क्रिप्टोकरन्सी (कूटचलन): जुगाराचे अजून एक साधन

सुस्मित

गेल्या काही वर्षात क्रिप्टोकरन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. क्रिप्टोकरन्सी मध्ये पैसे गुंतवा आणि झटपट श्रीमंत व्हा अशा प्रकारच्या ऑनलाईन जाहिरातींचा सुळसुळाट झालाय. भारतात 10 कोटी लोकं क्रिप्टोकरन्सी बाळगतात आणि जगात क्रिप्टोकरन्सीच्या वापरकर्त्यांच्या यादीत अव्वल स्थानावर येतो. यात काहीच नवल नाहीये. कारण भारतात कामकऱ्यांमध्ये आज रोजगाराच्या संधी अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे त्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवून श्रीमंत होण्याची स्वप्न दाखवली जात आहेत. याचसाठी एकीकडे क्रिप्टोकरन्सी कशी काम करते, ती कागदी चलनापासून वेगळी कशी, ती कामकऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी परिवर्तन करू शकते का, हे समजणे हे आवश्यक आहे. तर दुसरीकडे क्रिप्टोकरन्सीच्या मागील भ्रामक वैचारिक धारणा समजून त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने उहापोह करणे आवश्यक आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे नेमके काय आणि ती कशी काम करते?

क्रिप्टोकरन्सीला, म्हणजे कूटचलन, एक प्रकारचे डिजिटल चलन म्हटले जाऊ शकते. जसे कागदी चलन असते, म्हणजे रुपया, डॉलर इत्यादी; तसेच क्रिप्टोकरन्सीचे विविध प्रकार अस्तित्वात आहेत. बिटकॉइन ही सर्वप्रथम अस्तित्वात आलेली क्रिप्टोकरन्सी होती पण आजघडीला बिटकॉइन सोडून इथेरियम, टेदर अशा एकूण तब्ब्ल 6,000 प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहेत. क्रिप्टोकरन्सी हातात कधीच येत नाही; फक्त ऑनलाईन खात्यात दिसते आणि म्हणायला वस्तू विकत घ्यायला सुद्धा या चलनाचा वापर होऊ शकतो; पण वास्तवात मात्र यांचा वापर गोष्टींच्या देवाणघेवाणीसाठी कमी आणि गुंतवणुकीसाठी, सट्ट्यासाठीच होताना दिसतो.

दुसरीकडे, अनेकांना क्रिप्टोकरन्सीच्या चलनाच्या वापरापेक्षा तिच्या मागच्या तंत्रज्ञानात काही दूरगामी फायदे दिसतात. हे फायदे काय आहेत ते आपण पुढे बघू त्याआधी क्रिप्टोकरन्सी मागील तंत्रज्ञान काय आहे ते समजून घेऊ. क्रिप्टोकरन्सीच्या मागील तंत्रज्ञानाला डिस्ट्रीब्युटेड लेजर टेकनोलोजी (Distributed Ledger Technology) म्हणतात. म्हणजे उदाहरणाकरता बिटकॉइनच्या सगळ्या व्यवहारांची नोंदवही एका केंद्रिकृत संगणकावर नाही, तर जगभरातल्या शेकडो संगणकांवर विकेंद्रीत असते. यामुळेच, बिटकॉइनच्या सगळ्या व्यवहारांची नोंद आणि नियंत्रण बँक, सरकार किंवा इतर कोणतीही वित्तीय संस्था करत नाही तर ती सर्वांना ज्ञात असलेल्या सॉफ्टवेअरने नियंत्रित केली जाते. ही नोंद जगातल्या अनेक संगणकांवर विकेंद्रीकृत असते आणि गणितीदृष्त्या जटील पण सुरक्षित असे क्रिप्टोग्राफीचे (cryptography) तंत्र वापरून अशी व्यवस्था केली जाते की कोणी एक व्यक्ती यामध्ये फेरफार करू शकणार नाही. म्हणूनच क्रिप्टोकरन्सीला सुरक्षित समजले जाते.

क्रिप्टोकरंसी: सट्टेबाजीचे अजून एक उपकरण!

