भाकपा (माले) लिबरेशन सारख्या पतित दुरुस्तीवादी पक्षात झालेले पोषण आणि कम्युनिझमविरोधी अमेरिकन साम्राज्यवादी प्रचाराच्या बौद्धिक खुराकीतून तयार झालेली
कविता कृष्णन: सर्वहारा वर्गाची नवीन गद्दार

✍आनंद

सर्वहारा वर्गाशी गद्दारी करण्याचे काम दुरुस्तीवादी पक्षांचे सर्वच नेते करत असले, तरी कविता कृष्णन यांनी सीपीआय(एमएल) लिबरेशन सोडल्यापासून कम्युनिझम आणि कामगार वर्गाच्या महान शिक्षकांवर ज्या पद्धतीने उघडपणे हल्ला चढवला आहे त्यावरून हे स्पष्ट आहे की ही गद्दारी अगदी टोकाला गेली आहे. परंतु तिला या टोकापर्यंत पोहोचवण्यात तिच्या पक्षाचा मोठा हात आहे, कारण त्या पक्षानेच ते भांडवली उदारवादी वातावरण निर्माण केले ज्यामध्ये कविता कृष्णन सारखी गद्दार जवळपास तीन दशके पक्षात राहिली आणि केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरोमध्येही जवळपास दशकभर टिकून राहिली.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की पक्षाने कृष्णन बाहेर पडल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि त्यांच्या दीर्घ सहवासाबद्दल व सक्रिय भूमिकेबद्दल कौतुक आणि आदर व्यक्त केला. कोणताही क्रांतिकारी सर्वहारा पक्ष गद्दारांना बाहेर काढून किंवा त्यांच्यापासून सुटका करून दुःख व्यक्त करत नाही, तर आनंद व्यक्त करून सुटकेचा निश्वास टाकतो. कविता कृष्णन सारखी निर्लज्ज गद्दार कम्युनिझम आणि क्रांतिकारी सर्वहारा वर्गाच्या गौरवशाली वारशावर चिखलफेक करत असतानाही तिच्याबद्दल ‘कौतुक’ आणि ‘आदर’ व्यक्त करण्यात कुठलीही कमतरता या पक्षाने ठेवली नाही यावरूनच देशातील सर्वात पतित झालेल्या या दुरुस्तीवादी पक्षाचे वास्तव काही प्रमाणात उघड होते. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर जेव्हा अनेक लोक कृष्णनच्या विश्वासघाताचा पर्दाफाश करत होते तेव्हा हा पक्ष तिच्या मदतीला धावून आला आणि ट्रोल्स म्हणून त्यांच्यावर टीका करू लागला! तसे, कविता कृष्णनसारख्या निर्लज्ज गद्दाराचे उघडपणे समोर येणे काही आश्चर्याची गोष्ट नाही. ज्याप्रमाणे सीपीआयसारखा मृतप्राय दुरुस्तीवादी पक्ष कन्हैया कुमारसारखा विदूषक निर्माण करू शकतो, त्याचप्रमाणे ‘लिबरेशन’ सारख्या दुरुस्तीवादी पक्षातून कविता कृष्णनसारखी कुटील गद्दार निर्माण होणे अपेक्षितच होते. विशेष म्हणजे, या पक्षाने आतापर्यंत कृष्णन यांच्या खोटारडेपणाचे उत्तर दिले नाही, फक्त एक मैत्रीपूर्ण तक्रार केली आहे की आता फॅसिझमशी लढण्याची वेळ आहे (निवडणूक युतीच्या मार्गाने!), इतिहासातील कबरी खोदण्याची नाही! यावरूनच आपण कामगारांनी सीपीआय (एमएल) लिबरेशनचे खरे चरित्र ओळखले पाहिजे. पण तरीही कविता कृष्णन नावाच्या या कामगार वर्गाच्या गद्दाराने कम्युनिझम आणि कामगार वर्गावर केलेल्या हल्ल्यांची तथ्य  आणि पुराव्यांसहित वास्तविकता जाणून घेऊ.

कविता कृष्णन यांनी फेकलेला शाब्दिक चिखल अमेरिकन साम्राज्यवादी दुष्प्रचाराच्या घाणीपासून बनलेला आहे.

कविता कृष्णन म्हणतात की, अलीकडच्या काळात त्यांनी सखोल अभ्यास (!) केला आहे, ज्यानंतर त्या या निष्कर्षाप्रत आल्या आहेत की सोव्हिएत युनियन आणि चीनच्या सर्वहारा राजवटींची गणना जगातील सर्वात क्रूर निरंकुश राजवटींमध्ये व्हायला हवी, ज्या अजूनही जगभर निरंकुश शक्तींसाठी एक मॉडेल म्हणून काम करतात. पण तिच्या दाव्यांकडे एक नजर टाकली तरी हे स्पष्ट होते की तिला ही सडलेली आणि खोटी बौद्धिक खुराक अमेरिकन साम्राज्यवादी दुष्प्रचाराच्या विशाल नेटवर्कमधून मिळाली आहे. आज सोव्हिएत युनियन आणि स्टॅलिनबद्दल ती जे काही बोलत आहे, ते अमेरिकन साम्राज्यवादी दुष्प्रचार तंत्र शीतयुद्धाच्या काळापासून सतत प्रसारित करत आले आहे. ट्रॉटस्की आणि ख्रुश्चेव्हसारख्या सर्वहारा वर्गाच्या गद्दारांच्या कृत्यांव्यतिरिक्त, रॉबर्ट कॉन्क्वेस्ट, सोलझेनित्सिन आणि रॉय मेदवेदेव सारख्या साम्राज्यवादी दलालांनी देखील या काल्पनिक असत्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

