भाजपात सामील व्हा, स्वतःच्या भ्रष्टाचारी चारित्र्यावर प्रामाणिकतेचा मुलामा चढवून घ्या!!

पूजा

भारताच्या ‘सत्ताकारणात’ आमदारांनी, खासदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलण्याची घटना काही नवीन गोष्ट नाही, परंतु मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ज्या प्रकारे ‘पक्षबदली’ एक ‘पॉलिटिकल स्टंट’ — राजकीय डावपेच — म्हणून वापरला जात आहे त्यातून जनतेचा पैसा लुबाडून स्वतःचे घबाड बनवलेल्या नेत्यांचे भ्रष्ट चेहरे आणि ह्या सर्व भ्रष्ट नेत्यांना स्वतःच्या पदरात घेणाऱ्या आणि त्यांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकणाऱ्या मोदी सरकारचेही भ्रष्ट चरित्र स्पष्टपणे समोर आले आहे.  कुठल्याही राज्याची निवडणूक असो, पैशांच्या जोरावर आमदार, खासदारांना विकत घेणे; जे सहज विकत घेता येत नाहीत त्यांच्यावर ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांची चौकशी बसवणे व त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेणे आणि लगेच चौकशी गुंडाळली जाणे ही एक सामान्य बाब बनली आहे.

भारतीय जनता पार्टीत जाऊन स्वच्छ झालेले नेते

भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या मते भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आणि गुजरातहून आणलेली निरमा आहे! ही त्या निरमाचीच ‘जादू’ म्हणावी लागेल ज्यामुळे असे नेते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लागले, ईडी ची चौकशी बसली, त्यांचे आरोप, त्यांनी केलेला भ्रष्टाचार भाजपा मधे जाताच छू-मंतर होतो! 2014-15 ह्या वर्षभरात विविध निवडणुकांच्या काळात तब्बल 177 आमदार, खासदार ह्यांनी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश घेतला. तसेच तृणमूल काँग्रेस, बसपा ह्या पक्षांतून देखील पलायन करत भ्रष्टाचाराचा आरोप लागलेले किंवा आरोप लागण्याची शाश्वती असलेले, धमकी मिळालेले नेते भाजपमध्ये जाऊन सामील झाले आहेत. मध्यप्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे हिमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्रातील नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, शिवेंद्रसिंह भोसले, संदीप नाईक, वैभव पछाड, बंगालमधील तृणमूल काँग्रेस चे मुकुल रॉय, दीपक हल्डार, सुवेंदू अधिकारी, राजीव बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, रथिन चक्रोबर्ती, रुद्रनील घोष, अपरुपा पोद्दार, हरियाणाचे राव इंदरजीत सिंग, एन. डी. तिवारी, अशा अनेक राज्यांमधील नेत्यांवर लागलले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप भाजपा मध्ये प्रवेश घेताच धुवून निघाले आहेत!