क्रिप्टोकरन्सीच्या वापराची सुरुवात 2008 नंतरच्या जागतिक आर्थिक मंदीच्या काळापासून पासून झाली आणि गेल्या 10 वर्षात क्रिप्टोकरन्सी अधिक लोकप्रिय होत गेली. आधी म्हटल्याप्रमाणे क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल चलनाचा वापर वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी कमी आणि गुंतवणूक आणि सट्ट्यासाठी होत आहे. आज (म्हणजे हा लेख लिहिला गेला त्या दिवशी!) एका बिटकॉइनची किंमत 32 लाख रुपये एवढी आहे! इथे आपल्याला हे समजले पाहिजे की आजच्याघडीला क्रिप्टोकरन्सी वापरून तुम्ही बाजारात सध्यातरी थोड्याच गोष्टी विकत घेऊ शकता; पण दुसऱ्या बाजूला क्रिप्टोकरन्सी चलन म्हणून स्थापित झाली नसतानाही क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक सतत वाढत आहे. याच्यामागचे कारण आहे सट्टेबाजी आणि ते  समजून घेतले पाहिजे. 2008 पासून जग वैश्विक मंदीतून जात आहे. भांडवलशाहीच्या नैसर्गिक गतीतून नफ्याच्या घसरत्या दराची प्रवृत्ती निर्माण होते आणि आज पुन्हा जग त्याच मंदीच्या स्थितीत पोहोचले आहे. त्यामुळे आज भांडवल गुंतवून भरघोस नफा मिळवायची साधने फारच कमी उपलब्ध आहेत. परिणाम आहे सट्टेबाजी. ही सट्टेबाजी शेअरबाजारापासून ते खेळापर्यंत आणि घरांपासून ते क्रिप्टोपर्यंत अनेक गोष्टींमध्ये चालू आहे. यामुळेच क्रिप्टोकरंसीचे दर दर मिनिटाला प्रचंड खालीवर होतात! सट्टेबाजीमुळेच क्रिप्टोकरन्सी मध्ये पैसा गुंतवणं अतिशय जोखमीचं असतानाही यावर प्रचंड गुंतवणूक केली जात आहे.  अनेकजण यामध्ये बर्बाद सुद्धा झाले आहेत. उदाहरणार्थ, जानेवारी 2022 मध्ये बिटकॉइन ची किंमत 12% ने घसरली आणि एकूण 1 लक्ष कोटी डॉलर एवढे बाजार मूल्य कमी झाले.

क्रिप्टोकरन्सी प्रचलित होण्याचे एक मुख्य कारण तिच्या समर्थनात दिले जाणारे वैचारिक तर्क आहेत. या तर्कांची पडताळणी आणि भ्रमांचे निराकरण आवश्यक आहे.

विकेंद्रीकरणाचा भ्रम

सर्वात आग्रही क्रिप्टोकरन्सी समर्थक म्हणतात की क्रिप्टोकरन्सी  सरकारांच्या केंद्रिय नियंत्रणापासून मुक्त असेल. जसे रुपयाला नियंत्रित करायचे काम रिझर्व बँक ऑफ इंडिया करते त्याचप्रकारे क्रिप्टोकरन्सीला कुणी एक केंद्रीय संस्था, बँक नियंत्रित करत नाही. यांचा असा दावा आहे की, क्रिप्टोकरन्सीला जगभरातल्या तिला वापरणाऱ्या लोकांचे जाळे संचालित करते आणि “नियंत्रण” फक्त सॉफ्टवेअर करते, जे व्याख्येनुसारच भेदभाव करत नाही.  क्रिप्टोकरन्सीच्या याच विकेंद्रीकृत गुणवैशिष्ट्याचे तुणतुणे क्रिप्टोकरन्सी समर्थक वाजवत राहतात. भांडवलशाहीतील अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांना सोडविण्याचे उत्तर म्हणून याकडे बघितले जात आहे.

या लोकांची समस्या ही आहे की ते चलन नियंत्रणाच्या केंद्रिकरणाला भांडवलशाहीची समस्या मानतात, जेव्हा की ती समस्या नाहीच. क्रिप्टोकरन्सीच्या मागील तंत्रज्ञानाचे प्रामुख्याने उदारमतवादी-अराजकतावादी लोक समर्थन करत आहेत. त्यामागे त्यांची व्यवस्थेची चुकीची समज कारणीभूत आहे. त्यांच्यामते आजच्या व्यवस्थेच्या प्रश्नांच्या मुळामध्ये विविध प्रकारच्या संस्था आहेत ज्यांचे स्वरूप केंद्रीय आहे. त्यांना हे समजत नाही की केंद्रिय बँकांसारख्या वित्तीय संस्था आकाशातून नाही तर भांडवलशाहीच्या नैसर्गिक गतीने निर्माण झाल्या आणि  भांडवलाची गरज म्हणून क्रिप्टोकरन्सीच्या जगामध्ये सुद्धा पुढे जाऊन अशा संस्था निर्माण होतील, ज्यांच्यावर प्रभावीरित्या मोठ्या भांडवलाचे नियंत्रण असेल. खरा फरक याने पडतो की या केंद्रीय संस्थांवर सत्ता कोणाची आहे: कामगार वर्गाची का भांडवलदारांची, पण हा प्रश्न मात्र क्रिप्टोकरंसी समर्थकांच्या ध्यानीमनीही नाही!

