शिवसेनेच्या कामगारद्रोही इतिहासाला विसरू नका!
दुरुस्तीवादी सीपीआयचे कामगारद्रोही चरित्र पुन्हा उघड!
✍आशय
स्वत:ला मराठी माणसांचा, हिंदूंचा कैवारी म्हणणाऱ्या शिवसेनेचा स्थापनेपासूनचा संपूर्ण इतिहासच कामगारद्रोहाचा इतिहास आहे. वरवर मराठी कामगारांच्या हिताच्या थापा मारणाऱ्या या पक्षाने सतत सर्व कामगारांच्या हितांवर हल्ला करत बिल्डर-उद्योगपतींचे हित जपले आहे. नुकतेच सी.पी.आय. पक्षाने शिवसेनेच्या उमेदवाराला समर्थन जाहीर केले आहे. स्वत:ला कम्युनिस्ट, कामगार वर्गाचे अग्रदल, म्हणवणाऱ्या सीपीआय सारख्या गद्दार पक्षांमुळे जे भ्रम निर्माण होत आहेत ते दूर करण्याकरिता शिवसेनेच्या कामगारद्रोही इतिहासाकडे नजर टाकणे गरजेचे आहे. आपल्या शहीद नेत्यांचे आणि कामगारांचे बलिदान विसरून आज फॅसिस्टांच्या मागे जाणाऱ्या सीपीआय सारख्या दुरुस्तीवादी पक्षांचे खरे चरित्र सुद्धा कामगार वर्गाने ओळखणे गरजेचे आहे.
दादरमधील शिवाजी पार्कच्या जवळ असलेल्या शिवसेना भवनापासून अगदी हाताच्या अंतरावर आहे कोहिनूर स्क्वेअर टावर. 2005 मध्ये शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी आणि शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचा पुतण्या राज ठाकरे यांनी 421 कोटी रुपये देऊन ही जागा विकत घेतली. ही जागा शेवटी अनेक कायदेशीर त्रांगड्यांमध्ये अडकली आणि येथील बांधकाम अजूनही अपुरे आहे. मुंबईतील लढाऊ कामगार चळवळीवर शिवसेनेने केलेल्या हल्ल्याचे हा टावर म्हणजे मूर्तिमंत प्रतिक आहे. कोहिनूर स्क्वेअर ज्या जागी बनला आहे, त्याजागी कधीकाळी कोहिनूर मिल होती. कोहिनूर मिलसारख्याच अनेक कापड गिरणी कामगारांच्या लढ्याने मुंबई हलवून टाकली होती. कापड गिरणी कामगार हे मुंबईतील लढाऊ कामगार चळवळीचा कणा होते. या गिरणी कामगारांच्या लढ्याला संपवण्याकरिता शिवसेना बनली आणि तिने सतत कामगार वर्गाला नेस्तनाबून करण्याचे काम केले आहे.
शिवसेनेचा इतिहास हा मुंबईतील कामगार चळवळीला नष्ट करण्याचा इतिहास आहे. 1966 मध्ये शिवसेनेची स्थापनाच कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या पाठिंब्याने झाली होती, आणि कामगारांमध्ये फूट पाडण्याकरिता रचलेला हा डाव होता. कॉंग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पाठिंब्यामुळे त्यावेळी शिवसेनेला वसंतसेना असेही म्हटले जाई. गिरणी कामगारांनी शिवसेनेचा संप फोडण्याकरिता वापर करवला. बाळ ठाकरेंनी त्यांच्या मार्मिक या नियतकालिकात एकदा लिहिले होते की कम्युनिस्टांना संपवणे त्यांचे उद्दिष्ट आहे. मराठी माणसाच्या प्रतिनिधित्वाचा दावा करणारे ठाकरे वास्तवात मिल मालकांचे प्रतिनिधित्व करत होते. कॉंग्रेस सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने शिवसेनेने मुंबईत ‘राडा’ संस्कृती रुजवली. दुकाने फोडणे, हॉटेल जाळणे अशाप्रकारच्या कृत्यांनी लक्ष्य वेधण्याचे काम शिवसेनेने केले. त्या कामगार चळवळीला फोडण्यासाठी, जिने कामगारांकरिता अनेक अधिकार लढून मिळवले होते, भांडवलदार वर्गाने बाळ ठाकरे या एका प्रक्षोभक भाषणे करणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली भरकटवलेल्या युवकांच्या टोळीचा पुरा वापर करून घेतला.
शिवसेनेने कामगारांच्या मिटींगांमध्ये गोंधळ माजवणे चालू केले. सी.पी.आय.च्या दळवी बिल्डींग मधील कार्यालयावर केलेला हल्ला या हल्ल्यांपैकी पहिला होता. शिवसेनेच्या गुंडांनी ऑफिस मधल्या फाईल्स जाळल्या आणि फर्निचर फेकून दिले. टप्प्याटप्प्याने शिवसेना कामगार वर्गीय़ राजकारणावर हल्ला चढवत गेली. सी.पी.आय. चे भांडवलदार वर्ग धार्जिणे, दुरुस्तीवादी राजकारण जे वर्गसहयोगाचीच पाठराखण करत होते, शिवसेनेला आव्हान बनणे शक्य नव्हते.
