नौजवान भारत सभेचे पहिले महाराष्ट्र राज्य संमेलन संपन्न!

बिगुल पत्रकार

क्रांतिकारक शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल, अश्फाक सारख्या क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या नौजवान भारत सभा या युवक क्रांतिकारी संघटनेचे पहिले महाराष्ट्र राज्य संमेलन 23 मार्च 2022 रोजी, शहीद दिनानिमित्त पुणे शहरात संपन्न झाले. महाराष्ट्रातील विविध भागातील नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन राज्यातील व देशभरातील आत्तापर्यंतच्या एकंदरीत कामांचा आढावा घेतला, राज्य कार्यकारिणीची निवड केली, राज्य पातळीवर कामांना गती व नियमितता येण्यासाठी काही महत्वाचे प्रस्ताव देखील राज्य कार्यकारिणीच्या नेतृत्वात पारित झाले.
क्रांतिकारकांचा वारसा चालवणाऱ्या व विखुरलेल्या युवक आंदोलनाला योग्य विचाराच्या आधारावर नव्याने संघटित करण्यासाठी व त्याला जनसमुदायांच्या भांडवलशाही-साम्राज्यवादविरोधी संघर्षाचा अविभाज्य अंग म्हणून पुढे घेऊन जाण्याच्या व्यापक उद्देशाने नौभास गेले 7 वर्ष महाराष्ट्रात तरुणांना संघटित करण्याचे काम करत आहे. नौजवान भारत सभेच्या पहिल्या महाराष्ट्र राज्य संमेलनाची सुरूवात ही नौजवान भारत सभेचा ध्वज उभारून आणि स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांना क्रांतिकारी अभिवादन करून केली गेली. त्यानंतर पुणे शहराचे समन्वयक रवि यांनी राज्यभरातील नौभासच्या कामांचा अहवाल सादर केला. रोजगाराच्या मुद्यावरील राष्ट्रीय पातळीवर पार पडलेले बसनेगा आंदोलन, पुरग्रस्तांचे आंदोलन, झोपडपट्टी पाडण्या विरोधातले आंदोलन, खाजगी व सरकारी आरोग्य सेवेच्या वाईट परिस्थितीच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी केलेली आंदोलने, जातीय तसेच महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात वेळोवेळी केलेली आंदोलने, जनविरोधी सीएए-एनआरसी सारख्या कायद्यांच्या विरोधातील मोठमोठी आंदोलने, लोकशाही नागरी अधिकारांसाठी आंदोलने तसेच नैसर्गिक आपत्तीवेळी चालवलेल्या मदत मोहिमा व वैद्यकीय मदत शिबीरे, आरटीई अंतर्गत प्रवेश कार्य, कोरोना महामारीच्या वेळी केलेले राशन वाटपाचे व सामूहिक स्वयंपाक घराचे मदतकार्य; विविध क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या जन्म व स्मृतीदिनानिमित्त आयोजित केलेले अनेक कार्यक्रम अशा संघर्षाच्या आणि क्रांतिकारी सुधारकार्यांच्या सर्व कामांचा एकंदरीत आढावा मांडला गेला. त्यानंतर मुंबई शहराचे समन्वयक अविनाश यांनी देशभरातील विविध राज्यांमध्ये नौजवान भारत सभेकडून होत असलेल्या एकंदरीत कामांचा थोडक्यात आढावा मांडला. पुणे कार्यकारिणी सदस्य सुरज यांनी नौभासचे संपूर्ण काम कशापद्धतीने जनसहयोगातून कसे चालते, तसेच आजवरचा आर्थिक ताळेबंद मांडला.
मागील जवळपास 7 वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर नौभासला राज्यातील कामाच्या विस्ताराला शिस्तबद्ध पद्धतीने समोर घेऊन जाण्यासाठी कार्यक्रमाच्या सदस्य सत्रात नौभासची लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली व एकमताने राज्य कार्यकारिणी निवडली गेली. कार्यकारणीच्या सहमतीने साथी रवि यांची महाराष्ट्र राज्य सचिव तर अतुल यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड केली गेली.