समकालीन काळाची गोष्ट करता, कविता कृष्णनच्या दाव्यांचे मुख्य स्त्रोत टिमोथी स्नायडर सारखे सेलिब्रिटी इतिहासकार आणि ॲन ॲपलबॉम आणि टॉम निकोल्स सारखे असे पुराणमतवादी प्रतिगामी लेखक आहेत ज्यांनी अफगाणिस्तान, इराक आणि लिबियावर अमेरिकन साम्राज्यवादी हल्ल्यांचे समर्थन केले होते. कविता कृष्णन निर्लज्जपणे या साम्राज्यवादी दलालांचे ट्विट तिच्या ट्विटर प्रोफाइलवरून नियमितपणे रि-ट्विट करते. लिबरेशनपासून फारकत घेण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या एक दिवस आधी, तिने सर्वहारा वर्गाचा आणखी एक गद्दार गोर्बाचेव्ह यांना श्रद्धांजली अर्पण करत व त्याचे गोडवे गात ॲपलबॉम आणि निकोल्सचे लेख शेअर केले. हा तोच गोर्बाचेव्ह आहे जो सोव्हिएत युनियनमधील कामगार वर्गाचा विश्वासघात करणाऱ्या सर्व दुरुस्तीवाद्यांचा शेवटचा दुवा होता आणि अत्यंत घृणास्पद व्यक्ती होता.

टिमोथी स्नायडरच्या बाबतीत बोलायचे तर कोणताही गंभीर बुर्झ्वा इतिहासकारसुद्धा त्याला गांभीर्याने घेत नाही आणि 2010 मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या ‘ब्लडलँड: युरोप बिटवीन हिटलर आणि स्टॅलिन’ या पुस्तकात त्याने केलेले हास्यास्पद दावे आणि खोटेपणा अमेरिकन इतिहासकार ग्रोव्हर फर यांनी आपले पुस्तक ‘ब्लड लाईज’मध्ये उघड केला आहे. कविता कृष्णनच्या फेसबुक वॉलवर जर कोणी स्नायडर, ॲपलबॉम किंवा निकोल्स सारख्या अमेरिकन साम्राज्यवादी दलालांचे वास्तव उघड केले तर तिच्याकडे उत्तर नसते आणि अशा लोकांना ब्लॉक करण्याची धमकीसुद्धा देते. यावरून देखील हे स्पष्ट होते की ती आता केवळ जाणीवपूर्वक गद्दारीच नव्हे तर निर्लज्ज बेइमानी आणि उद्धटपणा करण्यापर्यंत घसरली आहे.

भारतात कविता कृष्णन यांचे प्रेरणास्थान बालगोपाल यांच्यासारखे मानवाधिकार कार्यकर्ते आणि विचारवंत आहेत, जे एकेकाळी माओवाद्यांचे हितचिंतक होते, पण नंतरच्या काळात त्यांचा मार्क्सवादापासून भ्रमनिरास झाला आणि सर्व प्रकारच्या हिंसाचारावर त्यांनी निरपेक्षपणे टीका केली. मार्क्सवादाचा सर्वात मोठा दोष म्हणजे तो मानवी स्वभाव समजत नाही असे बालिश आणि हास्यास्पद दावे त्यांनी केले! असा मूर्खपणाचा आणि अवैज्ञानिक दावा करण्यासाठी पुरेसे मूर्ख असणे आवश्यक आहे. मानवी स्वभाव ही नैसर्गिक गोष्ट नाही आणि मार्क्सवाद दाखवतो की मानवी स्वभाव हा समाजाची प्रकृती आणि चरित्रापासून स्वतंत्र काहीही असू शकत नाही. एका वर्गीय समाजात सामान्यपणे वर्गीय प्रवृत्ती आणि चरित्राबद्दलच बोलले जाऊ शकते. खाणे, पिणे आणि मलमूत्र त्यागणे या नैसर्गिक स्वभावा किंवा ‘इन्स्टिंक्ट’ व्यतिरिक्त, मानवी बाळ इतर काहीही जन्मतः घेऊन येत नाही. इतर सर्व मूल्ये आणि विचार संगोपनाच्या वेळीच त्याच्यामध्ये समाजातच तयार होतात, ज्या समाजातील (आदिम टोळी समाज वगळता) सर्वात मोठे वास्तव हे असते की तो वर्गांमध्ये विभागलेला असतो. हा मूर्ख बालगोपाल आता आणखी एका मूर्ख आणि गद्दार कविता कृष्णनसाठी प्रकाशस्तंभ बनला आहे यात आश्चर्य नाही. समान पंख असलेले पक्षी एकमेकांना शोधतातच.

आता कविता कृष्णन यांनी काय दावे केले आहेत आणि त्यांचे सत्य काय आहे ते पाहू.