2017 च्या हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माजी दूरसंचार मंत्री सुखराम, ज्याच्यावर दूरसंचार घोटाळ्या प्रकरणी आरोप सिद्ध देखील झालेत, याचा मुलगा अनिल शर्माने भाजपा मध्ये प्रवेश घेतला. सुखराम देखील 2017-2019 ह्या काळात भाजपा मध्ये राहिला व आता भाजपालाच अनौपचारिक समर्थन करत आहे. जुलै 2015 मध्ये गुवाहाटी पाणी घोटाळा (2010) प्रकरणी भाजपने आरोप लावलेल्या आसाम मधील काँग्रेसचे नेते हिमंता बिस्वा सरमाने पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये भाजपात प्रवेश घेतला आणि आता तो आसामचा मुख्यमंत्री आहे! तृणमूल काँग्रेस सोबत अगदी सुरुवातीपासून असणाऱ्या मुकुल रॉय आणि इतर 12 नेत्यांवर नारदा स्टिंग केस, 2014 च्या आरोपात ईडी कडून चौकशी सुरु झाली त्यांनतर 3 नोव्हेंबर 2017 ला त्यांनी भाजपात प्रवेश घेतला.  अरुणाचल प्रदेशात जनता पक्षाच्या पेमा खंडू (ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आणि फौजदारी गुन्हे देखील दाखल आहेत!) आणि 32 आमदार भाजपात गेलेत. कर्नाटकात तर भाजपा ने आमदार-खासदारांच्या खरेदीत शेकडो कोटी रुपये खर्च केलेत. जमीन आणि खाणी घोटाळ्यात अडकलेल्या, भ्रष्टाचारात अव्वल असणारा बी.एस. येडियुरप्पा पुन्हा कर्नाटकाचा मुख्यमंत्री बनला असून त्याच्या घरात भाजपा नेते, वकील, न्यायाधीश यांना भरपूर लाच खाऊ घातल्याचे पुरावे सापडले असूनही आज तो ताठ मानेने, दोषमुक्त होऊन फिरत आहे. कर्नाटकात 2018 च्या निवडणुकीच्या वेळी बेल्लारीच्या रेड्डी ब्रदर्सची देखील 16,500 कोटीच्या घोटाळ्यात निर्दोष मुक्तता करण्यात आली. व्यापम घोटाळ्यातील मध्य प्रदेशचे भाजपाचे मुख्यमंत्री  शिवराज सिंग चौहान देखील 2017 मध्ये निर्दोष मुक्त झाले.

जनतेप्रती कर्तव्याची कुठलीही भावना नसणाऱ्या, जनतेचा पैसा लुटून स्वतःच्या आणि मालकांच्या तिजोऱ्या भरण्यात कुशल असणाऱ्या ह्या भांडवली निवडणूकबाज पक्षाच्या नेत्यांनी पक्ष बदल केल्याने जनतेला लुटण्याच्या त्यांच्या कृतीत काहीही फरक पडत नाही. कोणत्याही पक्षात जा, काम तर जनतेला लुटण्याचेच करायचे आहे! भाजपा मध्ये प्रवेश करून ह्या सर्व भ्रष्ट नेत्यांना अलभ्य लाभ झाल्यासारखंच आहे कारण आता ना कुणी विचारणारे, जाब पुसणारे ना आता कोणत्या चौकशीची भीती!  म्हणूनच मणिपूर, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, बिहार इत्यादी राज्यांत स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप लावलेल्या पक्षांसोबत भाजपाने युती केली किंवा त्या पक्षांमधील भ्रष्ट नेत्यांना पक्षात सामील करून घेतले, आणि तरीही भांडवली प्रसारमाध्यमांवरील नियंत्रणाच्या जोरावर जनतेमध्ये आपली स्वच्छ छबी झळकवण्यात भाजपा सर्वात पुढे आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सारखे भांडवली निवडणूक बाज पक्ष जे आज भाजपच्या ह्या  ‘चेरी पिकिंग ‘ भ्रष्टाचार विरोधी मोहिमे विरोधात टाहो फोडत आहेत त्यांनी देखील हे खोटं थोतांड मांडणं बंद करावं कारण जनतेला त्यांचं भ्रष्टाचारावर असलेलं प्रेम माहित आहे. वास्तवात हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत! भांडवलदारांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या या पक्षांमध्ये भ्रष्टाचार असणारच आहे कारण यांचे मुख्य काम कामगारांच्या शोषणातून भांडवलदारांचा नफा निर्माण करणारी व्यवस्था टिकवणे आणि चालवणे आहे, तेव्हा नफ्याच्या वाहत्या गंगेत हात धुवून का नाही घेतले जाणार?  ऐतखाऊ मालक वर्गाची चाकरी करणारे हे नेते, स्वत: फुकटचे का नाही खाणार? युरोपातील तथाकथित ‘प्रामाणिक’ देशांमध्ये याच प्रकारच्या भ्रष्टाचाराला कायदेशीर रूप देऊन नेत्यांची ‘सोय’ केली जाते आणि भ्रष्टाचार नाहीच असे भासवले जाते. भ्रष्टाचाराची गंगोत्री असलेल्या भांडवली व्यवस्थेचे राजकारण असेच असू शकते.