1968 साली शिवसेनेने भारतीय कामगार सेना (बी.के.एस.) या ट्रेड युनियन विंगची स्थापना केली. बी.के.एस. ने वर्ग संघर्षाला विरोध केला आणि कामगार व मिलमालकांमध्ये “शांतता” स्थापित करण्याचे काम केले, थोडक्यात मिल मालकांच्या दलालाचे काम केले.
शिवसेनेच्या कामगार वर्गावरच्या हल्ल्याचे पुढचे पाऊल होते कामगार नेते कृष्णा देसाई यांच्यावरचा हल्ला. गिरणी कामगार युनियनचे उपाध्यक्ष असलेले कृष्णा देसाई हे महाराष्ट्र विधानसभेचे सी.पी.आय. चे आमदार होते. शिवसेनेच्या गुंडांनी 1967 मध्ये अगोदर एकदा निवडणूक प्रचारादरम्यान कृष्णा देसाईंवर हल्ला केला होता. ब्रिफकेसला ढालीसारखे वापरून कृष्णा देसाई जीव वाचवू शकले होते. देसाईंना माहित होते की ते शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत. देसाई सेनेच्या निशाण्यावर होते कारण ते एक दरारा असलेले ट्रेड युनियन नेते होते आणि गिरणगावच्या आसपासच्या इलाक्यात तळागाळात पोहोच असलेले नेते होते. सुरक्षेच्या काळजीने त्यांनी त्यांच्या कुटुंबाला अगोदरच त्यांच्या गावी रत्नागिरीला धाडले होते. 5 जून 1970 रोजी देसाई त्यांच्या एका खोलीच्या झोपडीत साथींसोबत बसलेले होते. पुढच्या दिवसाच्या कामांकरिता त्यांना पक्ष कार्यालयात बोलावणे आले होते. अशात शिवसेनेच्या गुंडांच्या एका गटाने त्यांच्यावर गुप्तीने हल्ला केला. त्यांच्या पाठीवर वार केला गेला आणि लिव्हर कापले गेले. आश्चर्यकारकरित्या ते एका मित्राच्या घरी पोहोचले, ज्याने त्यांना हॉस्पिटलला नेले, परंतु त्यांचा जीव वाचू शकला नाही. नंतर शिवसेनेच्या 16 सदस्यांना देसाइंच्या खुनासाठी शिक्षा झाली. त्यांच्या अंत्ययांत्रेत 25,000 जणांचा लोकसमुदाय शिवसेनेच्या विरोधात घोषणा देत सेनेचे बलस्थान असलेल्या शिवाजी पार्कावर मोर्चा घेऊन गेला. या मोर्चाला थंडावण्याचे काम सुद्धा सी.पी.आय.चे नेते श्रीपाद डांगे यांनीच केले आणि आपल्या पक्षाच्या गद्दारीच्या इतिहासाला पुढे चालवले. डांगेंच्या स्मृतीमध्ये निघालेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उद्धव ठाकरे हजर होते, ते असेच नाही!
1982 चा गिरणी कामगारांचा संप हा मुंबईतील संघटित कामगार वर्गाचा शेवटचा संघर्ष होता. लढाऊ ट्रेड युनियन नेते डॉ. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला. या लढ्यात शिवसेनेची भुमिका तीच होती जी या अगोदरच्या लढ्यांमध्ये होती, म्हणजेच धोकेबाजीची. गिरणी कामगारांमध्ये आपला प्रभाव वाढवण्याच्या उद्दिष्टाने शिवसेनेने स्वत:ची युनियन गिरणी कामगार सेना 1980 मध्ये स्थापन केली होती. नोव्हेंबर 1981 मध्ये एक दिवसाच्या संपानंतर मिलमालकांची संघटना आणि मिल्सची एकमेव मान्यताप्राप्त युनियन असलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ (आर.एम.एम.एस.) मध्ये गिरणी कामगार सेनेने वार्षिक बोनसचा करार करवला होता. मालक वर्गाकरिताच काम करणाऱ्या शिवसेनेने मालकांशी संगनमताने अशाप्रकारची आभास निर्माण करणारी आंदोलने सतत करवली आहेत. अजून मजुरी न वाढल्यास गिरणी कामगार सेनेने यानंतर दोन आठवड्यात बेमुदत संपाचा इशारा दिला होता. परंतु बाळ ठाकरेंनी कामगार मैदानात एका सभेमध्ये मुख्यमंत्री ए.आर. अंतुलेंनी दिलेल्या आश्वासनाच्या आधारावर संप मागे घेण्याचे आवाहन केले. कामगारांना गद्दारी लक्षात आली. त्यांना समजले की कॉंग्रेस-शिवसेनेने हातमिळवणी करून त्यांना धोका दिला आहे. कामगारांनी मैदान सोडले आणि डॉ. दत्ता सामंतांना लढ्याचे नेतृत्व स्विकारण्याचे आवाहन केले. बाळ ठाकरे, तेव्हाचे कॉंग्रेसचे शरद पवार आणि समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडीस यांनी संप फोडण्याकरिता युती केली. या तिघांनी शिवाजी पार्कातून कामगारांना संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले. परंतु कामगारांनी भांडवलदारांच्या या दलालांना नाकारले आणि संपात हिरीरीने सहभाग घेतला. या संपादरम्यान शिव”सैनिकां”नी सतत कामगारांच्या गेट-सभांमधे विघ्न आणण्याचे काम केले.