कविता कृष्णन यांच्या दाव्यांची सत्यता

‘मार्क्सवादावर चिखलफेक करा’ या मोहिमेअंतर्गत कविता कृष्णन यांची रणनीती, स्टॅलिनच्या काळात सोव्हिएत युनियनमध्ये झालेल्या अत्याचारांबद्दल अमेरिकन साम्राज्यवादी खोटेपणाची पोपटाप्रमाणे पुनरावृत्ती करण्याची, तसेच सध्याच्या चीनला कम्युनिस्ट म्हणून त्याच्या सामाजिक फॅसिस्ट आणि साम्राज्यवादी दुष्कृत्त्यांना कम्युनिझमच्या नावाने खपवण्याची आहे. इतकेच नाही तर ती टिमोथी स्नायडरची युक्ती वापरून हास्यास्पदपणे सध्याच्या युक्रेन युद्धामुळे युरोपमध्ये तयार झालेल्या परिस्थितीची दुसऱ्या महायुद्धातील परिस्थितीशी तुलना करते आणि पुतीन आणि स्टॅलिन यांना एकाच गटात टाकते जेणेकरून पुतिनच्या कारवायांच्या आडून संपूर्ण कम्युनिझमला बदनाम करता येईल. या प्रक्रियेत, ती “साम्राज्यवाद” आणि “फॅसिझम” सारखे शब्द अत्यंत चलाख रीतीने वापरते, जे कि मार्क्सवादाच्या मूलभूत संकल्पनांबद्दलचे तिचे आणि अज्ञान आणि मूर्खपणाच दर्शवते.

कविता कृष्णन करत असलेल्या बहुतांश दाव्यांचे उत्तर अनेक मार्क्सवादी आणि लेखक-इतिहासकार जसे की लुडो मार्टेन्स, ग्रोव्हर फर, मारियो सुसो यांनी फार पूर्वीच दिलेले असले, तरी या खोटारडेपणाच्या पुंजक्यांचा परिणाम सोव्हिएत युनियनच्या इतिहासाबद्दल अज्ञात, बेसावध परंतु गंभीर लोकांवर पडतो त्यामुळे त्यांचे मुद्देसूद उत्तर देणे गरजेचे आहे.

दावा क्रमांक 1: ‘स्टालिनच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत युनियनमध्ये एक सर्वसत्तावादी राज्य अस्तित्वात होते

स्टालिनकालीन सोव्हिएत राज्याला हिटलरकालीन जर्मनीप्रमाणे सर्वसत्तावादी म्हणण्याची आणि स्टॅलिनची तुलना हिटलरशी करण्याची खेळी अमेरिकन साम्राज्यवादाने शीतयुद्धाच्या काळापासून अवलंबली आहे. याची सुरुवात अमेरिकन साम्राज्यवादाची बौद्धिक एजंट हाना आरेन्ट हिने केली होती. सर्वसत्तावाद हा शब्द तिनेच रचला आणि सांगितले की एकीकडे भांडवली लोकशाही आहे आणि दुसरीकडे सर्वसत्तावाद आहे, ज्याच्या दोन आवृत्त्या आहेत: फॅसिझम आणि कम्युनिझम. तेव्हापासून या मूर्खपणाची पुनरावृत्ती नोम चॉम्स्की सारख्या अराजकतावाद्यांपासून कविता कृष्णन सारखे सर्वहारा वर्गाचे गद्दार करत आहेत. ते हे लक्षात घेत नाहीत की भांडवली लोकशाही हे भांडवलदारांच्या हुकूमशाहीचेच दुसरे नाव आहे आणि सर्वहारा वर्गाचे अधिनायकत्व म्हणजे सर्वहारा लोकशाही आहे, ती मोठ्या कामकरी जनतेसाठी लोकशाही आणि लुटारू, व्यापारी, कंत्राटदार, दलाल, श्रीमंत कुलक आणि धनी शेतकरी यांच्यासाठी हुकूमशाही आहे. थोडक्यात, भांडवली लोकशाही म्हणजे अल्पसंख्याकांसाठी लोकशाही आणि बहुसंख्यांसाठी हुकूमशाही, तर सर्वहारा अधिनायकत्व अर्थात सर्वहारा लोकशाही बहुसंख्य श्रमिक लोकांसाठी जास्तीत जास्त स्वातंत्र्य आणि लोकशाही आहे आणि लुटणाऱ्या अल्पसंख्याकांसाठी हुकूमशाही आहे.

हिटलर आणि स्टॅलिनचे एकत्रितपणे हुकूमशहा असे वर्णन करणार्‍या खोटारडेपणाच्या युक्तीने, अमेरिकन साम्राज्यवाद आणि त्याने फेकलेल्या तुकड्यांवर पोसले जाणारे बुद्धिजीवी आणि लेखक एकाच वेळी दोन शिकार करण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे हिटलरची हुकूमशाही हे भांडवली हुकूमशाहीचे अत्यंत रानटी रूप असल्याच्या सत्यावर पांघरूण घालून भांडवलशाहीला वाचवले जाते, तर दुसरीकडे सर्वहारा वर्गाची हुकूमशाही एका व्यक्तीची हुकूमशाही म्हणून मांडून समाजवादाबद्दल संभ्रम पसरवला जातो.

