ठेवण्याची क्षमता वाढते. कामगारांनीच तयार केलेल्या,  भांडवलदारांकडे एकत्र होणाऱ्या संपत्तीचा एक हिस्साच अप्रत्यक्षपणे नेते, नोकरशहांपासून ते अवाजवी पगार घेणाऱ्या उच्चमध्यम वर्गातील पांढरपेशा नोकरदाराला दिला जातो जो या बाजाराच्या व्यवस्थेचे विचारधारात्मक समर्थन करतो.

कोव्हिड सारख्या महामारींच्या काळातही भांडवलदारांचा एक हिस्सा गब्ब्बर होतच जातो, कारण अनेक उद्योगधंदे जे बंद होतात ते मोठे भांडवलदार कमी किमतीत विकत घेत जातात. यासोबतच मध्यम, निम्न उद्योगपतींचा एक हिस्सा दिवाळखोर होत जातो आणि उद्योग बंद पडल्यामुळे कामगारांची दैन्यावस्था वाढतच जाते.  गेल्या 2 वर्षातील प्रचंड वाढलेल्या विषमतेचे तात्कालिक कारण जरी कोव्हिड असले, तरी मूळ कारण मात्र भांडवली उत्पादन व्यवस्थाच आहे.

कामगार बिगुल, मार्च 2022