1992 मध्ये करवलेल्या दंगलींच्या आधारावर 1995 मध्ये जेव्हा शिवसेना-भाजपचे सरकार महाराष्ट्रात आले, तेव्हा “झोपडपट्टी पुनर्वसना”च्या नावाखाली त्यांनी कामगार वर्ग राहत असलेल्या झोपडपट्ट्य़ांच्या मोक्याच्या जागा मुंबईतील बिल्डरांना आणि जमीन व्यावसायिकांना कवडीमिलाने विकल्या. शिवसेना-भाजप सरकारने मिल-मालकांसोबत मिळून गिरण्यांच्या जमिनी सुद्धा विकण्याचा घाट घातला. या योजनेत दत्ता सामंताचा विरोध अडथळा बनत होता. गिरणीमालक, बिल्डर (ज्यांपैकी अनेक शिवसेना नेते होते) मिळून गुंडांना सुपारी दिली आणि दत्ता सामंतांच्या दिवसाढवळ्या हत्या केली गेली.
कामगारांच्या रक्तावर, त्यांना देशोधडीला लावून शिवसेना मुंबईवर राज्य करतेय. त्या पक्षाचं चरित्र कामगार वर्गाच्या विरोधी आणि मालकांची सेवा करणारे आहे. शिवसेनेने कामगार वर्गासोबत केलेला विश्वासघात काही केल्या विसरला जाऊ शकत नाही, काही केल्या त्याची भरपाई केली जाऊ शकत नाही. शिवसेनेचा हा काळा आणि खूनी इतिहास नेहमी गिरणी कामगारांचा आजही न संपलेला लढा, त्यांचे उध्वस्त झालेले जीवन, कामगार नेत्यांचे, कामगारांचे झालेले खून यांची आठवण मुंबईतील मिल्स च्या जागी उभ्या असलेल्या मॉल्स, टॉवर्स , उंच इमारती सतत करून देत राहतील. ह्या जखमा कधीही भरून न निघणाऱ्या आहेत.
भाजपला हरविण्याच्या नावाने क्षणात शिवसेनेचं कामगार वर्गविरोधी चरित्र विसरून शिवसेनेला पुरोगामी म्हणणाऱ्या, शिवसेनेकडे एक पर्याय म्हणून बघणाऱ्यांनी हे जाणून घेणे गरजेचे आहे की शिवसेनेला समर्थन करणे म्हणजे कामगार वर्गाच्या गद्दारांना समर्थन करणे, कामगार वर्गाचा विश्वास घात करणे. ज्या सी.पी.आय. ने नुकतेच अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेनेला समर्थन दिले आहे, ती सी.पी.आय. आता दुरूस्तीवादाच्या गटारात पोहून, आपल्याच शहीद नेत्यांचा आणि कामगारांचा इतिहास सवयीप्रमाणेच पायदळी तुडवून, भांडवलदार वर्गाच्या या फॅसिस्ट गुंडसेनेच्या चरणी लीन झाली आहे. कामगार वर्गाने अशा गद्दारांपासून तर विशेष सावध राहीले पाहिजे.
फॅसिझम म्हणजे भांडवलदार वर्गाने पोसलेला तो हिंस्त्र कुत्रा आहे जो आर्थिक संकटाच्या काळात कामगार वर्गाचे हिंस्त्र दमन करण्यासाठी भांडवलदार वर्गाने पोसलेला असतो. ही भुमिका संघ-भाजप आणि शिवसेना या दोन्ही संघटना निभावत आल्या आहेत. कॉंग्रेसचे शिवसेनेनेला तेव्हा आणि आजही असलेले समर्थन या पक्षांच्या भांडवली वर्गचरित्राची ग्वाहीच देते. तेव्हा या कामगारद्रोही गुंड शक्तींना संपवण्यासाठी कॉंग्रेस, सीपीआय सारख्या भांडवली पक्षांना नाकारून एक खरा कामगार वर्गीय पक्ष उभा करणे, हाच एकमेव पर्याय आहे.
कामगार बिगुल, ऑक्टोबर 2022