सत्य तर हे आहे की स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत युनियनने तीन दशकांत जी अद्भूत सामाजिक-आर्थिक कामगिरी केली ती एका व्यक्तीच्या हुकूमशाहीत शक्यच होऊ शकली नसती. सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचे सर्व निर्णय स्टॅलिनच्या मतानुसार घेतले जायचे हे पूर्णपणे खोटे आहे. सत्य हे आहे की त्या काळात पक्षांतर्गत विविध मुद्द्यांवर वादविवाद आणि मतदानाच्या माध्यमातून निर्णय घेतले जात होते, जसे की देशांतर्गत समाजवादाचा मुद्दा आणि सामूहिकीकरणाचा मुद्दा. अशा विविध मुद्द्यांवर बहुमताने निर्णय झाल्यानंतरही जे पक्षांतर्गत गटबाजी करून बहुमताच्या विरोधात जात असल्याचे आणि तोडफोडीच्या कारवायासुद्धा करत असल्याचे आढळून आले, अशांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आणि त्यातील अनेकांना त्यांनी चूक असल्याचे मान्य केल्यानंतर पक्षात परतदेखील घेण्यात आले. उदाहरणार्थ झिनोव्हिएव्ह, कामेनेव्ह, एवोदकिमोव्ह, प्रिओब्राझिंस्की आणि राडेक इ. अशा प्रकारे पक्ष हा एका व्यक्तीच्या इशार्‍यावर चालणारा निर्जीव पक्ष नव्हता.

हे देखील खरे आहे की बोल्शेविक पक्षात नोकरशाही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि खुशामत करण्याची प्रवृत्ती देखील होती. पण अशा प्रवृत्तींना आणि सवयींना चालना देण्याऐवजी स्टॅलिनने त्यांच्याविरुद्ध संघर्ष पुकारला आणि पक्षांतर्गत लोकशाहीला चालना देण्यावर मोठा भर दिला हे दाखवणारे बरेच लिखित पुरावे उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, यंग कम्युनिस्ट लीगच्या आठव्या काँग्रेसपूर्वी 16 मे 1928 रोजी ‘खालपासून टीका संघटित करा’ या भाषणात स्टॅलिन म्हणतात, “कम्युनिस्ट नोकरशहा हा सर्वात धोकादायक प्रकारचा नोकरशहा असतो. का? कारण तो आपली नोकरशाही पक्षाच्या सदस्यत्व कार्डाखाली लपवतो. आणि दुर्दैवाने, आपल्यात असे कम्युनिस्ट नोकरशहा मोठ्या संख्येने आहेत.”… “अशाप्रकारे पक्षाचे तात्काळ कार्य आहे: नोकरशाहीविरुद्ध तीव्र संघर्ष करणे, खालून टीका संघटित करणे आणि ती ओळखून त्याच्या प्रकाशात आपल्या कमतरता दूर करण्यासाठी व्यावहारिक निर्णय घेणे.” ही गोष्ट निराळी की नोकरशाहीला लगाम घालण्याच्या त्यांच्या संघर्षात स्टॅलिन पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत. हे समजून घेणे देखील महत्त्वाचे आहे की समाजवादी समाज हा साम्यवादी समाज आणि भांडवलशाही समाज यांच्यातील दीर्घ संक्रमणाचा काळ असतो, ज्यात बुर्झ्वा वर्ग आणि सर्वहारा वर्ग यांच्यातील संघर्ष नवीन आणि अत्यंत जटिल स्वरूपात सुरू असतो, समाजातील मानसिक श्रम आणि शारीरिक श्रम यांच्यातील फरक अद्याप संपलेला नसतो आणि भांडवली विशेषाधिकारांचा विचार समाजात अजूनही अस्तित्वात असतो. विचारधारा आणि संस्कृतीच्या पटलावर बुर्झ्वा विचारांचा प्रभाव खाजगी मालमत्तेचा नाश करून संपत नाही. त्यामुळे स्टॅलिन किंवा त्यांच्याआधी लेनिन कायदा पारित करून नोकरशाही संपुष्टात आणू शकत नव्हते. प्रश्न त्याविरुद्ध सतत संघर्ष चालू ठेवण्याचा आणि राजकीय वर्गसंघर्ष चालू ठेवण्याचा होता. स्टॅलिनने हा संघर्ष लाक्षणिकरित्या चालवला, परंतु ते हा संघर्ष सैद्धांतिकरीत्या आणि सुसंगतपणे चालवू शकले नाही. परंतु जिथपर्यंत स्टॅलिन किंवा सोव्हिएत पक्ष हुकूमशहा किंवा सर्वसत्तावादी असण्याचा प्रश्न आहे, हा पूर्णपणे साम्राज्यवादी प्रसारमाध्यमांचा निंदनीय कुत्साप्रचार आहे. ज्यानेही सोव्हिएत युनियनबद्दलचे बाजारू बुद्धिजीवींचे नव्हे तर गंभीर इतिहासकारांचे लेखन वाचले आहे, त्यांना हे माहित आहे.

