शहीद चंद्रशेखर आझाद आणि शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
✍बिगुल पत्रकार
संसार के सारे मेहनत-कश खेतों से मिलों से निकलेंगे
बे-घर बे-दर बे-बस इंसाँ तारीक बिलों से निकलेंगे
दुनिया अम्न और ख़ुश-हाली के फूलों से सजाई जाएगी
वो सुब्ह हमीं से आएगी
– साहिर लुधियानवी
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक प्रवाह क्रांतिकारकांचा सुद्धा होता ज्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांनी भारतात कामगार वर्गाच्या नेतृत्वातील क्रांती घडवून आणण्यासाठी आपले प्राण पणाला लावले. कामकरी जनतेचे राज्य आले पाहिजे हेच त्यांचे लक्ष्य होते. त्यांचे तत्व आणि विचार फक्त इंग्रजांसाठीच नाही तर भारतातल्या भांडवलदारवर्गासाठी आणि त्या वर्गाची पार्टी असलेल्या कॉंग्रेससाठी सुद्धा घातक होते. कारण स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, अश्फाकुल्लह खान, रामप्रसाद बिस्मिल सारख्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या (एच.एस.आर.ए.) क्रांतिकारकांच्या प्रवाहाकडे गेले असते तर जनता देशात फक्त स्वातंत्र्य मिळवून न थांबता समाजवादाच्या दिशेकडे गेली असती. त्यांचे स्वप्न एक असा स्वतंत्र देश घडवण्याचे होते जेथे उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, जाती-धर्मावर आधारित भेदभाव, मालक-मजूर अशा कोणत्याही प्रकारची विषमता नसेल. त्यांचे विचार देशातल्या भांडवली सत्तेच्या विरोधात कष्टकरी जनतेला संघटित करणारे असल्यामुळे सत्ताधारी वर्गाने त्यांच्या क्रांतिकारक वारशाला धूळ आणि राखेखाली दाबून टाकले आहे. उलट, क्रांतिकारकांच्या प्रतिमेचा वापर आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी वर्ग करत आहे. आज जेव्हा गरिब-शेतकरी आणि कामगारांचे शोषण दिवसेंदिवस वाढत आहे, जेव्हा जनतेला राब-राब राबुन सुद्धा मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे, जेव्हा कष्टकरी वर्गाला गरिबीच्या गर्तेत ढकलून मालक वर्ग दिवसेंदिवस गब्बर होत चालला आहे, जेव्हा जनतेच्या चेतनेची मशाल मालवण्यासाठी जात-धर्माचे विष जनतेला पाजले जात आहे, तेव्हा या क्रांतिकारकांच्या विचारांची प्रासंगिकता सर्वाधिक आहे. त्यांचे विचार जनतेमध्ये पुन्हा नव्याने घेऊन जाण्याची गरज बनली आहे.
आज देशात काही जनपक्षधर संघटना आहेत ज्यांनी क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा पुढे चालवला आहे. नुकतेच, ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ चे कमांडर-इन-चीफ शहीद चंद्रशेखर आजाद यांचा 23 जुलै रोजी आणि नौजवान भारत सभेच्या संस्थापकांपैकी एक शहीद शिवराम राजगुरू यांचा 24 ऑगस्ट रोजी जन्मदिवस होऊन गेले. त्यानिमित्त देशभरात नौजवान भारत सभा या युवक क्रांतिकारी संघटनेतर्फे, तसेच विविध क्रांतिकारी संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमांचा एक संक्षिप्त अहवाल येथे देत आहोत.
शहीद चंद्रशेखर आजाद यांच्या जन्मदिनानिमित्त ‘नाैजवान भारत सभे’ तर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादनपर कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत भाष्य करतांना कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता, संघटित होण्याची गरज हे सर्व मुद्दे मांडले. पदयात्रेत काही नागरिक आणि नाैभास चालवत असलेल्या शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सुद्धा सहभागी झाली होती. घोषणा देत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रोशनाबाद येथे ‘चंद्रशेखर आझाद यांचा क्रांतिकारी वारसा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी आझादांचे व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि एका क्रांतिकारी संघटनेला नेतृत्व देण्याची त्यांची क्षमता यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. नौजवान भारत सभेद्वारे आझादांच्या जन्मदिनानिमित्त संपुर्ण दिल्ली शहरात 15 दिवसीय ‘शहीद स्मृती अभियान’ व्यापक भागात चालवले गेले. याअंतर्गत, दिल्लीमधील करावल नगर, शहाबाद डेअरी, मेट्रो विहार, खामपुर, खजूरी, बवाना, वजीरपुर आणि दिल्ली विश्वविद्यालय या सर्व भागात कोपरा सभा, पदयात्रा, दुचाकीयात्रा, गीत गायन आणि चर्चासत्र अशा विविध सृजनात्मक पद्धतींनी आझादांच्या विचारांना जनतेपर्यंत घेऊन जाण्यात आले. मेट्रो विहार भागात ‘चंद्रशेखर आझाद युथ क्लब’ च्या अंतर्गत कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या तरूणांसाठी व्यायामशाळेची सुरूवात केली गेली. नाैजवान भारत सभेच्या आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश येेथील युनिटने आझाद जन्मदिनानिमित्त मुलांना आणि तरूणांना ‘दी लीजेंड ऑफ भगतसिंह’ हा सिनेमा दाखवुन विस्तृत चर्चा केली. हरियाणा येथील कलायत आणि चाैशाला येथे नाैभास तर्फे ‘दी लीजेंड ऑफ भगतसिंह’ हा सिनेमा दाखवुन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या विचारांबद्दल उपस्थितांसोबत विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच नरवानाच्या कर्मगढ आणि कैथल येथे आझांदाबद्दलचे पत्रक वाटून कामकरी जनतेसोबत संवाद साधण्यात आला.