दुसरे, त्यांना हे समजत नाही की भांडवलशाहीच्या प्रश्नांचे मूळ उत्पादनाच्या पद्धतीत आहे, ना की वितरणामध्ये. असमान विनिमय हा मूळात बाजारात खरेदी विक्रीमध्ये होत नाही तर उत्पादन प्रक्रियेमध्ये होतो. भांडवली उत्पादन पद्धतीत कामगार त्याची श्रमशक्ती भांडवलदाराला विकतो आणि त्याबदल्यात त्याच्या समतुल्य मजुरी मिळवतो. परंतु श्रमशक्ती ही ती गोष्ट आहे जी कार्यान्वित झाल्यानंतर, म्हणजे श्रमात रूपांतरीत होताना, तिच्या स्वत:च्या मूल्यापेक्षा जास्त मूल्य निर्माण करते. थोडक्यात उत्पादन प्रक्रियेमध्येच अतिरिक्त संपत्तीसह संपूर्ण उत्पादित संपत्ती तयार होते. याच एकंदरीत संपत्तीचा छोटा भाग असतो मजुरी आणि मोठा भाग असतो भांडवलदारांचा नफा.  अशा व्यवस्थेमध्ये फक्त चलन विकेंद्रीकृत करून काय होणार? ना तुमची मजुरी बदलेल, ना मालकांचा नफा! पुढे, जर तुम्ही आज गरीब असलात, तर उद्या क्रिप्टोकरन्सी आल्यानंतर सुद्धा तुम्ही गरीबच रहाल, म्हणजे रुपये देऊन क्रिप्टोकरंसी विकत घेण्यापासून ते क्रिप्टोकरंसीद्वारे इतर काही माल विकत घेण्याकरिता गरिबांकडे पैसे कुठे आहेत?  क्रिप्टोकरंसी आहे म्हणून ना रोजगार निर्मिती होईल, ना बाजाराच्या मूलभूत नियमांना काही फरक पडेल!

आर्थिक संकटं का येतात? भांडवलशाही व्यवस्थेचा प्रमुख अंतर्विरोध हा आहे की एकीकडे ती उत्पादनाचे सामाजिकीकरण करत जाते आणि दुसरीकडे (नफ्याच्या रूपाने) संपत्तीचे खाजगी हस्तगतीकरण होत राहते. ज्या व्यवस्थेत उत्पादन सामाजिक आहे आणि विनियोग खाजगी आहे, ज्या उत्पादनाच्या पद्धतीत अराजकता आहे, ज्या व्यवस्थेत उत्पादन मानवी गरजा भागवण्यासाठी नसून नफ्यासाठी आहे, ती व्यवस्था मूळातच अन्यायपूर्ण आहे. मार्क्सने शिकवल्याप्रमाणे, भांडवलशाहीत आर्थिक संकटे येतात कारण की स्पर्धेच्या दबावापोटी सर्व भांडवलदारांना यंत्र, तंत्रज्ञान इत्यादींमध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागते (याला स्थिर भांडवल म्हणतात), ज्यापोटी माल तर स्वस्त होतो, पण वाढत्या स्थिर भांडवलामुळे नफ्याच्या दराच्या घसरणीची प्रवृत्ती निर्माण होते. हाच नफ्याचा दर जेव्हा अर्थव्यवस्थेच्या स्तरावर घसरू लागतो, तेव्हा गुंतवणूक मंदावते, कारखाने बंद होतात, बेरोजगारी अजून वाढते आणि भांडवली विकासाचे चक्र थांबू लागते.  क्रिप्टोकरंसी ही समस्या सोडवू शकत नाही!