अशाच पद्धतीने स्टॅलिन यांनी पक्षाव्यतिरिक्त समाजातसुद्धा लोकशाही वाढविण्यासाठी संघर्ष केला. उदाहरणार्थ, 1936 च्या राज्यघटनेचा मसुदा तयार करताना सोव्हिएत सदस्यांसाठी थेट निवडणुका घेण्याच्या, कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांशिवाय इतर शहरी गटांद्वारे उमेदवार उभे केले जाण्याच्या, निवडणूक प्रचार आणि सार्वजनिक सभांमध्ये उमेदवार आणि पक्षाच्या व्यक्तींशी प्रश्नोत्तरे करण्याच्या आणि निवडणुकीसाठी गुप्त मतदानाच्या बाजूने ते ठामपणे उभे राहीले. आणि स्टॅलिन हे सर्व त्यावेळी करत होते जेव्हा देशाच्या आतून व बाहेरून सुरु असलेले विविध कटकारस्थाने आणि नंतर दुसऱ्या महायुद्धाने पक्ष व समाजात लोकशाही वातावरण बनवण्याच्या प्रयत्नात अनेक अडथळे आणले होते.

दावा क्रमांक 2: ‘स्टॅलिनने हिटलरशी युती केली, ज्यामुळे महायुद्धात लाखो लोक मरण पावले

स्नायडरच्या या हास्यास्पद दाव्यालासुद्धा कविता कृष्णन पोपटाप्रमाणे पुनरावृत्त करते की महायुद्धापूर्वी स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत युनियनने हिटलरच्या नेतृत्वाखालील जर्मनीशी करार केला ज्यामुळे पोलंड, बेलारूस, युक्रेन आणि तीन बाल्टिक देशांतील लाखो लोकांचा बळी गेला. सर्व ट्रॉटस्कीवादी आणि कम्युनिस्ट विरोधी प्रचारकांप्रमाणे, कृष्णन यांनीसुद्धा या दाव्याचे समर्थन करण्यासाठी मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप कराराला संदर्भापासून तोडून प्रस्तुत केले. स्टॅलिन-विरोधी साम्राज्यवादी दुष्प्रचाराप्रमाणे तिनेसुद्धा अतिशय चलाखीने ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका यांसारख्या साम्राज्यवादी देशांनी केलेल्या फॅसिस्टांच्या तुष्टीकरणाच्या दीर्घ इतिहासाला गायब करून टाकले, तसेच एकाकी असूनही फॅसिझमच्या आसन्न धोक्याला सामोरे जाण्यासाठी सोव्हिएत संघाने या पाश्चिमात्य साम्राज्यवादी देशांशी मिळून एक सामूहिक सुरक्षा करार पूर्णत्वास नेण्यासाठी जे अथक प्रयत्न केले त्याची चर्चाही संपूर्णपणे गायब केली. इतिहासातील वस्तुस्थिती अशी आहे की 1936 मध्ये जर्मनी, इटली आणि जपानची फॅसिस्ट युती खुल्या स्वरूपात अस्तित्वात आली होती. इटलीने 1936 मध्येच इथिओपियावर आक्रमण केले होते. सोव्हिएत युनियनने प्रस्ताव देऊनही, इटलीविरुद्ध कुठलीही प्रभावी सामूहिक कारवाई करण्यात आली नाही. 1938 मध्ये, नाझींनी ऑस्ट्रिया आणि चेकोस्लोव्हाकियावर कब्जा केला. अशाप्रकारे नाझी सोव्हिएत युनियनच्या सीमेकडे वेगाने पुढे जात होते. अशा परिस्थितीत, फॅसिझमच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सामूहिक पुढाकार घेण्याऐवजी, पाश्चिमात्य शक्ती हिटलरला सोव्हिएत युनियनवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देण्यात गुंग होत्या. 29-30 सप्टेंबर 1938 रोजी ब्रिटीश पंतप्रधान चेंबरलेन आणि फ्रेंच पंतप्रधान दलादिए यांनी हिटलर आणि मुसोलिनी यांची म्युनिकमध्ये भेट घेतली आणि प्रसिद्ध ‘मुनिक करारा’वर स्वाक्षरी केली, ज्या अंतर्गत चेकोस्लोव्हाकियाचे काही महत्त्वाचे क्षेत्र विभाजित करून जर्मनीला देण्यात आले. त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्सने स्वतंत्रपणे जर्मनीशी अनाक्रमणाचा करार केला आणि सोव्हिएत युनियनवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिली. एवढेच नाही तर स्पॅनिश प्रजासत्ताक चिरडण्यासाठी त्यांनी जर्मन आणि इटालियन आक्रमकांना साथ दिली.

1939 पर्यंत हे स्पष्ट झाले होते की दुसरे महायुद्ध कधीही सुरू होऊ शकते. मे 1939 मध्ये जपानने सोव्हिएत युनियनवर हल्ला केला. अगदी याच वेळी, जेव्हा साम्राज्यवादी असा विचार करत होते की हिटलर पूर्वेकडे चढाई करेल आणि सोव्हिएत युनियन दोन्ही बाजूंनी अडकून पडून काही दिवसांत कोसळेल, तेव्हा स्टॅलिनने मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप कराराच्या रूपात जर्मनीशी अनाक्रमणाचा करार करून अशी मुत्सद्दी खेळी केली की साम्राज्यवादी अवाक झाले. तसे बघायला गेले तर हा असा एक राजकीय मास्टरस्ट्रोक होता ज्यासाठी जागतिक सर्वहारा वर्गाचे नेते स्टॅलिन यांचे कौतुक केले पाहिजे कारण याद्वारे सोव्हिएत युनियनने साम्राज्यवाद्यांच्या दोन गटांना आपापसात लढण्यात व्यस्त केले आणि युद्धाच्या तयारीसाठी अमूल्य असा दोन ते अडीच वर्षाचा कालावधी मिळाला.