यानंतर झालेल्या आढावा व चर्चेनंतर राज्य पातळीवर सामूहिक कामांच्या वाटचालीसाठी व कामांना गती येण्यासाठी काही महत्वाचे प्रस्ताव पुढीप्रमाणे राज्य कार्यकारणीच्या नेतृत्वात पारित झाले. विखुरलेल्या प्रगतीशील युवक आंदोलनाला क्रांतिकारी कार्यक्रमाभोवती संघटित करणे; फॅसिझम विरोधात तृणमूल स्तरावर अभ्यासवर्ग, शिकवणीवर्ग, जनप्रचार इत्यादी माध्यमांमधून युवकांना संस्थाबद्ध पद्धतीने संघटित करणे; सर्वांना समान व विनामूल्य शिक्षणाच्या अधिकारासाठीचा संघर्ष तीव्र करणे व शिक्षणाचे खाजगीकरण-धार्मिकीकरण आणि भांडवली-बाजारी शिक्षणव्यवस्थेविरोधात संघर्ष तीव्र करत सावित्री-जोतिरावांचा वारसा पुढे नेणे; रोजगार अधिकारासाठी राज्यस्तरावर भगतसिंह रोजगार हमी कायदा पारित करून घेण्यासाठी संघर्ष तीव्र करणे; क्रांतिकारक चळवळीचा इतिहास व क्रांतिकारकांचा वारसा युवकांपर्यंत नेण्याकरिता साहित्याची निर्मिती व प्रचार-प्रसार करणे; नौभासच्या जाहीरनाम्यातील इतर मुद्यांवर प्राथमिकतेने काम वाढवणे हे ठराव पारित करण्यात आले.
कार्यक्रमातील आयोजित केलेल्या दुसऱ्या खुल्या सत्रामध्ये निखिल यांनी बेरोजगारीच्या समस्येवर मांडताना सांगितले की भारत हा जगात सर्वात जास्त बेरोजगारांच्या यादीत मोजला जातो. आकडेवारी सांगते की देशात रोजगार सतत कमी होत आहेत, सामाजिक आर्थिक असमानता वाढत आहे, श्रीमंत आणि गरिबांमधील दरी वाढतच चालली आहे. बेरोजगारीच्या प्रश्नावर भगतसिंह राष्ट्रीय रोजगार हमी कायदा झाला पाहिजे यासाठी व्यापक मोठे आंदोलन उभे करावे लागेल. पूजा यांनी समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि स्त्रीला समाजात दिल जाणार दुय्यम स्थान या प्रश्नावर मांडणी करत म्हटले की गेल्या अनेक दशकांपासून स्त्रियांवर होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भांडवली पितृसत्तेची व्यवस्था आहे तिथे स्त्रियांची पूर्ण मुक्ती होऊच शकत नाही. खाजगी मालकीच्या उदयासोबत स्त्रियांच्या गुलामीची असमानतेची सुरुवात झाली आणि खाजगी मालकी जपणाऱ्या भांडवलशाहीच्या नाशाशिवाय स्त्रीमुक्ती शक्य नाही. पुढे अविनाश यांनी जाती प्रश्नावर मांडणी करताना सांगितले की जगण्याच्या प्रश्नांभोवती कामगार-कष्ट्कऱ्यांना एकजूट करताना जातीअंताचा संघर्ष चालवणारी चळवळच आज खऱ्या अर्थाने जातीअंताची चळवळ बनू शकते. आरक्षणाच्या लढायांच्या निमित्ताने, अस्तित्वातच नसलेल्या संधींच्या एका हिश्श्यासाठी भांडणे लावून, जातींमधील अस्मितांना गोंजारणे चालू आहे. गरज आहे ती सर्वांना समान संधी मिळण्याची! आज प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्णत: मोफत आणि समान शिक्षणाच्या, आणि रोजगाराच्या कायद्याची मागणी ही जातीअंताच्या लढ्याचा भाग आहे.
यानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांनी बेरोजगारीच्या प्रश्नावरील “राजाचा वाजला बाजा” या पथनाट्याचे सादरीकरण केले. यावेळी नौजवान भारत सभेच्या सांस्कृतिक पथकाने विविध क्रांतिकारी गीते देखील गायली. आणि संमेलनाच्या समारोपाच्या वेळी शहीद भगतसिंह, सुखदेव , राजगुरू यांच्या स्मृतीला क्रांतिकारी अभिवादन करत अभिवादन फेरीद्वारे कार्यक्रमाची सांगता केली गेली.

कामगार बिगुल एप्रिल, 2022