अलाहाबादेतील आझाद पार्क येथे 27 फेब्रुवारी 1931 रोजी आझादांना ब्रिटीश पोलिसांनी सर्व बाजूंनी घेरले होते. पोलिसांशी त्यांनी जवळजवळ एक तास लढा दिला आणि शेवटी जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा त्यांनी शेवटच्या गोळीने स्वतःला मारून शहादत पत्करली. त्याच आझाद पार्क येथे नाैभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेतर्फे सभा आयोजित केली गेली. ‘उठो जवानों आगे आओ, लडकर नया समाज बनाओ’ हा नारा देत उपस्थितांनी तरूणांना संघटित होण्याचे आवाहन केले. तसेच उत्तरप्रदेशातील मथुरा आणि जहांगीरगंज येथे ‘जन एकता संकल्प अभियाना’ अंतर्गत पदयात्रा आणि कोपरा सभा आयोजित करण्यात आल्या. जहांगीरगंज येथे पदयात्रेत फॅसिझम, जातीयवाद, अस्पृश्यता, महागाई पासून मुक्तीचे नारे देत असताना ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या 8-10 गुंडांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. परंतु नाैभासच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. संघी लोकांच्या प्रत्येक आरोपाला तर्काने उत्तर दिल्यानंतर जनतेने सुद्धा संघी गुंडांचा विरोध करण्यास सुरूवात केली. शेवटी संघी गुंडांनी माघार घेतली आणि पदयात्रा यशस्वी झाली. ग्रामीण कामगार युनियन, उत्तरप्रदेश तर्फे मुडियारी, बरोहीपुरा-पांडे आणि कसमा का पुरवा गावांमध्ये कोपरा सभा करत पदयात्रा करण्यात आली.
शहीद शिवराम राजगुरू यांच्या जन्मदिनी पुण्यातील एफ.सी. रोड येथे नाैजवान भारत सभेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नाैभासच्या कार्यकर्त्यांनी क्रांतिकारी गाणी सादर केली आणि जनतेसोबत संवाद साधला. पोस्टर प्रदर्शन लावल्यामुळे नौभासची संक्षिप्त ओळख जनतेला मिळाली. यावेळी विद्यार्थी-तरुणांना नौभासच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. शेवटी घोषणा देऊन राजगुरू यांना अभिवादन करण्यात आले. त्याचदिवशी पुणे शहरातील बिबवेवाडी येथील सुपर भागात अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात राजगुरूंचा जीवनपट मांडला गेला. तसेच कामकरी जनतेसमोर क्रांतिकारकांचे विचार मांडण्यात आले. कार्यक्रमात क्रांतिकारी गीत सादर केल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले होते. नाैभासच्या मुंबई येथील कार्यकर्त्यांनी राजगुरूंच्या जन्मदिनानिमित्त चर्चासत्र आयोजित केले ज्यात राजगुरूंच्या जीवनाविषयी आणि त्यांच्या क्रांतिकारी प्रवासाबद्दल चर्चा करण्यात आली. दिशा विद्यार्थी संघटनेतर्फे वाराणसी येथील बनारस हिंदु विश्वविद्यालय (बीएचयू) येथे “क्रांतिकारी आंदोलनाचा वैचारिक विकास” या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले. चर्चेमध्ये महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब येथील क्रांतिकारी प्रवाहांच्या विकासावर चर्चा झाली. तसेच कानपूर, गोरखपूर आणि वाराणसी या क्रांतिकारक कारवायांच्या केंद्रांच्या विकासाबद्दल सुद्धा चर्चा झाली. गदर पार्टीची स्थापना, एच.आर.ए.ची स्थापना, काकोरी घटना, एच.एस.आर.ए.ची स्थापना आणि भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांचे बलिदान हे क्रांतिकारी राजकारणाच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे म्हणून चर्चिले गेले. चर्चेच्या शेवटी शिववर्मा यांनी लिहिलेल्या ‘संस्मृतियां’ मधून राजगुरूंच्या जीवनाशी संबंधित काही उतारेही वाचण्यात आले.
आज खऱ्या अर्थाने सर्वहारा वर्गाला संघटीत करायचे असेल तर जुन्या समाजव्यवस्थेवर आधारित अप्रासंगिक धार्मिक सणांच्या जागी जनतेच्या नायकांचे जन्मदिन-शहीददिन, जनतेने लढलेल्या योग्य लढाया हे सामुहिक सण म्हणून स्थापित करावे लागतील. भगतसिंहाने सांगितल्याप्रमाणे क्रांतीचा संदेश गिरण्या-कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील बकाल वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कोट्यवधी लोकांमध्ये पोहोचवून त्यांच्यात क्रांतीची चेतना जागवावी लागेल.
कामगार बिगुल, सप्टेंबर 2022