जिथपर्यंत पोलंडचा संबंध आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे की सोव्हिएत सैन्याने पोलंडची सीमा नाझींच्या हल्ल्याच्या 16 दिवसांनंतर त्यावेळी ओलांडली जेव्हा ते राज्य म्हणून अस्तित्वात नव्हते आणि फक्त तेच क्षेत्र ताब्यात घेतले जे ऑक्टोबर क्रांतीनंतर पोलंडच्या राज्यकर्त्यांनी बळकावले होते. कविता कृष्णन अमेरिकन साम्राज्यवादी प्रचारतंत्राच्या एवढ्या नशेत आहेत की त्यांना हे सुद्धा लक्षात नाही की हिटलरच्या बलाढ्य फॅसिस्ट सैन्याचा निर्णायक पराभव स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली रेड आर्मीच्या सैनिकांनी रशियन जनतेला सोबत घेऊन स्टॅलिनग्राडच्या रस्त्यावर त्यांच्या अतुलनीय शौर्याने, पराक्रमाने आणि अफाट बलिदान देऊन केला.

दावा क्रमांक 3: ‘सत्तेत राहण्यासाठी स्टॅलिनने पक्षातील वरच्या नेतृत्वाला नष्ट केले

हा दावा देखील नवीन नाही आणि त्याचे धागे 1956 मध्ये सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या 20 व्या कॉंग्रेसमध्ये झालेल्या ख्रुश्चेव्हच्या गुप्त भाषणाशी जोडलेले आहेत. ग्रोव्हर फर यांनी त्यांच्या ‘ख्रुश्चेव्ह लाईड’ (‘खोटा ख्रुश्चेव्ह’) या पुस्तकात सोव्हिएत अभिलेखागाराच्या आधारे ख्रुश्चेव्हचे सर्व खोटे दावे उघड केले आहेत. सत्य हे आहे की, 1 डिसेंबर 1934 रोजी पक्षाचे प्रमुख नेते किरोव्ह यांच्या हत्येनंतर, सोव्हिएत सत्ता उलथून टाकण्याच्या उद्देशाने दहशतवादी आणि विध्वंसक कारवाया करण्याचे डावपेच समोर येऊ लागले होते. खरंतर, ट्रॉट्स्कीच्या नेतृत्वात 1932 मध्ये ट्रॉटस्कीवादी, झिनोव्हिएववादी आणि इतरांद्वारे एक गुप्त गट तयार करण्यात आला होता, ज्याचे उद्दिष्ट दहशतवादी कृत्ये करणे आणि बोल्शेविक नेत्यांची हत्या करून उठावाची तयारी करणे हे होते. 1980 नंतर हार्वर्ड युनिव्हर्सिटीने सार्वजनिक केलेल्या ट्रॉटस्की अभिलेखागाराच्या आधारे सुद्धा हा गट तयार करण्यात आला होता हे सिद्ध झाले आहे. हे खरे आहे की 1936-38 दरम्यान सोव्हिएत सत्तेविरुद्धचा कट उधळून लावण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अटकसत्र करण्यात आले, अनेकांना फाशीची शिक्षा झाली आणि अनेकांना पक्षातून काढून टाकण्यात आले. या मोहिमेच्या तडाख्यात अनेक निष्पाप लोकही आलेत, हे खरे आहे. पण ते पक्षाचे किंवा स्टॅलिनचे जाणीवपूर्वक अवलंबलेले धोरण म्हणून मांडणे म्हणजे इतिहासासोबत प्रतारणा करणे आहे. किंबहुना, स्टॅलिन यांना या अतिरेकांची माहिती होताच त्यांनी ताबडतोब त्यांना रोखण्याचे आणि असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. या अतिरेकांचे नेतृत्व करणारे सोव्हिएत पोलिस एनकेव्हीडीचे प्रमुख येझोव्ह यांची जागा एनकेव्हीडीचे प्रमुख म्हणून लॅव्हरेन्टी बेरिया यांनी घेतली, त्यानंतर अतिरेक कमी झाला. येझोव्हला अटक करून खटला चालवला गेला आणि 1940 मध्ये त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. हा समाजवादी समाजात चालू असलेला वर्गसंघर्ष होता आणि वर्गसंघर्षाच्या प्रक्रियेत प्रत्येक गोष्ट योजनाबद्ध पद्द्धतीने, एखाद्या रात्रीभोजप्रमाणे किंवा रेशमाच्या कलाकारीप्रमाणे नसते. भांडवलशाही क्रांत्यांच्या काळात यापेक्षाही भयंकर अतिरेक आणि हिंसाचार झाला. पण जेव्हा सर्वहारा क्रांतीचा विचार केला जातो तेव्हा ते प्रेमगीतासारखे मऊ आणि नाजूक असण्याची अपेक्षा केली जाते! यापेक्षा मूर्खपणा आणखी काय असू शकतो?