याची दुसरी बाजू ही सुद्धा आहे की भांडवलशाहीत भांडवलाचे मूठभरांच्या हाती केंद्रीकरण (centralisation) आणि एकंदरीत भांडवल संचय वाढणे, म्हणजे संकेंद्रीकरण (concentration) ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे भांडवलशाहीत भांडवल मूठभरांच्या हातात मोठ्या प्रमाणात सतत जमा होत जाते. क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत सुद्धा हे दिसत आहे. क्रिप्टोकरन्सीला जनतेचे चलन वगैरे म्हटले जाते पण जसे भारतात वरच्या 10% लोकांकडे 40% संपत्ती एकटवलेली आहे त्याचप्रमाणे जगभरात वरच्या 0.01% बिटकॉइन मालकांकडे 27% बिटकॉइनची मालकी आहे. हे नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च (NBER) या अमेरिकी संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी सुद्धा जनतेचे चलन नसून मूठभरांचे चलन बनले आहे आणि भांडवली विकासाच्या नियमाने यात फक्त वाढ होईल, घट नाही.  क्रिप्टोकरन्सीची नोंदवही ही कागदावर विकेंद्रीकृत असली तरी वास्तवात क्रिप्टोकरन्सीच मूठभरांच्या हातात केंद्रीत झाली आहे.

विकेंद्रीकरणाचे समर्थक हे विसरतात की केंद्रिय बॅंकांचा कार्यभार हा मुख्यत्वे देशाच्या भांडवली आर्थिक संरचनेला चालू ठेवण्याचा असतो आणि यामध्ये मोठमोठ्या मक्तेदार कंपन्यांचे हित केंद्रस्थानी असते कारण भांडवल संचय त्यांच्याकडेच असतो. तेव्हा केंद्रिय बॅंक असो वा नसो, ज्यांच्याकडे भांडवल संचय आहे तेच अर्थव्यवस्थेचे नियंत्रक बनणार हे निश्चित! थोडक्यात, भांडवलशाहीची कार्यपद्धती न समजू शकल्यामुळे अनेक क्रिप्टोकरंसी समर्थक या चलनालाच भांडवलशाही विरोधातील हत्यार समजू लागलेत!

केंद्रियछपाईनसणे?

बिटकॉईनला एखादी रिझर्व बॅंकेसारखी बॅंक “छापत” (म्हणजे खरेतर याबाबतीत संगणकावर निर्माण करत) नाही, त्यामुळे त्याला कोणीही “छापू” शकते असे काहींना वाटते. परंतु बिटकॉईन सारखे चलन “छापले” कसे जाते? संगणक वापरून एक अतिशय जटील गणित सोडवले की बिटकॉईन तयार होतो. याला बिटकॉइन “मायनिंग” म्हणतात. याकरिता तुमच्याकडे गरज आहे संगणकीय शक्तीची (म्हणजे भांडवलाची) आणि वीजेवर खर्च करण्याच्या आर्थिक क्षमतेची (म्हणजे पुन्हा भांडवलाचीच!). आज 1 बिटकॉइन कमवायला एका अमेरिकन घराला 9 वर्ष वापरता येईल एवढी वीज लागते. म्हणजेच एका व्यक्तीला आज हे शक्य नाही. त्यासाठी आज मोठ्या कंपन्या तयार झाल्या आहेत ज्यांना ‘बिटकॉइन मायनिंग फार्म्स’ म्हटलं जातं. आज बिटकॉइन मायनिंग साठी लागणारी वीज एकूण जागतिक वापराच्या 1% च्या जवळ पोचली आहे. त्यामुळे बिटकॉइन मायनिंग तेच करू शकतील ज्यांच्याकडे गुंतवायला तेवढे भांडवल आहे.  भांडवलच केंद्रित असेल तर चलन निर्मिती सुद्धा केंद्रिकृतच होत जाणार. एकंदरीत किती बिटकॉईन निर्माण होतील याचा आकडा सुद्धा सॉफ्टवेअरने ठरवून दिला आहे, त्यामुळे “छपाई” संपल्यानंतर अस्तित्वात असलेले बिटकॉईनच संचयाचे साधन बनतील.

गोपनीयता: एका मर्यादेपर्यंतच

क्रिप्टोकरन्सीच्या गोपनीयतेच्या गुणवैशिष्ट्याबद्दल वारंवार बोलले जाते. पण जर का क्रिप्टोकरन्सी खरंच एक चलन म्हणून सगळीकडे वापरास आली तर कोणत्याही व्यवहारामध्ये वाद झाल्यास (आणि असे वाद होणारच!), व्यक्तिंच्या पडताळणीसाठी आणि भांडवली देवाणघेवाणीच्या व्यवहारांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी ज्यांनी व्यवहार केला त्यांची ओळख या ना त्या मार्गाने पटवावीच लागेल. उदाहरणार्थ भारतात क्रिप्टोकरन्सी वापरासाठी के.वाय.सी लागू करणे, यासारखी पावले लागू होतील. थोडक्यात, गोपनीयता तोपर्यंतच असू शकते जोपर्यंत लोक कायद्याच्या चौकटीच्या बाहेर राहून काम करण्यास तयार होतील, जे बाजाराच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात शक्य नाही!