मॉस्को खटल्यांबद्दल बोलायचे झाल्यास हे खटले विविध देशांचे राजदूत, पत्रकार आणि अनेक लेखकांच्या उपस्थितीत चालवले गेले होते. त्यांच्यापैकी बर्‍याच जणांनी नंतर हे खटले योग्य असल्याची आणि गुन्हेगारांचे कबुलीजबाब अचूक असल्याची बाब स्वीकारली होती. यापैकी एडवर्ड डेव्हिस हे त्यावेळी सोव्हिएत युनियनमध्ये अमेरिकेचे प्रमुख राजदूत आणि स्वतः वकील होते; डी.एन. प्रिंट हे ब्रिटनचे राजदूत आणि जगप्रसिद्ध वकील होते; अ‍ॅना लुई स्ट्राँग एक अमेरिकन लेखिका होती ज्यांना 1949 मध्ये सोव्हिएत युनियनमधून निष्कासित करण्यात आले होते, ज्यांनी ‘स्टालिन युग’ या त्यांच्या पुस्तकात या खटल्यांच्या सत्यतेची पुष्टी केली आहे.

दावा क्रमांक 4: ‘युक्रेन आणि सोव्हिएत युनियनच्या इतर भागांतील लाखो शेतकऱ्यांच्या मृत्यूला स्टॅलिन जबाबदार होता

हा दावासुद्धा खूप जुना आहे की सोव्हिएत युनियनमध्ये 1929 पासून सुरू झालेल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सामूहिकीकरणाची मोहीम आणि एक वर्ग म्हणून कुलकांचा परजीवीं वर्ग नष्ट करण्याच्या मोहिमेमुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि त्याला स्टालिन थेट जबाबदार होते. परंतु लुडो मार्टेन्स आणि अ‍ॅना लुई स्ट्राँग सारख्या लेखकांनी या खोटेपणाचे खंडन आधीच केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्टॅलिनला क्रूर आणि हिंसक माणूस म्हणून चित्रित करण्यासाठी मृतांचा आकडा निर्लज्जपणे वाढवून सांगितल्या जातो. असे करून सामूहिकीकरणाच्या काळात सुरू असलेल्या तीव्र वर्गसंघर्षाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले जाते. ही उलथापालथीची प्रक्रिया ढोबळपणे दोन टप्प्यांतून जाते. पहिल्या टप्प्यात अंदाजापेक्षा जास्त शेतीचे सामूहिकीकरण झाल्यामुळे जी अराजकता पसरली होती, त्याला दुसऱ्या टप्प्यात दुरुस्त करण्यात आले होते. या दुसऱ्या टप्प्यात कुलकांनी वर्ग म्हणून आपले अस्तित्व वाचवण्यासाठी सोव्हिएत सत्तेविरुद्ध उठाव केला. त्यांनी उभारलेल्या सशस्त्र पथकांनी ठिकठिकाणी उठाव केला, दहशतवादी कारवाया केल्या, पक्षाने पाठवलेले अनेक कम्युनिस्ट मारले गेले. सामूहिकीकरणाच्या प्रक्रियेला आळा घालण्यासाठी, उत्पादनाची साधने मोठ्या प्रमाणावर नष्ट केली गेली जेणेकरून सामूहिक शेती सुरूच होऊ नये. उभी पिके जाळली गेली, इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर कुलकांकडून अफवासुद्धा पसरवल्या गेल्या, राजकीय प्रचार करण्यात आला, शेतकऱ्यांची निरक्षरता, सांस्कृतिक मागासलेपणा, अंधश्रद्धा आणि धार्मिक श्रद्धेचा पुरेपूर फायदा उठवून त्यांना बोल्शेविकांविरुद्ध भडकावण्यात आले. अशा परिस्थितीत प्रतिगामी कुलक-धनी शेतकरी वर्गाचे दमन केले गेले, जे कोणत्याही समाजवादी सत्तेसाठी अत्यावश्यक आहे. माओने म्हटल्याप्रमाणे क्रांती ही डिनर पार्टी किंवा रेशमी कलाकारी नाही तर वर्गयुद्ध आहे. या नग्न सत्यापासून तोंड फिरवणारा व्यक्तीच क्रांतिकारी हिंसेने व्यथित होऊन हिंसेला निरपेक्षपणे विरोध करू शकतो.

जिथपर्यंत युक्रेनमध्ये दुष्काळामुळे लाखो लोकांच्या मृत्यूचा प्रश्न आहे, तर या संदर्भात लुडो मार्टेन्सने दाखवून दिले आहे की धान्याचा तुटवडा नक्कीच होता, परंतु दुष्काळाची कथा पूर्णपणे रचलेली आहे, ज्यामागे हिटलरची प्रचार यंत्रणा आणि विल्यम हर्स्टने अमेरिकेत स्थापन केलेल्या ‘पिवळ्या पत्रकारिते’चे साम्राज्य होते.

दावा क्रमांक 5: सध्या सुरू असलेल्या युक्रेन युद्धातग्लोबल लेफ्ट’ (?!!) रशियन साम्राज्यवादाची बाजू घेत आहे.

रशियाच्या साम्राज्यवादी हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या संदर्भात कविता कृष्णन जगभरातील डाव्यांना न थकता दूषणे देत आहे की ते रशियाची बाजू घेत आहेत आणि युक्रेनच्या जनतेला साथ देत नाहीत. तिच्या खोटेपणाला प्रामाणिक दाखवण्यासाठी ती ‘ग्लोबल लेफ्ट’ सारखे शब्दप्रयोग करत आहे, जणू काही असा एकसंध समुदाय अस्तित्वात आहे. हे खरे आहे की काही कम्युनिस्ट पक्ष (विशेषत: दुरुस्तीवादी पक्ष) आणि तथाकथित डाव्या बुद्धिजीवींनी रशियन हल्ल्यासाठी रशियाला पुरेसे जबाबदार धरले नाही आणि ते अमेरिकन साम्राज्यवादाला त्यांचे मुख्य लक्ष्य बनवत आहेत. परंतु हेही खरे आहे की, युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धासाठी बहुतांश गंभीर कम्युनिस्ट क्रांतिकारी गट-संघटना आणि पक्षांनी अमेरिकन साम्राज्यवादासोबतच रशियन साम्राज्यवादालाही कठड्यात उभे केले आहे आणि या युद्धाला दोन साम्राज्यवादी छावण्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेचा परिणाम म्हणून बघितले आहे. परंतु कदाचित कविता कृष्णन अमेरिकन साम्राज्यवादाचा आवडता डावा चेहरा म्हणून जागतिक स्तरावर प्रस्थापित होण्याचे स्वप्न पाहत आहे! हे एक कारण असू शकते ज्यामुळे त्या रशियन आणि चिनी साम्राज्यवादावर तर बरेच काही बोलतात परंतु अमेरिकन साम्राज्यवादाच्या कारवायांवर निर्लज्जपणे पांघरूण घालतात.

कविता कृष्णन यांनी व्यक्त केलेले उदारमतवादी (बुर्झ्वा) लोकशाहीप्रतीचे प्रेम आणि उदारमतवादी गटामध्ये आनंदाची लाट!

कविता कृष्णन यांनी पक्ष सोडण्याच्या निर्णयामागे उद्धृत केलेल्या तीन कारणांपैकी एक कारण उदारमतवादी (वाचा बुर्झ्वा/भांडवली) लोकशाहीचे रक्षण करणे हे सांगितले आहे. उदारमतवादी लोकशाहीवरील तिच्या या अपार प्रेमासाठी सर्व उदारमतवादी, डावे-उदारमतवादी आणि उदारमतवादी-डावे कविता कृष्णन यांचे अभिनंदन करत आहेत. पक्षात असतानाही ती याच गटाच्या जवळ होती, पण आज तिने या गटात पूर्णपणे सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच एका मुरलेल्या दुरुस्तीवाद्याप्रमाणे, ती ‘लोकशाही’ हा शब्द ‘सर्वहारा’ किंवा ‘भांडवली’ या विशेषणाशिवाय वापरते आणि फॅसिझमच्या विरोधात त्याचे रक्षण करण्याची शपथ घेते. अशातच

अपूर्वानंद आणि अशोककुमार पांडेसारखे घोर कम्युनिस्टविरोधी पतित लेखक-बुद्धिजीवी तिची प्रशंसा करत आहे यात काही नवल नाही.

कविता कृष्णन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिने माओवादी चीनबद्दल अजून अभ्यास केलेला नाही. म्हणून, चीनवर हल्ला करताना, ती मोठ्या चलाखीने चीनच्या सध्याच्या दुरुस्तीवादी राज्याच्या निरंकुश चारित्र्याचा उल्लेख करून मार्क्सवादावर हल्ला करते. माओकालीन चीनबद्दल जाणून घेण्यासाठी एडगर स्नो, विल्यम हंटन आणि स्टुअर्ट श्रॅम यांसारख्या प्रामाणिक लेखकांची पुस्तके वाचण्याऐवजी ती अमेरिकेच्या साम्राज्यवादी स्त्रोतांवर अवलंबून आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. असो, अशा बौद्धिक खुज्या व्यक्तीकडून कायच अपेक्षा केली जाऊ शकते जी ‘आयटम सॉन्ग’ला स्त्रीमुक्तीचा मार्ग म्हणून पाहते आणि ‘सरकाय लो खटिया’ सारख्या गाण्यांना स्त्रियांच्या लैंगिकतेची अभिव्यक्ती मानते? अशी व्यक्ती सीपीआय(एमएल) लिबरेशन सारख्या पतित झालेल्या दुरुस्तीवादी संघटनेतच इतकी वर्षे राहू शकली असती आणि आता ती प्रतिगामी छावणीत उभी राहून मार्क्सवाद आणि सर्वहारा वर्गाला कलंकित करण्याचा प्रयत्न करत असेल तर यात नवल काही नाही. कविता कृष्णन यांनी स्वतःसाठी अस्मितावाद, एनजीओ राजकारण आणि साम्राज्यवादाची बौद्धिक दलाली करण्याचा मार्ग उघडला आहे आणि तोच मार्ग अशा पतित लोकांसाठी योग्य आहे. सर्वहारा वर्गाकडे अशा लोकांसाठी घृणेशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही.

(अनुवाद: जयवर्धन)
(मूळ लेख: मजदूर बिगुल, ऑक्टोबर 2022)

कामगार बिगुल, नोव्हेंबर 2022