सुरक्षिततेच्या मर्यादा

क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार आणि एकंदरीतच क्रिप्टोकरन्सी खूप सुरक्षित आहे असे बोलले जाते पण मानवीय चुकांमुळे क्रिप्टोकरन्सी सुद्धा असुरक्षित असू शकते आणि क्रिप्टोकरन्सी चोरीला जाण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. 2011 मध्ये एम.टी गोक्स नावाच्या ऑनलाईन बिटकॉइन एक्सचेंज मधून 3700 कोटी रुपये एवढे बिटकॉईन्स चोरीला गेले. ही चोरी बिटकॉइनच्या नेटवर्क मध्ये असलेल्या चुकीमुळे शक्य झाली.

भांडवलदार वर्गामधील अंतर्गत मतभेद

आजच्या घडीला विविध देशातील भांडवलदार वर्ग क्रिप्टोकरन्सीकडे विविध प्रकारे बघत आहेत, कारण त्यांच्यामध्येच या तंत्रज्ञानाबद्दल मतभेद आहेत. चीन, रशिया मध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यात आली आहे, सिंगापुर क्रिप्टोकरन्सीला एक माल म्हणून बघते, फिनलंड त्याला डिजिटल माल मानते. भारतात सुद्धा  क्रिप्टोकरन्सी कायदेशीर चलन नाही, परंतु त्यावर बंदी सुद्धा नाही. म्हणजे आज क्रिप्टोकरन्सी बद्दल जगभरात काहीच सुसंगत धोरणं नाहीत आणि भांडवलदार वर्गामध्ये सुद्धा काही प्रमाणात गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत बिटकॉईनसारख्या विकेंद्रित क्रिप्टोकरन्सीचे एकंदर चरित्र पाहता ते कायदेशीर चलन म्हणून सर्व देशांना स्विकार्य नाही, कारण त्यामुळे केंद्रिय बँकांचा आणि त्यामार्फत असलेला भांडवलदारांचा अर्थव्यवस्थेवरील ताबा सुटेल. यामुळेच भारतासारखे देश आता केंद्रिय बॅंकेमार्फतच क्रिप्टोकरंसीचे चलन आणण्याचा विचार करत आहेत! क्रिप्टोकरंसी नंतर बाजारावरचे नियंत्रण आणि नियमन कसे टिकवता येईल, भांडवली कायद्याच्या चौकटीत व्यवहार कसे घडवता येतील, भांडवली व्यवस्था दीर्घकाळात कसा आकार घेईल याबद्दलच्या अनिश्चिततांमुळे हे मतभेद आहेत.  क्रिप्टोकरंसीचा वापर, तिचे केंद्रिय किंवा विकेंद्रित स्वरूप, गोपनीयता इत्यादींबद्दल भांडवलदार वर्गाच्या गटांमध्ये जरी मतभेद असले तरी बाजाराची व्यवस्था चालवणे, नफा-मजुरीची व्यवस्था चालवणे, भांडवलाचे एकंदरीत अर्थव्यवस्थेवर नियंत्रण कायम ठेवणे याबाबत मात्र त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत!

कामगार वर्गाचा दृष्टिकोन

पण आज क्रिप्टोकरन्सी असो वा नसो कामगारांच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही! मूळ प्रश्न उत्पादनाच्या साधनांच्या मालकीचा आहे, उत्पादित मालाच्या वितरण व्यवस्थेचा नाही. कामगार-कष्टकरी वर्ग आपल्या मेहनतीतून संपत्ती निर्माण करतो, परंतु बाजाराच्या व्यवस्थेमध्ये तो सतत पिचलेलाच राहतो. त्यामुळे या कामकरी वर्गाने क्रिप्टोकरन्सीच्या नवीन जुगारात सहभागी न होता भांडवली व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहिजेत जी आज कामकरी वर्गाला भूक, गरिबी, बेरोजगारी शिवाय काहीच देऊ शकत नाही!